मनोरंजन

⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️ 🍁भाग दहा 🍁

⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️

🍁भाग दहा 🍁

आज सकाळ पासूनच माईची गडबड चालू होती . रमाकाकुला मदतीला बोलवलं . स्वयंपाक तर रमाकाकुच करत असे पण उद्या पाहुणे येणार म्हणून जोरात तयारी सुरू होती . रव्याचे , बेसनाचे लाडू , चिवडा , पाकातल्या पुऱ्या आणि काय काय ..शिवाय उद्या आमरस आणि पुरणपोळी !सत्या गमतीत म्हणाला सुध्दा ‘ माई ..एका वर्षाचं एक दिवसांत खायला नाही घालायचं त्यांना ..आणि ते फक्त मन्याला बघायला येणार आहेत ..लगेच लग्न लावायचा तर विचार नाही ना तुझा ..’

‘ तुझ्या तोंडात साखर पडू दे रे बाबा ..’

‘ का गं .. तुझा पांडुरंग कंटाळला का सारखी साखर खाऊन .. काही झालं की लगेच वाटीत त्याच्यापुढे साखर ठेवतेस ..पण एक बरं आहे फार अपेक्षा नसते त्याची माणसासारखी ..चिमुटभर साखरेवर पण खुश रहातो ‘

‘ त्याला काय चिमुटभर आणि काय पोतंभर ..त्याला द्यायचं त्यात सुध्दा आपलाच स्वार्थ ..बरं सत्या दादाला घेऊन जातोयस ना रे इस्पितळात .. तो काही ऐकणार नाही ..त्यात डोकं फिरलेलं आहे .. सूनबाई असती तर बरं झालं असतं .. मनू ला पण थोडी सोबत झाली असती आणि मला ही मदत झाली असती .. बरं जा बाबा .. त्याला घेऊन जा डॉक्टर कडे ..’

सत्या दादाला घेऊन गेला . आबा खूप खुश होते . मी मुलगा पहायला तयार झाले हे ही नसे थोडके असं त्यांना वाटलं असावं . मी आबांना दिलेल्या शब्दाखातर तयार झाले पण मनातून रघूचा विचार जातच नव्ह्ता .. असं का म्हणाले आबा ‘ रघू मुलगा चांगला आहे पण तुझ्यासाठी नाही ‘ चांगला शिकला सावरलेला आहे .. कारण मालन म्हणाली होती .पोलीसात भरती झालेत .म्हणजेच तो एम पी एस सी पास झाला आहे .साहजिकच आर्थिक स्थिती सुधारलीच असेल . मला समजून घेतो , माझ्यावर प्रेम करतो .. मग त्याची जात नावडती आहे का ? पण आपली जात ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो ? जी कर्माने यायला हवी ती जन्माने येते . मग तो दुसऱ्या जातीत जन्माला आला यात त्याचा काय दोष !उद्या येणारा मुलगा जर मला समजून घेणारा नसेल , माझ्यावर प्रेम करणारा नसेल तर फक्त त्याची आणि माझी जात एक आहे म्हणून मी त्याला स्वीकारायचं का ? माणूस म्हणून असणं महत्वाचं नाही का ? आणि जर येणारा मुलगा सर्वार्थाने चांगला असेल ..म्हणजे समजुन घेणारा असेल , प्रेम करणारा असेल तर चालेल आपल्याला ? कसं चालेल ? माझं कुठे प्रेम असणारे त्याच्यावर .. माझं तर रघूवर प्रेम आहे . त्याच्याशिवाय मी दुसऱ्या कोणाचाच विचार करू शकत नाही . मग हे सगळं का होऊ देतोय आपण ..आबांना , माईला दुखवायचं नाहीच पण रघू विषयी पण खात्री वाटत नाही का आपल्याला . हीच वेळ होती की तो खंबीरपणे घरी येऊन आबांशी बोलणं अपेक्षित होतं .पण तो आलाच नाही ..मग अशा माणसासाठी आपल्या माणसांना दुखवून आयुष्यभर एकटं रहाणं कितपत योग्य आहे .फोनची रिंग वाजली तशी मी दचकले . मी रीसीव्हर उचलला ..

‘ हॅलो ..’

‘ हॅलो वन्स .. मी सुलक्षणा बोलतेय ..’

‘ बोल वहिनी .. कशी आहेस आणि आईची तब्येत आता कशी आहेस .. तू कधी येते आहेस इकडे ..’

‘ मी तेच सांगण्यासाठी फोन केला आहे .. मी उद्या सकाळी येते आहे . आईची तब्येत आता स्थिर आहे .दादा येतोय मला सोडवायला ..सासूबाईंना सांगा हं ..’

‘ हो हो ..सांगते .. अगं आताच माई तुझी आठवण काढत होती .. बरं झालं तू येते आहेस ..’

‘ हे कसे आहेत ..’

‘ बरा आहे .. ये तू .. मी तुझा निरोप देते माईला आणि हो तुझ्या यांना पण ‘

फोन ठेवला ..मी मुद्दामच दादाला लागल्याचं सांगायचं टाळलं .माईला निरोप दिला ..ती खूपच खुश झाली . आज दिवसभरात आबांशी फारसं बोलणं झालं नाही .मी मुद्दामच ते टाळलं ..कारण मला भीती वाटत होती की माझ्या मनातली चलबिचल त्यांना कळेल .

रात्री झोपताना माई जवळ येऊन बसली . मी तशीच पडून राहिले . ती हळुवार डोक्यावरून हात फिरवायला लागली तसं त्या स्पर्शाने डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं . तिने मऊ आवाजात विचारलं ..

‘ झोपलीस ..’
‘ नाही गं ..’ मी भरल्या गळ्याने म्हणाले . माझ्या आवाजातला ओलावा तिच्यापर्यंत पोचलाच असणार .म्हणाली ‘ उद्या कोणती साडी नेसणार आहेस..वहिनीची छानशी नेस .आणि गळ्यात घाल तिचं लहानसं काहीतरी .. तुला काय ..काहीही छानच दिसणार ..’

मी काहीच बोलत नाही हे तिच्या लक्षात आलं .माझं तोंड दोन्ही हातात धरून म्हणाली ‘ मला माहितीये ..’

मी उठून बसत विचारलं ‘ काय माहिती आहे तुला माई ‘

‘ तू खुश नाहीयेस ..’

मी तिच्या मांडीवर डोकं ठेवलं .माझ्या डोळ्यातलं पाणी तिचा पदर ओला करत होतं.बराच वेळ ती माझ्या केसातुन हात फिरवत राहिली .हळूच म्हणाली ‘ झोप शांतपणे .. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ..भूतकाळ विसरला तर वर्तमान आणि भविष्य ही चांगलं होईल. काहीवेळेस आयुष्यात काही वजा करणं ही फायद्याचं ठरतं ..कधी आठवणी तर कधी माणसं ..!’

‘ अशी माणसं वजा करता येतात आयुष्यातून .. हं .. तसं ही प्रेम हा घाट्याचाच सौदा ..फायदा फक्त व्यवहारात पहायचा ना की प्रेमात ..
माई एक विचारू ..’

‘ कसं असतं ना मनू .. जे लिहा वाचायला , बोलायला सोपं वाटतं ना ते प्रत्यक्ष जगताना खूप अवघड असतं.आणि माणसाने ही सोपं जगावं ..त्यामुळे मला उत्तर द्यायला अवघड जाईल असा कुठलाही प्रश्न विचारू नकोस..’

‘ मला जर हा मुलगा आवडला नाही तर तुम्ही मला लग्नासाठी आग्रह करणार नाहीत ना ..’

‘ तुझ्या आबांनी हे स्थळ पाहिलं आहे म्हणजे ते न आवडण्या सारखं असेल का ?’

‘ माई .. एवढा कसा विश्वास आहे तुझा आबांवर ..तुला कधीच कसे प्रश्न पडत नाहीत . डोळे झाकून त्यांच्यावर विश्वास ठेवतेस ..’

‘ आमच्या सुखी संसाराचं तेच सूत्र आहे .आम्ही एकमेकांवर विश्वास ठेवतो .. त्या विश्वासामुळे आदर आहे . हे सगळं एका दिवसात नाही झालं ..सहवास हा एकमेव मार्ग आहे .माझ्यासाठी हेच प्रेम आहे ..बाकी आपल्या कपीलेला ही वासरू झालंच की ..झोप आता ..आणि तू ही त्यांच्यावर विश्वास ठेव ..ते तुझं कधीच वाईट होऊ देणार नाहीत .’

रात्रभर मला नीट झोप आलीच नाही . सारखी स्वप्न पडत होती . रखमाई पण आली स्वप्नात .. रघूही दिसला ..आधी हसत आला ..मग माझ्यापासून दूर दूर पळत होता . दादा त्याच्यामागे धावतोय .. मी पण धावतेय आणि धावता धावता विहिरीत पडले आहे . मला कोणीतरी बुडताना वाचवलं ..डोळे उघडुन पाहिले तर रघू हसत उभा .. रखमाई मला म्हणतेय हे पाप हाय , येड्या गत वागू नका ..मी लग्न करतेय ..मांडवात नदीचं पाणी शिरलं आहे .. असं बरंच असंबद्ध काही बाही दिसत राहिलं .दचकून जागी झाले तर चांगलं उजाडलं होतं .

