★विभा कॉलिंग विभास ★ (२) लेखिका मधुर कुलकर्णी
*विभा कॉलिंग विभास * (2)
“रागा, मी मारलं ग त्याला, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी!” विभावरी रागिणीचा फोटो जवळ घेऊन हुंदके द्यायला लागली. जरा शांत झाल्यावर तिने कपाटातून कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवलेलं रागिणीने तिला लिहिलेलं पत्र बाहेर काढलं. ते पत्र वाचता वाचता अश्रुमुळे अक्षरं धुसर झाली, त्या अश्रुंच्या पटलावर हसरी, भित्री रागिणी, विभाला दिसायला लागली…..
***
“विभा, मला पुण्याच्या एका सॉफ्टवेअर कपंनीत जॉब मिळाला आहे. पुढच्या आठवड्यात जॉईन व्हायचं आहे.”
“रागा, तू माझ्यापासून इतक्या दूर जाणार? मी कशी राहू तुझ्याशिवाय?” विभावरी रडवेल्या चेहऱ्याने म्हणाली.
“वेडाबाई, आपण जन्मभर एकमेकींना पुरणार आहोत का? दोघींची लग्न झाल्यावर वेगळं होऊच ना?”
“मी लग्नच करणार नाहीय. तुझ्याबरोबर करवली म्हणून येईन ती कायम तुझ्याच सोबत राहीन.”
“असं म्हणतेस? मग एक काम करू. सख्ख्या बहिणी सख्ख्या जावा होऊ म्हणजे प्रश्नच मिटला.” रागिणी हसत म्हणाली.
रागिणी विभावरीजवळ आली आणि तिला जवळ घेत म्हणाली,
“आई-बाबा गेल्यावर प्रसादमामाने किती मायेने वाढवलं आपल्याला! मामीनेही त्याला साथ दिली. रोहन आणि ऋचाने सख्ख्या भावंडासारखं प्रेम केलं म्हणून आपण आईबाबांच्या दुःखातून लवकर बाहेर पडलो. नाहीतर एकट्या पडलो असतो ग! मामाचे हे ऋण आयुष्यात विसरायचे नाही. आणि विभा, मी पुण्याला गेल्यावर तू नीट रहा. मला तुझी काळजीच वाटते. कधी कधी फार उतावीळ होऊन काहीतरी करून बसतेस.”
“माझी काळजी करू नकोस. मामा, मामीला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही.” रागिणीचा हात धरत विभावरी म्हणाली.
**
मुंबईहून पुण्याला जाताना अनिल आणि अरुणाचा जबरदस्त कार ऍक्सीडेन्ट झाला. अनिल तर जागीच गेले. अरुणा जखमी अवस्थेत दवाखान्यात असताना प्रसाद आला आणि त्याच्या हात तिने आपल्या थरथरत्या हातात घेऊन नजरेने प्रसादला आर्जव केलं. प्रसाद समजून चुकला.त्याने अरुणाचा हात घट्ट दाबत म्हटले,
“मुलींची काळजी करू नकोस. मी त्यांचा बाप होईन.”
प्रसादचे ते शब्द ऐकले आणि अरुणाने शांतपणे डोळे मिटले.
बारावीतली कोवळी रागिणी आणि दहावीतल्या अवखळ विभावरीला पोरकं करून गेले.
प्रसादने मुलींना नागपूरला आणलं. दोघींचीही महत्वाची वर्ष जाणार होती पण प्रसादने दोघींनाही उभारी दिली. हळव्या मनाची रागिणी खचून गेली होती. पुढील वर्षी दोघीही चांगले गुण मिळवून पास झाल्या. रागिणीने आय टी ला प्रवेश घेतला. बारावी झाल्यावर आर्किटेक्ट व्हायचं विभावरीचं स्वप्न होतं. दोघींनीही आपलं उद्दिष्ट गाठलं.
***
रागिणीचा पुण्याला जायचा दिवस आला आणि विभावरीकडे बघून तिच्या डोळ्यांना धारा लागल्या.
“विभाची काळजी का करतेस ग? आहोत की आम्ही!” मामी म्हणाली.
“तसं नाही ग मामी! तू आणि मामा असल्यावर मला तिची काळजी नाहीच. पण ती जरा अविचारी आहे म्हणून काळजी वाटते.”
“बहिणाबाई, तुम्ही बिंदास जा. मामा, मामी आणि मी बघून घेऊ.”
विभावरी रागिणीची बॅग उचलत म्हणाली.
रागिणी प्रसादला नमस्कार करायला वाकली तसे तिचे डोळे भरले.
“रागिणी, आता इथली काळजी करू नकोस. तुझ्या करिअरकडे लक्ष दे. आणि ज्या मुलींबरोबर राहणार आहेस त्याची नीट चौकशी कर. हल्ली काय काय ऐकायला येत गं!”
“दोघीजणी आहेत मामा, चांगल्या आहेत. माझं त्यांच्याशी बऱ्याच वेळा बोलणं झालंय.”
“सुखाचा प्रवास होऊ दे. तुला हवं ते सगळं मिळू दे !” प्रसादने रागिणीला जवळ घेऊन थोपटलं.
**
ऑफिसचा पहिला दिवस आला आणि रागिणीचं टेन्शन वाढलं. ती विभावरीसारखी मनाने पक्की नव्हती. जरा घाबरट होती. पण सगळ्या कलीग्जनी तिला सांभाळून घेतलं. बॉसला ती इंटरव्हयूच्या वेळी भेटली तेवढीच! विभास वैद्य… त्याचे समोरच्या व्यक्तीला रोखून बघणारे भेदक डोळे तिला आठवले. त्या डोळ्यात समोरच्याला खेचून घ्यायची ताकद होती.
ऑफिस जॉईन करून दोन दिवस झाले आणि विभासने रागिणीला केबिनमध्ये बोलावलं.
“मे आय काम इन सर?”
“कम इन मिस रागिणी! कसं वाटतय तुम्हाला इथे? पहिलाच जॉब असल्यामुळे तुम्हाला सेटल व्हायला वेळ लागेल. काही अडचण आली तर मला सांगा. बाय द वे, यू हॅव गॉट लव्हली लॉंग हेअर.”
“थँक्स सर!”
रागिणीने विभासकडे बघितलं. तेच ते भेदक डोळे, तिला आकर्षित करत होते.
घरची आठवण, नवीन जागा, कामाचं लोड, ह्या सगळ्याने रागिणी आजारी पडली. तिच्या ह्या आजारपणात विभास तिची रोज फोन करून चौकशी करायचा. विभासचा मोहवणारा आवाज,तिची इतकी काळजी घेणं, रागिणीला तीव्रतेने त्याच्याकडे खेचत होतं. ती नकळत त्याच्यावर प्रेम करायला लागली. रोज त्याच्या फोनची अधीरतेने वाट बघायला लागली.
आठ दिवसांनी रागिणी जॉईन झाली. विभासने तिला केबिनमध्ये बोलावलं,”हाऊ आर यू फिलिंग रागिणी? ”
“सर, तुमचे खूप आभार! तुम्ही मला रोज फोन करत होता, माझी चौकशी करत होता.”
“इट्स माय ड्युटी रागिणी! आणि प्लिज, आजपासून फक्त विभास म्हण, सर नको.”
“तुम्ही बॉस आहात, नावाने कसं हाक मारू?”
“बॉस बाकीच्या लोकांसाठी! तुझ्यासाठी फक्त विभास! विभास खुर्चीतून उठला. रागिणीच्या जवळ येत तिला खुर्चीतून उठवलं आणि तिच्या गालावरून बोटं फिरवायला लागला .
रागिणी शहारली. भानावर आली आणि म्हणाली,”सर, मी जाते.”
रागिणी केबिनच्या बाहेर आली पण तो गालावरचा स्पर्श तिला रोमांचित करून गेला. कामात लक्ष लागत नव्हतं. तिने हळूच गालावरून हात फिरवला आणि खुदकन हसली…….
***
रागिणीला विभासबद्दल फक्त आकर्षण नाही पण प्रेमही वाटायला लागलं होतं. मात्र स्वभावाने बुजरी, घाबरट असल्यामुळे ती पुढाकार घेत नव्हती. तिच्या मनाची ही चलबिचल विभासला कळली. ऑफिस सुटल्यावर तो रोज तिला फोन करू लागला.
“रागिणी, आज कुठेतरी बाहेर भेटू. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. येशील?”
“मला आठच्या आत फ्लॅटवर परत यावं लागेल. फ्लॅटच्या ओनरच्या तशा आम्हाला रिस्ट्रिक्शन्स आहेत.”
“अग हो, मी काही तुला पळवून नेत नाहीय. तुझी साधी राहणी ,तुझा हा बुजरेपणाच मला आवडायला लागलाय. आत्तापर्यन्त सगळ्या ओव्हर स्मार्ट मुलीच बघितल्या. तुझं हे साधेपण मला भावलंय.”
रागिणी विभासला भेटायला गेली खरी पण मनात भीती घेऊनच!
“रागिणी, आपण पुण्याच्या बाहेर मुळशी रोडला फिरायला जाऊ. तिथे बरेच रिसॉर्ट्स आहेत.”
“नको विभास, मला आठ पर्यंत परत जायचं आहे.”
“तुझा माझ्यावर विश्वास नाहीय का? आत्ता फक्त तीन वाजले आहेत, मुळशीला तासाच्या आत पोहोचू, गप्पा करू, मस्त गरम भजी, चहा घेऊन परतू. आठ कशाला, तू सातच्या आतच पोहोचशील.” विभास रागिणीचा हात धरत म्हणाला.
ओढल्यासारखी रागिणी गाडीत बसली. रिसॉर्टवर गेल्यावर विभास जेव्हा रागिणीला रूमकडे न्यायला लागलं तेव्हा ती जरा घाबरली.
“विभास, बाहेर बसूनच गप्पा करू ना! रूम कशाला?”
“मी एक बिझिनेसमन आहे, माझ्या अनेक ओळखी आहेत. चुकून कोणी बघायला नको.”
“पण आपण गाडीत तर बरोबरच आलो की.” रागिणी म्हणाली.
“बंद गाडीत इतकं कळतं नाही. आणि तुझा विश्वास नसेल तर आपण परतूया .”
“तसं नाही, पण…”
“आता इथे वेळ घालवू नकोस, जरा वेळ गप्पा करून निघूया.”
रूम फार सुंदर होती. सजावटीची अभिरुची दिसून येतं होती. विभासने बॅगमधून ड्रिंक्स काढले. रागिणी ते बघून अस्वस्थ झाली.
“रागिणी रिलॅक्स, तू माझ्याबद्दलचा तुझ्या मनात असलेला गैरसमज दूर कर. मी घेतो ड्रिंक्स पण कधी कधी खूप निराश होतो तेव्हाच! मला फार एकटं वाटतं तेव्हा घेतो. लहानपणापासून आई-बाबांचे वादच जास्त बघितले. तेव्हा भीतीने एका खोलीत बसायचो. कितीतरी वेळ बाहेर येतच नव्हतो. त्यांच्या भांडणाचा माझ्या मनावर परिणाम झाला. थोडा मोठा झाल्यावर मित्रांमध्येच जास्त वेळ घालवू लागलो. पण फ्रस्ट्रेशनमध्ये एक दिवस दारूची चव चाखली आणि सगळं विसरण्यासाठी ती नशा आवडू लागली. सिगरेट जवळ केली. मी अभ्यासात हुशार होतो. इंजिनिअरिंगला प्रवेश मिळाला. आय टी केलं. मला स्वतःची फर्म काढायची होती. एका ठिकाणी नोकरीं लागली आणि मी आईबाबांपासून वेगळा झालो. माझं दुर्दैव, मी शेवटच्या वर्षाला असताना आई गेली. बाबांचा मी तिरस्कार करायला लागलो. स्वतःच्या पायावर उभा राहिलो आणि वेगळा झालो. खूप मेहनत केली आणि माझं स्वप्न पूर्ण केलं. छोट्या प्रमाणात स्वतःची फर्म काढली. यश मिळतं गेलं आणि आज तू जे बघते आहेस ते ऐश्वर्य माझ्या कष्टाचं फळ आहे. पण मी खूप एकटा आहे ग! तुला बघितलं आणि जाणवलं, मला शेवटपर्यंत साथ देणारी मुलगी हिच! मी तुझ्यावर प्रेम करतो, आवडतेस तू मला!”
रागिणी विभासच्या जवळ आली. त्याचा चेहरा हातात घेतला. विभासने तिच्या कमरेला मिठी मारली. रागिणीने त्याच्या केसांवर ओठ टेकले. विभास उठला आणि रागिणीला मिठीत घेतलं. रागिणी भान हरपून त्याला बिलगली. त्या क्षणाने, त्या स्पर्शाने तिचं अवघं स्त्रीपण फुलून आलं. विभासचा तो धुंद स्पर्श…,ती नकळत प्रतिसाद देत राहिली. घड्याळात आठ कधीच वाजून गेले होते पण रागिणीला भान नव्हतं. त्या सुंदर क्षणी तिला फक्त विभास हवा होता… तिच्यावर उत्कट प्रेम करणारा विभास ….!
**
“विभास, मी चुकले! अशी कशी मी भान हरपून बसले. एक अख्खी रात्र मी तुझ्याबरोबर घालवली. मी माझ्या रूममेट्स ना काय सांगू? फ्लॅट ओनरला काय सांगू? फार फार चुकले मी!” रागिणी हातात तोंड खुपसून रडायला लागली.
“ओह कमॉन रागिणी! इतकं काही आकाश कोसळलं नाहीय. इट्स व्हेरी नॅचरल. रडणं थांबव आणि कारण काय सांगायचं हे तू बघ. लेट्स गो.”
“तू बघ? काल रात्री जे काही घडलं त्यात तुझी काहीच चूक नव्हती?”
“कुठल्या जगात वावरते आहेस रागिणी ? आता एक रात्र मजा करणं हे खूप कॉमन आहे. त्यात चूक वगैरे काही नाही.”
“मजा करणं? शी, किती घाणेरडी भाषा वापरतो आहेस. अरे प्रेम करतेय तुझ्यावर.” रागिणी रडत म्हणाली.
“करतेस ना? मग विसर सगळं. गाडीत बस आणि चल.”
रागिणीने विभासकडे बघितलं. कालचा हळवा विभास आणि हा! इतका फरक? तिला चीड आली. पण त्या अनोळखी ठिकाणाहून ती एकटी पुण्यात कशी परत जाणार होती? तिला काहीही माहिती नव्हतं. पाय ओढत ती गाडीत बसली. स्वतःच्या शरीराची तिला घृणा आली. प्रसादमामा, मामी, विभावरीची आठवण आली आणि एक जोरात हुंदका आला. फ्लॅट येईपर्यंत रागिणी फक्त रडत होती. गाडीतून उतरल्यावर तिने विभासकडे बघितलं सुद्धा नाही. फ्लॅटची बेल तिने प्रेस केली आणि भीतीने तिला घामाच्या धारा लागल्या…..
क्रमश: