⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️ 🍁भाग तेरा 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…!⚛️
🍁भाग तेरा 🍁
सुहास माझ्याशी असं का वागला हे माझ्यासाठी कोडंच होतं . माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे हे ऐकून ही त्याने लग्नाला का होकार दिला . त्याच्या एका होकाराने माझं सगळं आयुष्य ढवळून निघालं होतं . मला माई , आबांना न दुखावता माझ्या मनासारखं घडायला हवं होतं . काहीतरी मिळवण्यासाठी काहीतरी गमवायला हवंच का ? आता रघू जर घरी आला तर काय महाभारत होईल ते सांगायला नकोच . रघूला पत्र लिहून कळवायला हवं ..आताच तू येऊच नकोस . तो म्हणतो तसं योग्य वेळेची वाट पहायला हवी का ? पण ती योग्य वेळ आपोआपच येईल अशी परिस्थिती नाही ..आपल्यालाच ती आणावी लागेल . पण कसं ? तेच समजत नव्हतं .आता सोलापूरला गेल्यावरच सुहास भेटेल आणि तेंव्हाच काय तो खुलासा होईल .
दुसऱ्या दिवशी सत्या निघून गेला . त्याच्याकडे बघून मला वाटलं .. असं निर्मोही जगता यायला हवं ,कसलाच त्रास नाही . ना कसला भावनांचा गुंता ! असं जगणं प्रत्येकालाच शक्य होईल असंही नाही .जाताना मला म्हणाला ‘ जिथे असेन तिथून पत्र पाठवत जाईन खुशालीचे ..तुझ्या लग्नाची तारीख काढली की कळव मला ..तुझी पाठवणी करताना मी असणारच ..’
माझ्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत म्हणाला ‘ वेडाबाई .. रडतेस कशाला ? तुम्ही बायका खूप कणखर असता ..जन्मल्यापासून आपलं असलेलं , मानलेलं .. सगळं सहजी सोडून दुसऱ्या घरात जाता आणि तितक्याच सहजतेने त्या परक्या घराला आपलं मानता .मोठं झालेलं झाड सुध्दा एका ठिकाणाहून काढून दुसऱ्या ठिकाणी लावलं तर ते लवकर रुजत नाही पण तुम्ही मात्र डोक्यावर अक्षता पडल्या की स्वतः च्या नावासह सगळं आरपार बदलून जाता . त्या नावाबरोबर स्वतः चं लहानपण त्या घरीच सोडून जाता .तुमचा जीव असतो माहेरी पण मोह नसतो .. फक्त माझ्या माणसाचं सगळं चांगलं व्हावं , त्यांनी सुखात असावं ही निखळ भावना असते . मी जेंव्हा जेंव्हा घराचा विचार करतो तेंव्हा तेंव्हा मला तुझी आठवण येते मन्या ..माझ्यासाठी तू कितीही मोठी झालीस तरी मन्याच रहाशिल ..जे घडू नये ते घडून गेलं आहे ..आता त्याचा विचार करू नकोस ..हसत रहा , खुश रहा ‘
माझ्या डोक्यावर त्याने हात ठेवला होता .
आता घरात सोलापूरला कधी जायचं याची चर्चा सुरू झाली होती .आबांची तब्येत बरी असली तरी एवढा पाचेक तासांचा प्रवास त्यांना सहन होणार नाही असं डॉक्टरांचं म्हणणं पडलं .त्यांच्याबरोबर घरी कोणीतरी रहायला हवं .. माई आणि दादा आले तर एकटी वहिनी रहाणं शक्य नव्हतं. म्हणजे ते आबांना प्रशस्त वाटलं नसतं . मला आणि वहिनीला पाठवायला दादा तयार नव्ह्ता . माईने तरी घर पहावंच असा आबांचा आग्रह होता . असं सगळं त्रांगडं झालं होतं . मला ही मुंबईला जावंच लागणार हे जेंव्हा मी आबांना सांगितलं तेंव्हा त्यांनी ते अगदी सहज उडवून लावलं .म्हणाले ‘ तसं ही आता आठ एक दिवसात सुट्टयाच लागतील कॉलेजला ..कॉलेज मधे फोन करून सांगा , वडिलांची तब्येत बरी नाही ..आणि एक लेखी अर्ज ही पाठवून द्या ..’ त्यांच्या या बोलण्याला नाकारावे असं उत्तर माझ्याकडे नव्हतंच .
मी रघूलाही इथे काय काय घडलं ते सविस्तर पत्र लिहिलं आणि कॉलेज साठीही अर्ज लिहिला . दोन्ही पाकीटं तयार करून मी मालनकडे द्यावीत या विचाराने मालनला बघत होते . आज सकाळपासून ती दिसलीच नव्हती . शेवटी मी माई ला विचारलं ‘ माई .. आज मालन नाही आली का ..’
‘ आली होती की ..आज जरा लवकर गेली ..काहीतरी बिनसलं होतं तिचं .बबन ने पुन्हा मारलेलं दिसतंय .येईल पुन्हा ‘
‘ बबन तिला मारतो .. का पण ..आणि तुम्ही कोणीच काहीच बोलत नाहीत ..’
‘ आम्ही कसं बोलणार मधे ..तो खाजगी प्रश्न आहे त्यांचा ..आपण पडू नये असं मधे ‘
‘ आणि दादा .. त्याला चालतं का ? ‘ मी इतकं थेट विचारल्यामुळे माई घाबरली .मग हळूच डोळे मोठे करत म्हणाली ‘ असं काहीही कसं विचारते आहेस गं .. तुझी वहिनी ऐकेल ना .. मनात येईल ते असं वाटेल तसं बोलू नये बाईच्या जातीनं ..’
‘ हो का .. अरे वा .. मनात येईल तसं वाटेल तसं वागण्याचा अधिकार पुरुषांना आहे पण बाईने मात्र बोलायचं सुध्दा नाही ..’
‘ बास गं .. मी हरले ..मला नाही तुझ्या अशा बोलण्याला काय उत्तर द्यावं ते समजत ‘ माई हात जोडत म्हणाली .
.’पण का गं .. तू का तिची चौकशी करते आहेस ?’
‘ अगं ..मला ते कॉलेजला रजेचा अर्ज द्यायचा आहे ना ..ते पाकीट पोस्टात टाकायचं होतं म्हणून ‘
‘ मग त्याला कशाला हवी मालन .. दादाकडे दे ..तो सांगेल बबनला ..’
मी घाबरलेच .. हे माझ्या लक्षातच आलं नाही .
‘ हो .. हो .. बरं बरं ‘ म्हणून मी वेळ मारून नेणार होते तितक्यात दादा आला .. माई त्याला म्हणाली ‘ बरं का रे .. मनू चा अर्ज पाठवायचा आहे तिच्या कॉलेजात ..तेवढं तू पोस्टात टाकायला सांग कोणाला तरी ..’
‘ माई ..दोन दिवसात सोलापूर ला जायचंच आहे ना ..तिथून टाकू . इथे तो पोस्टमन आठवड्यात एकदा कधीतरी येतो ..त्यापेक्षा सोलापूरहून लवकर जाईल ‘
मी सुटकेचा निःश्वास सोडला . अरे देवा ..पण रघूला पत्र कसं पाठवू .त्याला हे सगळं समजायलाच हवं .
सोलापूरला कोण आणि कसं जायचं हा प्रश्न राहिलाच होता .शेवटी आबांनीच मार्ग काढला ..ते माईला म्हणाले ‘ ताई साहेबांबरोबर तुम्ही असणं जास्त गरजेचं आहे . बबन तुम्हाला घेऊन जाईल ..आपल्याच गाडीने जा म्हणजे सोयीनुसार तुम्हाला परतीच्या प्रवासाला निघता येईल .मालनलाही सोबत असू द्या मदतीसाठी .नवख्या ठिकाणी जाताय आपली माणसं बरोबर असलेली बरी ‘
रघूला पत्र कसं पाठवावं या काळजीत मी होतेच . मला रघूचा रागच आला ..मलाच पत्रात पत्ता कळवला असता तर काय झालं असतं ? त्याने आंतरदेशीय मधे थोडीही जागा सोडली नव्हती हे आठवून मला वाईटही वाटलं ..उगाच आपण रघूवर रागावलो .मी रघूचं पत्र काढून वाचायला लागले ..आणि मला आनंद , आश्चर्य असं काय काय वाटून गेलं .इतक्या वेळात आपल्या लक्षात कसं आलं नाही . रघूचं पोस्टिंग सोलापूरला आहे . आपण पण सोलापूरलाच जाणार आहोत . जणू काही रघूची भेट होणारच असा आनंद मला झाला .कुठल्याही प्रश्नाला वेळ दिला की मार्ग सापडतोच हे रघूचं बोलणं आठवलं .मालन पण माझ्याबरोबर असणार .. काहीही झालं तरी रघूला भेटायचंच असं मी ठरवून टाकलं .आतपर्यंत सोलापूर ला जायचं कसं टाळता येईल असा विचार करणारी मी , नाखूष असणारी मी इतकी आनंदले होते की कधी एकदा उद्याचा दिवस जातो आणि आम्ही सोलापूरला निघतो असं मला झालं होतं .मालन वाड्यात येताना दिसली .. तसं मी माझ्या खोलीच्या खिडकीजवळ जाऊन उभी राहिले .तिला मागे विहिरीवर येण्यासाठी पाचच मिनिटं लागली पण तो वेळ मला खूप जास्त त्रासदायक वाटला . ती दिसताच मी तिला हाक मारून जवळ बोलावून घेतलं ..
‘ मालन ऐक .. तुला रघू ने त्याचा पत्ता दिला आहे ना ..तो प्लीज मला आणून दे ..आजच ..’
‘ उद्या सकाळच्याला आनते ताय ..आधीच माज्या धन्याला सोंश्यय आलाय ..आजच मारून पार हालत खराब केलती ..’
‘ अगं पण तुझ्यावर का संशय ..’
‘ ते पोष्टमन हसले माज्याकडं बगून .. तेवडं कारन बास झालं की .. ‘
मी कपाळावरच हात मारून घेतला . दादा घरात गेल्यावर घराच्या बाहेर उभा रहाणारा हाच का बबन ? किती सोयीने मान , अभिमान , इज्जत , प्रेम सगळ्याच गोष्टी !! ठीक आहे ..उद्या आण म्हणण्याशिवाय माझ्यापुढे दुसरा पर्यायच नव्हता .
मी रात्रभर सोलापूरला गेल्यावर रघूला कसं भेटता येईल याचा विचार करत राहिले. सकाळी आबांकडून सुहास चा पत्ताही घ्यायचा . रघूचा पत्ता नाव बदलून कोणाला तरी विचारायचं की दोन्ही घरात किती अंतर आहे .
सकाळी मालन आली तशी एक डोळा माझा तिच्याकडेच होता . ती सगळी कामं नेहेमीप्रमाणे करत होती .दुपारची जेवणं झाली तरी तिची आणि माझी भेट झालीच नाही . आबांकडून मी सुहास चा पत्ता मागून घेतला . माझी अस्वस्थता वाढत होती . मालन आणि बबनला ही उद्या सकाळी निघायचं आहे हे आबांनी सांगून झालं होतं . सोलापूरला जायचं आहे ताईसाहेबांच्या होणाऱ्या सासुरवाडीला असं सांगितल्यावर मालन ने ज्या पध्दतीने माझ्याकडे पाहिलं ..मला भीतीच वाटली की आमच्या दोघीत काही तरी चालू आहे असा संशय नको यायला कोणाला .
चारचा चहा घ्यायला मी मुद्दामच बाहेर गेले नाही . डोकं दुखतंय जरा असं सांगून पडून राहिले . माझा चहा घेऊन मालन येईल आणि तिच्याशी बोलता येईल हा हेतू .. पण चहा घेऊन वहिनी आली तशी मी उठून बसले ..
‘ अगं तू कशाला आणलास.. मालन होती ना .. ‘
‘ त्यात काय झालं एवढं .. तुमचं डोकं दुखतंय ना .. चेपून देऊ ..’
‘ नको .. नको .. वहिनी मालन ला पाठवते स जरा .. तिच्याकडून घेते थोडं डोकं दाबून ‘
‘ बरं .. बरं .. पाठवते ..मीच दिलं असतं पण तुम्ही नको म्हणणार ..उद्या जायचं आहे ..गोळी पण घेते आणून .. बऱ्या व्हा .. प्रवासात काही त्रास नको ..’
मी कसं नुसं हसत मान हलवली .. वहिनी गेली आणि मला हुश्श झालं .मालन घाईतच आली आणि आल्या आल्या तिने मला पत्त्याचं चीटोरं दिलं . मी घाईने दोन्ही पत्ते पाहिले ..दोन्ही शिवाजीनगर , सोलापूर .फक्त रघूच्या पत्त्यावर शिवाजीनगर पोलीस स्टेशन होतं . रघूला भेटण्याचा मार्ग सापडला असं मला वाटलं पण मला वाटत होतं तितकं ते सोपं नव्हतंच ..नसणारच कदाचित !
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी