⚛️फिटे अंधाराचे जाळे…! ⚛️ 🍁भाग सतरा 🍁
⚛️फिटे अंधाराचे जाळे…! ⚛️
🍁भाग सतरा 🍁
गाडी बाजूला घेऊन बबन खाली उतरला ..’ हे बग रघू .. माईसायबांची न ताय सायबांची जबाबदारी थोरल्या मालकांनी माज्यावर दिली हाय .. त्यांच्या इश्वासाला मी तडा नाय जाऊ देनार .. त्या दोगी गाडीच्या भायेर न्हाई येनार म्हंजे न्हाई येनार ..’
रघूने एक कडक नजर बबन कडे टाकली . कदाचित त्याच्या अंगावर असणाऱ्या वर्दीने त्याची ती नजर जास्त भेदक वाटली .बबन दारा समोर दोन्ही हात पसरून उभा होता. रघूने त्याला बाजूला हो असं खुणवलं पण तो ही हट्टाने नकारार्थी मान हलवत उभा राहिला . रघू त्याला म्हणाला
‘ हे बघ बबन.. तुझं माझं काही वैर नाही . तू दादासाहेबांच्या खाल्ल्या मिठाला जागतो आहेस पण मी काही त्यांचं वाईट करत नाही. मला फक्त एकदा माईसाहेबांशी बोलू दे ..खूप गोडीत सांगतो आहे ..नाहीतर ..’
‘ नायतर काय .. मला तुज्या वर्दीचा रुबाब नगं दाखवू .. मालकांना जर कळलं तर माजी खांडोळीच करत्याल ..’
माई घट्ट डोळे मिटून बसली होती . आता तिच्या डोळ्यातून पाणी वहायला लागलं . मी दुसऱ्या दाराने बाहेर पडले आणि बबनला म्हणाले ..’ हे बघ बबन .. रघूला माईशी बोलायचं आहे ..तू आणि मालन बाहेरच थांबा ..आणि नाही म्हणायची हिंमत करू नकोस .माझ्यात पण आबासाहेबांच रक्त आहे हे विसरू नकोस .जोपर्यंत रघू माईशी बोलत नाही तोपर्यंत आपण इथून निघणार नाही ..आधीच खूप उशीर झाला आहे ..मला उगाच गोंधळ नको आहे . हवं तर रघू भेटला होता हे दादाला मी ही सांगत नाही .. तू ही सांगू नकोस ..पण आता रघू माईशी बोलणारच ..’
माझा एकंदरीतच आवेश असा होता की बबन काही न बोलता बाजूला झाला .मी मालनला गाडीबाहेर बोलावलं . रघू जीपमध्ये चढला.. त्याच्या मागे मी पण चढले .मी माई शेजारी बसले आणि रघू समोरच्या सीटवर बसला . त्याने स्वतः ची कॅप काढून बाजूला ठेवली . माई अजून ही डोळे मिटूनच बसली होती . माई च्या इतक्या समोर रघू पहिल्यांदाच बसला असावा . माई कडे बघून त्याच्याही डोळ्यात पाणी जमा झालं त्याचे हात थरथरत होते . मी माईच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले ‘ माई .. फक्त एकदाच बोल त्याच्याशी .. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकून तरी घे ‘
माई च्या पायावर रघूने डोकं ठेवलं तसं माईने पाय मागे ओढले . रघू दुखावल्या स्वरात म्हणाला ‘ माईसाहेब आता नमस्कार करण्याचा अधिकार पण काढून घेतलात का माझा तुम्ही .. तुमचा आशीर्वाद हवाय आम्हाला ..’
माई गप्पच होती . तिने सावकाश डोळे उघडले .आता ती शांतता खूप अस्वस्थ करत होती . तशी माई सावकाश म्हणाली ‘ मी कोण अधिकार देणारी ..आशिर्वाद सुध्दा आम्ही दोघे मिळून देतो .एकटीने आशिर्वाद काय द्यायचा ते नाही कळत मला .. आशिर्वाद घ्यायचा असेल तर दोघांचा एकत्रच घ्यावा लागेल .’
‘ ते तर मी करणारच आहे ..मी वाड्यात येणार आहे .. थोरल्या मालकांना भेटणार आहे ..’
‘ तुम्ही मोठे झालात ..मालक म्हणू नका ..’
‘ माईसाहेब हवं तर चाबकाने फोडा हवं तर पण असं काळजाला घरं पडतील असं बोलू नका ..तुम्हाला जसा तुमचा पांडुरंग आहे तसं मला थोरले मालक आहेत .माझ्या कातड्याचे जोडे करून घातले तरी तुम्ही दोघांनी दिलेलं प्रेम , माया .. तुमचे उपकार मी फेडू शकणार नाही .’
‘ चांगले पांग फेडतो आहेस बाबा .. तुला एवढंच करायचं असेल तर एकच कर ..माझ्या लेकीला मोकळं सोड .. ‘
‘ माई साहेब ..तुम्ही माझा जीव मागा तो ही देईन पण हे एवढं नाही देऊ शकणार मी . एवढं दिलंत आता हे शेवटचं मागणं आहे तुमच्याकडे .. मनाचा हात माझ्या हातात द्या ..मी तिला सुखात ठेवेन ही खात्री असू द्या . मी आज सुहासरावाना भेटलो ..भला माणूस आहे .. पण माझी आणि मनाची जोडी स्वर्गात बांधली गेली आहे .’
‘ बास रघुवीर .. ही वेळ आणि जागा दोन्हीही योग्य नाही . तू वाड्यात येऊन यांच्याशी बोल ..आता आम्हाला जाऊ दे . मी हात जोडते तुझ्यापुढे ..’
‘ नको माई साहेब तुम्ही कृपा करून हात जोडू नका ..मी येतो ..वाड्यात येऊन बोलतो ..आठच दिवसात येतो .’
रघू पुन्हा एकदा माईच्या पाया पडला आणि गाडीच्या बाहेर पडला . मी येतो आहे असं माझ्याकडे बघून त्याने खुणेनेच सांगितलं आणि बुलेट वर बसून तो निघून गेला .
बबन आणि मालन गाडीत आले . कोणीच कोणाशी बोलत नव्हतं . मी माई शी बोलायचा प्रयत्न केला पण ती माझ्याशी बोलत नाही हे माझ्या लक्षात आलं . आम्ही अगदी लहान असल्यापासून माईच्या या अबोल्याची भीती वाटत असे .कधी काही चुकीचं वागलो की माई आमच्याशी अबोला धरत असे तेंव्हा तिचा पदर धरून तिच्या मागे फिरत असू . ‘ बोल ना गं माई ..पुन्हा नाही ना असं करणार ‘ अशी कबुली दिल्यावरच ती आमच्याशी बोलत असे . पण आता ‘पुन्हा नाही ना असं करणार ‘ अशी कबुली मी तिला देऊ शकत नाही .येताना खूप लवकर आलेलं सोलापूर ..तोच रस्ता ..तीच माणसं ..पण आता तोच रस्ता संपत नव्हता . घरी गेल्यावर अजून काय काय होणार हे तो देवच जाणे .
वाड्यात पोहचेपर्यंत चांगलंच अंधारून आलं होतं .रातकिड्यांचा आवाज जास्तच कर्कश्श वाटत होता . आकाशाने चांदण्यांची चादर पांघरली होती . चंद्र ही डोकावत होता . हवेत चांगलाच उष्मा जाणवत होता . वाडा आला तसं धडधड वाढली .आणि अजूनच गरम व्हायला लागलं . कपाळावर घाम आला . माईला ही भीती वाटत असावी ..तिने ही पदराने आलेला घाम पुसला ..उतरताना माझी मदत तिने घेतली नाही . मी हात पुढे केला तरी तिने मालनच्या हातात हात दिला . बबनने आमचं सामान उतरवलं ..दादा समोरच आरामखुर्चीत बसला होता .त्याला पहाताच अजूनच भीती वाटली .. बहुदा सगळ्यांनाच .बबन त्याची नजर टाळत घाई घाईत सामान आत घेऊन गेला. वहिनीने घाईत पाण्याचं तांब्या भांड आणून ठेवलं .आम्ही आल्याचं कळताच आबा ही बाहेर आले . वहिनी पण खूप उत्सुकतेने आम्ही काय सांगतोय , माई काय सांगतेय हे ऐकण्यासाठी उभी होती .माई सावकाश हात पाय धुवून आली . बबन कडे बघत दादाने विचारलं ..
‘ प्रवासात काही त्रास नाही ना रे झाला ..’
बबन काहीच न बोलता फक्त नकारार्थी मन हलवून उभा होता ..मालन ही घाबरून उभी होती . काहीतरी बिनसलं आहे ..आम्ही कोणीच त्याच्या नजरेला नजर देत नाही आहोत हे दादाच्या लक्षात यायला वेळ लागला नाही . तो बबन च्या अंगावर ओरडला ..
‘ वाचा बसली का रे तुझी .. मी काय विचारतो आहे ..तोंड उचलट जरा ..’
‘ मालक .. मला खरंच काय बी म्हाईत नव्हतं ..’
बबन ला पुढे काही बोलू न देता माई म्हणाली ‘ बबन .. मालन जा तुम्ही घरी ..विश्वा ..सकाळी बोलू ..खूप दमले आहे मी ..पडू द्या मला जरा ..’
वहिनीने विचारलं ‘ सासूबाई .. स्वयंपाक सगळा तयार आहे .. थोडं खाऊन घ्या ..’
‘ माझी भूक मेलीय..तुम्ही घ्या खाऊन ‘
असं म्हणून माई खोलीत जायला लागली . मालन , बबन ही निघाले तसं दादा बबन कडे तीक्ष्ण नजर टाकत म्हणाला ..’ तू थांब रे जरा ..’ तसं माई एकदम ठामपणे म्हणाली ‘ विश्वा .. जाऊ दे त्याला .. दिवसभर गाडी चालवून तो ही दमला आहे .. ए जा रे बाबांनो ‘ ते दोघे पडत्या फळाची आज्ञा घेतल्यासारखे गेले . माई तिच्या खोलीत गेली .आबा ही शांतपणे बसून होते ..माझ्याकडे पहात ते म्हणाले ‘ तुम्ही काही सांगाल , बोलाल की तुम्हीही दमल्या आहात ? आणि जेवणार आहात की तुमच्याही तोंडाची चव गेली आहे ‘
मी मान खाली घालून बसून राहिले . तसं म्हणाले ‘ जा .. तुम्हीही जाऊन आराम करा ..कोणाच्याच तोंडाला का चव नाही ते उद्या कळेलच ‘
मी पण घाईने खोलीत निघून आले . उद्याच्या कल्पनेनेहीं माझा थरकाप उडाला . पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल की यावेळी सुख मला प्रसन्न होईल .भूतकाळाची भुतं कितीही भिरकावून द्यायची म्हंटल तरी ती येतातच बाहेर .तीन वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. दादाचं लग्न झालं होतं .त्यादिवशी पुजा होती . घरात सगळी धावपळ चालू होती .पाहुणे मंडळी होती .आंब्याच्या पानांचे तोरण करायचे होते म्हणून रखमाईने रघूला मागच्या आंब्याच्या झाडाचा फाटा आणायला सांगितला. मी गुलाबी कांजीवरम नेसली होती . माई चा तन्मणी घातला होता ..मोत्याच्या बांगड्या , मोत्याचं कानातलं , बुगडी .आरशात पाहिलं आणि स्वतः वरच खुश झाले होते . खिडकीतून पाहिलं तर रघू झाडावर चढला होता ..त्याला काही कैऱ्या ही आणायला सांगितल्या होत्या . तो त्याच्या नादात होता ..मी खिडकीत उभी राहिले ..त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तो पहातच राहिला. त्याला जणू आजूबाजूच्या जगाचा विसर पडला होता . तो नुसता माझ्या कडे पहात होता . मला भीती वाटली .. हा पडेल . मी माझ्याही नकळत ओरडले ‘ अरे सावकाश .. पडशील ..’ तो भानावर आला . खाली उतरून खिडकीजवळ आला ..खूप काही बोलूनही जे समजलं नसतं ते त्याच्या नजरेतून मला कळत होतं . मी लाजून मान खाली घातली ..त्याने सोनचाफ्याचं फूल काढून खिडकीतून मला दिलं त्याचवेळी रखमाई बाहेर आणि माई आत आली . दोघींनी ते एकच वेळी पाहिलं . रखमाईने रघूला ताबडतोब घरी जायला सांगितलं .. माईने मला हाताला धरून तिच्या खोलीत नेलं आणि खोलीतून बाहेर पडायचं नाही अशी तंबी दिली .. त्या दिवशी नंतर रघू मला दिसला तो मी आले त्या दिवशी स्टँडवर .त्या दिवशी नाही तरी दुसऱ्या दिवशी आबांना , दादाला , सत्याला सगळं समजलं . माझ्यासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली . मी स्पष्टपणे सांगितलं ..माझं रघूवर प्रेम आहे .एखादी अभद्र घटना घडावी तसं सगळे वागत होते . रघूला दादाने बेदम मारलं ..इतकं की त्याला हॉस्पीटल मधे अडमिट करावं लागलं .माझं घराबाहेर पडणं एकदम बंद झालं .माझं लग्न लावून द्यायचं हा एकमेव ध्यास घेतला सगळ्यांनी . मी पण बधले नाही . अन्नत्याग केला .सगळ्यांशी बोलणं सोडलं .शेवटी आबा म्हणाले ‘ रघूने स्वतः येऊन तुझा हात मागितला तर मी नक्की विचार करेन ‘ पण रघू जणु गायबच झाला . रघू बद्दल मनात राग बसला .’ मला नोकरी करू द्या .. मी रघू ला हळू हळू विसरेन ‘ असं मी माईला वचन दिलं . एक दिवस सविस्तर पत्र लिहून घराच्या बाहेर पडले . मुंबईत पी जी झाल्यामुळे मुंबई नवीन नव्हतीच ..त्यामुळे तडक मुंबई गाठली . मुंबई गाठेपर्यंत मला भीती होती .. मला दादाच्या हाती सापडायचं नव्हतं .माझं नशीब बलवत्तर होतं म्हणून मुंबईत नोकरी मिळाली .मी रघूला विसरेन असं जरी सांगितलं असलं तरी ते शक्य झालं नव्हतं . आज पुन्हा ते सगळं जुनं आतलं , साठलेलं , तुंबलेलं आठवून डोळ्यात पाणी आलं .आज पुन्हा सगळं तसंच घडत होतं . पण आज रघू बदलला होता ..आज तो मला असं एकटीला सोडून जाणार नाही .नाहीतर माईशी बोलणं त्याला सोपं नव्हतंच तरी तो आला होता . सुहासशी पण तो स्पष्टपणे बोलला होता . यावेळी तो नक्की येईल .. आबांशी बोलेलच ..आबा तेंव्हा म्हणाले होते ..त्याला स्वतः ला येऊन बोलू दे मी नक्की विचार करेन . त्या म्हणण्यावर ते अजूनही रहातील ना .. तसं जर झालं तर सगळं सोपं होईल . पण दादा .. त्याला कसं आणि कोण आवरणार ? यावेळी रघूचं वागणं खूपच आत्मविश्वास आणि माझ्यासाठी आश्वासक आहे .
मी खिडकी उघडली .. आंब्याच झाड डोलत होतं .हवेची झुळूक आली ती ही सुखवून गेली .मी रेडिओ लावला .. लताचा आर्त स्वर कानी आला ..’ तू चंदा .. मैं चांदनी .. तू तरुवर मैं शाख रे ..’ तो स्वर खोल खोल झिरपत गेला . खिडकीतून येणाऱ्या चंद्रंप्रकाशाने जणू मायेने चेहेऱ्यावरून हात फिरवला . मी डोळे मिटून घेतले.. रघूचा चेहेरा डोळ्यासमोर आला .’नाही ..आता कशालाच घाबरणार नाही मी आणि तू ही घाबरुच नकोस .. मी होतेच तुझ्याबरोबर आताही आहेच .’ मनातच बोलले ..जणू माझं म्हणणं रघू पर्यंत पोचणार होतं .मला खात्री आहे ..माझ्या भावना नक्की त्याच्या पर्यंत पोचतील . मी समाधानाने डोळे मिटले .. आता मी पूर्णपणे तयार होते उदयाला सामोरं जाण्यासाठी !
क्रमशः
©अपर्णा कुलकर्णी