* || सदानंद ||* मानस देसाई #कथाविश्व
* || सदानंद ||* मानस देसाई
#कथाविश्व
यावेळी मी खरगपूर स्टेशनवर उतरल्यानंतर आयआयटी कॅम्पसला ऑटोने नव्हे तर सायकल रिक्षातून जायचे ठरवले. पहिल्यांदा एडमिशन साठी आले होते तेंव्हा सभोवतालचे दृश्य पाहून फार छान वाटले होते. पण बरोबर आई आणि माझ्या चार मोठ्या बॅगा, म्हणून टॅक्सी केली होती. त्याच वेळी ठरवले की पुढच्या वेळी एकटी असेन तेंव्हा स्टेशन ते कॅम्पस सायकल रिक्षाची मजा लुटू. मी स्टेशनबाहेर पडले तेव्हा समोर पार्कच्या बाहेर बऱ्याच रिक्षा उभ्या होत्या. मी एका रिक्षेकडे वळले आणि पाठमोऱ्या असलेल्या त्याला विचारले,” तुमि की आमाके आयआयटी निये आबे..?” रिक्षावाल्याने माझ्याकडे वळून पाहिले, आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. सदानंद! आमच्याकडे कामाला येणाऱ्या यमुनाचा मोठा मुलगा!
” अरे सदू, तू इथे.. एवढया लांब बंगाल मध्ये? तू तर मुंबईला होतास ना कंपनीत?मार्केटिंग करत होतास ना..?”
सदू ओशाळला ” हो ताई..” तो म्हणाला, ” सांगतो तुम्हाला, पण एवी ता ताई तुम्ही एवढया लांब इथे कशा?”
” अरे, मी शिकतेय ना इथे.. म्हणून आलेय. येतोस का कॅम्पसला?”
“येतो ना दीदी,” तो म्हणाला, ” द्या ती बॅग इकडे”. असं म्हणत त्याने माझी बॅग बाकावर ठेवली आणि मला बसायला सांगितलं.
त्याने रिक्षा चालवत बोलायला सुरुवात केली. ” दीदी, नाना तर दारू पिऊन पिऊन शेवटी गेले ते तुम्हाला माहितीच आहे. आई तर फार गोंधळून गेली होती. मला काहीच कळेना काय करायचं ते. बीकॉम.चा निकाल लागला आणि मला वाटलं की छान नोकरी मिळेल पण नाही मिळाली दीदी नोकरी. गावाकडून काका धान्य पाठवायचे पण नंतर हळू हळू कमी केलं त्यांनी. तुमच्या सोसायटी मधल्या कामांची मदत व्हायची पण ती किती? ते केसकर साहेब अमेरिकेला गेले आणि जाधव साहेबांनी घर विकलं म्हणून ती दोन्हीं काम बंद झाली. ज्योतीला आई कामावर घेऊन जात नव्हती. ज्योती म्हणाली मी दुसऱ्या सोसायटीत काम करायला जाते तर आई नाही म्हणाली. दहावीचं वर्ष होतं तिचं. मग मी काकांना एकदा भेटायला गेलो होतो पण ते माझ्याशी भांडले. मी तिथून निघालो. एस टी स्टँड वर मला कॉलेजमधला मित्र भेटला. सुदीप्तो. तो इथलाच, खरगपूरचा. त्यानं पण बरेच प्रयत्न केले होते पण कोणीच जॉब देत नव्हतं. तो म्हणाला चल चार दिवस खरगपूरला. मी इथे आलो. नंतर आम्ही दोघांनी हा रिक्षाचा उद्योग सुरु केला ताई.”
” तू घरी येतोस तेंव्हा ओळखू पण येत नाहीस असा जमानिमा करून येतोस की” मी म्हणाले, ” ज्योतीला छान छान कपडे, यमुनाला साड्या आणि दागिने पण करवले रे तू…..?”
” हो ना दीदी, ” तो पुढे बोलू लागला, ” त्याचं असं झालं दीदी कि इथे येऊन सहा महिने झाले तसे एकदा एक अशीच सवारी बसली होती वडील आणि मुलगी, तिचं नाव मोम. ती रडत होती कारण तिचा अकाउंटिंगचा पेपर अवघड गेला होता. तिला ओनर्स इक्विटी काय ते लक्षात येत नव्हतं. मी तिला समजावलं आणि त्यांना धक्काच बसला.” सदू बोलला. मी पण चकित झाले. ” अरे व्वा.. काय समजावलं तू तिला…?” ” मी म्हणालो की दीदी, ओनर्स इक्विटी इज इक्वल टु असेट्स मायनस लायबीलीटीज आणि ते धंद्याच्या सुरुवातीला गुंतवलेल्या पैशाइतके साधारण यायला हवेत. तो माणूस मला घरी घेऊन गेला. दिपांकरदा त्यांचं नाव. मी तिचा अख्खा पेपर सोडवून दिला आणि दिपांकर दानी मला मोमदीदीला शिकवायला ठेवले. तेंव्हापासून बऱ्याच शिकवण्या घेतोय दीदी..”
मला खरंच या मुलाचा अभिमान वाटला. प्रतिकूल परिस्थितीत कसे टिकावे आणि आलेल्या संधीचे सोने कसे करावे हे त्याला कळले होते. शिवाय शिक्षण कुठेही वाया जात नाही हे ही खरे आहे ते ही त्याला उमजले होते..
” मी पैसे उधळत नाही दीदी. साठवून ठेवलंय ज्योतिसाठी. तिला इथेच आयआयटी मध्ये शिकवायचा विचार करतोय..” तो म्हणाला.
“चांगलाच विचार आहे तुझा” त्याच्या जिद्दीला दाद देत मी म्हणाले.
आयआयटी चा कॅम्पस आला. ” दीदी, कुठलं हॉस्टेल तुमचं ?” त्यानं विचारलं.
” मदर टेरेसा हॉल ”
” हां, म्हणजे टिक्का सर्कल जवळ..” तो म्हणाला.
आम्ही हॉस्टेलच्या दाराजवळ पोहोचलो. मी उतरले, बॅग खाली घेतली आणि पर्स उघडली.
” दीदी, काय करताय तुम्ही? मी पैसे घेणार नाही. तुम्ही माझ्या ताई सारख्या आणि मी तुमच्या कडून पैसे घेऊ?”
” बरं बाबा, घेऊ नकोस, देत नाही तुला.. ठीकाय..? पण सांभाळून रहा रे..खूप पैसे कमव आणि ज्योतीला इथे एडमिशन घे. बेस्ट ऑफ लक.”
” दीदी, एक विनंती आहे,” तो म्हणाला, ” मी इथे रिक्षा चालवतो ते ज्योती आणि आईला सांगू नका. ज्योतीचे लग्न ठरवताना तिचा भाऊ रिक्षा चालवतो ते कळलं तर तिचं लग्न होणार नाही. मी अजूनही मुंबईला मार्केटींग मॅनेजर आहे असंच त्यांना वाटतं.
मला वाईट वाटले – ” सदू, मी हे कोणालाही कधी सांगणार नाही कारण जर ज्योती तुझी बहीण असेल तर ती माझी पण बहीण आहे.”
सदू रिक्षा घेऊन परत फिरला.
~मानस देसाई
💐 समाप्त 💐
छान लिहिले आहे