मनोरंजन

विश्वास ©® ज्योती रानडे #कथाविश्व

विश्वास

©® ज्योती रानडे
#कथाविश्व

“आई, विश्वास म्हणजे काय ग?” सहा वर्षाच्या सुबोधने आईला विचारले.

अमेरिकेतील एका लहान गावात राहणारा सुबोध घरी मराठी व शाळेत इंग्रजी बोलत वाढत होता..

“अं..विश्वास म्हणजे एक नातं/रिलेशन ..म्हणजे मी तुला उगीचच एखादी गोष्ट करायला लावणार नाही याची खात्री..Trust!”निशाला नीट सांगता येत नव्हते.

“पण आई मला कितीतरी गोष्टी तू उगीचच करायला लावतेस की.. दात घासणे, केस विंचरणे.. मला नसतं ते करायचं!” सुबोध म्हणाला. मग trust कुठे आला?

“नंतर सांगते सुबोध.. चल पटकन तयार हो. शाळेला उशीर होईल बरं का! निशाने त्याचे दप्तर भरायला सुरुवात केली. सोपं नाही हं लहान मुलाला विश्वास म्हणजे काय सांगणं. किंबहुना काही शब्द जिथे जसे वापरले जातात ती परिस्थितीच त्या शब्दाचा अर्थ शिकवत असते.

अमेरिकेतील एक लहान गावात सुबोध, त्याची आई निशा व बाबा अतुल रहात असतं. डिसेंबर मधील एका पहाटे ते गाव हिमवर्षावात लपेटलं गेलं होतं. वेगवेगळ्या आकाराचे नाजूक नक्षी असलेले गोलाकार हिमकण भुरभुर खाली येत होते. अतुल कामाच्या निमित्ताने जवळच्या शहरात गेला होता.

निशा व सुबोध हिमवर्षावात बाहेर पडले. तो भुरभुर खाली येणारा बर्फ काळे रस्ते पांढरेशुभ्र करत होता. जसजसा बर्फ वाढत जातो तसतसे रस्ते घसरडे होत जातात म्हणून निशा त्या हिमाच्छादित रस्त्यावरून अगदी सावकाश गाडी चालवत हळूहळू पुढे जात होती. पंधरा मिनिटांच्या अंतरावर सुबोधची शाळा होती आणि मग तिचे ऑफिस त्यापुढे पंधरा मिनिटांवर होते.

थोडं पुढे गेल्यावर तिला रस्त्याच्या कडेला काहीतरी हलताना दिसले. काही कळण्याच्या आत एक देखणं, उंच हरीण रस्ता क्रॅास करण्यासाठी तिच्या गाडी पुढे जोरात पळत आलं…
पळताना धाडकन ते गाडीच्या एका बाजूला धडकून रस्त्याच्या दुसऱ्या कडेला गेले. पाठोपाठ त्या हरणाचे पिल्लू पळत आलं आणि बर्फाची सवय नसल्याने तिच्या गाडी पुढे घसरून पडलं. तिनं करकचून ब्रेक लावला..अचानक घडलेल्या या गोष्टीनं त्या थंडीतही तिला घाम फुटला होता.. सुबोध एकदम रडायला लागला..

” आSSई, नीट चालवं ना गाडी.. ” सुबोधची नजर त्या पिल्लाकडे होती.

रस्त्याच्या दुसऱ्या कडेला पिल्लाची आई पिल्लासाठी तिथेच थांबली होती..पिल्लू उभे राहण्याचा प्रयत्न करत होते पण ते घसरून पडत होते.. निशाला गाडीतून बाहेर पडून ते पिल्लू उचलून रस्त्याच्या कडेला नेऊन ठेवावसं वाटत होतं.. पण ते मोठे हरीण धावून अंगावर येण्याची शक्यता होती. निशाला गडबडून गेली.

ते पिल्लू आता अंगावर बराच बर्फ पडून पांढरे दिसत होते.. त्याची सोनेरी त्वचा व त्यावरील पांढरे ठिपके बर्फामुळे एकमेकात मिसळून पांढरे दिसत होते..निशाला उलटे वळून निघून जावसं वाटत होते पण न जाणो मागून येणाऱ्या गाडीला पांढऱ्या बर्फात पांढरं पिल्लू दिसलं नाही तर त्याचा जीव जायचा..म्हणून ती हलली नाही. मागे दूरवर एक गाडी हळूहळू येत होती बाकी फारसं कुणी तिला दिसलं नाही..

“आई, take a picture of the baby deer and send it to my teacher.” सुबोध म्हणाला.. टिचर सांगेल तुला काय करायचं ते!” सुबोधने प्रसंगावधान दाखवत आईला सांगितले.

त्याचं वाक्य ऐकताच तिला आयडिया आली. तिने गाडीतून पटापट फोटो काढून सोशल मिडिया वर टाकले. त्या खाली लिहिले, “या अमुक रस्त्यावर माझ्या गाडीला हरीण धडकले आहे.. हरणाचे पिल्लू बर्फात घसरून माझ्या गाडी पुढे पडले आहे. त्याला उठता येत नाही. हरणांना कसं वाचवायचं कुणी सांगेल का? ”

” आई, कॉल 9 1 1. आम्हाला शाळेत सांगतात की काहीही emergency झाली तर या नंबरला फोन करायचा असतो.” सुबोधला आईला काही माहित नाही याची खात्री होती.

हो रे करते फोन.. ती म्हणत होती पण तिच्या पोस्ट ला आता भराभर उत्तरे येऊ लागली होती.
एक माणूस म्हणाला, “मी पाच मिनिटात येतो तिथे. I’ll help the deer.”
रस्त्याच्या कडेला असलेली हरिणी आता लंगडत हळूहळू पिल्लाजवळ येत होती. सुबोध ते उंच हरीण अवाक होऊन बघत होता. चॉकलेट ब्राउन रंगावर पांढरे ठिपके असलेले असे देखणे हरीण एवढ्या जवळून त्याने बघितले नव्हते.

तेवढ्यात तिथे एक माणूस आला आणि त्या मोठ्या हरणाकडे बघून म्हणाला, “मी तुला मदत करायला आलो आहे. I am here to help you! I’ll not hurt you or your baby. OK?”

ते हरीण त्याची भाषा कळल्यासारखे तिथे स्तब्ध उभे राहिले. त्या माणसाने पिल्लाचे हात पाय पुसले आणि त्याला उभे केले. पिल्लाच्या पायावर असलेला गोठलेला बर्फ काढला. पिल्लाचे अंग चोळले. ते पिल्लू चालत त्याच्या आईकडे केले. आई आणि पिल्लू रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडीत अदृश्य झाली.

तो माणूस निशाला म्हणाला, ” Deer Crossing चा भाग आहे हा. या भागात मी अनेक हरणांना वाचवले आहे. प्राण्यांना बरोबर समजते की कोण आपल्याला मदत करायला आले आहे आणि कोण शिकार करण्यासाठी आले आहे! मी या समोरच्याच घरात राहतो.. त्यामुळे पटकन येऊ शकलो.”

निशाने त्याला थँक्यू म्हणून सुबोधला त्याच्या शाळेत पोचवले व ती ऑफिसला गेली. संध्याकाळी सूर्यनारायण ढगातून बाहेर आला होता. वादळ थांबले होते आणि रस्त्यावरचा बर्फ वितळू लागला होता. तिने सुबोधला शाळा कशी झाली विचारात गाडीत बसवले.. .
सुबोध सांगत होता,”आई, मी सर्वाना त्या deer ची गोष्ट सांगितली.. त्यांना पण baby deer बघायचे आहे.”

तिची गाडी परत हरीण धडकलेल्या भागात आली.. सकाळी बर्फ पडताना असताना अजूबाजूचे फार काही दिसत नव्हते पण संध्याकाळी तिला कुठून हरीण आले, कुठे पळाले सर्व दिसले. त्या माणसाचे घर दिसताच तिनं गाडी थांबवली. कारण घराजवळ जे दृश्य होतं ते बधून ती चकित झाली होती.

एक हरणाचे पिल्लू उड्या मारत त्या माणसाशी खेळत होते आणि पिल्लाची आई रस्त्याच्या कडेला उभी राहून शांतपणे त्या दोघांकडे बघत होती.

त्याने निशाला ओळखले. “खूप छान काम केलस तू सकाळी! तुझी पोस्ट मला कामाला जाण्यापूर्वी दिसली म्हणून मी येऊ शकलो! नाहीतर हे गोजिरवाणं पिल्लू बर्फात गोठून तिथेच रस्त्याच्या मध्यावर उभं राहिलं असतं..आणि एखाद्या गाडीने त्याला उडवले असतं! आणि बघ ना … मायलेक मला थॅन्क्यु म्हणायला आले आहेत! त्यांना जाणीव असते काय घडलय याची!”त्याने दुधाची बाटली आणली व पिल्लाला दूध दिले. पिल्लांची आई नजर न हलवता त्या दोघांकडे बघत होती.

निशाने सुबोध कडे वळून म्हंटले, ” राजा, हे बघ! याला म्हणायचे विश्वास. त्या पिल्लाच्या आईला माहित आहे.. हा माणूस त्यांना hurt करणार नाही म्हणून ती दोघे इथे आली आहेत..विश्वासाने! कळले?

सुबोधने Oh.. this is Vishwas!” म्हणून मान हलवली. So Aai, vishwas is always shown by your action? Right?

निशाने होकारार्थी मान हलवली. हरणीच्या डोळ्यातील विश्वास तिला खूप ओळखीचा वाटला. विश्वासाला असणारे अनेक पदर त्या दृष्टीत सामावले होते.. कौतुकाने ते सुंदर दृश्य बघण्यात ती हरवून गेली होती.

©® ज्योती रानडे
2024 JyotiRanade. All rights reserved.
कथाविश्व – गोड कथांचे अनोखे विश्व 🎉

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}