⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️ 🍁भाग अकरा 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️
🍁भाग अकरा 🍁
प्रिय मनास ..
मी अजूनही तुला प्रिय म्हणतो आहे कारण मला तू प्रिय आहेस . प्रिय हा केवळ मायना नाही तर ती माझी भावना आहे ..भावना ही खरंच दाखवण्याची गोष्ट आहे की वाटण्याची ? माझे तुझ्यावर प्रेम होते , आहे आणि राहील ..त्याच्या साठी कसल्याही अटी , कराराची गरज नाही . तुझ्याशिवायचं जगणं हे जगणं नसतंच मुळी ..तो व्यवहार असतो फक्त . जन्माला आलेला प्रत्येकच माणूस जगत असतो .. फक्त श्वास घेणं आणि सोडणं ,रोजचे शारिर धर्म पाळणं म्हणजे जगणं का ? प्रेम ही एक अशी भावना आहे जी माणसाचं जगणं समृद्ध करते .ही जगण्यातली श्रीमंती मी तुझ्यामुळे अनुभवली .. ‘तुझ्याशिवाय ‘ ही कल्पना ही मी करू शकत नाही .तुला वाटेल मी भ्याड आहे ..मी भ्याड नाही पण मी सारासार विचार करतो . प्रेम अविचार नाही शिकवत ..प्रेमामध्ये विचार करण्याची ताकद मिळते .ज्यांनी अविचार केला ते प्रेमात असफल झाले . मला नुसतं प्रेम करायचं नाही तर ते निभावायचं आहे ..तुझ्याबरोबर आयुष्य काढायचं आहे . तुझ्यासाठी जीव देणं खूप सोपं होतं या तुलनेत . पण त्याने काय साध्य झालं असतं ..तू तरी जगू शकली असतीस का ? प्रत्येक प्रश्नाला उत्तर हे असतंच आणि जसजसा काळ जाईल तसं त्या प्रश्नांची दाहकता कमी होते . आपल्या आयुष्यातली तीन वर्ष विरहात गेली , दुःखात गेली पण पुढे आपण आयुष्यभर एकत्र रहाणार आहोत . मी लवकरच तुझ्या घरी येणार आहे .. आबांशी बोलणार आहे .
प्रेमात पडणं ही ठरवून होणारी गोष्ट नाही ..मी तुझ्या प्रेमात पडलो पण त्यामुळे माझं इतरांशी असणारे संबंध बदलणारे नव्हते . आबा माझ्यासाठी मालक होते आणि राहतील . त्यांनी माझ्या शिक्षणा साठी खर्च केला , मला प्रोत्साहन दिलं म्हणून मी शिकू शकलो ही वस्तुस्थिती आहे .काहीही झालं तरी मी त्यांचा नोकर ..कोणत्या बापाला आपल्या मुलीचं लग्न अशा ठिकाणी करायला आवडेल . मी बाकी काही नाही तर माझी आर्थिक स्थिती बदलू शकतो आणि मगच मी तुझा विचार करणं योग्य आहे हे मी समजुन घेतलं होतं . तुझ्यासाठी तुझे ते वडील होते , आई होती , भाऊ होते ..त्यांच्यासमोर तू बिनदिक्कतपणे बोलू शकत होतीस पण माझ्यासाठी ते मालक होते .. ज्यांच्यासमोर मी कधी नजर वर करून कधी बोललो नाही त्यांच्याशी मी काय बोलणार होतो .. ते ही हातात काहीच नसताना . ही तीन वर्ष मी खूप मेहेनत घेतली ..स्वतः ला सिध्द करण्यासाठी ! आता एक बाप म्हणून आबांनी विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी मी तयार आहे .
यावेळी मी घरी का आलो नाही असा प्रश्न तुला पडला असेल ..पण माझ्या मायच्या चौदाव्या साठी मी आलो होतो .ही वेळ नव्हती की मी तुमच्या घरी यावं .पण लवकरच येईन ..
इतकी वर्ष झाली आहेत आता थोडेच दिवस ..मला माहिती आहे ,तुला माझा खूप राग आला असेल .इतक्या दिवसांत मी तुझ्याशी कधीही संपर्क का केला नाही , तुला शोधलं नाही ..मीच अजून चाचपडत होतो , स्वतः ला सिध्द करत होतो ..अशावेळी आपण दोघांनी भेटण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतः च्या हातानी स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं .
मला विश्वास होता की तू ही माझ्यासाठी थांबशील .. तू सतत माझ्याबरोबर होतीस ..आकाशात शुक्राची चांदणी पाहिली की , तलावात कमळ फुललेले पाहिले की, नदितलं आरस्पानी मंद झुळझुळणारं पाणी पाहिलं की ,वाऱ्याची थंड झुळूक आली की , एखादी गाण्याची लकेर कानी आली की , मोगऱ्याचा सुवास दरवळला की , गावच्या बसची पाटी पाहिली की , एखादं सुंदर पुस्तक वाचलं की , नूतन चा फोटो मासिकात किंवा पोस्टर वर कुठेही पाहिला की , मायच्या बांगड्यांची किणकिण ऐकली की , रिमझिम पाऊस आला की , मातीचा ओला वास आला की ..उठताना , बसताना , झोपताना , जेवताना अगदी श्वास घेताना तुझी आठवण येत राहिली . तुला वाटेल काय असंबद्ध बोलतोय .. पण खरंच तुझी आठवण येण्याची काळ वेळ नव्हती ..ती कधीही यायची अवचित .माझं जगणं प्रसन्न करून जायची . तुझ्यासाठी केलेल्या कवितांनी एक अख्खी दोनशे पानी वही भरली ..आता तू भेटलीस की तुला त्या सगळ्या कविता ऐकवायच्या आहेत .
माझा पत्ता मालन जवळ आहे..तिच्याजवळ पत्र लिहून दे ..ती मला पाठवेल ते . मालन माझी बहीणच आहे असं समज .थोरले मालक तिच्याबरोबर जे वागतात ते तिला आवडतं च असं नाही ..पण भूक माणसाला नको त्या गोष्टीही करायला भाग पाडते . असो .. हा विषय खूप मोठा आहे ..
मी पत्र पाठवत राहीन ..तुझ्या उत्तराची वाट पाहीन ..आपला सगळा त्रास आता संपणार आहे . माझं पोस्टिंग सोलापूरला झालं आहे .मी मुंबईत बदली मिळते का यासाठी प्रयत्न करणार आहे ..तात्या सध्या मधू बरोबर मुंबईला रहायला गेले आहेत . माझी नोकरी अशी .. जाण्या येण्याची वेळ नक्की नाही म्हणून त्याच्याबरोबर पाठवलं त्यांना . मधू ने मला तू बस मधे भेटल्याचं सांगितलं ..तुला माझ्याबद्दल खूप राग आहे हे ही सांगितलं ..साहजिकच आहे .मी समजू शकतो ..पण तुझा राग लवकरच मी काढणार आहे ..फक्त आणि फक्त प्रेम करायचं आहे आपण आता .दाखवलं तरच प्रेम असं नसतं मना .. प्रेम होतं च फक्त ते दाखवण्यासाठी योग्य वेळेची मी वाट पहात होतो . ती वेळ आता आली आहे .येतोय लवकरच ..
अजून खूप काही लिहायचं आहे , बोलायचं आहे पण ..जागाच नाही ..बाकी पुढच्या पत्रात ..तोपर्यंत मी तुला आठवत रहातो ..तू मला आठवत रहा ..
