मनोरंजन

⚛️#फिटे अंधाराचे जाळे…!⚛️ 🍁भाग सोळा 🍁

⚛️#फिटे अंधाराचे जाळे…!⚛️

🍁भाग सोळा 🍁

तो पोलीस ऑफीसर पाठमोरा होता . हा रघूच आहे नक्की ..पाठमोरा असला तरी मी त्याला ओळखण्यात नक्कीच गल्लत करणार नाही .माझ्या हृदयाचे ठोके वाढायला लागले . तो आता सुहास आणि त्या जमलेल्या माणसांशी बोलत होता . पोलीस ऑफिसर आल्यामुळे गर्दीचा आवाज कमी झाला होता ..त्यामुळे मला गोंगाट आणि आवाज जे ऐकायला येत होते ते कमी झाले . हळुहळु गर्दी पांगायला लागली .आता सुहास आणि त्याने शेकहॅण्ड केला ..सुहास कदाचित त्याला थँक्यू म्हणत असणार ..पण मी गाडीत आहे हे न कळताच रघू जाणार का ? एवढं समोरासमोर येऊन पुन्हा एकदा आमची भेट होणार नाही का ? त्या दिवशी स्टँड वर पण असंच ओझरतं बघीतलं होतं ..आजही आमची भेट होणार नाहीच का ? नाही नाही .. आज मी असं होऊ देणार नाही .मी घाईत कारची खिडकी खाली केली ..आणि मान बाहेर काढून सुहासना मुद्दाम आवाज देणार तितक्यात रघूने मागे बघीतलं . त्याची आणि माझी नजरानजर झाली . काय वाटलं त्या क्षणी ..सिनेमात दाखवतात तसं सगळं जग धूसर होऊन फक्त आणि फक्त तोच दिसत होता . मी क्षणभर विसरून गेले की मी सुहास बरोबर आहे .मला पाहून रघूच्या चेहेऱ्यावरही आश्चर्य , आनंद अशा संमिश्र भावना दिसत होत्या .त्याच्या आणि माझ्याही चेहेऱ्यावर हसू उमटलं होतं ..आणि आम्ही दोघे एकमेकांना ओळखतो हे सूहासच्या कदाचित लक्षात आलं . रघू पोलीस ऑफिसर आहे हे मी सांगितलेलं होतंच पण तो सोलापुरातच आहे हे मात्र सांगितलं नव्हतं .तरीही त्याने अंदाज बांधला असावा का ? आतापर्यंत आभाराची भाषा बोलणारा सुहास एकदम ताठ झाला . मी आणि रघू एकमेकांकडे बघत हसतोय हे कदाचित त्याला आवडलंही नसावं .. तो पटकन वळून गाडीत बसला . त्याने गाडी स्टार्ट केली .. तसं रघू ही वळून माझ्या खिडकी जवळ आला . तो आलेला पाहून ही त्याच्याकडे दुर्लक्ष करत सुहास म्हणाला ‘ निघायला हवं .. खूप उशीर झालाय आधीच ..घरी वाट बघत असतील सगळे .’

मी सुहास कडे बघत म्हणाले ‘ हे रघुवीर .. आणि रघुवीर ..हे सुहास ‘

रघूने हसत ‘ हॅलो ..’ म्हंटल पण सुहासने प्रत्युत्तर दिलं नाही .तो स्टिअरिंगवर हात ठेवून समोर बघत बसून राहिला . मी खाली उतरले .. मला माहिती आहे सुहासला नक्कीच राग आला असणार ..पण रघूला भेटण्याची ही शेवटची संधी होती आणि ती मला वाया घालवायची नव्हती .किती वर्षांनी आम्ही असं समोरासमोर उभे राहून एकमेकांना पहात होतो . काय बोलावं तेच कळत नव्हतं .. शब्दच फुटत नव्हते .. असं वाटत होतं जणू सगळं जग थांबलं आहे . एक क्षणभर वाटलं .. या क्षणी मला मरण आलं तरी चालेल ..पुढचे सगळे प्रश्नच रहाणार नाहीत . रघूच्या डोळ्यात पाणी होतं ..त्याने विचारलं
‘ कशी आहेस ..’

‘ आहे जिवंत ..असं म्हणायचं ..’

‘ इथे कशी ? माझं पत्र मिळालं ना .. तुझा विश्वास आहे ना माझ्याबरोबर ‘

मी होकारार्थी मान हलवली . सुहासने रागाने हॉर्न वाजवला . तसं रघू त्याच्या खिडकीजवळ जात म्हणाला ..
‘ सर .. एक दोन मिनिटं बाहेर या ना प्लीज . मला माहिती नाही मनाचे तुम्ही कोण आहात ..पण आता सध्या तरी मला तुम्ही देवदूतच वाटत आहात .’

त्याच्या या बोलण्यावर सुहासने गाडी बाजूला घेतली ..गाडी तिथे व्यवस्थित लावून दार धाडकन बंद करून तो बाहेर आला . रघूने ही त्याची बुलेट बाजूला घेतली .
सुहास कडे बघून हे लक्षात येत होतं की तो चिडला आहे पण तो जसं दार बंद करून रघूच्या समोर आला तसा तो एकदम वेगळाच सुहास झाला .त्याच्या चेहेर्यावर एक स्मित होतं . आणि मला ते जरा विचित्र वाटलं .एखाद्या विशिष्ट परिस्थितीमध्ये समोरच्या माणसाची अपेक्षित प्रतिक्रिया आली नाही की ते सहज नाही हे लक्षात येतं .
सुहास हसतच म्हणाला ‘ वेल मिस्टर ..माझी ओळख यांनी करून दिली आहे आता मी यांची ओळख करून देतो ..ही सुंदर , सुविद्य युवती माझी होणारी पत्नी आहे . मनवा.. आणि मी देवदूत वगैरे कोणी नाही ..मी सध्या माणूस आहे , ज्याला सगळ्या भावना आहेत हे लक्षात ठेवा ‘

‘ होणारी आणि झालेली यात खूप अंतर असतं सर .. ती ऑलरेडी मनाने माझी पत्नी झाली आहे . ‘

‘ मानणं आणि असणं यात ही खूप अंतर असतं मिस्टर ..लवकरच आमच्या दोघांचं लग्न होणार आहे . आता घरी जाईपर्यंत आमच्या लग्नाची तारीख निघालेली असेल .तेंव्हा तुम्ही हिला विसरून गेलेलं उत्तम राहील . नाहीतर याचे परिणाम खूप वाईट होतील ‘

‘ तुम्ही एका पोलीस ऑफिसरला धमकी देताय ? आणि प्रेम केलं आहे आता चांगले , वाईट जे काही परिणाम होतील ते भोगण्याची माझी तयारी आहे . लग्न तर आमचंच होणार आणि ते ही थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन ..आणि तुम्हीच आमचं लग्न लावून द्याल .’

‘ मिस्टर पोलीस ऑफीसर .. स्वप्न पाहणं चांगलं आहे पण आपल्या आवाक्यात असतील अशीच स्वप्न पहावीत ..आणि मीच तुमचं लग्न लावून देईन म्हणता आयुष्य म्हणजे काय सिनेमा आहे का ..शेवट चांगलाच व्हायला ..’

‘ आयुष्य सिनेमा नाही पण माझा अजूनही चांगुलपणा वर विश्वास आहे , नात्यांवर विश्वास आहे ,प्रेमावर विश्वास आहे .. माझ्या मनावर माझा विश्वास आहे ‘

‘ ओ मिस्टर कवी .. तुमच्या कल्पना तुमच्याजवळ ठेवा ..आम्ही निघतोय ..उशीर होतोय . खरं तर तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर मी नक्की घरी या असं सांगितलं असतं पण तुम्हाला सांगतो आज भेटलात , पुन्हा कधीही भेटू नका ‘

‘ भेटावं तर लागेल ना सर ,
मी कविता करतो हे तुम्हाला कळलं म्हणजे अर्थातच ते मनाने तुम्हाला सांगितलं असणार ..आमचं एकमेकांवर प्रेम आहे हे ही सांगितलं असणार हे ओघाने आलंच .तरीही तुम्ही हा अट्टाहास का धरताय ..’

‘ एक साधी गोष्ट तुम्हाला समजली पाहिजे ज्या गोष्टीवर आपला अधिकार नाही त्या गोष्टीचा हव्यास असू नये .. धरू नये ..’

‘ चुकतंय तुमचं .. मना ही गोष्ट तुमच्यासाठी असेल , माझ्यासाठी माझी वस्तुस्थिती आहे . महत्वाचं म्हणजे ती माणूस आहे ना की वस्तू की तिच्यावर कोणीही अधिकार सांगावा ..तुम्हाला आणि मला काय वाटतं मनाबाबत हे महत्वाचं आहेच पण त्या ही पेक्षा मनाला काय वाटतं हे जास्त महत्त्वाचं आहे .. तर ..’

रघूचं बोलणं मधेच तोडत सुहास म्हणाला ‘ बास बास .. मला हा शब्दांचा खेळ नाहीच खेळायचा .. वाद ही नाही घालायचा . मी एका सुसंस्कृत कुटुंबामधे रहातो .. वाढलोय . असं रस्त्यावर उभे राहून आयुष्याचे निर्णय घेणं मला पटणार नाही . मी आधी मोठ्यांचा विचार करतो ..मुलीच्या सुखाचा विचार करतो ..स्वतः च्या सुखपेक्षा दुसऱ्यांच्या सुखाचा विचार करतो .. तसे संस्कार आहेत माझ्यावर .अर्थात मी हे कोणाशी बोलतोय ? संस्कार , सुसंस्कृतपणा कशाला म्हणतात हे तुम्हाला काय समजणार . मनवा माझी प्रतिष्ठा आहे ..तुला समजलं तर समजून घे ‘

‘ शब्दांचे खेळ नको म्हणालात पण तुम्ही तर शब्दांनी माझ्या जीवाशी खेळलात..सुसंस्कारित असणं म्हणजे काय ? मुळात सुसंस्कार म्हणजे काय हे ठरवण्याचा अधिकार फक्त सधन आणि उच्चभ्रू लोकांना नाही . फक्त घरातल्याच नाही तर सगळ्याच मोठ्या लोकांचा आदर करावा हे आहेत माझे संस्कार ..त्यासाठी फक्त सामाजिक पत , प्रतिष्ठा न पहाता माणूस म्हणून समोरच्याचा आदर करावा .. स्वतः चं पोट भरल्यावर उरलं तर अन्न गरिबाला देणं म्हणजे सुसंस्कारित असणं नव्हे तर स्वतः अर्धपोटी असतानाही एखाद्या उपाशी माणसाला दोन घास खाऊ घालणं म्हणजे सुसंस्कारित असणं . माझा जन्म कुठे झाला यावरून तुम्ही मला माणूस म्हणून नाही जोखू शकत . माझं मनावर प्रेम असतानाही पळून जाऊन मी लग्न केलं नाही ..मी सुसंस्कारित असण्याची अजून काय परीक्षा हवी सर . काय म्हणालात तुम्ही मनवा तुमची प्रतिष्ठा आहे पण माझा तर प्राण आहे ती .तुमच्यासमोर तुमच्या तोलामोलाचे अजून पर्याय असतील पण प्राणाला पर्याय असू शकत नाही .तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे सर .. आयुष्याचे निर्णय असे रस्त्यावर उभे राहून घेऊ नयेत ..मना ..लवकरच येतोय घरी ..तुझ्याबरोबर कोण आलं आहे ..’

‘ माई ..’

‘ ठीक आहे ..भेटूच ..’

काही कळायच्या आत रघू गाडीवर बसून निघून गेला .

वातावरणात कडवटपणा भरून राहिला होता . दहा मिनिटांवर घर आलं होतं . मी आणि सुहास एक शब्दही बोललो नाहीत . बोलण्यासारखं आमच्यात काही राहिलंच नव्हतं .सुखाचा काजवा रघूबरोबर उडत गेला होता ..पदरात घेतला होता त्याच्या सुखसहवासाचा चांदणचुरा .त्याच्या हसण्यानं उरात भरून राहिला होता शीतल प्रकाश ..जणू चंद्र सामावला होता . घर आलं तसं सुहास कडे न बघता मी घरात निघून गेले . माई माझ्याकडे पहात म्हणाली ‘ किती वेळ मनू .. निघायचं आहे आपल्याला ..’

तसं सुहासच्या काकू चेष्टेत म्हणाल्या ‘ पाय निघत नसेल ना .. पण लवकरच यायचं आहे आता ..पंधरा दिवसानंतर ची तारीख काढली आहे .. काय सुहास पंधरा दिवस राहशील ना बाबा एकटा ..’

