Classified

कुठून आणायची मम्मी? सौ. आसावरी प्रदीप बहिरट चिंचवड पुणे

कुठून आणायची मम्मी?

सासूबाईंना एकटे ठेवण्यासारखी परिस्थिती नव्हती म्हणून सुमेधानी नोकरी सोडून दिली. कायम व्यस्त असण्याची सवय असल्याने घरात वेळ जाईना.मग बिल्डिंग मधील मुलांना स्तोत्र शिकवायला सुरुवात केली. त्यातून संस्कार वर्ग सुरू झाले.कधी कोणी संस्कृत मधील अडचणी विचारायला येऊ लागले.मग काही मुलांच्या आया ,काकू पहिली ,दुसरीतच आहे तुम्हीच बघाना शिकवून सगळे विषय दुसरीकडे नकोच पाठवायला असे म्हणू लागल्या.

होता होता पहिली ते चौथी पर्यंत शिकवण्या सुरू झाल्या. साधारण संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ती मोकळी होई.छोट्या मुलांचे ते जग तिला फार आवडायचे. त्यांच्या शाळेतील गमती जमती,छोटीमोठी भांडणे ,त्यांच्या आयांच तक्रार सांगणं तिला परत तिच्या मुलाचे ईशानचे बालपण आठवून देई.

बघता बघता ईशान शिकून नोकरीला पण लागला. संध्याकाळी तो आणि त्याचे बाबा परत येई पर्यंत काही मुल कधी कधी काही होमवर्क केलं नाही म्हणून किंवा काही परीक्षा असेल तर थांबून असायची.दादा आला की मस्ती करायचा त्यांच्या बरोबर कधी चॉकलेट द्यायचा कधी गणित सोडवायचे शॉर्टकट सांगायचा त्यामुळे दादा फार लाडका असायचा.

एकदा संध्याकाळी एक आजोबा आजी आणि त्यांचा तीन वर्षाचा नातू असे शिकवणीची चौकशी करायला आले होते. आजोबा आणि आजी एकूण कपडे ,बोलण्याची पद्धत बघता गावाकडचे असावेत वाटलं नातवाचे नाव यश होते. थोडा भेदरलेला सावळा पण तरतरीत सरळ नाकाचा मोठ्या मोठ्या बोलक्या डोळ्यांचा यश आजी आजोबा यांच्यामध्ये त्यांचा एकेक हात घट्ट धरून बसला होता.

ज्युनियर केजी मध्ये होता .मोठ्या नामवंत शाळेत घातलं होत .पण तो रुळत नाहीये. काही येत नाहीये त्याला. शाळेत शिक्षकांशी काहीच बोलत नाही, ऐकत नाही. आजोबा सांगत होते. आजी शांतपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवत होती.यश मोठ्या मोठ्या डोळ्यांनी सगळी कडे भिरभिर पाहत होता.

“काका फारच छोटा आहे हो हा. आणि फक्त आठच मुलं एका वेळी घेऊ शकते,जागाही नाही , सगळ्यांकडे नीट लक्ष पण देता येत नाही मुलं खूप असली तर.मला नाही जमणार पण मी सांगते तुम्हाला दुसरं कुणी असेल तर.” सुमेधानी त्यांचा फोन नंबर घेतला.

यशला काही खाऊ दिला आणि त्याच्या गालावरून हात फिरवला. थोडे नाराज होऊनच आजी आजोबा उठले.

दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कामे आवरली आणि सासूबाईंना चहा नाश्ता देऊन मुलांच्या वह्या तपासायला बसली तेव्हढ्यात बेल वाजली . दार उघडलं तर परत दारात आजोबा.
येऊ का म्हणत आत आले.
म्हणाले ,” यशला शाळेत सोडून तुमच्या कडे लगेच आलो.तुम्हाला तुमच्या कामात अडथळा आणला का ? माफ करा ताई.आम्ही तन्मयच्या शेजारी राहतो त्यांनी तुमचं नाव सुचवलं म्हणून आलो, काल तुम्हाला भेटल्यावर ही पण म्हणाली मॅडमना परत विचारू, नकोच दुसरी कडे पाठवायला. म्हणून सकाळी तुम्हाला त्रास द्यायला परत आलो.

“काका अहो लहान वर्गाचा अभ्यास इतका काही कठीण नसतो, त्याची आई अर्धा एक तास वेळ काढू शकली तरी होईल. “सुमेधा वही तपासता तपासता म्हणाली.
अर्धा एक मिनिट काही उत्तर आले नाही तर तिनी मान वर करून बघितलं तर आजोबांचे डोळे भरून आले होते, मोठ्या प्रयासाने ते हुंदका आवरत होते.

“काल त्या लेकरा समोर काही जास्तीच सांगता येईना झालं ताई, आमची सूनबाई ,यश सहा महिन्याचा असतानाच गेली. मेलेल माणूस गुणाच म्हणायचं म्हणून नाहीं हो चांगुलपणा सांगत ,फार जीव लावणारी होती पोरगी.एव्हढी शिकलेली डॉक्टर पण कधी उलट उत्तर दिलं नाही की आमच्या गावाकडच्या बोलण्याला राहण्यासरण्याला कधी नाक मुरडली नाहीत प्रेमविवाह होता दोघांचा ती गेली आणि पोरगं पण पार कोसळून गेलं होत.याच्या कडे बघत सावरलं माझ्या लेकानी स्वतःला . संध्याकाळी,रात्री दवाखान्यातून आला की पूर्णवेळ यश ला देतो, खेळतो ,त्याचा अभ्यास घेतो. आम्ही असतो आजूबाजूला पण तो आला की संध्याकाळी त्या दोघांचीच एक दुनिया बनते. यश कुठे खेळायला जात नाही, तो नर्सरी मध्ये पण नाही गेला आता या शाळेत घातलं त्याला पण तो तिथेही मुलांमध्ये मिसळत नाही. इथे तुमच्या कडे त्याच्या ओळखीची मुलं येतात , त्यांच्यात राहील तर थोडा खुलेल, बाकी मुलासारखा खेळेल ,भांडेल, रडेल,हट्ट करेल .प्लीज नाही म्हणू नका हो.”

सुमेधाला नाही म्हणताच आल नाही, बावरून आजी आजोबांना घट्ट धरून बसलेलं ते मोठ्या डोळ्यांच कोकरू तिला आठवलं. म्हणाली.,.
“पाठवा काका आज पासून येऊ दे त्याला,” सुमेधा म्हणाली. “थोड उशिरा पाठवा म्हणजे बाकीच्यांच्या अभ्यासात थोड लक्ष घालून झालं की याला बघता येईल.”

संध्याकाळी यश आला.काही दिवस बावरल्या सारखा झाला पण मग खुलू लागला. सुरुवातीला खूप सावकाश लिहायचा त्यामुळे जास्त वेळ थांबायचा. तो पर्यंत ईशान यायची वेळ होत असे .ईशान कामावरून आला की त्याच्या बरोबर यालाही काही च्याऊ म्याऊ खायला दिलं की आधी नाही म्हणायचा . ईशान दादा ये रे यशू म्हणाला की मग यायचा. सुमेधानी इशू आणि यशु अशी हाक मारली की यश खुदूखुदु हसायचा. सारखी कार्टून बघणं आणि शाळेत हिंदी बोलणारे असल्यामुळे बहुतेकदा हिंदीतच बोलायचा. शाळेत कोणाच्या वाढदिवसाला मिळालेला खाऊ, चॉकलेट सुमेधासाठी ईशान साठी सांभाळून आणायचा.कधी फुल कधी शाळेत शिकवेलल क्राफ्ट घेऊन यायचा. उशिरा आला तरी बाकीच्यांना बाजूला करून त्याचाच अधिकार असल्या सारखा सुमेधाला चिकटून बसायचा. काही चुकलं आणि समजावून सागितलं की ऐकायचा. होता होईतो याला खूप समजून घ्यायचं आईची जागा कोणी घेऊ शकत नाही पण आपल्याला जितकी जमेल तितकी माया या लेकराला द्यायची ही खूण गाठ सूमेधच्या मनात पक्की झाली होती.

एकेकदा आजी न्यायला आली तरी निघायचे नावच नाही घ्यायचा.तू अभी जा मैं बैठ रहा हुं म्हणायचा.
कधी ईशान च तिच्याशी वाद घालणं, लाड करून घेणं, हसणं त्यांच्या गप्पा ऐकणं त्याला खूप आवडायचं.तोही तसाच मिसळून जायचा. अगदी संध्याकाळी दिवेलागणीला देवां समोरची नैवेद्याची छोटी दूध साखरेची वाटी त्याचीच असायची

तिला विचारायचा
“भैया भी पढाई नहीं करते थे तो आप उसे भी मारती थी क्या? उनको भी पानिशमेंट मिलती थी क्या?”

मग ईशान सांगायचा ,”मुझे तो स्टंप से मारती थी’

“सच्ची क्या भैय्या”? हा मोठे डोळे अजूनच मोठे करत विचाराचा .
हा रे, अस ईशान म्हणाल्यावर दोघेही खळखळून हसायचे.
मैं तो पढता हुं हैं ना? अस म्हणून कौतुक करून घ्यायचा

त्याच्या अस रेंगाळण्याची ईशान ,त्याचे बाबा ,सासूबाई सगळ्यांनाच सवय होऊ लागली होती. यालाही ईशान ला कधी उशीर झाला की बेचैन वाटायचे मग गॅलरीत आत बाहेर सुरू व्ह्यायच.कंटाळून शेवटी घरी जायचा. चार दिवस सुट्टी झाली कधी तर आल्या आल्या धावत येऊन सूमेधाच्या गळ्यात पडायचा. चार दिवसातली सगळी मजा ,गाऱ्हाणी तिला सांगायची असायची ना? मग अश्या दिवशी अभ्यासाची सुट्टी.

एखाद्या दिवशी त्याचे बाबा सोडायला यायचे तेव्हा मनापासून आभार मानायचे. म्हणायचे,” मॅडम कसे उपकार फेडू तुमचे !!!आम्हाला कळतच नव्हतं याला कस सांभाळायचं?
त्याला काही कळत नव्हतं तेव्हा ती गेली. त्याला तर तिचा चेहरा फोटोत आहे तोच माहिती आहे. सुरुवातीला थोडा खेळायला जात असे पण परत घरी येऊन चुपचाप बसे. होम ट्युशन लावून बघितली, डे केअर ला ठेऊन बघितलं कुठे कुणाकडून इतक्या अजाण वयात दुखावला होता का काय झालं होत कळलच नाही.”
सुमेधा विचारात पडायची की आपण तर फक्त थोडी माया लावली
आपण अस काय इतकं केलं सुमेधाला खरचं कळायचं नाही.

कधी आजी पण गप्पा मारायच्या .कधी सुनेच्या आठवणी सांगायच्या.कधी म्हणायच्या ,आम्ही किती दिवस पुरणार काही तरी बघायला नको काहो ?मुलगा ऐकतच नाही दुसरं लग्न करायला. तो म्हणतो लग्न प्रेम हा विषय माझ्यासाठी संपलाय .आता जे आयुष्य आहे ते यश साठी. तो मोठा झालं की मी सुटलो…अस असत का हो? या लेकराच काय होणार? आणि हा मोठा झाला की बाहेर पडला घरातून की त्याचा बाबा एकटा नाही का पडणार? याला आई मिळेल, आईच प्रेम मिळेल , घराला आधार होईल. या वर्षी मी ऐकणार नाही. त्याची ताई आली दिवाळीला की तिला विषय काढायला लावते.”

दिवस असेच जात होते. दिवाळीच्या सुट्ट्या झाल्या.
शिकवणी सुरू झाली.
यश परत थोडा गप्प गप्प वाटत होतं.नेमका ईशान ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेला होता . यश नी एक दिवस वाट बघितली, दुसऱ्या दिवशी बधितली.

“काssकू ईशान भैया कभी आयेंगे?”यश विचारत होता.

सुमेधा म्हणाली काम के लिये गये है ना भैय्या आ जायेंगे एक दो दिन मे.
परत दुसऱ्या दिवशी तेच काही अभ्यास नाही काही नाही यश तेव्हढच डोक्यात घेऊन बसलेला भैया कब आयेंगा?

आता मात्र सुमेधा म्हणाली ,” आज येणार आहे येईल इतक्यात उद्या टेस्ट आहे अभ्यास करणार आहेस का आणू तुझ्यासाठी पण स्टंप?”

सुमेधाचा आवाजातला कडक पणा पहिल्यांदाच अनुभवलेला यश थोडा मागे आला
पण तरीही, बताओ ना कब आ जाएंगे?

डबडबलेले डोळे आणि व्याकूळ चेहरा. सुमेधानी पटकन जवळ ओढल त्याला. त्याचे भरू आलेले डोळे पुसले . विचारलं
क्यू चाहिए भैय्या? क्या काम हैं?

बताऊ?? फिर डाटोंगे नहीं?

नाही, बोल रे पटपट आणि आपण अभ्यासाला बसू.सुमेधा म्हणली .

भैया को पूछना था? एक बात हैं! …यश

क्या?क्या बात पूछना हैं?

आपको कहासे लाये भैया? ये पुछना था, आजीआजोबा बोल रहे है की मेरे लिये मम्मी लायेंगे. जहासे आपको ले आये भैया, मेरे को भी वहासे ही से लानी हैं मम्मी!
बताओ ना…

दार उघडून आत आलेला ईशान आणि सुमेधा दोघांचेही डोळे पाणावले होते. आणि सुमेधाच ते निरागस कोकरू दोघांकडे आळीपाळीने बघत होत…..

सौ. आसावरी प्रदीप बहिरट
चिंचवड पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}