⚛️फिटे अंधाराचे जाळे…! ⚛️ 🍁भाग चौदा 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…! ⚛️
🍁भाग चौदा 🍁
उद्या पहाटेच सोलापूर ला निघायचं म्हणून माई आणि वहिनीची खूप तयारी चालली होती . पहिल्यांदाच त्यांच्या घरी जायचं तर सगळं व्यवस्थित घ्यायला हवं म्हणून आबा ही जातीने लक्ष घालत होते .दादा आणि वहिनीने तालुक्याला जाऊन सुहासच्या आईला साडी , वडिलांना शाल ,सुहाससाठी पण कपडे वगैरे आणले होते . हे लोक तर आमचं लग्नच असल्यासारखं वागत होते . बरं ..कोणाशी काही बोलण्याची ही सोय नव्हती . तरी मी माई जवळ कुरकुर केलीच .’ माई .. अगं किती करताय ..त्यांचा फक्त होकार आला आहे..अजून आमचं लग्न तरी ठरलं आहे का ? ‘
‘ हो मग .. अजून काय ठरायचं राहिलं आहे आता .. तुला माहिती नाही पण यांच्याजवळ नानासाहेब म्हणालेत तसं .. फक्त मुलगी पसंत पडणं महत्वाचं होतं आमच्यासाठी ..बाकी गोष्टी फार महत्वाच्या नाहीत ..लग्नाच्या आदल्या दिवशीच शालमुदी चा कार्यक्रम करू आणि अगदी लवकरात लवकर तारीख काढू म्हणालेत . आता आपण त्यांच्या घरी जाऊन सगळं पाहिलं ..सुहास रावांच्या आईंनी तुला पाहिलं .. की झालं ,आमचं बोलणं होईलच ! येताना तारीख काढूनच यायचं आहे ..’
‘ माई .. ते लोक जास्तच घाई करत आहेत असं वाटत नाही का तुला ..काहीतरी नक्कीच गडबड असणार आहे .इतर वेळी नको इतक्या शंका येतात तुम्हाला या वेळी तुम्हाला कोणालाच असं वाटत नाही का ..की मी इतकी जड झाले आहे ..एकदाचं लग्न लावून दिलं की तुम्ही मोकळे ..म्हणून तर तुम्हीही घाई करत नाही आहात ना ..’
माई दुखावल्यासारखी वाटली . तिच्या डोळ्यात पाणी जमा झालं ..मला वाईट वाटलं पण क्षणभरच ! मला ही राग आलाच होता . त्यामुळे मी ही गप्पच बसले . माझ्याकडे ती बघत होती पण मी नजर बाहेर लावून बसले होते . माझा चेहेरा तिच्याकडे वळवत ती म्हणाली ..’ इकडे बघ जरा माझ्याकडे ..तुला खरंच असं वाटतंय की आम्ही घाई करतोय ? तू पंचवीस वर्षांची झालीस आणि तुझ्या बरोबरीच्या मुली आई झाल्या आहेत .सगळ्यात महत्वाची तू आमची जबाबदारी नाहियेस .. तू स्वतंत्र आहेस ..कमावती आहेस ..तुला आम्ही सांभाळत नाही आहोत .पण आई बाप म्हणून तुझं लग्न योग्यवेळी आणि योग्य ठिकाणी व्हावं असं जर आम्हाला वाटत असेल तर आमचं काय चुकलं ? आणि ते लोक घाई करत आहेत कारण त्यांचाही मुलगा मोठा आहे ..चांगली मुलगी जर असेल तर शुभ कार्यात वेळ लावू नये असं जुनी जाणती माणसं सांगतात .आणि त्यांची सगळी चौकशी यांनी केली आहे . असं जबाबदारीतून मोकळं होण्यासाठीच घाई करायची असती तर आधीच तुला नकार ..’
‘ बोल .. थांबलीस का .. रघू ला नकार दिलाच नसता असं म्हणायचं आहे ना तुला ..’
‘ ज्या गावाला जायचंच नाही त्या गावचा पत्ता का विचारा ..चल मला भरपूर कामं आहेत ..’
फोनची रिंग वाजत होती . दादा आणि वहिनी घरात नव्हते . मला रिंग ऐकायला येत असून उठायची इच्छा होत नव्हती ..मी तशीच बसलेली पाहून माई फणफणत फोन उचलायला गेली .
‘ हॅलो .. बोला सुहासराव .. हो हो .. उद्या निघतोच आहोत आम्ही ..हो हो ..पहाटेच निघू .. हो ..हो ..काही काळजी करू नका तुम्ही .. मनू ना ..आहे ना .. देते हं ..’
‘ मनू .. ए मनू .. फोन घे जरा ..’
सुहास फोनवर आहे म्हंटल्यावर मी ताबडतोब उठले . माई तिथेच थांबलेली पाहून मी तिला हळूच म्हणाले ‘ माई .. मी बोलते ..’
मी एवढं गोडीत बोलते आहे ते पाहून माई खुशीत म्हणाली ‘ मी आहे यांच्या खोलीत .. बोल तू सावकाश ‘
माई गेल्यावर मी एक दीर्घ श्वास घेतला.. रीसीव्हर हातात घेऊन एक मिनिट शांत उभी राहिले ..
‘ हॅलो .. काही बोलणार आहेस की मी तुझा श्वास ऐकूनच समाधान मानायचं आहे ..’
‘ प्लीज .. प्लीज सुहास ..मला तुमच्याशी खूप गंभीरपणे काहीतरी बोलायचं आहे .. मी आधीही तुमच्याशी गंभीरपणे बोलले होते पण तुम्ही माझं बोलणं खूपच हसण्यावारी घेतलंत .. प्लीज ..’
‘ मी तुझं बोलणं खूप गंभीरपणे घेतलं आहे .फक्त तुला अपेक्षित प्रतिक्रिया मी दिली नाही म्हणजे मी तुझं म्हणणं हसण्यावारी नेलं असं म्हणणं चुकीचं नाही का ‘
‘ मी तुम्हाला इतकं स्पष्टपणे गोष्टी सांगूनही तुम्ही असं का वागताय ? ‘
‘ स्पष्टपणे सांगितलेली प्रत्येकच गोष्ट बरोबरच असते असं नाही ..’
‘ माझ्या बाबतीत काय चूक काय बरोबर हे तुम्ही कसं सांगू शकणार ..’
‘ सगळं आपण आताच फोनवर बोलायचं आहे का ..मी तुझ्याशी लग्नाला तयार आहे हे तर नक्की आहे . ते सुध्दा सकारण .. म्हणजे अगदी चांगल्या कारणासाठी .. उद्या येतेच आहेस तर समक्ष सांगतो .’
‘ प्लीज .. मी तुम्हाला विनंती करते .माझं तुमच्यावर प्रेम नाही हे माहीत असताना का आपलं आयुष्य अवघड करताय ..’
‘ आता जरी नसलं तरी पुढे तुझं माझ्यावर प्रेम असेल हे मी खात्रीने सांगतो . कारण हे जे काय तू प्रेम आहे कोणावर तरी म्हणतेस ..ते लहान वयातलं आकर्षण असतं .आणि तू म्हणतेस तसं त्याचं ही तुझ्यावर प्रेम असेल तर तो तुझं लग्न माझ्याशीच काय दुसऱ्या कोणाशीही होऊ देणार नाही ..तरच त्याचं खरं प्रेम .. हे मान्य आहे ना तुला .. मग बघू त्याचं प्रेम खरं की माझा विश्वास ..’
मी काय बोलावं ते न सुचून गप्प बसले .
‘ बरं .. आई बोलते आहे माझी .. बोल जरा ..’
‘ नमस्कार ..’
‘ अगं किती गोड गं आवाज तुझा .. उद्या या हं लवकर ..वाट पहातो आहोत आम्ही ..आई कुठे आहे ..’
‘ बोलावते हं माई ला .. ‘
‘ असू दे .. असू दे ..या लवकर हेच सांगायचं होतं .तुमचं झालं ना बोलणं मग झालं ..’
मी फोन ठेवला .पुन्हा एकदा सुहासशी बोलण्याचा माझा प्रयत्न चांगलाच फसला होता .
अगदी पहाटेच आम्ही सगळे निघालो . चार पाच तासांचा रस्ता होता तरी माई ने इतकं काय काय करून घेतलं होतं खाण्यासाठी .माझ्या डोक्यात फक्त एकच विचार होता.. रघू ला कसं भेटता येईल . बबन बरोबर असल्याने मालनला एकटी कुठे पाठवण्याचा प्रश्न नव्हता . मला बाहेर पडणं तर जवळ जवळ अशक्य होतं . रघूच्या बाबतीत जसं मालनला माहिती आहे तसं बबनलाही माहिती असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. तरी गाडीत बोलता बोलता माईला सांगितलं ..’ माई .. अगं माझी एक मैत्रीण आहे मुंबईची .. ती लग्न होऊन सोलापूरलाच आली आहे . वेळ मिळाला तर तिला भेटून येऊ का ?’
‘ कोण गं ..’
खोटं बोलणं ही सोपं नसतंच ..नाव विचारल्यावर मी गडबडले च ‘ अं .. आहे एक ..तुला माहिती नाही ती ..’
‘ अगं हो पण नाव असेल की नाही काही ..’
‘ हं ..ज्योती जोशी ..’
‘ तिचा पत्ता माहिती आहे का तुला .. सोलापूर काय आपल्या गावासारखं लहानसं गाव आहे का ..की सगळे लोक एकमेकांना ओळखतील .कुठे म्हणून जाणार आहेस .’
‘ शिवाजीनगर पोलीस स्टेशनला लागूनच घर आहे म्हणाली होती ..तिथे विचारलं तर सांगतीलच की ..’
‘ बरं ..आधी ज्या कामासाठी आलो आहोत ते काम होणं महत्वाचं ..आज परत गावालाही निघायचं आहे ..तरी बबन ला पाठवून आपण बघू ती कुठे रहाते .. सुहसराव ना विचारू ..शिवाजीनगर पोलीस स्टेशन जवळ आहे ना ..’
मी एकदम घाबरून म्हणाले ‘ नको .. नको .. तू म्हणतेस ते खरं आहे ..आधी आपलं काम महत्वाचं ‘
माई समाधानाने हसली . मी आणि मालन एकमेकींकडे बघत होतो . न बोलताही आम्हाला समजत होतं .. बबन मात्र काहीही न बोलता गाडी चालवत होता.सोलापूर जवळ आलं हे लक्षात यायला लागलं ..तुरळक वस्ती दिसायला लागली . मी आणि मालन अगदी लक्षपूर्वक पहायला लागलो . समजा जर मिळालीच संधी तर पोलीस स्टेशनला जाता यावं एवढीच इच्छा . पण मलाही हे कळत होतं की खूप अवघड आहे .
एक दोन ठिकाणी बबन ने पत्ता दाखवून कसं जायचं ते विचारलं .शिवाजीनगर पोलीस स्टेशन ची पाटी दिसली आणि मी आणि मालन ने एकमेकींकडे पाहिलं .दोनच मिनिटांत गाडी एक वळण घेऊन एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली . सुहासने वरच्या खोलीच्या खिडकीतून आम्हाला पाहिलं आणि आम्ही गाडीतून उतरेपर्यंत सुहास त्याचे वडील नानासाहेब आणि अजून दोघेजण बाहेर आले . घर कसलं भला मोठा दुमजली बंगला होता तो. समोर भली मोठी बाग ..विविध प्रकारची फुलझाडं .. दोन तीन गाड्या ही उभ्या केलेल्या दिसल्या. आमचं सामान गडी माणसांनी घरात घेतलं .
‘ या या .. काही त्रास नाही ना झाला प्रवासात ‘
नानासाहेबांनी बबनला विचारलेलं मी ऐकलं .
सुहासच्या आई मला एकदम मायाळू बाई वाटल्या . लहानखुऱ्याच होत्या .अंगावर दागिने , साड्या पाहून सधनतेची साक्ष पटत होती .त्याच्या दोन्ही काकूंची ओळख झाली ..घरातलं वातावरण एकदम मोकळं ढाकळं वाटलं .सुशिक्षित लोक आहेत हे लक्षात येत होतं . घरात आधुनिक सुविधा ही होत्या . मी सगळ्यांच्या पाया पडले .सगळेजण मला प्रश्न विचारत होते ..मी उत्तर देत होते . अगदी दोन्ही काकु सुध्दा सुहास ची चेष्टा करत होत्या . खरंच माणसं खूपच चांगली होती . मला माझाच राग येत होता आणि सुहासचा ही ! एवढ्या चांगल्या माणसांना का दुःख द्यावं ..सुहासने जर वेळीच मला नकार दिला असता तर ही परिस्थिती उद्भवलीच नसती .जेवणखाण झाल्यावर सुहसच्या आई म्हणाल्या ‘ अरे सुहास .. मनवाला जरा आपली आंब्याची बाग , मळा दाखवून आण ..साखर कारखान्यावर तर काही जाता येणार नाही ..पण बाकीचं तरी बघू दे तिला ..म्हणजे जबाबदारीची जाणीव होईल .’
हसत सुहास म्हणाला ‘ ती कुठे इथे रहाणार .. ती माझ्याबरोबर मुंबईत रहाणार ..कसली आलीय जबाबदारी ..पण दाखवून आणतो ‘
मी पडत्या फळाची आज्ञा घेऊन निघाले .. मला तेच हवं होतं . सुहासशी बोलायचं आणि त्याच्या बरोबरच पोलीस स्टेशन मधे जाऊन रघू ची भेट घ्यायची असं मी ठरवलं त्यामुळे मनोमन आनंदले .
सुहास बरोबर गाडीत बसले . त्याने बंगल्याच्या बाहेर गाडी काढली पण मेन रोड कडे न जाता दुसऱ्या दिशेने वळवली .पोलीस स्टेशन वरून गाडी गेली की आपण त्याला थांबवायचं असं मी ठरवलं होतं त्यावर पाणी फिरलं . सुहास अचानक खूप गंभीर झाल्यासारखा वाटला . गाडीत बसल्यापासून एक शब्द ही तो माझ्याशी बोलला नाही . मी बोलायचं प्रयत्न केला तर म्हणाला ..
‘ मला माहिती आहे , मी असं का वागलो हा प्रश्न तुला पडला आहे . त्याचंच उत्तर देण्यासाठी मी तुला घेऊन चाललो आहे .प्लीज थोडावेळ काही बोलू नकोस ‘
वीसेक मिनिटं गाडी चालवल्यावर गाडी एका चाळी समोर एक ग्राउंड होतं तिथे थांबली .सुहास शांतपणे समोर बघत होता ..मग म्हणाला
‘ हे बघ .. ती चाळ दिसते आहे समोर ..आता घागर घेऊन ती बाहेर आली ना ..ती माझी बहिण आहे ..आणि माझ्या वागण्याचं हे कारण आहे ‘
मला हे खूपच अनपेक्षित होतं .सुहास च्या डोळ्यात पाणी आलं होतं .मला धक्का बसल्यामुळे काय बोलावं तेच समजत नव्हतं .
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी