★विभा कॉलिंग विभास ★ (1) लेखिका मधुर कुलकर्णी
★विभा कॉलिंग विभास ★ (1)
विभावरीने पेपरमध्ये परत जाहिरात बघितली. ‘विभास सॉफ्ट वेअर लिमिटेड’ कंपनीत एफिशीअंट इंटिरिअर डिझायनर हवे आहेत. प्लिज कॉन्टॅक्ट–989…….!
विभावरी ने नंबर डायल केला.
“हॅलो सर,विभावरी माथुर हिअर! मे आय स्पीक टू मिस्टर विभास वैद्य?”
“ओह! व्हॉट अ कोइनसिडन्स! दोन विभा एकमेकांशी बोलताहेत. जोक्स अपार्ट! कशासाठी फोन केला होता आपण? आय होप यू नो मराठी! माथुर आडनाव म्हणून विचारलं.”
“हो सर,तुमच्या कंपनीच्या इंटिरिअरसाठी दिलेली जाहिरात बघितली. त्या संदर्भात बोलायचं होतं. मी आर्किटेक्ट आहे आणि इंटिरिअर डिझाइनरचा माझा बराच अनुभव आहे.”
“दॅटस् ग्रेट! उद्या येऊ शकता तुम्ही सकाळी ११ वाजता?”
“शुअर सर!”
“मी सेक्रेटरीला तुमची अपॉइंटमेंट लिहून ठेवायला सांगतो. सी यू टूमॉरो.”
विभावरीने फोन बंद केला. ‘विभास सोफ्ट वेअर’मध्ये तिला काम मिळायलाच हवं होतं. उद्याच्या इंटरव्ह्यूच्या तयारीला ती लागली.
नुकत्याच केलेल्या स्टायलिश हेअरकटवरून विभावरीने हेअरब्रश फिरवला. ओठांना गुलाबी लिपस्टिक लावलं. तिच्या गोऱ्यापान,कमनीय देहावर फिकट गुलाबी कलरची साडी, स्लीव्हलेस ब्लाऊज खुलून दिसत होतं. घाऱ्या डोळ्यांची मादकता सौंदर्यात भर घालत होती. आपल्या रूपाने विभास घायाळ व्हायला हवा,हेच तिला हवं होतं. सुंदर स्त्रियांच्या मागे विभास नेहमीच असतो,हे तिला ऐकून माहिती होतं. विभासच्या कंपनीत तिला नोकरी हवीच होती. इंटिरिअरच्या माहितीत,अभ्यासात विभावरीला कोणी मागे टाकू शकत नव्हतं, इतकी ती सतत नव्याचा शोध घेणारी आणि अपडेटेड होती.
ठरल्या वेळी विभावरी कंपनीत पोहोचली. फार वेळ तिला थांबावं लागलच नाही. विभासने तिला केबिनमध्ये बोलावलं.
“मे आय कम इन सर?”
विभासने वर बघितलं. मूर्तिमंत सौंदर्य त्याच्यापुढे उभं होतं. तो कितीतरी वेळ विभावरीकडे टक लावून बघत होता.
“सर”…!
“ओह येस! प्लिज कम इन. हॅव अ सीट.”
विभावरीने तिची फाईल विभासला दिली. विभासने फाईल घेताना जाणूनबुजून तिच्या हाताला केलेला स्पर्श विभावरीला जाणवला. विभावरीने त्याच्याकडे फक्त एक कटाक्ष टाकला आणि ती ओठातच हसली. विभावरीचा आत्तापर्यँतचा अनुभव बघता तिला नोकरी देण्यात विभासला काहीच अडचण वाटत नव्हती. उलट ऑफिसचा ती कायापालट करेल ह्याची विभासला खात्री पटली. तिच्या नेत्रसुखद उपस्थितीने तो रोमांचित झाला होता.
“एकदा ऑफर स्विकारल्यावर तुमचं काम तुम्ही अर्धवट सोडून जाऊ शकत नाही. तशी तुम्हाला सही करावी लागेल.”
“सर, मला जॉब हवा आहे, मला मान्य आहे.”
“प्लिज साईन हिअर.”
विभावरीने करारपत्रावर झोकात सही केली. तिच्या मनातल्या आराखड्याचा श्री गणेशा झाला होता.
***
विभासच्या ऑफिसवरून विभावरीला कल्पना आली की त्याने प्रचंड पैसा ओतलाय. त्याच्या राहणीमानावरून तो चांगल्याच सधन घरातला वाटत होता. ऑफिसचा पॅटर्न आणि विभासची केबिन ह्याचं इंटिरिअर बदलायचं होतं. विभासने विभावरीला पूर्ण ऑफिस दाखवलं. त्याला काय अपेक्षित आहे, हे देखील सांगितलं.
