मनोरंजन

⚛️फिटे अंधाराचे जाळे …!⚛️ 🍁भाग तेवीस 🍁

⚛️फिटे अंधाराचे जाळे …!⚛️

🍁भाग तेवीस 🍁

आबांना घरी आणलं .. पहिल्या पेक्षा आबा बरेच ताजेतवाने वाटत होते . मी आबांशी जेवढ्यास तेवढंच बोलत होते पण ते ही माझ्याशी बोलण्याचा फारसा प्रयत्न करत नव्हते .शांतपणे सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असत . देवब्राह्मण व्यवस्थित पार पडला . माझं कशातच मन नाही लागत हे ही त्यांच्या लक्षात येत असेल कदाचित पण ते तसं अजिबात भासवत नव्हते . आज सीमांत पूजन ..सोलापूर हून सगळी मंडळी सकाळीच निघाल्याचा फोन झाला होता .आम्हाला इकडे फार गोतावळा नव्हताच . त्यामुळे इकडे पाहुण्यांची फारशी गर्दी नव्हतीच. सोलापूरहून ही अगदी मोजकीच म्हणजे सुहास , त्याचे आई बाबाच फक्त निघालेत असं समजलं . हे मला जरा विचित्र वाटतंय .कारण त्यांचं एकत्र कुटुंब आहे ..आणि लग्नासाठी कोणीच येणार नाही हे कसं .त्यात शरू तर करवली पण ती पण येणार नाही म्हणे . लग्नानंतर गावजेवण घालतील तो प्रेमाचा कमी आणि प्रतिष्ठेचा भाग जास्त ! गावातली भावकीतली मंडळी आहेत पण मुक्कामाला असं घरी कोणी नाही . एकच आत्या होती ती ही अमेरिकेत रहात होती .आबांची आई म्हणजे आमची आजी खूप लवकर म्हणजे आत्या लहान असतानाच वारली .. काय तर म्हणे फक्त कावीळ झाली म्हणून निमित्त झालं आणि तडकाफडकी गेली . आजोबांनी दोन्ही मुलांचं संगोपन केलं .. पुन्हा लग्न केलं नाही . आजोबा मात्र मला चांगलेच आठवतात .अतिशय मितभाषी होते ..पण त्यांच्या व्यक्तिमत्वात एक दरारा होता . स्वच्छ पांढरे कपडे ..अगदी फेटा सुध्दा पांढराच वापरायचे . आजी गेल्यापासून त्यांनी रंगीत काहीच घातलं नाही असं माई सांगायची .किती सत्वस्थ माणूस ! मी बारावीत असताना ते गेले ..शेवटी शेवटी त्यांची दृष्टी गेली होती .पण कान अतिशय तिखट होते आणि आवाज एकदम खणखणीत .. दादा चा चढलेला आवाज ऐकला तरी बसल्या जागेवरून आवाज देत असत की दादा गप्प होत असे . मला अहिल्या म्हणत असत ..कारण माझी आणि अहिल्याबाई होळकरांची जन्म तारीख एक होती . माझ्यावर त्यांचा खूप जीव होता .. एकतर आत्या इतकी लांब आणि इकडे मी एकुलती एक . सतत सांगायचे ‘ अहिल्याबाई .. तत्व सोडून वागू नये .तडजोड करावी पण अभिमानाला मुरड घालून करू नये ..मुलगी आहात म्हणजे कमी आहात असं समजू नका ..स्त्री मधे समाज बदलण्याची ताकद असते ..तसंच महाभारत घडवण्याची ही ! खूप शिका ..मोठं व्हा .. हे सगळं आपला संसार सांभाळून करायचं बरं का ‘

‘ आजोबा .. मुलींनाच का सगळी बंधनं ..मुलांना पण हे सांगायला हवं ना ..संसार सांभाळ म्हणून ..’

‘ कसं आहे ना अहिल्याबाई ..निसर्गाने देताना जे दिलं आहे त्याचा आपण आदर करायला हवा ना .निसर्गाने देतानाच बाईला मानसिक आणि पुरुषाला शारीरिक ताकद जास्त दिली आहे .मग प्रत्येकाने आपलं बलस्थान ओळखून वागावं .उगाच बेडकाने छाती फुगवली म्हणजे त्याचा बैल होत नाही .उद्या पुरुषाने ठरवलं की स्त्रियांनाच का मूल जन्माला घालता येतं ..मी पण घालणार तर ते शक्य आहे का ? नाही ना .. तुम्ही रांधा वाढा उष्टी काढा असं आमचं म्हणणं नाही ..पण आपण जसे आहोत तसं स्वतः ला स्वीकारा .. तुमची बलस्थान ओळखा . ती विकसीत करण्याचा प्रयत्न करा .स्त्री आहात तर पुरुष होण्याचा अट्टाहास ठेवू नका . स्त्री राहून ही खूप गोष्टी करता येतात हे समजून घ्या ..काय ,आम्ही काय म्हणतोय ते समजतंय का ? आता जरी नाही समजलं तरी समजेल मोठं झाल्यावर .जेंव्हा कधी द्विधा मनस्थिती होईल तेंव्हा या म्हाताऱ्या आजोबाला आठवा ..काय ‘

आजोबांच्या आठवणीने डोळ्यात पाणी आलं . आज आजोबा असते तर काय म्हणाले असते .तुमची ताकद ओळखा म्हणाले असते की मुलगी आहात म्हणून तुमच्या आयुष्याचे निर्णय इतरांना घेऊ द्या म्हणाले असते . रघूने माझ्याशी प्रतारणा केली म्हणजे माझं आयुष्य संपलं का ? रघूशी लग्न करणं एवढंच माझ्या आयुष्याचं ध्येय असलं पाहिजे का ? किंबहुना कोणाशी का होईना मी लग्न केलंच पाहिजे का ? जर माझं सुहास वर प्रेमच नाही तर हे समजूनही तो माझ्याशी लग्न करतोय ..म्हणजे माझ्यावर उपकारच करतोय या भावनेपोटी मी त्याच्याशी लग्न करणं म्हणजे फक्त माझंच नाही तर त्याच्याही आयुष्याची माती करण्यासारखं होईल .आजोबा जसं म्हणाले ‘ शिका .. मोठं व्हा ‘ हे शिकणं म्हणजे सुशिक्षित असणं अपेक्षित आहे . ज्या शिक्षणामुळे मला स्वतः चे निर्णय स्वतः घेता येईल .आणि मोठं होणं म्हणजे फक्त आर्थिक मोठं होणं नव्हे ..समंजसपणा , निर्णयक्षमता , संवेदनशीलता या गुणांसह मानसिक दृष्ट्या मोठं होणं अपेक्षित हवं . मी नुसती रडतेय ..ते सुध्दा रात्री ..कोणाला कळणार नाही असं . का? मी आबांच्या तब्येतीचा विचार करतेय ..एक मुलगी म्हणून माझं ते कर्तव्य आहे .पण आबांचं वडील म्हणून माझ्याप्रती कर्तव्य नाही का ? मी कशात सुखी राहीन हा विचार त्यांनीही करायला हवा ना ..त्यांना वाटतं मी सुखी रहावं ..पण माझ्या सुखाची व्याख्या ते ठरवणार असं कसं ? आणि हे सगळं होत असताना मी माझी नाराजी ही दाखवायची नाही . नाही .. अजून ही वेळ गेलेली नाही .मी आबांना जाऊन सांगतेच की मला लग्नच करायचं नाही . ना रघूशी ना सुहासशी . आबांकडे या विचाराने मी उठले ..आता माझा निर्णय झालेला होता .तितक्यात मालन मला बोलवायला आली ‘ ताय ..आबासाहेब बोलवत्यात तूमाला ..’ बरं झालं ..माझं म्हणणं खूप शांतपणे त्यांना सांगणं अवघडच होतं .त्यांच्या या परिस्थितीत वाद घालणं नकोच .. ते काय म्हणतात ते बघू आणि त्यावर कसं सांगायचं ते ठरवू असं ठरवून मी त्यांच्या खोलीत गेले .

आबा एकटेच बसले होते . जपाची माळ ओढत होते . त्यांनी डोळे मिटलेले होते आणि विचारमग्न वाटत होते . काय चालू असेल त्यांच्या डोक्यात .आपली मुलगी खुश नाही हे तर त्यांना नक्की समजत असेल तरी एवढं कसं शांत राहू शकतात हे .मी आवाज दिला ..
‘ आबा ..’

‘ या .. आलात .. बसा ‘
त्यांनी डोळे उघडत माळ डोळ्यांशी लावत म्हंटल . मी त्यांच्या बाजूला बसले .
‘ तुम्हाला वाटतं मी तुमचा विचार करत नाही ..पण तसं नाहीये ..मी फक्त तुमचाच विचार करतो .’

