मनोरंजन

⚛️फिटे अंधाराचे जाळे …! ⚛️ 🍁भाग अठरा 🍁

⚛️फिटे अंधाराचे जाळे …! ⚛️

🍁भाग अठरा 🍁

माझं मी सकाळी लवकरच आवरून घेतलं .तसंही रात्री झोप लागलीच नव्हती . आज काय होणार या भीतीने माझं मनस्वास्थ्य हरपलं होतं . दादा कुठल्याही थराला जाऊ शकतो हे आतापर्यंच्या अनुभवावरून एवढं अनुमान तर होतंच . रघूच्या नोकरीवर विपरीत परिणाम होईल असं त्याने काही करू नये एवढीच इच्छा होती . साम , दाम ,दंड , भेद अशा सगळ्या प्रकारे तो रघूचं मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणार .यापेक्षाही जास्त अवघड गोष्ट होती ती म्हणजे आबांना समजावणं . या सगळ्यात त्यांची तब्येत बिघडली तर मला अजिबात चालणार नाही . तेवढी एकच गोष्ट मला कमजोर करू शकते ..याची जाणीव जितकी मला होती तितकीच ती माई आणि आबांना ही असणार आणि तेच जास्त घातक होतं .
सकाळपासून माईचा अबोला होता तसाच होता . ती न बोलता सगळी कामं उरकत होती . वहिनी पण नेमकं काय झालं आहे याचा अंदाज घेत होती . चहा , नाश्ता झाला .. आबांना त्यांच्या गोळ्या दिल्या माईने . आबा म्हणाले ‘ आता सांगाल का .. काय झालं आहे ..’

माई ने एक सुस्कारा सोडलेला माझ्या नजरेतून सुटले नाहीच . माईने सगळी घटना सांगितली आणि रघू तुम्हाला भेटायला येणार आहे हे सांगितलं .. दादा येताना त्याने फक्त रघू येणार आहे तेवढंच ऐकलं आणि तो प्रचंड चिडला .. मालन कामासाठी येताना त्याला दिसली ..तिला पहाताच तो म्हणाला ‘ आताच्या आता जा आणि बबन्याला बोलावून आण ..जा ताबडतोब ‘
ती माईकडे बघत उभी राहिली तसं अजूनच चिडून तो म्हणाला ‘ ए ..तोंड पहात काय उभी आहेस .. निघ म्हणालो ना मी ..मग निघायचं ..’

माई काहीच बोलत नाही हे पाहून मालन निघून गेली . आबा विचारमग्न बसले होते . मी तिथेच उभी होते ..माझ्याकडे बघून दादा अजूनच चवताळला ‘ काय नीलाजरी आहे बघा .. फालतू लाडावून ठेवलं आहे तुम्ही .. नाक कापणार ही एक दिवस तुमचं माझ्याकडुन लिहून घ्या ‘

‘ चिरंजीव तोंड सांभाळून बोला ..धाकट्या बहिण आहेत तुमच्या .त्यांच्याबद्दल बोलताना जरा शब्द जपून वापरा ‘ आबा म्हणाले

मला ही रागच आला ..’ नाक कापण्याच्या गोष्टी तू तरी करू नकोस ..आल्यापासून बघते आहे मी ‘

‘ ताई साहेब .. तुम्हाला ही वेगळं सांगायला हवं का ..माझी तुमच्याबद्दल तक्रार आहेच ..आधी तुम्ही माझ्या काही प्रश्नांची उत्तरं द्या ..मला सांगा तुम्ही रघूला भेटत होत्या का ..’

‘ नाही आबा .. तुमची शपथ घेऊन सांगते मी इथे येईपर्यंत रघू ला कधीही भेटले नाही .. ना ही कधी त्याच्याशी बोलले ..’

‘ खोटं बोलतेय ही ..बरोबर या सोलापूर ला गेलेल्या असताना रघू तिथे कसा होता . एवढा योगायोग कसा ..हा काय हिंदी सिनेमा वाटला का तुला .. माझा अजिबात विश्वास नाही हिच्यावर .. थांबा तो बबन्या येऊ द्या ..सगळं वदवून घेतो त्याच्या कडून ‘

‘ चिरंजीव ..तुम्ही थोडं थंड डोक्याने घ्या .. काहीही झालं तरी मला नेमकं काय झालं आहे ते समजून घेऊ द्या .. बोला ताईसाहेब ..पण एक लक्षात घ्या ..जे काही सांगाल ते फक्त आणि फक्त खरंच सांगा .खोटं बोलाल तर माझं मेलेलं तोंड पहाल ..’