“सर,ऑफीसचं इंटीरिअर सुंदर होईल ह्याची मी खात्री देते. आय विल ट्राय माय लेव्हल बेस्ट!”
“तुमचा प्रेझेंसच इतका सुंदर आहे तर काम देखील एक्सट्रा ऑर्डीनरी होणार हे नक्की!”
विभासच्या ह्या बोलण्यावर विभावरीने हलकंस स्मित केलं.
**
विभावरीने कामाचा चार्ज घेतला आणि बघता बघता महिन्याभरात अर्ध ऑफिसचं इंटीरिअर झालं देखील! तिला लवकरात लवकर हे काम पूर्ण करायच होतं. तिचं लक्ष्य साधायचं होतं. विभावरी पुढच्या कामाचं डिझाईन काढतच होती आणि विभासचा फोन आला.
“हाय विभा, उद्या काय करते आहेस? शनिवार आहे,ऑफिस बंद आहे आणि मी पण फ्री आहे.”
“सर, विशेष काही ठरवलं नाहीय.”
“ओह, डोन्ट कॉल मी सर! कॉल मी विभास! आता आपली चांगलीच ओळख झालीय. बाय द वे,आय एम इम्प्रेस्ड विथ युअर वर्क.”
“थँक्स विभास!” विभावरी लाडिकपणे म्हणाली.
विभावरीने एकेरी हाक मारल्यामुळे विभास सुखावला.
“उद्याचा लंच आपण बाहेर कुठेतरी घेऊ. वेळ आणि जागा तू ठरव.चालेल?”
“डन! विभावरीने होकार दिला.
“आणि त्यानंतर लॉंग ड्राइव्ह.”
“ओके! मी वेळ कळवते.”
**
रात्री कामावरून परत आल्यावर विभावरीने कपाट उघडलं. उद्या विभास बरोबरच्या डेटसाठी तिने लेमन कलरची सिल्क साडी काढली. त्यावर घालायला तिने मोत्याचा एक नाजूक सेट काढला. विभास माझ्यावर अजूनच लट्टू व्हायला हवा हेच तिच्या मनात होतं.
विभावरी तयार होऊन निघणार इतक्यात तिला मोबाईलवर प्रसादमामाचा नंबर दिसला. तिने मोबाईल उचलला.
“हॅलो मामा, बोल कशासाठी फोन केला होतास?”
“काही काम असेल तरच फोन करायचा का ग?”
“तसं नाही रे, मी सहज बोलले.”
“कुठवर आलंय तुझं काम? इथली नागपूरची चांगली नोकरीं सोडून पुण्याला गेलीस आणि आमची काळजी वाढवलीस.” प्रसाद काळजीने बोलला.
“काम चालू आहे. महिन्याभरात संपेल बहुतेक!”
“तिथेच नोकरीं करणं गरजेचं आहे का? मान्य आहे, मुली हल्ली करिअरसाठी घरापासून लांब जातात पण तुला इथे चांगला जॉब असताना तू सोडून तिकडे गेलीस. ताईला वचन दिल होतं ग, माझ्याच मुली समजून मी सांभाळ करेन. आम्ही कुठे कमी पडलोय का बेटा?”
“मामा, काय बोलतोस तू हे? आता मी रडेन हं!” विभावरीचे डोळे खरच भरून आले. आई-वडील गेल्यावर मामा आणि मामीने कशाचीही उणीव भासू दिली नव्हती.
“मामा, माझी काळजी करू नकोस. मी मजेत आहे. इथलं काम झालं की पुढचं बघू. सो रिलॅक्स.”
विभावरीने मोबाईल बंद केला. डोळ्यातलं पाणी पुसलं आणि परत टचअप करायला फेस कॉम्पॅक्ट हातात घेतला……
**
विभासने डेटसाठी थ्री स्टार हॉटेलची निवड केली. विभावरीला घ्यायला तो त्याची मर्सीडिज घेऊन आला. विभावरी कारमध्ये बसली आणि सहज तिने विभासकडे वळून बघितलं. त्याच्या अंगावर ब्रँडेड कपडे, मनगटाला ब्रँडेड घड्याळ होतं. उंची परफ्यूमचा सुगंध तिला आला. विभास फारच हँडसम दिसत होता.
“विभा, यू आर लुकिंग स्टनिंग.” विभावरीचा हात हातात घेत विभास म्हणाला.
“थँक्स.” विभावरी मनमोकळं हसली. ”
“तुझ्या घरी कोण कोण असतं?”
विभावरी एकदम दचकली. हा प्रश्न तिला नको होता.
“विभास, पुढच्या भेटीत आपल्या फॅमिली बद्दल बोलू. आज एकमेकांना नीट जाणून घेऊ. एकमेकांच्या आवडी निवडी!”
“आवडीनिवडी? मला फ्लर्ट करायला आवडतं. ड्रिंक्स घ्यायला आवडतं. खाण्यात पाव भाजी आणि फिश माझी आवडती डिश आहे. आय लव्ह फिश. माझी आई गोव्याची होती. त्यामुळे फिश लहानपणापासून आवडतं.”
“होती म्हणजे?”
“हं! नाहीय ती आता. लवकर गेली. तुझी आवड तरी कळू दे.”
“मी नॉनव्हेज खात नाही, ड्रिंक्स घेत नाही. प्रामाणिक माणसं मला आवडतात. साधं सरळ आयुष्य जगणारी आहे मी!”
“इथे आपला मतभेद होईल. आयुष्य एकदाच मिळतं. एन्जॉय करून घ्यावं.”
“कोणाला दुखावून नाही.”
“म्हणजे? तुला म्हणायचं तरी काय आहे?”
“काही नाही, सहजच बोलले.”
लन्चच्या आधी विभासने बऱ्यापैकी ड्रिंक्स घेतले. विभावरीला खरं तर ह्या सगळ्या गोष्टीची अजिबात सवय नव्हती. पण तिने तेवढे मॅनर्स पाळले. लॉंग ड्राइव्हला जायला विभावरीने नकार दिला. नाही म्हटलं तरी विभासला चढलीच होती.
“विभास, आज लॉंग ड्राइव्ह नकोच. एखाद्या वेळेस लॉंग ड्राइव्ह आधी करू मग लंच!”
“ओके मॅम, आपण म्हणाल तसं!”
विभावरीला सोडून विभास घरी गेला.
**
विभावरी आणि विभासच्या भेटी वाढू लागल्या. काहीतरी कारण काढून विभावरीशी शारीरिक जवळीक वाढवायचा प्रयत्न तिच्या लक्षात यायला लागला पण ती विरोध करत नव्हती.
ऑफिसचं इंटिरिअर झालं होतं, आता फक्त पेन्टिंग्स, लँडस्केप्स तेवढे राहिले होते.
एका रात्री झोपताना विभावरीने प्रसादला फोन केला.
“मामा, माझं इथलं काम संपलंय. दुसरीकडे कुठे मिळतंय का बघते.”
“आता तू सध्या पुण्यात आहेसच तर माझ्या मित्राला जरा सल्ला देशील ना? त्याचं मंगलकार्यालय त्याने नवीन करून घेतलंय. तिथलं थोडं इंटीरिअर त्याला करायचं आहे.”
“माझं इथलं काम माझ्या मनासारखं होऊ दे मामा, मग सांगते.”
“अग, झालं म्हणालीस ना?”
“अजून मुख्य काम राहिलंय. ते झालं की! अच्छा मामा, गुड नाईट.”
विभावरीने खोल श्वास घेत मोबाईल बंद केला.
**
विभावरीने जीन्स, टी शर्ट घातला आणि आरशात बघितलं. तिच्या मादक रुपाला हा पेहेराव फारच शोभून दिसत होता. आज विभासच्या घरी त्याला भेटायला ती जाणार होती. पर्समध्ये काही वस्तू न विसरता तिने टाकल्या. एक दिवस विभासने तिला घरीच ये म्हणून आमंत्रण दिलं आणि तिने ते लागलीच स्वीकारलं. दोघांची जवळीक आता चांगलीच वाढली होती. विभावरी त्याच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद देत होती.
“विभा, उद्या माझ्या घरी ये. मी एकटाच राहतो. माझ्या बापाशी माझं पटत नाही. तो वेगळा राहतो.”
“पण वॉचमन तर असेलच की!त्याला पण उद्या नको बोलावू ना!” विभावरी अजूनच लाडात येत म्हणाली.
” उद्या वॉचमनला पण सुट्टी! तुला उद्या भरभरून प्रेम द्यायचंय आणि घ्यायचं पण आहे. देशील ना?”
“मी तुझीच आहे रे.”
“होल्ड इट! नो इमोशन्स! उद्या फक्त तू आणि मी आणि धुंद एकांत!”
“विभास!”…..
विभावरीने कोकण जॉईंटला फोन केला. “फ्राईड कर्ली फिश एक प्लेट मी दिलेल्या पत्त्यावर पाठवा. आणि डिलिव्हरीची वेळ मला नक्की सांगा. जी वेळ दिली आहे त्या वेळेतच पाठवा.”
***
विभासच्या घराची बेल विभावरीने प्रेस केली. जणू काय वाटच बघत होता इतक्या लवकर विभासने दार उघडलं. त्याने ड्रिंक्सची तयारी करूनच ठेवली होती.
