ताशा,वेश्या,आणि कविता. (सत्य कथा.) (लेखक.नितीन चंदनशिवे.)
ताशा,वेश्या,आणि कविता.
(सत्य कथा.)
(लेखक.नितीन चंदनशिवे.)
शेवटची लोकल नुकतीच निघून गेली आणि फ्लॅटफार्म रिकामं झालं.मुसळधार पाऊस कोसळून ओसरता झाला होता.रिमझिम बऱ्यापैकी सुरूच होती.बाकड्यावर पोतं टाकलं आणि अंगावर एक चादर घेऊन मी आडवा झालो.मला आठवतंय त्या दिवशी नगरपालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला होता. बाहेर रस्त्यावर विजयी उमेदवारांची मिरवणूक चालू होती.पाऊस थांबल्यामुळे तिला आणखी जोर चढला होता.फटाक्यांचा माळा वाजत होत्या.ढोल ताश्यांचा आवाज आणखीन वाढला होता.तासभर धिंगाणा सुरूच होता.त्या आवाजाच्या गर्दीत बच्चनच्या ताशाचा आवाज मी बरोबर हेरला आणि बच्चनला यायला उशीर होणार याची खात्री झाली.झोप लागत नव्हती.भूक लागली होती.उठून बसलो आणि तंबाखूचा विडा मळायला सुरवात केली.
विडा मळत असताना मागून मंगलचा आवाज आला “क्या कालू झोपला नाहीस अजून”. “अगं बच्चन अजून आला नाही”… असे म्हणत, मी बाकड्यावर पुन्हा बसकण मारली.ओठावर दोन बोटं गच्च दाबून थुकलो. पिचकारी फ्लॅटफार्मच्या बाहेर गेली. हा माझा छंद होता.
बारा वाजले होते जय हिंद थिएटर जवळ होतं.शेवटचा खेळ संपत आला तशी मंगल उभी राहत म्हणाली,”चल आलेच मी तासाभरात”.असं म्हणून ती निघून गेली.तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे एक कटाक्ष टाकला आणि तोंडातला विडा बोटाने धरून भिरकावला.मंगल कोण कुठली माहीत नाही. आसऱ्याला एकत्र जमलेल्या गर्दीला एकच नातं असतं ते म्हणजे परिस्थितीचं. आणि म्हणाल तर फक्त ओळखीचं.मंगल इथं धंदा करत होती.शरीर विकून फक्त पोट भरत होती.मी बॅचलर मुलगा.दिवसभर काम आणि कॉलेज करून रात्र काढायला स्टेशनवर येणारा.इथं मी खरी जिंदगी जगलो.फार नाही पण तीन साडे तीन महिने तर नक्कीच.
अर्ध्या तासाने मंगल पुन्हा आली.चिडलेली आहे हे लगेच ओळखलं.आल्या आल्या तिने इशारा केला आणि मी तंबाखू मळायला लागलो.तिच्यासाठी विडा मीच मळत असे.विडा तिच्या हातावर देत म्हणालो “आज लवकर आलीस..” “अरे आज निकाल लागला ना,थिएटर रिकामच सालं.गिऱ्हाईकच नाही.जे रोजचे दोघेजण असतात तेपण दिसले नाहीत.तो नालायक नवीन आलेला पोलीस दोनशे रुपये फुकटचे घेऊन गेला.साला… हफ्ता आम्हाला पण द्यायला लागतो काळू “… तिचं बोलणं थांबवत मी आवंढा गिळत विचारलं “जेवलीस?” .मान झटकत छया करत खूप उपाशी असल्याचा इशारा तिने दिला.पण त्यातूनही ती म्हणाली “ तू खाल्लस काय?” मी नाही म्हणालो.त्यावर तिने पुन्हा विचारलं “बच्चन कुठाय” (शिवी)…..? मी सांगितलं “आज मिरवणुकीत ताशा वाजवायला गेलाय तो”. मंगलने पण तंबाखू थुकली आणि म्हणाली, “थांब कायतरी बघते खायला..काही नाही मिळालं तर आत्ता महालक्ष्मी येईल पुणे स्टेशनला जाऊ”. तेवढ्यात गाडीचा आवाज आलाच.मंगल म्हणाली, “चल त्या बाजूला जायला हवं नाहीतर उपाशी राहायला लागल आज चल उठ लवकर “.. मी चादर गुंडाळून हातात घेतली आणि आम्ही निघणार तेवढ्यात बच्चनचा आवाज आला. “ये काळू ये मंगला,अरे रुखो मुझे छोडके कहा जाते.” या दोघांची हिंदी अशीच.
खांद्यावर ताशा अडकवलेला आणि हातात काळी पिशवी घेतलेला ताशेवाला बच्चन दिसला की मला बाप भेटल्यागत वाटायचं.त्याचं वय असेल चाळीस पंचेचाळीस.कधीतरी बोलण्यात परभणीच्या कोणत्यातरी भागातला आहे एवढंच कळलं होतं.बाकी काहीच माहिती नव्हती.त्यादिवशीपण हातात काळी प्लॅस्टिकची पिशवी दाखवत आम्हाला दोघांना म्हणाला “चलो खाना खाते है”
आम्ही लगेच बाकड्यावर बसलो पिशवी फोडली.गरम बिर्याणी तिघांसाठी आणली होती त्याने.मटण कशाचं म्हणून मी कधीही विचारलं नाही.मंगल म्हणाली “काय बच्चन आज लय खूष..’ त्यावर ताशावर हात मारत बच्चन बोलला “बडी सुपारी मिली दो सो रुपया मिला.सौ का बिर्याणी लाया तेरे लिय..” बिर्याणी कधी संपली आणि पोट कधी भरून ढेकर आला कळलं नाही.रेल्वेच्या नळावर हात धूवून पाणी प्यालो आणि बाकड्यावर येऊन बसलो.
बराच वेळ तिघांच्या गप्पा चालायच्या.झोप आली की, मग आपापल्या बाकड्यावर जाऊन आम्ही झोपायचो.
त्याच फ्लॅटफॉर्मवर माझ्या बऱ्याच कवितांचा जन्म झालाय.आणि माझासुद्धा…
ताशेवाला बच्चन या बच्चन बरोबर गप्पा मारत असताना तो एकदा म्हणाला होता की, “काळ्या एक दिवस मी असा ताशा वाजवीन की या दफणभूमीतले मुडदे पण बाहेर येऊन नाचतील.” त्याच्या या एका वाक्याने माझ्या मनावर खूप खोलवर परिणाम केला.साला साधा ताशा वाजवणारा माणूस पण हा सुद्धा एक ध्येय ठेऊन आहे आणि त्याच्या कलेशी किती इमान राखून आहे.कधी कधी मंगलपण लावण्या ऐकवायची.सोलापूरच्या तमाशात कामाला होती असे सांगायची.नंतर नवरा वारल्यावर तमाशा बंद झाल्यानंतर एका मुलाला भावाकडे ठेऊन ती या धंद्यात आणि पुण्यात आली होती.आम्हां तिघा कलाकारांची भेट रोज रात्री इथेच व्हायची.त्याचा ताशा तिची लावणी आणि माझी कविता असायची.त्यावेळी मी कधीच सभागृहात किंवा स्टेजवर कविता म्हणली नव्हती.फक्त लिहायचो आणि बडबडत बसायचो.माझं पब्लिक ही फक्त दोन माणसं.त्यांनी दिलेली जी दाद असायची ती दाद जगातल्या कोणत्याच कवीच्या वाट्याला आली नाही हे मी फार अभिमानाने सांगीन.
रात्री साडेअकरा वाजता मी हजेरी लावायचो ती उपाशी पोट घेऊनच.कारण कोणतंही नातं नसणारी पण हक्काची ही दोन माणसं मला उपाशी झोपू देत नव्हती.आणि मी जे म्हणेल ते ते मला खायला देत गेली.रूमची सोय झालेली असतानासुद्धा मी यांच्यासाठी फ्लॅटफॉर्म सोडायला तयार नव्हतो.
एकदा वर्तमान पेपरला सरस्वती विद्या मंदिर येथे राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन काव्यवाचन स्पर्धा असल्याची जाहीरात वाचली.बक्षीस तीन हजार रुपये होतं.मी बच्चनला आणि मंगलला ती वाचून दाखवली.माझी जायची कोणतीच इच्छा नव्हती पण बच्चन बोलला “तू जा इथं.” मंगलनेही तेच वाक्य पुन्हा गिरवले.मला हुरूप चढला.पण घाबरलो होतो म्हणलं, “मला जमणार नाही बोलायला.आपला काय नंबर येणार नाही.आणि मी काय स्टेजवर जाणार नाही.” त्यावर बच्चन म्हणाला, “देख जितने केलिय मत खेल.तू सिर्फ इधर जैसे बोलता है वैसेच उधर बोल.” त्यावर मंगल म्हणाली “आणि अजून पंधरा दिवस वेळ आहे.प्रॅक्टिस कर.” ती तमाशात काम केलेली असल्यामुळे प्रॅक्टिस वैगेरे तिला माहीत होतं.
मी तयार झालो.माझे लाडके मराठीचे प्राध्यापक रोकडे सर यांच्याकडून शिफारस पत्र घेतलं आणि नाव नोंदणी झाली.मग प्रॅक्टिस सुरू झाली.अनेक कवितांमधून माझी भारत माझा देश आहे ही कविता बच्चनला आवडायची त्याने तिच म्हणायला सांगितली.झालं तयारी झाली आणि स्पर्धेच्या आदल्या रात्री दोघांनीही शुभेच्छा दिल्या आणि सांगितलं उद्या भेटू काळू.आणि दोघेही अंधारात गेले.एकाच वयाचे होते दोघेही.तिला गिऱ्हाईक मिळालं नाही किंवा मिळालं तरीसुद्धा ते शारीरिक एकत्र येत होते.दोघांमध्ये प्रेम होतं का नव्हतं ते त्यांनाच माहीत.पण दोघेही कुणाला यायला उशीर झाला तर एकमेकांबद्दल काळजी करायचे.मी त्यांना चिडवायचो सुद्धा.अर्थात भाषा कमरेखालची असायची.जी मी इथेच शिकली होती.
स्पर्धेचा तो दिवस आठवतोय.शंभरच्यावर स्पर्धक आले होते आणि मंगेश पाडगावकर प्रमुख पाहुणे होते त्यांच्या हस्ते बक्षीस वितरण होतं.माझा नंबर आला मी जीव लावून कविता सादर केली.डोळ्यासमोर फक्त फ्लॅटफार्म आहे असे मनावर गोंदवून आणि समोर फक्त बच्चन आणि मंगलच आहेत असा विचार करून मी माझी आयुष्यातली पहिली कविता सादर केली.स्पर्धक संपले होते.अर्धा तास ब्रेक होता.त्यानंतर बक्षिस वितरण होतं.मी थांबावं का निघावं असा विचार करत होतो.कामाला सुट्टी टाकली होती.म्हणलं जाऊन तरी काय करायचं बसू इथंच.निदान पाडगावकरांना तरी बघून होईल.अर्धा तास खूप जीवघेणा गेला.पुन्हा हॉल गच्च भरला.
प्रमुख पाहुणे पाडगावकर आणि इतर स्टेजवर स्थानापन्न झाले.कार्यक्रम सुरू झाला एक दोन मनोगतं झाली.नंतर पाडगावकर बोलले.आणि त्यानंतर बक्षिस वितरण सुरू झालं.उत्तेजनार्थ दोन बक्षिसं जाहीर जाहीर झाली.हॉल टाळ्यांच्या गजराने घुमत होता.
तृतीय क्रमांक पुकारला.द्वितीय क्रमांक पुकारला माझं नाव कुठेच नव्हतं.मी खूप नाराज झालो होतो.आत्ता इथून कसं निघायचं याचा विचार करत होतो.बोलणारा निवेदक मुरलेला होता त्याने प्रथम क्रमांक पुकारताना वातावरण लय टाईट केलं.माझी धडधड केव्हाच बंद झाली होती.निश्चितच आपण तरी प्रथम क्रमांक नसणारच याची खात्री होती.मी निघायचं कसं याचा विचार करत होतो.
तेवढ्यात प्रथम क्रमांक स्पर्धकाचं नाव आहे नितीन चंदनशिवे.अशी घोषणा झाली.मी उभा राहिलो आणि परत खाली बसलो.टाळ्या वाढल्या होत्या.मी कसातरी उभा राहिलो.स्टेजवर गेलो आणि पाडगावकरांच्या हस्ते ते बक्षीस घेतलं. टाळ्या जोरात वाजायला सुरवात झाली तशी टाळ्याऐवजी मला बच्चनचा ताशाचा आवाज येत राहिला.
ती ट्रॉफी आणि तीन हजाराचे पाकीट घेऊन मी बाहेर आलो.
मी कधी एकदा स्टेशनवर जाऊन मंगल आणि बच्चनला भेटीन असे झाले होते.फार आनंद झाला होता.मी अगोदर खडकी बाजारात आलो सागर स्वीटसमधून पावशेर गुलाबजाम घेतले आणि कॉर्नर हॉटेलमधून तीन बिर्याणी पार्सल घेतल्या.मी आयुष्यात पहिल्यांदा स्पेशल रिक्षा केली,आणि स्टेशनजवळ आलो.मला माहित होतं यावेळी मंगल कुठे असणार ते.जय हिंद थिएटर जवळ गेलो तर एका रिक्षात गिऱ्हायकाबरोबर मंगल बसलेली दिसली.तिथेच थांबलो कारण तिथे जाणं म्हणजे तिच्या शिव्या खाणं होतं.रात्रीचे सव्वा नऊ झाले होते.कोल्हापूरला जाणारी सह्याद्री एक्सप्रेस फ्लॅटफार्मला थांबली होती.गाडी जाईपर्यंत बाहेरच थांबलो.गाडी निघून गेली थोड्या वेळाने फ्लॅटफार्म रिकामे झाले.
मी आमच्या बाकड्यावर जाऊन बसलो.वारंवार मी केशवसुत यांचे छायाचित्र असलेली ती केशवसुत करंडकची ट्रॉफी पाहत होतो.आणि आपण कसे सादरीकरण केले असेल याचा विचार करू लागलो.फ्लॅटफार्मवरच्या घड्याळाकडे नजर गेली रात्रीचे बारा वाजत आले होते.पुन्हा एकदा विडा मळला आणि तोंडात बार भरला.पहिली पिचकारी मारली तशी नजर पलीकडच्या बाजूला गेली.बच्चन आणि मंगल दोघेही हातात हात घालून चालत जिन्याच्या दिशेने जाताना दिसले.मी मोठ्याने ओरडलो “बच्चन भाय……..”…त्या दोघांनी फक्त हात उंचावला आणि माझ्या बाजूला येणारा जिना चढू लागले.बच्चनच्या हातात काळी पिशवी दिसली.म्हणजे याने पण बिर्याणी आणली वाटतं.रोज त्याच्या हातातलं पार्सल बघून होणाऱ्या आनंदाने आज रागाची जागा घेतली.कारण मी पण बिर्याणी आणली होती.ते दोघे अगदी जवळ आले तसे मी विडा थुकला आणि पिशवीतली ट्रॉफी काढून सरळ मंगलच्या हातात देत बच्चनला म्हणालो बच्चन “जंग जिती हमने।”….
पहिल्यांदा मंगलने माझ्या गालाचा चिमटा घेतला.डोक्यावर हात फिरवत तिने मला छातीशी कवटाळून धरलं.आणि पाठीवर खूप जोरात थाप मारत म्हणाली बघ “मी म्हणलं होतं की नाही तू जिंकणार म्हणून…” लगेच बच्चनने खांद्यावरचा ताशा कमरेत घातला आणि अंग वाकडं करून नाचून त्याने वाजवायलाच सुरवात केली.मी पण थोडा नाचलोच.त्याला मंगलने थांबवलं आणि म्हणाली “चला जेवण करून घेऊ.मला निघायचं आहे.” आत्ता तिला कुठे जायचे आहे आम्हाला चांगलं माहीत होतं.मी म्हणालो मी आपल्यासाठी बिर्याणी आणि गुलाबजाम आणलंय.बच्चनपण म्हणाला पण बिर्याणी आणली आहे.मंगल म्हणाली, “असुद्या खाऊ सगळं त्यात काय एवढं.” आम्ही तिघांनी मिळून तेवढी सगळी बिर्याणी खाल्ली.मला पहिल्यांदा जाणीव झाली की,आपली भूक मोठी आहे आणि जेवनपण भरपूर लागतं आपल्याला.तिघेही पाणी पिऊन आलो.बाकड्यावर बसलो.एवढे सुंदर सेलिब्रेशन आयुष्यात पुन्हा कधीच होणार नाही.मी डबल विडा मळायला घेतला अर्धा मंगलला दिला.दोघांनी तोंडात बार भरला.बच्चनने बिडी पेटवली आणि म्हणाला वाटलं नव्हतं तुला बक्षिस मिळेल म्हणून.
“नितीन ऐकव ना परत तिच कविता आणि तशीच.” मी ऐकवली पण खरं सांगू स्पर्धेच्या सादरीकरणापेक्षा खूप उत्तम बोललो.दोघांनीही टाळ्या वाजवल्या.
मंगल निघून गेली तिचं गिऱ्हाईक तिची वाट पाहत होतं याची जाणीव बच्चनला आणि मला होतीच.ती गेल्यानंतर बच्चन आणि मी दोघेच बोलत बसलो.मी म्हणालो “बच्चन ही ट्रॉफी कुठे ठेवायची?” तेव्हा बच्चन म्हणाला, “त्यावर तुझं शाईने नाव लिही आणि मी सांगतो तसं कर.” मी पेनातील शिस काढून त्यातली शाई बाहेर काढून माझं फक्त नाव लिहिलं.तेवढ्यात महालक्ष्मी एक्सप्रेस फलाटावर दाखल झाली.प्रवासी उतरले काही चढले.गाडी निघाली तशी बच्चनने माझ्या हातातली ट्रॉफी हिसकावून घेतली आणि धावत्या रेल्वेच्या एका डब्यात खिडकीतून मोकळ्या शीटवर टाकली आणि हसत हसत माघारी आला. मी खूप प्रयत्न केला त्याला अडवण्याचा पण त्याने बाजी मारली.मला बच्चनचा खूप राग आला.कमरेखालची भाषा ओठांवर आलेली होती तोच बच्चन म्हणाला “आ बैठ इधर” मी त्याच्या शेजारी बाकड्यावर बसलो तसा बच्चन म्हणाला, “हे बघ ही गाडी गेली. त्यात तुझी ट्रॉफीपण गेली.आता एक दिवस इतका मोठा हो इतका मोठा हो सगळ्या जगात तुझं नाव झालं पाहिजे.मग तुझी ट्रॉफी कुणीतरी स्वतःहून तुला आणून देईल त्यावेळी त्या माणसाचे पाय धर.” माझ्यासाठी हे सगळं अजब होतं.बच्चन बोलत होता मी ऐकत होतो.ताशा वाजवणारा माणूस मला जगण्याचं कसलं सुंदर तत्वज्ञान सांगून गेला.आणि कशासाठी जगायचं हे शिकवून गेला.
तेवढ्यात मंगल आली.तिचं गिऱ्हाईक वाट पाहून चिडून दुसरीला घेऊन गेलं होतं.ती ही बसली मग आमच्याबरोबर.मला आठवतंय आम्ही रात्रभर झोपलो नाही.गप्पा मारत राहिलो.पहाटे थोडा डोळा लागला.सूर्य उगवायच्या आत फलाट सोडावं लागायचं.आम्ही उठलो बाहेर टपरीवर चहा घेतला.का कुणास ठाऊक पण मी खिशातील पाकीट बाहेर काढलं आणि एक हजार मंगलला आणि एक हजार बच्चनच्या हातात देत म्हणालो, “मंगल तुला एक साडी घे आणि मेकअपचं सामान घे जरा नटून थटून धंद्यावर थांबत जा… आणि रेट वाढवून सांगत जा.” मी गमतीने हसत बोलत होतो.तिने नकार दिला पण मी जबरीने तिच्या हातात पैसे दिलेच.तिचे पाणावलेले डोळे स्पष्ट दिसत होते.बच्चनला म्हणालो, “तुला एक ड्रेस घे,आणि असा ताशा वाजव असा ताशा वाजव सगळं जग नाचत इथं आलं पाहिजे.” त्याने नकार बिकार न देता हजार रुपये खिशात ठेवत मंगलला नेहमीप्रमाणे गमतीने बोलला “क्या मंगलाबाय शादी करेगी मेरेसे?” त्यावर कायम शिव्या घालणारी मंगल खूप लाजून लाजून हसली…त्याच धुंदीत पुन्हा विडा मळला.बच्चनने बिडी पेटवली.आणि आम्ही एकमेकांचा निरोप घेतला तो पुन्हा संध्याकाळी तिथेच भेटण्यासाठी..
आज दिवस बदलले आहेत.मी माझ्या संसारात माझ्या नव्या जगात आहे.सहा वर्षांपूर्वी मंगल वारली.दोन महिने ससूनला पडून होती.बच्चन शेवटपर्यंत तिच्याजवळ होता.मी दोनदा भेटून आलो.मला पाहून खूप रडली होती ती.माझाही हुंदका आवरला नव्हता.बच्चनचा हात हातात गच्च दाबून धरला होता तिने.त्यांच्यात एक प्रेमाचं नातं निर्माण झालं होतं.मंगल गेली तेव्हा बच्चन खूप रडला होता.तिचं अंत्यविधीचं सगळं मीच केलेलं होतं.
त्यानंतर बच्चनला दोन दिवसात दोनदा जाऊन भेटलो.म्हणलं “काय हवं असेल तर सांग नाहीतर चल घरी माझ्याजवळ राहा.” तर तो नाही म्हणाला. अंगावर आलेले चांगले कपडे पाहून लांबूनच बोलत होता.मलाच त्याचा राग आला आणि मग “अबे हरामके,मंगलके दिवाने म्हणत त्याला गच्च मिठी मारली.त्याचा निरोप घेतला.नंतर त्याला भेटायला बऱ्याचवेळा गेलो दिसला नाही.जिवंत आहे की नाही माहीत नाही.पण जेव्हा पाऊस पत्र्यावर पडायला सुरुवात होते तेव्हा, आणि माझ्या कवितेवर समोर जमलेले पब्लिक टाळ्या वाजवत राहतं तेव्हा, माझ्या डोळ्यात बच्चन आणि बच्चनचा ताशा नाचत असतो.आणि मंगल मला छातीशी गच्च कवटाळून भिजवत राहते. ही दोन माणसं माझ्या आयुष्यात आलीच नसती तर… माझ्यातला कवी आणि लेखक जन्माला आलाच नसता.
लेखक नितीन सुभाष चंदनशिवे.
कवठेमहांकाळ.
सांगली.
070209 09521 ( लेखकाशी थेट बोलू शकता.)
छान लिखाण