कथा -‘आपलं घर’… शिल्पा
कथा -‘आपलं घर’… शिल्पा 🌹🌹
आई थांब दारातच, आधी औक्षण करते भाकर तुकडा ओवाळून टाकते मगच ये आत.. स्नेहा अस म्हणत धावतच आत गेली.. आज स्नेहा, सुनील यांना त्यांची हक्काची आई आणि शौर्याला लाड करणारी आजी मिळाली.
सकाळीच सुनील आणि स्नेहा वृद्धाश्रमातील या कुसुम आजींना आपल्या घरी घेऊन आले.
सख्या नात्याने दुरावलेली कुसुम आजी आज सख्या नात्यापेक्षा ही त्यांना आपलंसं करणाऱ्या घरातआनंदाने आली होती.
स्नेहा आणि सुनील हे दोघे लहान पणा पासून अनाथच
एकांच्या ओळखी मधून दोघांचं लग्न जमलं, त्यांना शौर्या नावाची पाच वर्षाची मुलगी होती.
स्नेहा आणि सुनील महिन्यातून दोन वेळा तरी या वृद्धाश्रमात येत या वयस्कर लोकांन बरोबर वेळ घालवत त्यांना तुकारामांची गाथा, ज्ञानेश्वरी वाचून दाखवत , कधी अभंग, कधी गप्पा गोष्टी , भेंड्या, पत्यांचे डाव दोन तास कसे जात त्यांनाही कळत नसे, छोट्या शौर्याला तर या सगळया आजी आजोबांचा लळा लागला होता. ते सगळेच दर महिन्याला शौर्या ला भेटण्यासाठी उत्सुक असायचे.
पण विशेष गट्टी जमली ती या कुसुम आजी बरोबरच कुसुम आजी म्हणजे उत्साहाचा झराच किती तरी छान गोष्टी, लहान मुलांच्या कविता त्यांनी शौर्याला शिकवल्या.. शुभंकरोती, रामरक्षा शौर्या पण एकदम छान म्हणायची. शौर्या त्यांच्या भोवती घुटमळत असे नेहमी.
कुसुम आजींना दोन मुले एक दिल्ली मधे तर एक इथेच मुंबई मधे राहणारा, जसे वामन आजोबा गेले तसे कुसुम आजी वृद्धाश्रमात आल्या त्या कायमच्या, गेल्या दहा वर्षात कोणीही त्यांना भेटायला सुद्धा आले नाहीत.
दर महिन्याला वृद्धाश्रमात त्यांच्या नावाने विशिष्ट रक्कम जमा होते. इतकचं
शौर्याला तर कुसुम आजी चा चांगलाच लळा लागला होता..
एक दिवस स्नेहा आणि सुनील वृध्दाश्रमाच्या मालकाशी बोलले , त्यांना तर फार आनंद झाला.. अहो किती सूज्ञ निर्णय आहे तुमचा ,आम्हालाही खूप वाईट वाटतं या आजी आजोबांच.. घरचे काहीही विचार न करता यांना अस सोडून देतात.. अर्थात ज्यांना कोणीच नाही त्यांनी जरुर राहावं पण ज्यांना सख्खी नाती आहेत त्यांनी अस करावं,असो पण तुमच्या सारखे लोकं अजून आहेत या जगात… छान वाटलं, नाती जर प्रेमाने जपली तर वृध्दाश्रमांची संख्या कमी होईल..
त्या दिवशी ‘ आपलं घर ‘ वृध्दाश्रमातून निघताना सगळ्यांचेच डोळे पाणावले होते पण आनंदाने ह… कुसुमला आज.. सख्या नात्या पेक्षाही जास्त जपणारी त्यांची हक्काची सून मुलगा आणि नात मिळाली होती.
आई ..स्नेहा ओवाळायला हातात तबक घेऊन उभी होती.. भूतकाळात गेलेली कुसुम एकदम भानावर आली.. दोघींच्या डोळ्यांच्या कडा आनंदाने कीचिंत पाणावल्या होत्या
स्नेहाने औक्षण केलं आणि तिघांनी हात धरून कुसूमला आत नेल.. कुसुम तिघांकडे कौतुकाने पहात असतानाच सुनील म्हणाला आई हे आपल्या चौघांच हक्काचं ‘ आपलं घर ‘
शिल्पा 🌹🌹