“वेलकम डिअर! आज तुला बघून कलीजा खलास झालाय. इतकी मादक तू आजपर्यंत कधी दिसली नाहीस. विभा, आज मला थांबवू नकोस. माझा संयम सुटत चाललाय. आणि तू सांगितल्याप्रमाणे वॉचमनला पण सुट्टी दिलीय. फक्त तू आणि मी!”
“इतकी घाई कसली आहे विभास? आज मी पूर्णपणे तुझीच आहे.” विभासच्या ओठांवर बोटं ठेवत विभा म्हणाली.
तिचा हा लाडिक विभ्रम बघून विभास पाघळला. त्याने ड्रिंक्स ग्लासमध्ये ओतले.
“आज माझ्यासाठी ह्याची चव घे.”
“नो थँक्स विभास, मी कोल्ड ड्रिंक घेते.”
“आज तुझ्या डोळ्यातली मदिरा मला धुंद करतेय. चिअर्स टू अवर नशिली भेट.”
विभास एकामागून एक ग्लास रिचवत होता आणि विभावरी त्याला प्रवृत्त करत होती. कोकण जॉईंट मधून फूड पार्सल आलं आणि विभावरीने ते ओपन केलं.
“विभास, आज तुझ्या आवडीचं फिश मागवलंय. पण त्याआधी मी तुझ्याबरोबर एक पेग घेणार. आज पहिल्यांदा तुझ्यासाठी त्याची चव चाखतेय कारण आय लव्ह यू!”
विभासला एव्हाना चांगलीच नशा चढली होती, त्याचं बोलणं अडखळत यायला लागलं होतं. तो सोफ्यावरून उठायला लागला तसा त्याचा तोल जायला लागला. विभावरी त्याच्या कमरेभोवती हात लपेटत म्हणाली, “मै हूँ ना!”
विभास तिच्या ह्या कृतीने उत्तेजित झाला आणि म्हणाला, “आज तुला सोडणार नाही. तुला सोडायला मी आजचा प्लॅन केलाच नाहीय. आज तुझा उपभोग मला घ्यायचा आहे.”
विभासमधला पशु जागा व्हायला लागला होता. विभावरीने त्याच्यासाठी अजून एक ग्लास भरला आणि विभासच्या ओठांजवळ नेत म्हणाली “आज की शाम तेरे नाम.”
विभास आता पूर्ण धुंदीत होता. तो स्वतः सोफ्यावरून उठू शकत नव्हता. विभावरीने हॅन्ड ग्लोव्हज् घातले. फ्राईड कर्ली माशाचे तुकडे केले. माशातला एक मोठा काटा बाजूला काढला. ती विभासाच्या जवळ आली, नशेमुळे त्याची शुद्ध हरपत चालली होती. तिने त्याचा तोंडात एक माशाचा तुकडा घातला.
“डार्लिंग, तुझ्या आवडीची डिश मागवली आहे बघ!”
डोळे अर्धवट मिटलेले , नशा चढलेल्या अवस्थेत विभासने तो तुकडा तोंडात टाकला आणि विभावरीने झरकन मागून येऊन त्याचे नाक जोरात दाबले. विभासचा श्वास अडकला, त्याने आss केल्यावर तिने त्याच्या घशात तो काटा टाकला आणि अजूनच गच्च नाक दाबून ठेवलं. विभास श्वासासाठी तडफडत होता, घशातल्या अडकलेल्या काट्यामुळे त्याला तोंडानेही श्वास घेता येईना. नशेमुळे तिला ढकलून देण्याची ताकद त्याच्यात राहिली नव्हती.त्याची ती तडफड बघून विभावरीला अजूनच चेव आला. दहा मिनिटांनी विभासाची तडफड थांबली. त्याचा श्वास पूर्ण थांबलाय ह्याची खात्री झाल्यावर विभावरीने पटकन गाडीची किल्ली घेतली. चेहरा पूर्ण रुमालाने झाकून घेतला आणि ती धावतच घराबाहेर पडली. विभास शेवटचा श्वास घेत होता, तेव्हा कुठलाही पूरावा मागे न सोडण्याची तिने काळजी घेतली होती.
****
विभावरीने घरात पाऊल ठेवल्या ठेवल्या अंगावरचे कपडे, स्कार्फ सगळं जाळून टाकलं आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत ती राख टाकली. ती आंघोळ करून रागिणीच्या फोटोजवळ आली आणि तो फोटो हातात घेऊन हुंदके देऊन रडायला लागली.
“रागा, मी मारलं ग त्याला! आता जे काही होईल ते भोगायची माझी तयारी आहे…….. तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी!”………
छान कथानक
मस्त!!