तीन मध्यमवर्गीय कथा विवेक चंद्रकांत वैद्य . नंदुरबार .
तीन मध्यमवर्गीय कथा विवेक चंद्रकांत वैद्य . नंदुरबार .
१) गेल्या काही दिवसापासून त्याची गाडी त्रास देत होती . सेल्फस्टार्ट तर बंदच झाले. पण किक पण जास्त माराव्या लागायच्या.पाय पोटर्या दुखायचे. ओळखीचे मॕकनीकने कधीचेच सांगितले “काका…दोन हजारात गाडी मस्त पळेल.बॕटरी नवीन टाकू.अॉईल बदलू.कॉरबोरेटर साफ करु. ” दोन हजार मोठी रक्कम नव्हती .पण पैसाचं पुरत नव्हता. दोन्ही मुलं बाहेरगावी शिकायला.अधूनमधून पत्नीची पोटदुखी. तिचा खर्च .
शेवटी काटकसर करुन त्याने २००० जमवले. रवीवारी गाडीचे काम उरकून टाकू असा विचार होता तर संध्याकाळी त्याच्या मुलाचा फोन..
“बाबा..,पुढच्या आठवड्यात माझा वाढदिवस आहे तुम्हाला माहिती आहे ना?”
“हो. ”
“थोडे पैसे पाहिजे होते”
“किती ?”
“दोन हजार पुरतील”
“इतके ?”
“बाबा.इथे सर्व मित्रांना पावभाजी आईस्क्रीम द्यावे लागते. प्रत्येक जण देतो.”
पाचशे रुपयात भागणार नाही का असा प्रश्न त्याच्या ओठावर आला.तो त्याने गिळला.जाउ द्या .आपले वाढदिवस तर काही साजरे झाले नाही .निदान पोरांना तरी करु द्या .
समोरून मुलाचा आवाज आला.” केव्हा पाठवतायत पैसे?”
“उद्या परवा टाकतो तुझ्या अकौंटला”. त्याने उत्तर दिले.
अजून काही दिवस काटकसर करावी लागेल . त्याच्या मनात विचार आला.आणि अजून काही दिवस पाय दुखवून घ्यावे लागतील.
२) गेले कित्येक दिवस त्याची बायको त्याच्या मागे लागली होती.टीव्ही बदला . छानपैकी फ्लॕट टीव्ही घ्या म्हणून . वीस बावीस हजाराचे बजेट होते. त्यालाही जूना भलामोठा टीव्ही बदलायचाच होता.पण खर्चही बराच चालू होता. घराचे हप्ते.विधवा बहिणीला मदत.त्यामूळे तो जरा दुर्लक्षच करत होता.
आज अचानक साहेबांनी त्याला बोलवले. “अहो ताटे.तुमचे मागचे एरीअर्स तुमच्या खात्यात जमा झाले आहेत.जरा चेक करून घ्या.”
“हो सर.करतो.तरी किती पैसे आले असतील?”
“वीस बावीस हजार असतील साधारण. बाकीच्यांनाही तेवढेच मिळाले”
तो खूष झाला.चला .बाईसाहेबांना नवीन टीव्ही घेऊन देउ आता.
अॉफीस सुटताच तो तडक घरी आला. पत्नीला सांगून मोकळे व्हावे असं त्याला वाटले . मग विचार केला त्यापेक्षा तिला सरप्राइज देउ.
पाणी पिऊन तो बसलाच होता.तितक्यात त्याची मोठी मुलगी धावत पळत आली.
“पप्पा,आमच्या कॉलेजची ट्रीप चालली आहे साउथ इंडीया.मी जाउ ?”
“किती दिवस? खर्च किती ?”
“आठ दिवस.अठरा हजार.”
“इतका जास्त ?”
“पप्पा.जातांना प्लेनने जाणार . शिवाय मैडम म्हणाल्या ३-४ हजार खर्चाला खरेदीला घेऊन ठेवा.”
बाहेर येऊन तिच्या गोष्टी ऐकत असलेल्या बायकोकडे त्याने असहाय नजरेने पाहीले.तिनेही सर्व समजल्यासारखे संमतीची मान हलवली.
मुलगी म्हणाली “मैडमांनी उद्या पर्यत फायनल करायला सांगितले आहे.माझ्या सर्व मैत्रीणीपण जाणार आहेत.पप्पा मी जाऊ ना?”
“हो.” त्याचा आवाज त्यालाच ओळखू आला नाही,त्याने एकदा पत्नीकडे आणि एकदा जून्या टीव्हीकडे पाहीले आणि सुस्कारा सोडला.
३) कित्येक वर्षे भाड्याच्या घरात राहून तो कंटाळून गेला होता. दरवर्षी भाडेवाढ.३-४वर्षात घर बदल.परत घरमालकाची कटकट ..अटी. त्याने प्रयत्न पुर्वक पैसे जमा करायला सुरुवात केली.काटकसर केली.एक्स्ट्रा कामे केली. नाही म्हटले तरी सात साडेसात लाख जमा झाले. गावाबाहेर एका बिल्डरने मध्यमवर्गीयांसाठी स्वतंत्र दोनरुम ची घरे बांधून विकायला काढली हे समजताच तो तिकडे गेला.
मटेरीअल थोडे मध्यम दर्जाचे होते तरी त्याला आवडले.त्याच्या बजेटमध्ये होते.शेवटी त्याचं स्वतःच घर होणार होतं ते.
आनंदाने तो घरी पोहचला तर घरात ही गर्दी . त्याची वृद्ध आई बेशुद्ध पडलेली.गल्लीतल्या डॉक्टरांनी हॉस्पिटलला न्यायला सांगितलेले .त्याने तातडीने रिक्षा मागवली. हॉस्पिटलला लगोलग रक्त वै तपासण्या झाल्या.सीटीस्कॕन केलं तर मेंदूत छोटीसी गाठ. तिथून परत शहरातल्या मोठ्या हॉस्पिटलला हलवण्याचा सल्ला .पुन्हा धावपळ.एम्बुलन्स.तपासण्या.I,C,U.वै.
तो तणावातचं. तिथल्या डॉक्टरांनी अॉपरेशन सांगितलं .खर्च सांगितला . जर ऐपत नसेल तर सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्लाही दिला. त्याने क्षणभर विचार केला. हे हॉस्पिटल इथले डॉक्टर नामांकीत.
वडील वारल्यानंतर आपल्याला वाढवण्यासाठी आईने केलेले कष्ट त्याला आठवले.त्याने अॉपरेशनची संमती दिली.
अॉपरेशन यशस्वी झाले. आईच्या उशाजवळ तो बसला होता. हॉस्पिटलचे बील साडेचार लाख रुपये आले.बाकी खर्च वेगळा. शुद्धीवर आल्यानंतर आईला हे सांगायचे नाही हे त्याने ठरवून ठेवले होते. नाहीतर आई त्याला ओरडली असती”मेल्या.कशाला माझ्या म्हातारीच्या बोडक्यावर एवढे पैसे खर्च केले? मरु दिलं असतं मला.माझ काय राहलय आता.”
तो हसला.डोळ्यांतलं पाणी पुसून त्याने आईच्या डोक्यावरून हात फिरवला. जाउ दे आई.तू मला अजून हवी आहेस.घरं नंतरही घेता येईल…..
[समाप्त ]
विवेक चंद्रकांत वैद्य . नंदुरबार .