दादा आणि सत्या पाहुण्यांना आणायला फाट्यापर्यंत गेले होते . वहिनी आली होती . माईची स्वयंपाक घरात धावपळ चालू होती . वहिनीने मला एक साडी आणि बाकी तिचं गळ्यातलं सेट वगैरे आणून दिला .चिंतामणी कलरच्या साडीवर बारीक जरीची मोरपीसाची एम्ब्रॉयडरी होती . नाजूक गळ्यातलं आणि छोटंसं लोलक असलेलं कानातलं . ती म्हणाली ‘ मी काही मदत करू का ..’

‘ नाही नको .. पण वहिनी ही साडी जरा जास्तच चांगली वाटते .. थोडी साधीशी नाही का ..’

‘ काही जास्त नाही .. आज तुमचा दिवस आहे .. नेसा हीच ..आलेच मी ..’

ती निघूनही गेली . कितीतरी वेळ ती साडी हातात घेऊन मी बसून राहिले. आवरवं अशी इच्छाच होत नव्हती . पण कितीही नको वाटलं तरी मला आवरावं लागणारच होतं . मी साडी नेसली .. जे काय दिलं होतं ते सगळं घातलं ..कसे बसे केस गुंतवले . मला मी स्वतः बळी जाणाऱ्या बकरीची आधी जशी पुजा करतात तसंच काहीसं वाटलं . अंगावर सरसरून काटा आला .आबांना माझं सुख हवं आहे पण माझं सुख कशात आहे हे ठरवण्याचा अधिकार मात्र माझा नव्हता .दादा मात्र अनैतिक वागताना ही त्याचं वागणं सगळे मुग गिळून मान्य करतात ..मी तर नैतिकतेच्या मार्गाने लग्न करून रघूबरोबर रहायचं म्हणत होते ..ते मात्र यांना मान्य नाही . म्हणजे नैतिक , अनैतिक हे सगळं सोयीने आहे . मुलासाठी आणि मुलीसाठी वेगवेगळे नियम !

तितक्यात घाईने मालन येताना दिसली . ती आली पण तेवढ्यात आबा ही आले . ती खोलीत आली आणि काही न बोलता उगाच चादर नीट करायला लागली .
आबा माझ्या कडे अतिशय प्रेमाने पहात म्हणाले ‘ वा .. वा .. झालात तयार ? दृष्ट नको लागायला कोणाची ! ताईसाहेब तुम्ही माझी लाज राखलीत .. या म्हाताऱ्या बापाला समजुन घेतलंत .. तुमचं हे ऋण आहे माझ्यावर .. माफ करा मला ..’
त्यांनी हात जोडले तसं मी त्यांचे हात हातात घेत म्हणाले ‘ हे काय आबा .. तुम्ही मला काही मागितलं आणि मी ते दिलं नाही असं होईल का ? हे ऋण वगैरे काय बोलताय ..तुमचा अधिकार आहे तो ..’

‘ हा तुमचा समजूतदारपणा थोडा जरी थोरल्या चिरंजीवांमधे असता तर सुखाने मरता आलं असतं मला ..’ त्यांच्या डोळ्यात पाणी आलं तसं त्यांचं लक्ष मालन कडे गेलं ..
मालन ला म्हणाले ‘तू इथे काय करतेस .. बाहेरची व्यवस्था बघ जरा ..’

‘ सगळं झालं हाय जी .. ते माई सायबानी सांगितलं ताईसायाबना काय पायजेल नको ते बग म्हून आले ..’

‘ बरं .. बरं .. ठीक आहे .. आवरा लवकर ‘ म्हणत आबा गेले .

समजूतदारपणा ची एवढी मोठी शिक्षा ! मी खुश नाहीये हे त्यांना कळतंय पण तरी ते स्वतः चंच म्हणणं खरं करू पहात होते . स्वतः च्या मुलीच्या सुखापेक्षा एवढं काय मोठं होतं ? जात , प्रतिष्ठा ,मान की अहंकार ! माझं कशातच लक्ष नव्हतं ..मालन तिथे घुटमळत आहे हे ही जाणवलं नाही ..मालन इकडे तिकडे बघत माझ्या जवळ आली .. ब्लाऊज मधून एक चुरगाळलेलं आंतरदेशीय काढून माझ्या हातात ठेवलं आणि खुसपुसली ‘ दादाचं हाय ..’

मला काही कळायच्या आत तर ती निघून ही गेली . मी सुन्न होऊन बसले . काय चाललं आहे हे माझ्या आयुष्यात ..जिथले परतीचे दोर मी स्वतः च्या हाताने कापत होते .. पुन्हा पुन्हा तिथे एक नवा मार्ग का तयार होतो आहे . नियतीच्या मनात आहे तरी काय ? मी दार लावून घेतलं आणि धडधडत्या हृदयाने पत्र उघडलं ..

‘ प्रिय मनास ..’

क्रमशः

©अपर्णा कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}