#बॉस©गौरी ब्रह्मे
#बॉस
साधारण महिन्यातून दोनदा “आवाज हळू करा, भांडी आपटू नका, दार बंदच ठेवा” अश्या सूचना नवऱ्याकडून घरात strict orders च्या कलमाखाली आम्हाला सगळ्यांना मिळतात. गेल्या काही महिन्यांत आम्हाला याची सवय झालेली आहे. त्यादिवशी त्याची “महत्त्वाची मीटिंग” आहे हे आम्हाला कळतं, कारण त्यादिवशी एरवी साध्या कपड्यांत काम करत असलेला नवरा चकाचक आवरतो, चक्क दाढी करतो, फक्त फॉर्मल शर्टच नव्हे तर फॉर्मल पॅन्टही घालतो. आमची लेक त्याला चिडवते, “बाबा, फॉर्मल शर्ट ठीक आहे पण व्हिडियो कॉलसाठी फॉर्मल पॅन्टची काय गरज आहे? आजकाल सगळे फक्त चांगला शर्ट घालतात. तिचा बाबा तिला सांगतो, “कपडे हे फक्त व्हिडियोसाठी किंवा दिखाऊगिरीसाठी घालायचे नसतात. व्यवस्थित कपडे घातले की आपल्यालाही छान वाटतं, स्वतःबद्दलचा आत्मविश्वास वाढतो. अश्या मिटिंग्समध्ये तो खूप महत्त्वाचा असतो.” लेक सगळं ऐकत असते.
कालही त्याची अशीच “महत्त्वाची मीटिंग” होती. लेक तिच्या बाबांबरोबर गप्पा मारायला लागली. मला वाटतं, विशेषतः मुलींची घरातल्या प्रत्येक माणसाबरोबर एक वेगळी वेव्हलेंग्थ जमलेली असते. त्या त्या वेव्हलेंग्थप्रमाणे त्या कोणाशीही कितीही गप्पा मारू शकतात. तर त्यांच्या गप्पा सुरु झाल्या. मी ऐकत होते.
“बाबा, झाली मीटिंग?”
“हो, झाली एकदाची!”
“खूप महत्त्वाच्या असतात या मिटिंग्स?”
“हो, बऱ्याच गोष्टी टॉप लेव्हलवर ठरत असतात, त्यामुळे महत्त्वाच्या असतात.”
“ओरडतात तुमचे बॉस तुम्हाला?”
“चूक झाली की खरडपट्टी काढतात. पण आमचे दोन बॉस जबरदस्त आहेत. शक्यतो चुका होतील असं काही करूच देत नाहीत. प्रोजेक्टवर करडी नजर असते त्यांची.
“मग तुला ओरडले आहेत तुझे बॉस कधी?”
“जी काय ओरडाओरडी असते ती एकदम टॉप लेव्हल असते. आम्हाला शक्यतो आमचे बॉस लोक सांभाळून घेतात.”
“खूप भारी आहेत बाबा तुझे दोन्ही बॉस?”
“एकदम तूफान आहेत! कामात अजिबात हयगय नसते. अतिशय हुशार, मॅनेजमेंट स्किल्स जबरदस्त, आणि खरडपट्टी काढायला अजिबात इकडे तिकडे बघत नाहीत. मोठमोठ्या लोकांना मीटिंगमधे कोलतात.”
“कोलतात म्हणजे?”
“म्हणजे कोणाचीही भीडभाड ठेवत नाहीत.”
“मग सगळे त्यांना घाबरून असतात?”
“अग घाबरायला काय ते तुमच्या शाळेच्या xyz प्रिन्सिपल नाहीयेत.” But yes, people do get scared of them because they respect them. आणि याचं कारण दोघींचा स्किलसेट तसा जबरदस्त आहे. दोघी त्यांच्या कामात बाप आहेत.”
“दोघी?” ही लेकीकरता गुगली असते.
“हो, दोघी.”
“म्हणजे तुझ्या बॉस दोन बायका आहेत?”
“हो. So?”
“म्हणजे दोन बायका तुम्हाला सांगतात, कसं काम करायचं, काय करायचं नाही ते?”
“अर्थात. आणि सांगितलं तर त्यात काय इतकं? बॉस हा बॉस असतो. त्यात स्त्री पुरुष असा भेद नसतो. या दोघी आता पन्नाशीत आहेत. सॉफ्टवेयर क्षेत्रात क्रांती घडत होती होती या दोघी या क्षेत्रात आल्या आहेत. त्यांचा अनुभव प्रचंड आहे. पूर्ण युरोप डिव्हिजनच्या हेड आहेत त्या. प्रचंड पैसे कमावतात. Funds कसे मॅनेज करायचे, कोणते निर्णय घ्यायचे ते या दोघींना आता व्यवस्थित माहीत आहे. So they are the boss!”
“हम्म.” लेक जरा विचारात पडते. “म्हणजे बाबा मी पण बॉस बनू शकते?”
“अर्थात बनू शकतेस. भरपूर अभ्यास केलास, मेहनत केलीस तर तू काहीही करू शकतेस, बॉस देखील बनू शकतेस.”
“Wow, राधा द बॉस, मस्त वाटतंय ऐकायला.”
“मलाही मस्त वाटेल, पंधरा एक वर्षांनी एखाद्या घरात एक बाबा असाच घरात सगळ्यांना सांगत असेल, शांत बसा रे. माझी महत्त्वाची मीटिंग आहे माझ्या बॉस, राधा ब्रह्मेबरोबर.”
हे ऐकून आमच्या लेकीच्या डोळ्यांत हजार तारे एकदम चमकल्याचा भास झाला.
आमच्या घरात एकाच दिवशी चिल्ड्रेन्स डे, फादर्स डे आणि वूमेन्स डे सगळे एकदम साजरे झालेले असतात.
©गौरी ब्रह्मे