जीवनाचे गाठोडे …..सूभाष साळवी, बदलापूर …
जीवनाचे गाठोडे …..सूभाष साळवी,
बदलापूर …
एक माणूस त्याच्या जीवनातील समस्यांनी कंटाळून गेला होता. रात्रंदिवस चिंता करून, पत्नीशी बेबनाव, मुलांचे शिक्षणाची चिंता, व्यवसायातील चढउतार, वृद्ध आईवडिलांचे आजारपण या सर्वांच्या जबाबदारीचे ओझे खांद्यावर घेऊन चालता चालता कंटाळून गेला होता. त्याला जीवनात सर्वत्र अंधारच दिसत होता. यातून काही मार्ग सापडत नव्हता.
थोडक्यात, या सर्व ओझ्याखाली तो दबून गेला, परिणामी त्याने आत्महत्या करण्याचं निश्चित केलं.
आत्महत्या करण्याच्या इच्छेने, एकदा कूणीही घरी नसताना संधी साधून त्याने झोपेच्या गोळ्या घेतल्या. मरण्यासाठी त्या गोळ्या कमी पडल्या की काय तो गाढ निद्रेत गेला. त्यावेळी त्याला दिसले, त्याच्या आजूबाजूला दिव्य प्रकाश पसरत आहे. ज्या दिशेने प्रकाश येत होता तिकडे नजर वळवली. पाहिले, तर काय ? तेजस्वी चेऱ्यावर मंद मंद स्मित असलेला परमकृपाळू परमात्मा उभा होता.
दोघांची नजरानजर होताच, ते म्हणाले, बेटा, माझ्या प्रिय मुला, जो पर्यंत तुला बोलावले नाही, त्या आधी माझ्याकडे येण्याची तुला काय घाई आहे ?
हे प्रभू, मला माफ करा, मी तुमच्याकडे येण्याची घाई करीत होतो, त्या बद्दल क्षमा करा. पण जीवनात एक ही पाऊल पुढे टाकण्याची हिम्मत माझ्यात राहिली नाही. माझ्या जबाबदाऱ्या, चिंता आणि दुःखाच हे गाठोडे तुम्ही पाहिले ?
स्वतःच्या खांद्यावरील मोठ्या ओझ्याकडे बोट दाखवत तो परमेश्वराला म्हणाला, आता हा संसाराचा गाडा ओढण्याची शक्ती किंवा हिम्मत दोन्ही पैकी एक ही माझ्यात राहिली नाही, म्हणून मी माझे जीवन संपवू इच्छित होतो.
भगवान हसून म्हणाले, पण मी तर तुम्हा सर्वांना तुमच्या सर्व चिंता माझ्याकडे सोपवा असेच सांगितले. तू पण तुझ्या चिंता माझ्याकडे सोपवून रिकामा का होत नाही ?
पण देवा, तुम्ही मलाच का सर्वात भारी गाठोडे दिले आहे ? मी तर माझ्या गाठोड्या इतकं भारी ओझं कधीच कुणाच्या खांद्यावर पाहिले नाही. रडवेल्या सुरात त्या माणसाने तक्रार केली.
बेटा, या दुनियेत प्रत्येक व्यक्तीला काही ना काही ओझे उचलण्यास मी दिलेलेच आहे आणि ते जरुरी आहे बघ.
इथे तुझ्या खूप साऱ्या शेजार पाजाऱ्यांची गाठोडी आहेत. तुला असे वाटत असेल की, तुझेच गाठोडे सर्वात भारी आहे, तर तू त्याच्या ऐवजी या मधून दुसरे कुठले ही ओझे घेऊ शकतोस. बोल, अशी अदलाबदल करायची आहे ? गर्भित अर्थाने हसत, भगवान बोलले.
आश्रयचकीत भावाने त्या माणसाने, भगवंताच्या पायाजवळ पडलेल्या गाठोड्यांवर नजर टाकली. सर्वच गाठोडी त्याच्या गाठोड्या एवढीच दिसत होती. पण प्रत्येकावर एक नाव लिहलेले होते. ज्या व्यक्तीचे गाठोडे असेल, त्याचे नाव व पत्ता त्यावर लिहलेला होता. सर्वात पुढे असलेल्या गाठोड्यावरचे नाव त्याने वाचले.
त्याच्याच घराच्या बाजूला रहाणाऱ्या एका अतिशय सुंदर आणि सुखी दिसणाऱ्या स्त्रीचं नाव त्यावर लिहले होते. त्या स्त्रीचा पती खूप मोठा उद्योगपती होता. त्यांचे घर सुख समृद्धीने भरलेले होते. घरातील प्रत्येकासाठी स्वतंत्र अशी विदेशी कार होती. त्या स्त्रीच्या मुली किमती कपडे आणि आधुनिक दागिने वापरत होत्या. कॉलेज मध्ये शिकणारा तिचा मुलगा दर महिन्याला कार बदलत होता. त्यांचे कुटुंब उन्हाळ्यात स्वित्झरलँड ला एक महिना राहत असत.
त्या स्त्रीचं गाठोडं घ्यावे असा विचार या माणसाच्या मनात आला. त्याने स्वतःचे गाठोडे बाजूला ठेवून या स्त्रीचे गोठोडे उचलले. जेव्हा त्याने ते उचलून धरले तेव्हा त्याला नवल वाटले. कारण ते गाठोडे हलके नसून स्वतःच्या गाठोड्या पेक्षा खूपच जड होते. कसेबसे त्याने ते खाली ठेवले.
नंतर देवासमोर बघत विचारले, भगवान, इतक्या साऱ्या सुख सुविधा मध्ये राहणाऱ्या बाईचे गाठोडे पिसासारखे हलके असायला हवे होते. त्या ऐवजी ते इतके जड का बरे आहे ? मला कळत नाही.
नाही समजत तर स्वतःच खोलून बघ. मार्मिक हास्य करत भगवान बोलले.
त्या माणसाने गाठोडे उघडले. बाहेरून खूपच सुखी आणि वैभवशाली जीवन जगणाऱ्या त्या स्त्रीच्या गाठोड्यात, रात्रंदिवस तिला त्रास देणारी कर्कश सासू दिसली. त्या बाईचा पती मद्यपी होता. कामानिमित्ताने देश-विदेशात त्याचे जाणे येणे होते व अत्यंत व्याभिचारी जीवन जगत होता. भयंकर रोग जडले होते. त्या स्त्रीला सुद्धा रोगाची लागण झाली. पति-पत्नी गुप्तपणे यासाठी लाखो रुपये खर्च करीत होते. त्यांच्या मुलाचे तस्करी संबंध होते. मुलगी कर्करोगाने पिडीत होती.
बस्, त्या माणसाने ताबडतोब गाठोडे बंद केले. तो पुढे पाहू शकला नाही. सहजपणे त्याच्या तोंडून शब्द निघाले,
भगवान, बाहेरून अत्यंत श्रीमंत आणि सुखवस्तू दिसणाऱ्या या स्त्रीचं जीवन इतक्या यातनांने भरलेल आहे ? मी कल्पना ही करू शकत नाही.
भगवान हसले आणि म्हणाले, “मी तुला म्हटले ना. प्रत्येकाच्या डोक्यावर ओझे हे असतेच. दुसऱ्याचं गाठोडे तुम्हला हलके वाटते. कारण ते तुमच्या खांद्यावर नसते. अजून ही तुला दुसऱ्या कुणाचं गाठोडं बघून ते घ्यायचे असेल तर घेऊ शकतोस.
तो माणूस ज्या ज्या लोकांना सुखी आणि नशीबवान समजत होता, त्यांची नावे बघत बघत त्याने गाठोडी खोलून पाहिली. पण नवल असे घडले की, प्रत्येक व्यक्तीचे गाठोडे त्याला जास्त भारी आणि स्वतःपेक्षा अनेक पटीने विटंबनेने भरलेले दिसले.
एक एक करत अनेक गाठोडी शोधत राहिला, त्यावेळी भगवान मात्र मंद मंद हसत एकदम शांतपणे उभे होते.
खूप वेळानंतर अचानक त्याने गाठोडी तपासणे बंद केले. दीर्घ श्वास घेत म्हणाला, प्रभू, मला माझेच गाठोडे द्या. मला वाटते या सर्वांपेक्षा तेच जास्त हलके आहे.
असे म्हणतोस ? तर मग जीवन संपवून टाकावे, असा विचार करण्या इतका कुठला मोठा भार तुझ्या डोक्यावर आहे ? पाहू या तर खरे… यात काय भरलेले आहे. तुझे गाठोडे खोल, भगवान म्हणाले.
त्या माणसाने स्वतःचे गाठोडे उघडले. त्यात सोन्याच्या विटा होत्या. नोटांच्या अनेक थपप्या होत्या आणि दुसरे अगदी क्षुल्लक म्हणता येईल असे प्रश्नरुपी दगड होते.
बेटा, अत्यंत मायाळू आवाजात भगवान म्हणाले, अनेक वर्षांपासून तू या सोन्याच्या विटा घेऊन फिरत होतास आणि ही नोटांची थप्पी जमवत होतास. इतके असूनही शेवटी जीवनाचा अंत करण्याचीच वेळ आली ना ? मग हे सोने नाणे पैसा अडका काय कामाचा ? कुणीतरी चोरून नेईल किंवा खर्च होईल या भीतीने तू हा भार वाढवला आहेस.
आता तू तुझ्या दुनियेत परत जा. हा पैसा गरजू गोरगरिबांना वाटून टाक. जे भुकेने तडफडत आहेत. ज्यांना जीवनात काहीच मिळाले नाही. मी तुला खात्री पूर्वक सांगतो की, त्यांचा आनंद बघून तुझ्या आत्म्याला जे सुख आणि शांती मिळेल ते या तुझ्या दौलतीने तुला कधीच मिळाले नसेल. शिवाय सर्व काही दान केल्याने तुझ्या खांद्यावरचे ओझे कमी होईल. आणि हो, हे छोटे छोटे धारदार दगड कसले जमा केले ?
त्या माणसाला लाज वाटली. शरमेने खाली बघत तो म्हणाला, प्रभू, हे माझ्या, अभिमान, स्वार्थ, पाप आणि द्वेषाचे दगड आहेत. ज्यांच्या धारेने मी दुसऱ्यांना दुखावण्याचे काम केले आहे.
भगवान हसू लागले. म्हणाले, काही हरकत नाही बेटा, तू आरामात तुझ्या दुनियेत परत जा. पण हे छोटे दगड मला दे. आज मी ते सर्व तुझ्याकडून घेतो.
असे म्हणत करूणावतार परमेश्वराने त्याचे पाप, राग-द्वेष, तसेच अभिमान वगैरे जे दगड होते ते स्वतःच्या हातात घेतले. ते दगड इतके धारदार होते की, परमेश्वराच्या हातातून पण रक्त येऊ लागले.
त्या माणसाला आता खूप हलके वाटत होते. परमेश्वराचे आभार मानून तो पाया पडला. मग स्वतःचे गाठोडे खांद्यावर घेऊन पृथ्वी वर परत जावे म्हणून निघाला. थोडे अंतर चालल्यानंतर त्याला काहीतरी आठवलं.
मागे फिरत त्याने परमात्म्याला विचारले, प्रभू, माझे ओझे नेहमी माझ्या खांद्यावरच असते. मग बाकी सर्वांची गाठोडी इथे कां पडून आहेत ?
आता भगवान खळखळून हसत म्हणाले, माझ्या प्रिय मुला, हीच ती गोष्ट आहे जी, तू आतापर्यंत समजू शकला नाहीस. इथे प्रत्येकाकडे असह्य आणि तुझ्या करता पण जास्तपटीने जड असे गाठोडे आहे. तरी ही हे लोक छान जगत आहेत. कारण त्यांनी त्यांचा भार माझ्यावर टाकला आहे. तू मात्र तुझे गाठोडे खांद्यावर घेऊन फिरत आहेस.
त्या माणसाच्या डोक्यात आता लख्ख प्रकाश पडला. डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या. अलगद पावलाने तो मागे फिरला. खांद्यावरील गाठोडं उतरून ते परमेश्वराच्या चरणा जवळ ठेवले. नमस्कार केला आणि आज पर्यंत कधीही न अनुभवलेली दिव्य शांतीचा अनुभव घेत पृथ्वीवर परत येण्यासाठी निघाला.
त्याच क्षणी गुंगी उतरल्या मुळे
त्याचे डोळे उघडले.
बोध …..
मित्रांनो, जे आपणांस मिळाले आहे त्यातच जीवनाचा आनंद आहे. जे आपल्याकडे नाही त्यासाठी दुःख करण्यात काही अर्थ नाही. तुम्हीच ठरवा, कसे जगायचे
हा लेख …सूभाष साळवी,
बदलापूर …