‘अभिषेक’ #कथाविश्व —सचिन देशपांडे
‘अभिषेक’
#कथाविश्व
दामले आजोबा आज, अगदी सकाळी सहा वाजल्यापासूनच दबा धरुन बसलेले. आज कुठल्याही परिस्थितीत, ते पकडणारच होते त्या चोराला. तो चोर… जो त्यांच्या अंगणातील जास्वंद, कण्हेर, स्वस्तिक, पारिजातक, सोनचाफा इत्यादी झाडांवरील… सर्व फुलं रोजच्यारोज उडवत असे. बरं फुलं तोडून नेतांना, झाडांचीही पार नासधूस करीत असे तो.
कर्वेरोडच्या सह्याद्रीनगरमधे… रिटायर्ड जज दामल्यांचा, ऐसपैस बगला होता. जिथे ते अन् त्यांची पत्नी, असे दोघेच रहात. दामल्यांच्या दोन्ही मुली लग्न होऊन पुण्यातच रहात होत्या… एक कोथरुडला, तर दुसरी शनवारात. अधूनमधून दोघीही चक्कर टाकत असत आळीपाळीने. बाकी निवृत्त न्यायाधीश असल्याने, दामल्यांची वट मात्र होती शेजार-पाजार्यांत. आणि त्यामुळेच… “चक्क आपल्या अंगणात चोरी?” हा मुद्दा त्यांनी, फारच मनाला लाऊन घेतला होता. दुसरं म्हणजे… “आज हा चोर अंगणापर्यंत पोहोचलाय, उद्या घरात शिरायचा… आणि ते ही सौ एकटी असतांना शिरल्यास, आणिकच पंचाईत” असा विचार मनात डोकावून दामले, अधिक अस्वस्थ झाले होते. त्यामुळेच दामल्यांनी आज, “त्या भुरट्याचा सोक्षमोक्ष लावायचाच” असं मनोमन ठरवलेलं.
आणि तेवढ्यात दामल्यांना, चाहूल लागली अंगणातून. त्यांनी खिडकीचा पडदा हळूच थोडासा बाजूला करत, बाहेर डोकावून पाहिलं. दहा – बारा वर्षांची एक मुलगी… फ्राॅकचं खालचं टोक हातात धरुन उभी होती, झाडांभोवतीच्या एखाद फूट उंचीच्या कठड्यावर. तिने फ्राॅकमध्ये गोळा केलेली असावीत फुलं. पण आता ती स्तब्ध उभी होती जागच्याजागी, अगदी थिजल्यासारखी. दामल्यांना कळेना… की ही मुलगी फुलं तोडून झाल्यावरही, नुसती उभी का आहे. लहान पोरच आहे म्हंटल्यावर, दामले हातातली काठी आपटत बाहेर आले… “काय गो चिमुरडे चोरी करतेस होय?” असं ओरडतच. पण तरीही ती मुलगी जागेवरुन, ढिम्म हलेना. दामले एकीकडे आश्चर्य करीत, आणिक जवळ जवळ येत होते तिच्या. साधारण बारा एक फुटांवर दामले असतांना, त्या मुलीने कठड्यावरुन उडी मारली. आणि दामल्यांपासून दूर पळण्याऐवजी, त्यांच्याकडे जोराने पळत आली ती. एका हाताने फ्राॅकचं टोक, अजुनही पकडून होती ती. दुसर्या हाताने दामल्यांमा थांबवल तिने… जणू त्यांना अडवत होती ती, पुढे जाण्यापासून. दामल्यांच्या हातात आयतीच सापडली होती ती खरी… पण त्यांना समजतही नव्हत की, ही पोर आपल्यापासून पळून जाण्याऐवजी… आपल्यापाशीच का आली पळत? दामल्यांनी जोराने तिचं बखोट धरलं… आणि ते हलवत तिला खडसावणार, तोच ती एका हाताने त्या झाडांपाशी बोट करत बोलली…
“साप… लय मोट्टा साप हाय तिथं… तुमी जवल येत हूते… तुमाला चावला असता त्यो… म्हनून म्या आली तेच्या अंगावरुन उडी मारुन”.
दामल्यांनी तिच्या बोटाच्या दिशेला पाहिलं, नी सर्रसरुन काटा आला त्यांच्या अंगावर. एक फणा काढलेला भलामोठा नाग होता तिथे. क्षणार्धात फणा मिटवून तो झप्पकन सरपटत… कठड्याच्या बाजूने गेटबाहेर पडत, दिसेनासा झाला. दामल्यांना खूप कौतुक वाटलं त्या पोरीचं, आणि तिच्याकडे पाहिलं त्यांनी. ती त्यांच्याकडेच बघत उभी होती… तिच्या टपोर्या, बोलक्या, पाणीदार डोळ्यांनी. दामल्यांचं लक्ष खाली जमिनीवर गेलं. मगाशी तिच्या हाताला धरुन तिला जाब विचारतांना, तिच्या फ्राॅकमधून फुलं पडली होती खाली. फक्त चार फुलं… निळीशार… गोकर्णाची फुलं. त्या फुलांकडे बघितलं त्या मुलीने, आणि मग दामल्यांकडे बघत बोलली ती…
“माझा बा संकराचा लय मोट्टा भगत हाय… त्यो रोज संकराची पुजा करायचा… पन आता बरेच दिस झाले, हंथरुनावरच असतूय… आजारी असतूय… म्हनून आता म्या पुजा करती, बा ला लौकर बरं वाटाव म्हनून… पन म्या रोज फकस्त, चारच फुलं नेत असती बागेतून तुमच्या… ती बी फकस्त गोकर्नाचीच… आयच्यान… बाकी कुठल्याच फुलान्ला म्या हाथ बी लावत नाय… बा म्हनतो ‘फुलान्ला आपल्या भक्तीचा वास येतू… अगदी गोकर्नाच्याही… तुला बी येईल… मग बग… तुझं लक्षच जानार न्हाई, त्या चाफ्या नी पारिजातकाकडं’… सप्पथ सांगती… म्या बगत बी नाय बाकी फुलांकडं… त्या संकराचीही आन घेते हवं तं”.
दामले आजोबांचे डोळे पाणावले होते आता. जास्वंद, कण्हेर, स्वस्तिक, पारिजातक, सोनचाफा वगैरे फुलझाडांची प्रेमाने निगा राखतांना… त्यांना कळलंच नव्हतं की हा गोकर्ण कसाकाय, नी केव्हा उगवला मध्येच. म्हणजे ज्याची फुलं त्यांच्या खिजगणतीतही नव्हती, तिच फुलं कोणीतरी… आपल्या कोणासाठीतरी रोज निष्ठेने नेत होतं, आणि ती ही अगदी नेमकी. दामल्यांनी त्या पोरीला ती खाली पडलेली फुलं, उचलायला सांगितली. आणि बोलले…
“तू येत जा गं बाळा रोज… आणि हवी तेवढी फुलं वेचत जा… आणि हो… उद्या मी ही येतो तुझ्याबरोबर, घरी तुझ्या… तुझ्या बाबांचं औषध-पाणी करु आपण… मस्त खडखडीत बरा करु त्याला… त्याला पुन्हा शंकराची पुजा करायला बसवतो की नाही, बघच तू… तुमच्या दोघांच्या ह्या एकत्रीत श्रद्धेमुळेच तर वाचलोय मी आज”.
दामल्यांनी त्या मुलीच्या डोक्यावरुन, मायेने हात फिरवला. तिच्या डोळ्यांतून एक थेंब पाण्याचा… पडला तिच्या ओंजळीतील, एका गोकर्णाच्या फुलावर. अन् त्या अभिषेकाने, आणिकच गडद निळं दिसू लागलं होतं… ते गोकर्णाचं फुल, त्या निळकंठाचं फुल.
—सचिन देशपांडे