‘ आबा .. आतपर्यंत मी तुमच्याशी कधी खोटं बोलले नाही आणि आताही बोलणार नाही .’
बबन येऊन उभा राहिला , त्याच्याबरोबर मालन ही होती..त्यांच्यासमोर बोलणं मला अवघड वाटत होतं . माईच्या ते लक्षात आलं .ती म्हणाली ‘ मालन तुझी कामं करायला जा तू .. बबन तुला रघूबद्दल काय माहिती होती ते खरं खरं सांग ‘

मालन बद्दल कोणालाच संशय नव्हता .माझ्या बोलण्यातही मी तिचं नाव कसं येणार नाही ते पहाणार होते . माझ्यामुळे तिला त्रास नको .मालन आत निघून गेली . बबन दादाच्या पाया पडत म्हणाला ‘ आईच्यान सांगतो मालक मला त्याच्याबद्दल काईच म्हायती नव्हतं . आमी यायला निघालो आन तवाच त्याला बगीटलं .. तो तितं कसा आला मला खरंच म्हायती न्हाई . मी खोटं बोलत असंन तर रगतपीती व्हिल मला .. साप चावल मला .. मला ..’

‘ बास ..बबन जा तू मळ्यात ..गरज वाटली तर बोलवेन तुला..जा तू आता ‘
आबांनी जा सांगितल्यावर बबन निघून गेला . आणि तो खोटं बोलत नाही याची कदाचित खात्री पटली .माझं आत लक्ष गेलं तर मालन तिथून पाया पडत होती . माझं नाव सांगू नका असं खुणेनेच विनवत होती. मी तिला नजरेनेच नाही सांगणार असं सांगून शांत रहा असं खुणवलं . आमची खुणवाखुणवी वहिनीच्या लक्षात आली .नशीब , दादा किंवा माई आबांच्या लक्षात आलं नाही .त्यानंतर मी मधू मला बस मधे भेटला त्यामुळे रखमाईचा चौदावा असल्याचं समजलं ..स्टँडवर रघू दिसला पण मी त्याला भेटू शकले नाही . सुहासला रघूबद्दल सगळं खरं खरं सांगितलं .सुहासबरोबर बाहेर गेल्यावर रघूची गाठ कशी पडली ..त्यामुळे तो माईला भेटायला आला हे सगळं सांगितलं . तो वाड्यात ही येणार आहे , आबांना भेटणार आहे ..तो पोलीस ऑफीसर झाला आहे हे सगळं सांगितलं . रघूने मालन बरोबर चिठ्ठी पाठवली होती हे मी सांगितलं नाही त्यामुळे मी खोटं ही बोलले नाही आणि पूर्ण खरं ही सांगितलं नाही . माझं सगळं आबांनी शांतपणे ऐकून घेतलं .बराच वेळ ते शांत होते . माई ही काहीच बोलत नव्हती . मीच म्हणाले ‘ आबा ..तुम्ही मला म्हणाला होतात की रघू मला येऊन भेटला तर मी विचार करेन .. आता तो येतो आहे .. तुम्ही खरंच विचार कराल ना ..आबा तुम्हाला मला सुखी झालेलं पहायचं आहे ना ..पण माझं सुख रघू बरोबरच आहे .आमच्या नशिबाने पुन्हा आम्हाला भेटवलं आहे तर तुम्ही पण द्या ना आशिर्वाद ‘

आबा मान हलवत म्हणाले ‘ मला घरात वाद नको आहेत ..आजचा दिवस मला विचार करू द्या .. जो काही निर्णय असेल तो तुमच्या हिताचा असेल एवढंच सांगतो . तुमचा आहे ना माझ्यावर विश्वास ..’

मी होकारार्थी मान डोलवली.’जा तुमच्या खोलीत जा तुम्ही .. आम्ही बघतो ..’

मी उठून निघाले .. माई आणि दादाच्या चेहेऱ्यावर स्पष्ट आश्चर्य दिसत होतं . मी जाताना माझ्या कानावर त्यांचं बोलणं पडलं .वहिनी आणि माईंकडे बघत शांतपणे आबा म्हणत होते ‘ आज पासून ताईसाहेबांची विशेष काळजी घ्या ..त्यांना बाहेर येण्याची गरज पडू नये .पंधरा दिवसांत लग्न होऊन त्या जाणार ..त्यांच्या माहेरपणात कुठेही कमी नको ..आणि चिरंजीव नको ती माणसं वाड्यात यायला नको याची काळजी तुम्ही घ्या .त्यासाठी काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही .भिकू रामोष्याला बोलावून घ्या .. जातीनं त्याचा आदर सत्कार करा .फेटा आणि चांदीचं कडं भेट द्या त्याला .आज पासून पंधरा दिवस मालन इथेच राहील ..तिला ताईसाहेबांच्या दिमतीला ठेवा . मी सांगितलं आहे जरा ही कुचराई मला चालणार नाही . आणि बबनला बोलवून घ्या .. त्याला माझ्या खोलीत घेऊन या ..मी पडतो जरा ..विश्रांती घ्यायला हवी .. ताईसाहेबांच्या लग्नात विघ्न नको .भरपूर कामं आहेत .आणि हो विठू ला मी बोलवलं आहे असा निरोप द्या ..’

म्हणजे आज विचार करतो म्हणून आबांनी शांतपणे त्यांचा निर्णय दिला होता . आज पासून मी नजर कैदेत आहे हे समजायला मला वेळ लागला नाही . अतिशय गोड बोलून माझ्या विश्वासाला तडा दिला होता . या सगळ्यात जमेची बाजू एकच होती ..मालन माझ्याबरोबर रहाणार होती . तिच्याबद्दल कोणालाही संशय येऊ नये यासाठी खूप जपून पावलं उचलावी लागणार होती . रघू पर्यंत पोचण्याचा ती एकमेव मार्ग होती . मी ही शांत डोक्याने आणि थंडपणे विचार करायचे ठरवले .दिवसभरात खोलीत आणून दिलेलं खाणं पिणं मी कशालाच नकार दिला नाही .कोणाशीही भांडण केलं नाही . सतत फक्त एकच विचार .. रघूला सावध कसं करता येईल . भिकू रामोष्याची आठवण आबांनी उगाच काढली नाही हे तर मला समजलेच . लहानपणापासून बघत आले आहे . कोणाचा बंदोबस्त करणं म्हणजे काय हे ही माहित होतं आणि म्हणूनच रघू ची जास्त काळजी वाटत होती . अर्थात रघू ही इथेच लहानाचा मोठा झाला आहे . सगळ्या खड्डे खाचखळग्यांचा त्याला अंदाज असणारच . पण म्हणून काळजी संपणारी नव्हतीच .

घरात माझ्या लग्नाची तयारी सुरू झाली होती आणि मी मात्र या सगळ्यातून बाहेर कशी पडते याचा विचार करत होते .दुपारी चारचा चहा घेऊन वहिनी खोलीत आली . आल्याबरोबर तिने दार लावून घेतले . मी काही बोलणार तेवढ्यात म्हणाली ‘ काही बोलू नका .. फक्त मी काय सांगते ते ऐका .. मी तुम्हाला आणि मालनला खाणाखुणा करताना पाहिलं आहे .. नाही .. नाही घाबरु नका .. मी कोणाला ही सांगणार नाही .’
ब्लाऊज मधून काही रुपये काढून माझ्या हातात ठेवत म्हणाली ‘ राहू द्या ..उपयोगी पडतील ..ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याशीच लग्न करावं ..तुमच्या मनासारखं होऊ दे सगळं ..मी मदत करेन .. एका स्त्रीचं मन एक स्त्रीने ओळखायला हवं ना .. मी समजू शकते ‘

नेहमीची घाबरून , भेदरून रहाणारी ही वहिनी नव्हतीच . वेगळीच कोणीतरी भासली ..माझी सखी भासली की बहिण ? मी तिला मिठी मारली . डोळ्यातून पाणी वहात होतं .माझ्या पाठीवरून हात फिरवत ती म्हणाली ‘ बास बास ..तुमची मनाजोगती पाठवणी करायची आहे. मला तरी कुठे बहिण आहे . लहान बहिणी सारख्याच आहात तुम्ही मला .भावापेक्षा बहिण जास्त समजुन घेते ना .मग पुसा बघू डोळे .सासूबाई पण समजतील ..शेवटी आई आहेत त्या .. हं .. चला चहा घ्या आता ..’

‘ वहिनी .. माझ्या खूप संकटाच्या काळात तू अगदी देवसारखी धावून आली आहेस ..अजून फक्त एक मदत करशील . रघू शिवाजीनगर पोलीस स्टेशन , सोलापूर इथे असतो . तुझ्या भावाकडून तिथला फोन नंबर काढून देशील .तुझे उपकार आयुष्यभर विसरणार नाही ..’
ती माझ्या तोंडावर हात ठेवत म्हणाली ‘ उपकाराची भाषा नको .. बहिण मानलं आहे ना मला ..’

दारावर टकटक झाली ..वहिनी माझ्यापासून बाजूला झाली . आम्ही दोघींनी डोळे पुसले .वहिनीने दार उघडलं तर मालन होती . ती वहिनीला म्हणाली ‘ मालक बोलावत्यात तुमाला ..’

‘ आलेच हं ..’ वहिनी निघून गेली .

मालन असताना दरवाजा लावण्याची सोय नव्हती . ती कॉटच्या बाजूला खाली बसली . बाहेरचा अंदाज घेत पुटपुटली ‘ ताईसाहेब .. ह्येना मांडव घालायला सांगिटलं हाय ..कसं करनार हाय ..’

‘ तू फक्त बाहेर काय घडतंय त्यावर बारीक नजर ठेव ..मला सांगत जा ..’
माई येताना दिसली तसं मी बोलणं आवरतं घेतलं .गोड बोलून मला फसवलं यांनी . का असं वागत आहेत . मी पण बधणार नाहीच .
अजून तर खूप मोठ्या दिव्यातून जायचं आहे मला .

क्रमशः

©अपर्णा कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}