मी फक्त हसले . माझं हसणं त्यांच्या जिव्हारी लागलं असावं ..त्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं .भरल्या आवाजात ते म्हणाले ..’ उद्या तुमचं लग्न आहे ..तुम्ही दुसऱ्या घरी जाणार .. दुसऱ्याच्या हातात आपला काळजाचा तुकडा सोपवणं हे सोपं काम नाही . बागेत एखादं झाड लावलं तर त्याची किती निगा ठेवतो माळी ..त्याला कीड लागू नये , त्याची वाढ चांगली व्हावी आणि ते रोप त्याची काळजी घेईल अशा माणसाच्या हातात पडावं अशी त्याची इच्छा असते . तुम्ही तर आमची मुलगी आहात ..आई जन्म देते , तिच्या रक्ता मांसाने बाळाला वाढवते पण बापाचा जीवच असतो त्या मुलीत .मुलगी म्हणजे बापाचं हृदय असतं . असो ..तुम्हाला माझं बोलणं योग्य वेळ आली की समजेल ..तर मी तुम्हाला अशासाठी बोलवलं होतं की उद्या लग्नानंतर तुम्हाला सोलापूर ला रहायची वेळ आली तर तुम्ही काय कराल ? तुम्ही नोकरी सोडू नये असं मला वाटतं ..तुम्हाला सोलापूरलाही चांगली नोकरी मिळू शकते ..तिथेही खूप मोठे कॉलेजेस आहेत .’

‘ आबा .. एक सांगायचं होतं ..’

‘ बोला ना ..’

‘ आबा मला हे लग्नच करायचं नाही . हे लग्न करणं म्हणजे सुहास वर ही अन्याय करण्यासारखं आहे ..’

‘ आणि रघूवीर वर ..’

‘ त्याचा आता या सगळयाशी काही संबंध राहिला नाही .’

‘ संबंध असे तोडता येतात का ?’

‘ तुम्ही माझ्यापुढे दुसरा पर्याय ठेवला आहे का ?’

माई आत येत म्हणाली ..’ हे काय .. पाहुणे मंडळी पोचतील लवकरच आणि तुम्ही बापलेक गप्पा मारत का बसले आहात .चल मनू ..आवरून घे लवकर ..’

‘ माई मी माझा निर्णय आबांना सांगितला आहे .. मला लग्नच करायचं नाही ..’
माई अवाक होऊन माझ्याकडे बघत होती .

आबांनी त्यांचा पंचा माझ्यासमोर झोळी सारखा धरला आणि म्हणाले ‘ मी भीक मागतो तुमच्यासमोर ..माझ्या लेकीचं सुख माझ्या पदरात टाका ‘

कितीही राग आलेला असला तरी कोणतीही लेक बापाला असं पाहू शकत नाही .माझ्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं .. मी डोळे घट्ट मिटून घेतले .आबा माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले ‘ सगळं तुमच्याच म्हणण्याप्रमाणे होईल ..तुमचा बाप तुम्हाला शब्द देतो आहे .’

मी धावतच खोलीत आले . आधी मनसोक्त रडून घेतलं .मग आंघोळ केली थंड पाण्याने ..तेंव्हाच मनाला बजावलं मनवा आज मेली ..आज जिचा जन्म होईल ती फक्त आबांची मुलगी असेल आणि होणारी सुहासची बायको ! यंत्रवत सगळं आवरलं ..दारावर जोरजोरात थाप पडायला लागली म्हणून दार उघडलं तर मालन होती .. ती हसत होती ..मी वैतागले ..’ का दार बडवते आहेस ..आणि हसायला काय झालं ‘

‘ ताय .. काय सांगू तूमाला.. पाव्हणे आलेत .. आबासायेब .. माई सायबांनी स्वागत केलं नवरदेवाचं .. समदे आलेत सुहास भाऊ , त्येंचे आई वडील हयेत ..’

ती काय बोलतेय ते ऐकलं तरी आतपर्यंत पोचतच नव्हतं . मी स्तब्ध होऊन तिच्याकडे बघत होते . ही एवढी का खुश झाली आहे . माणसं एवढी सहजी कशी बदलतात .प्रेम नाही त्याच्याबरोबर लग्न करू नका असं सांगणारी मालन हीच का असा प्रश्न पडला मला . वहिनीही हसतच मला न्यायला आली आणि माझ्या कपाळावर आठी पडली .

क्रमशः

©अपर्णा कुलकर्णी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}