तसं सुहास जणू काही घडलंच नाही अशा थाटात म्हणाला ‘ मला काय ..आज जरी लग्न करा म्हणालात तरी मी तयार आहे .’

हसणं गप्पा ..चालू होत्या .त्या सगळ्यात माझं लक्षच नव्हतं . चहापाणी करून आम्ही निघालो. सुहासच्या आईंनी मला एक सुरेख हस्तिदंती पेटी दिली आणि त्यात कोरीव काम केलेला छोटा चांदीचा आरसा .एवढी महागडी भेट मला घ्यावीशी वाटत नव्हती पण माझं कोण ऐकणार ? सुहासच्या आई प्रेमाने म्हणाल्या ‘ घे गं .. तुझंच तर आहे सगळं ..नाही कशासाठी म्हणायचं . या आरशात जेंव्हा जेंव्हा पहाशिल तेंव्हा तेंव्हा तुझ्या चेहेऱ्यावर सुहास च्या आठवणींच हसू असू दे ..’
मला त्या आरशाकडे बघवेना . मी पटकन तो पेटीत ठेवून दिला . सुहास म्हणाला मी ही जरा थोडं गावाबाहेर पर्यंत जाऊन येतो . मी माईला म्हणाले ‘ माई .. नको ना .. त्यांना यायला किती उशीर होईल ‘
मग माई ने ‘नका येऊ ..उगाच दगदग नको ‘ असं सांगितल्यामुळे त्याचा नाईलाज झाला पण मी सुटकेचा निःश्वास सोडला .

गाडीत बसल्यावर माईने सुहास च्या घरच्यांचं भरभरून कौतुक सुरू केलं . मला ही खूप प्रश्न विचारत होती ..मी वेळ मारून नेत होते . माई च्या ते लक्षात येऊन तिने विचारलं ‘ काही झालं आहे का ..नाही मी बघतेय तुझं कशातच लक्ष नाही . स्वतः तच हरवल्या सारखी आहेस .. काहीतरी वेगळीच वागते आहेस .. माझ्या जिवाला घोर लावू नकोस .. काय झालं आहे .. सुहास तुला पसंत आहे ना ‘
मला हसायलाच यायला लागलं .पंधरा दिवसांनी माझं लग्न ठरवलं होतं आणि आता मला माई विचारत होती ‘ तुला सुहास पसंत आहे ना ‘ मी हसतच म्हणाले ‘ नसेल तर ..’

‘ शुभ बोल गं .. गंमतीत सुध्दा हे असलं अभद्र बोलू नकोस ..पांडुरंगा ..विठ्ठला ‘

‘ माई .. तुझा विठ्ठल ही सावळाच ना गं .. आणि कृष्ण सुध्दा ..म्हणूनच कदाचित मला सावळ्या रंगाचं आकर्षण असावं ‘

माईने घाबरून माझ्याकडे पाहिलं .मागून हॉर्नचा सतत आवाज येत होता ..आम्ही बोलत असल्यामुळे आमच्या लक्षात आलं नाही पण बबन वैतागला ..
बबन जोरात ओरडला .’ च्या मायला .. कोन हये रे त्यो .. कवधरनं पे पे चालवीलं हाय .. बगतोच हेच्याकडं ..’

मी ,मालन , माई तिघींनी ही मागे पाहिलं . माझ्या आणि मालनच्या चेहेऱ्यावर हसू पसरलं . तसं बबन म्हणाला ‘ कवा धरनं फातुय .. मागं मागंच यायलयं .. काय करू .. समदे कागुद बराबर हायेत .. थांबीवतोच गाडी ..’

आता आम्ही गावाबाहेर आलो होतो . बबनचं बोलणं होण्याआधी रघूने आमच्या जीप समोर त्याची बुलेट आडवी घातली ..बबनला थांबण्याशिवाय दुसरा पर्यायच राहिला नाही .. बबन त्याच्याकडे डोळे फाडून बघत होता . माई ने मात्र डोळे घट्ट मिटून घेतले .. जणु रघूकडे तिने पाहिलं नाहीतर रघू काही बोलणार नाही अशी वेडी आशा तिला वाटत असावी ..

क्रमशः

©अपर्णा कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}