मनोरंजन

⚛️फिटेअंधाराचेजाळे…!⚛️ 🍁भाग बारा🍁

⚛️फिटेअंधाराचेजाळे…!⚛️

🍁भाग बारा🍁

मी वहिनी बरोबर बाहेर आले . माई मला पहाताच माझ्या जवळ आली . माझ्याकडे खूप प्रेमाने पाहिलं आणि म्हणाली थांब .. काजळ डबीतून काजळ बोटावर घेऊन आली आणि माझ्या कानामागे तीट लावली . माझ्या तोंडावरून खूप मायेने हात फिरवला आणि म्हणाली ‘ गुणाची गं माझी बाय ती ..कोणा कोणाची दृष्ट नको लागायला माझ्या सोन्यासारख्या लेकीला ..’
तिनं बोटं कानशिलावर मोडली . तिचं ते प्रेम पाहून माझ्या पोटात कालवाकालव झाली . मला कोणी अधिकार दिला .. हिला फसवण्याचा . मी तिच्याशी खोटं कसं वागू शकते ? जेंव्हा तिला समजेल ..मी खोटं वागले , नाटक केलं तेंव्हा किती त्रास होईल तिला. माई ने माझ्या खांद्यावरचा पदर नीट केला आणि म्हणाली ‘ नमस्कार कर हं सगळ्यांना ..’
मी मान हलवली . माई ने माझा हात हातात घेतला .माझा हात थरथरत असलेला तिच्या लक्षात आलं .. ती म्हणाली ‘ घाबरु नकोस .. हं .. ते विचारतील त्याची उत्तरं न घाबरता दे .’

मी माईला विचारलं ‘ कोणी बाई माणूस नाही का बरोबर ..आई , बहिण , काकू , मावशी ..कोणीही ..’

‘ तेच ना .. कोणी नाही ..वडील आणि मुलगा दोघेच आले आहेत . मला ही जरा विचित्रच वाटलं ..पण असुत दे ..प्रत्येकाच्या घरातल्या पध्दती वेगवेगळ्या असतात . ‘

‘ पध्दती वगैरे काही नाही .. या लोकांना बाई ला काही मत असतं हेच मान्य नाही ..’

‘ शू ..उगाच काही बोलू नकोस ..काहीच माहिती नसताना आपण नको ते अर्थ काढू नयेत . वस्तुस्थिती कळल्यावर मग वाईट वाटतं की आपण उगाच बोललो पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते .’

दादा आत आला .. माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला ‘ चल .. जास्तीचा आगाऊ पणा करायची काही गरज नाही . जेवढं विचारतील तेवढंच बोल .मुलगा चांगला आहे .. हे स्थळ हातचं जाता कामा नये ..काही गडबड झाली तर गाठ माझ्याशी आहे हे लक्षात ठेव .’

माई थोड्या रागाने म्हणाली ‘ ही वेळ आहे का रे हे सगळं बोलण्याची . कधीतरी नीट बोलत जा तिच्याशी ..बरं सूनबाई ..तू जा मनू बरोबर ‘

‘ नाही .. नको .. काय गरज आहे . आम्ही तर घरचेच आहोत आणि ते दोघे आहेत फक्त ..तिने यायची काही गरज नाही . तसं ही मुंबई सारख्या शहरात एकटी रहाते मनू ..तिला काही भीती वाटणार नाही ..ये लवकर ‘
दादा गेला .. त्याच्याकडे मी थक्क होऊन पहात होते . काय ही मानसिकता .. बहिणीला पहायला आलेले लोक त्यांच्यासमोर स्वतः ची बायको यायलाही नको . स्वतः च्या डोक्यात घाण भरलेली आहे म्हणून याला सगळं जग तसंच वाटतं .. मी माईकडे पाहिलं तर तिनेही ‘ जाऊ दे .. त्याला नाही आवडत सूनबाईने कोणा नवख्या लोकांसमोर आलेलं .. जा तू ‘ असं मलाच समजुतीने सांगितलं. नको त्या गोष्टीचं सुध्दा माईला कौतुक ..मी सगळा राग गिळला . सत्या आला त्याच्याबरोबर बाहेर दिवाणखान्यात गेले .

समोर आबा आणि कदाचित त्याचे वडील असावेत . मी जाऊन त्या दोघांना नमस्कार केला .’ आयुष्मान भव ‘ दोघांनीही आशिर्वाद दिला . सत्या आणि दादाच्या ही पाया पडले ..दादाच्या बाजूला तो ,सुहास बसला होता . तो माझ्याकडेच पहात होता . चेहेऱ्यावर एक मंद स्मित होतं . आमची नजरानजर झाली तशी मी नजर वळवली आणि जागेवर जाऊन बसले . त्याच्या वडिलांनी जुजबी प्रश्न विचारले .. नाव , शिक्षण , एकत्र कुटुंब आहे तर चालेल ना , मुंबईत नोकरी कुठे करते, किती वर्ष झाले वगैरे . मग त्यांनी सुहास ला सांगितले ‘ तुम्हाला काही विचारायचे असेल तर विचारा ..’

त्याने विचारलं ..’ कविता आवडतात ..?’

मी दचकले .. स्वतः ला सावरत होकारार्थी मान हलवली .

‘ म्हणजे तुम्ही कविता करता की वाचायला आवडतात ..’

वाटलं सांगावं ‘ ऐकायला आवडतात ‘ पण मनातलं बाजूला सारून मी सराईतपणे खोटं सांगितलं ‘ वाचायला ‘

‘ एखादी आवडलेली कविता .. आठवते आहे का ..’

मी होकारार्थी मान हलवली ..

‘ प्लीज ऐकवता का ? ‘

त्याने म्हंटल्यावर माझा नाईलाज झाला ..
मी रघूची ही कविता म्हणायला सुरुवात केली ..

आताशा कुठूनसं आभाळ येतं भरून
थोडी हुरहूर , धडधड थोडी
मग तुझी आठवण येते फिरून

रेंगाळत येते कधी सुरावट दुरून
थोडं काहूर , बेचैनी थोडी
मग तुझी आठवण येते फिरून

डोळे ओले अन् गळा येतो भरून
थोडी उदासी , वेदना थोडी
मग तुझी आठवण येते फिरून !

चंद्र चांदणे , मालकंस रात्रीचा स्मरून
थोडं आगतिक , जागी थोडी
मग तुझी आठवण येते फिरून

मी कविता झाल्यावर गप्प बसले . माझे कान गरम झाले होते .. कदाचित लाल ही झाले असावेत . काहीच न सुचून मी पदराच्या धाग्याला चुरगळत बसले .

‘ व्वा .. सुरेख ..कोणाची आहे ही कविता ‘ असं सुहासने विचारलं .

एक दोन मिनिट मी गप्प बसले आणि मग पुटपुटल्या सारखं बोलले ‘ वीर म्हणून तरुण कवी आहे ..चांगल्या कविता करतो ..’

आबा , दादा किंवा सत्या यांना रघू कविता करतो हेच माहित नसल्याने त्यांना काही शंका येणं शक्यच नव्हतं . दादा च्या चेहेऱ्यावर थोडे त्रासिक भाव दिसले . हे काय कविता , बिविता नाही ते प्रश्न विचारतोय हा असं त्याला नक्की वाटलं असणार . सुहास सावकाश म्हणाला ..’ मला ही काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता ..’

मी नकारार्थी मान हलवली . तसं सुहास म्हणाला ‘ तुमची काही हरकत नसेल तर आम्ही थोडं फिरून येऊ का .. नाही म्हंटल तरी मोठ्या लोकांसमोर त्यांना संकोच वाटत असणार ..’

त्याच्या या बोलण्यावर सगळे गप्प बसले . एक अस्वस्थता जाणवत होती . तसं आबा म्हणाले
‘ सुहासराव ..मुंबईत हे सगळं चालतं ..पण आमचं गाव लहान आहे ..त्यात आम्हाला , ताई साहेबाना सगळे ओळखतात . तुम्हां दोघांना एकत्र फिरताना पाहून गावात चर्चा होईल म्हणून नको ..नाहीतर काही हरकत नव्हती . ‘

‘ आबासाहेब .. मुलं म्हणतायत तर जाऊ द्या ..हवं तर सत्यजीत ना जाऊ द्या बरोबर .. काळ बदलतोय ,आपणही बदलायला हवं ‘
सुहासच्या वडिलांनीच प्रस्ताव मांडल्यामुळे आबांचाही नाईलाज झाला .माई माझ्या कानात म्हणाली ‘ ही कसली कविता .. छानसं देवच गाणं म्हणायचंस ना .. तुझं आवाज किती गोड आहे ..’ मी गप्पच बसले .
मला खरं तर सुहासला एकटंच भेटायचं होतं कारण मला त्याला रघूबद्दल सांगायचं होतं . सत्या आला तरी तो समंजस आहे ..कदाचित देईल तो वेळ आम्हाला .आबा म्हणाले
‘ यमाईचं दर्शन घेऊन या ..’
तसं सत्या म्हणाला ‘ आबा .. मठात जातो ..तिथे फारसं कोणी नसतं आणि जवळ ही आहे ..लवकर परत येता येईल ‘ आबांनी होकारार्थी मान हलवली .

सत्या गाडी चालवत होता ..बाजूला सुहास बसला आणि मागच्या सीटवर मी . मी आता सुहासकडे नीट बघीतलं . सत्या म्हणाला तसा खरंच रुबाबदार होता आणि अगदी ठळकपणे मला जाणवलेली गोष्ट म्हणजे त्याच्या चेहेऱ्यावरचां शांत भाव !

आम्ही मठात पोचलो तसं सुहासने येऊन मी बसले होते तिथलं दार उघडलं . माझ्यासाठी हे नवीन होतं .एखाद्या पुरुषाने एखाद्या स्त्रीला एवढा आदराने वागवताना मी फार कमी वेळा पाहिलं होतं .सत्या म्हणाला ‘ मी इथेच आहे ध्यान मंदिरात ..तुम्ही फिरून या ..’

मठाचा कोपरा न कोपरा मला परिचित होता . माझा आणि रघूचा तिथला वावर मला भासत राहिला . माझ्या पायात काटा टोचल्यावर रघूच्या डोळ्यात आलेलं पाणी आठवलं ..मठातली काळ्याशार कातळाची बावडी ..तिथून दिसणारं वडाचं खूप जुनं झाड ..ज्याच्या पारंब्या जमिनीला टेकलेल्या होत्या .त्याच्या भोवती छानसा ओटा होता . बाजूला एक छोटंस भुयार होतं .. तिथे खाली आत जाऊन ओरडलं की मठात गाभाऱ्यात आवाज यायचा .आमच्या दोघांचं नाव कैक वेळा त्या भूयाराने ऐकलेलं !मी माझ्याच विचारात चालले होते आणि सुहास माझ्या बरोबर चालत होता . तो माझ्याकडे पहात होता .. मी त्याच्या बरोबर असूनही त्याच्या बरोबर नाही हे कदाचित त्याला कळलं असावं .. तो ही शांतपणे चालत होता . मी वडाजवळ थांबले .. तसं तो माझ्याकडे रोखून बघत म्हणाला

‘ बसूयात इथे .. नक्की ना ‘

‘ अं .. हो .. हो ..’

‘ तुम्हाला माझ्याशी काही बोलायचे आहे का ? ‘

माझ्या मनातलं याला कसं कळलं . मी दचकून त्याच्याकडं बघीतलं .. तसं हसत म्हणाला ‘ जादू येते मला .. मला समोरच्या माणसाच्या मनात काय चालू आहे हे अचूक कळतं ..’

मी शब्दांची जुळवणी करू लागले , उगाच काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं ‘ तुमच्या बरोबर आई , बहिण कोणी का नाही आलं ‘

‘ हं .. आईची तब्येत बरी नव्हती ..मग तिला एक दिवसात एवढा प्रवास नसता झेपला ..आणि बहिणीचं लग्न झालं आहे ..घरात काकु आहेत दोन पण त्या आईसोबत राहिल्या ..’

दोघेही गप्प बसून होतो . मग तोच म्हणाला ‘ मला काय आवडतं ..नाही विचारणार ..मला काहीच विचारायचं नाही तुम्हाला .. मग काही सांगायचं असेल तर सांगा .. मी ऐकेन ‘

‘ माझं .. म्हणजे मी ..म्हणजे मला हे लग्न नाही करायचं आहे ..प्लीज तुम्ही मला नकार द्या ..’

तो गंभीर झाला .हाताची घडी घालून शांतपणे माझ्याकडे बघत होता . मला त्याची ती नजर सहन होईना .मी नजर खाली वळवली . माझ्यावरची नजर स्थिर ठेवत सावकाश त्याने विचारलं
‘ कारण समजू शकेल का मला ..’

मी काहीच बोलत नाही ते बघून म्हणाला ‘ अच्छा .. न सांगण्यासारखे ..लाज वाटण्यासारखे काही आहे का. .’

मी पटकन म्हणाले ‘ अजिबात नाही ..लाज का वाटेल .. माझे प्रेम आहे एका मुलावर ..मी जी कविता म्हणून दाखवली ती त्याचीच होती .घरात मान्य नाही पण तो लवकरच येणार आहे घरी .. मला मागणी घालण्यासाठी .. मी त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाचा विचार करू शकत नाही ..’

माझं सांगून झालं होतं आणि सत्या आला . मी निःश्वास सोडला . आता फार काही बोलण्याची गरज ही नव्हती . मला जे बोलायचं होतं ते माझं सांगून झालं होतं .गाडीत बसल्यावर मला प्रचंड दडपण आलं होतं .सुहास मात्र निवांत होता .. जणू काही मी त्याच्याशी काही बोललेच नव्हते .

सत्याने विचारलं ‘ काय झालं का मग बोलणं ..’

अगदी सहज हसत सुहास म्हणाला ‘ हो तर ..अगदी व्यवस्थित समजून घेतलं आम्ही एकमेकांना ‘

हा असं विचित्र का वागतोय .. ना तो चिडला.. ना बोलणं , हसणं कमी केलं . याच्या मनात आहे तरी काय ?

घरी आलो ..जणू काही झालंच नाही अशा थाटात सुहास बोलत होता . जेवणं पार पडली ..सुहासच्या वडिलांनी मला बाहेर बोलवलं ..
माई , वहिनीला ही बाहेर बोलवलं .वहिनीच्या हाताने कुंकु लावून मला एक साडी ,पेढ्याचा पुडा दिला . हे काय चाललंय हे समजेना ..

तसं ते म्हणाले ‘ सुहासच्या आईने सांगितलं होतं ..मुलगी आवडली तर लगेच पेढ्याचा पुडा देऊन या .. चांगल्या कार्यात जास्त उशीर करू नये ..आम्हाला मुलगी पसंत आहे ..लवकरच पुढच्या गोष्टी ठरवू ..आता तुम्ही या सगळे सोलापूरला .. आमचं घरही पाहणं होईल ..’

माई मला हळूच म्हणाली ‘ नमस्कार कर ..’

मी यंत्रवत नमस्कार केला .मी अगदी आशेने सुहास कडे बघत होते .पण तो हसत होता .. खुश दिसत होता . न राहवून मी म्हणाले ‘ त्यांनाही एकदा विचारा ..’
तसं गडगडाटी हसत ते म्हणाले ‘ अहो सूनबाई .. त्यांनीच आम्हाला तुम्ही पसंत असल्याचं सांगितलं आहे ..त्याशिवाय का आम्ही निर्णय देणार ..’

मी सुहास कडे बघीतलं .. तर तो हसत होता .. माझ्याकडे बघून त्याने डोळे मिचकावले. मला खूप जास्त राग आला .. मी पळतच आत गेले . तसं ‘ लाजली वाटतं ‘ म्हणून बाहेर हशा पिकला .

एक नवीन तिढा माझ्यासमोर होता ..

क्रमशः

©अपर्णा कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}