तुझाच आणि फक्त तुझाच
रघूवीर .. रघू.. वीर
मी ते पत्र छातीशी घट्ट धरून बसले होते . इतक्या दिवसांत पडलेल्या सगळ्या शंका मिटल्या होत्या .. सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली होती . आणि त्याचं ही माझ्यावर तितकंच प्रेम आहे याची खात्री पटली होती .आनंदाने माझ्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागलं ..हात पाय थरथरत होते . तेवढ्यात दारावर टकटक झाली .. मी घाबरले .. कुठे ठेवू हे पत्र .. कोणाच्याही हाती लागायला नको . मी गडबडीत पत्राची अगदी छोटी घडी घातली आणि माझ्या बॅगेत अगदी तळाशी ते पत्र ठेवलं . बॅग बंद करून कुलूप लावलं . किल्ली टेबलच्या ड्रॉवर मधे ठेवली . दारावर जास्त थापा पडायला लागल्या तसं घाईत म्हणाले ..
‘ आले. .. आले ..एक मिनिट हं ..’
मी दार उघडलं तसं वहिनी हसत आत आली आणि म्हणाली ..
‘ काय हो ..झाली की नाही तयारी .. अरे वा खूप सुरेख दिसताय .. आलीत बरं का ती मंडळी .. सासूबाई म्हणाल्या पाहुण्यांचं चहा पाणी झालं की या बाहेर .. बोलावतील तुम्हाला .. तुम्हाला काही देऊ का .. चहा , कॉफी ..’
मी अजूनही भांबावलेलीच होते .. रघूचा शब्द न शब्द आठवत होता . आता हा कार्यक्रम अगदी उपचार म्हणून पार पाडायचा होता .. आधीही माझी फार इच्छा नव्हतीच ..होता तो रघू बद्दलचा राग होता .पण आता हे सगळं नाटक करणं मला जड जात होतं .
‘ लक्ष कुठंय तुमचं .. ‘ वहिनीने विचारलं . मी काही नाही अशी मान हलवली . तितक्यात सत्या आला .. तो येताच वहिनी निघून गेली ..तो माझ्याकडे बघतच राहिला . मी प्रश्नार्थक भुवया उडवल्या तसं म्हणाला ‘ मन्या .. खूप सुंदर दिसते आहेस . आणि सुहास राव म्हणजे तुला बघण्यासाठी जो मुलगा आला आहे तो .. खरंच छान आहेत . मी येताना त्यांच्याशी गप्पा मारत होतो ..खूपच समजदार वाटले मला ते .घरची परिस्थिती इतकी चांगली आहे की सात पिढ्या बसून खातील पण तरी ते नोकरी करत आहेत आणि महत्वाचं म्हणजे बँकेत चांगल्या पोस्टवर आहेत .हुशार वाटले मला .. दिसायला ही रुबाबदार आहेत .मन्या .. एक सांगू .. जे होतं ते चांगल्या करता होतं .जुन्या कुठल्याच गोष्टींचा विचार करू नकोस . ते तुला समजुन घेतील ..प्रेम करतील तुझ्यावर ..’
‘ आणि माझं प्रेम नसेल तर ..’
त्याने दचकून माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला ‘ तू अजूनही तयार नाहीयेस का ? मग हे सगळं कशासाठी ? विनाकारण गुंता वाढवते आहेस तू ..’
मी गप्प बसले . सांगू का सत्याला रघूबद्दल ..तो समजुन घेईल का ..पण तो तर उद्या जाईल निघून ..इथे मलाच तोंड द्यायचं आहे असा विचार करून मी सावरून घेत म्हणाले ‘ अरे .. म्हणजे ..कुठल्याही गोष्टीला वेळ द्यायला हवा ..’
माझ्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला ‘ माझ्यासाठी फक्त तुझा आनंद महत्वाचा .. खुश रहा , सुखी रहा ‘
वहिनी मला बोलावून आली . जे होईल ते होईल ..त्या सुहासला संधी मिळताच रघूबद्दल सांगायचं .. बघू पुढच्या पुढे असा विचार करून मी निघाले .
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी