Classified

★विभा कॉलिंग विभास ★ (३) लेखिका मधुर कुलकर्णी

विभा कॉलिंग विभास (3)

बेल वाजल्यावर केतकीने दार उघडलं तर दारात घामेजलेली रागिणी उभी होती.
“रागिणी, काय झालं? तू ठीक आहेस ना? आणि काल रात्री कुठे गेली होतीस?”

“केतकी, मला आत येऊ दे.” रागिणी आत येतं म्हणाली.

“अगं बोल की! कुठे होतीस रात्रभर? आणि अशी घाबरलेली का दिसतेय?” केतकी तिला पाणी देत म्हणली.

“काही नाही ग, काल मी बसमधून येतं होते तर आमच्या बससमोर एक माणूस अचानक आला. ड्रायव्हरने करकचून ब्रेक दाबला.मरता मरता वाचला तो! सगळ्या प्रवाशांना खाली उतरवलं. मी पण खूप घाबरून गेले होते. तिथेच जवळ माझी एक मावशी राहते, तिच्याकडे होते रात्रभर!”

“कुठली मावशी? तू कधी बोलली नाहीस आजपर्यंत!”

“नाही बोलले का? विसरले असेन. केतकी, आपण नंतर बोलू, मी जरा आंघोळ करून येते. कसतरी होतंय.” रागिणीने कशीतरी वेळ मारुन नेली.

***

दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये जणू काही झालंच नाहीय असं विभास वागत होता. दोन दिवस रागिणी त्याला टाळत होती पण नंतर तिला कामासाठी विभासच्या केबिनमध्ये जावंच लागलं.

“चिल रागिणी! आपण दोघेही तरुण आहोत. जे झालं त्याचा फार विचार करू नकोस. मी तुझी सॅलरी वाढवतोय.”

रागिणीने चमकून विभासकडे बघितलं….. म्हणजे ह्याच्या मनात तरी काय आहे? काय समजतो हा मला? मी तशी मुलगी आहे? प्रमोशनसाठी इतक्या खालच्या लेव्हलला जाणारी?
“विभास, मी तशी मुलगी नाहीय. प्रमोशन, पगारवाढीसाठी…..तुझ्याबद्दल मनात भावना निर्माण झाल्या होत्या म्हणून नकळत प्रतिसाद देत गेले.”

“फरगेट इट रागिणी. फाईल दे जरा! यू मे गो.” विभास तिच्या हातातली फाईल घेत म्हणाला.

इतका कोरडा, इतका तुटक आहे हा? मग कालचं ह्याचं भावाविवश होऊन वागणं नाटक होतं का? ह्याला फक्त मजा करायची होती? रागिणीचे डोळे भरून यायला लागले. तिला अपमानास्पद वाटलं. ती तडक केबिनच्या बाहेर आली. चेहरा नॉर्मल ठेवत काम पुढे सुरु ठेवलं.

**

— विभा, झोपलीस का ग?–

इतक्या रात्री, बारा वाजता रागिणीचा मेसेज बघून विभाने तिला फोन लावला.

“रागा, इतक्या उशीरा तू जागी? तू दहा वाजता झोपणारी मुलगी आहेस. काय झालं? तब्येत ठीक आहे ना?” विभाला काळजी वाटली.

“राहू दे नंतर बोलू. ऋचा असेल ना तुझ्या बाजूला?”

“ऋचा आज तिच्या मैत्रिणीकडे नाईट आउटला गेलीय. बोल काय झालं? मला काळजी वाटतेय.”

“विभू, खूप रडावंसं वाटतंय ग तुझ्या कुशीत!”

“अगं काय झालं ते तरी सांगशील का नाही?” विभाचा धीर सुटत चालला.

“गुदमरल्यासारखं होतंय ग! श्वास अडकतोय. भीती वाटतेय कसलीतरी!”

“उद्या ताबडतोब डॉक्टरकडे जा. मी येऊ का पुण्याला?”

“नको विभा, सध्या कामाचं लोड आहे,मीच नागपूरला येईन महिन्याने! मी हा जॉब सोडतेय. रिझाईन करतेय उद्या! दुसरीकडे ट्राय करते.” रागिणीने हुंदका दाबला.

“अगं पण का रागा? इतकं चांगलं पॅकेज असताना?” विभाला आश्चर्य वाटलं.

“इथे माझं मन लागतं नाहीय.”

“व्हॉट नॉन्सेन्स रागा! नोकरीत कोणाचंच मन लागतं नसतं. ती निभवावी लागते. आणि तू आता जरा प्रॅक्टिकल हो. तुझं सारखं हे टेन्शन घेणं, मुळूमुळू रडणं कमी कर. जरा टफ हो ग!”

तिच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या विभाचं हे बोलणं रागिणीने ऐकलं आणि एक क्षण तिला विभाचा हेवा वाटला. माझ्या जागी विभा असती तर तिने विभासला जाब विचारला असता. मी का नाहीय विभासारखी?

“रागा, फार विचार करू नकोस. नोकरीत कुणीच खुश नसतं. आता शांत झोप. उद्या बोलू.”

**

रागिणीने राजीनामा दिलाच! तिला तिथे नोकरीं करणं अशक्य झालं होतं. राजीनामा दिल्यावर दीड महिन्याने ती रिलीव्ह होणार होती. ऑफिसमधलं काम ती अक्षरशः रेटत होती. राजीनामा देऊन महिना होऊन गेला आणि एक दिवस रागिणी काम करतानाच चक्कर येऊन पडली. फर्स्ट एड केल्यावर ती जरा वेळाने नॉर्मल झाली. तिने आजूबाजूला बघितलं. विभास कुठेही दिसत नव्हता. इतका कसा हा बदलू शकतो? तिला भडभडून आलं. हाफ डे घेऊन ती घरी गेली पण तिला बरंच वाटतं नव्हतं.

रजा टाकून दुसऱ्या दिवशी ती दवाखान्यात गेली.
“आय थिंक यू शुड गो टू सम लेडी डॉक्टर.” डॉक्टरांचं हे वाक्य ऐकलं आणि रागिणीचे हातपाय कापायला लागले. तिची पाळी चुकली होती हे आत्ता तिला आठवलं.

ती तशीच गायनॉकोलॉजिस्ट डॉक्टर स्मिता देसाईकडे गेली.
“आर यू मॅरिड?”

डॉक्टरांनी रागिणीला विचारलं आणि रागिणीला घाम फुटला.

“नाही डॉक्टर.”

“आय एम सॉरी टू से, बट यू आर प्रेग्नन्ट.”

“डॉक्टर, हे कसं शक्य आहे?”

“कसं शक्य ते तुम्हालाच माहिती!”

“डॉक्टर, प्लिज मला मोकळं करा.”

“तुमच्या पार्टनरशी आधी बोला, मग ठरवू. एकतर्फी निर्णय घेणं योग्य नाही.”

रागिणीला कुठेतरी आशा वाटली की विभास ही बातमी ऐकून बदलेल.
तिने दवाखान्यातून बाहेर पडल्या पडल्या विभासला फोन केला.
“विभास, बोलायचं होतं.”

“लवकर बोल, माझ्याकडे वेळ कमी आहे.” विभास तिरसटासारखं बोलला.

“तुझं बीज माझ्या पोटात अंकुरलंय विभास.”

“व्हॉट नॉन्सेन्स! ही असली फालतुगिरी ऐकायला मला वेळ नाहीय. कामाचं काही असेल तर बोल.”

“विभास, इतका कसा कठोर झालास तू? विसरलास तो दिवस?”

“मला इमोशनल ब्लॅकमेल करू नकोस. ह्या असल्या फालतू गोष्टीना मी किंमत देत नाही. कशावरून माझंच?”

“विभास!” रागिणी जिवाच्या आकांताने ओरडली. खचून गेली, दुसऱ्याच क्षणाला सावरली आणि तिने डॉक्टरांना फोन केला, “डॉक्टर, दोनच मिनिट बोलते. मला हे मूल अबॉर्ट करायचं आहे. तुम्ही दिवस आणि वेळ मला सांगा.”
तिने फोन बंद केला आणि ती रिक्षेत बसून घरी जायला निघाली….

****

डॉक्टर देसाईंनी रागिणीला काही सूचना देऊन डिस्चार्ज केलं. उद्विग्न अवस्थेत, थकलेल्या अवस्थेत रागिणी फ्लॅटवर आली. दुसऱ्या दिवशी तिने रजा वाढवून घेतली. केतकी आणि सना कामावर गेल्यावर तिने विभाला पत्र लिहायला घेतलं.

प्रिय विभा,

….,

****

रागिणीने विभाला लिहिलेलं पत्र पूर्ण केलं आणि तिच्या बॅगच्या तळाशी ठेवलं. प्रचंड रितेपण शरीरात आलंय हे तिला जाणवलं. एका कोवळ्या जीवात जीव यायच्या आतच मी त्याला मारून टाकलं हा विचार तिला पोखरत होता. भ्रूणहत्येचं पाप माझ्या माथी लागलं. विचार करून डोकं फुटायची वेळ आली. प्रचंड थकवा आला होता. पाठीतून ,कंबरेतून कळा येत होत्या. काही खायची इच्छा नव्हती. पण शक्ती येण्यासाठी औषध घेणं भाग होतं. एक कप दुधाबरोबर तिने औषध घेतलं आणि झोपली.

गोल गोल वावटळीतून एक लहान अर्भक रडतंय आणि दोन्ही हात पुढे करून मला घे म्हणतंय असं स्वप्न रागिणीला पडलं आणि ती दचकून जागी झाली. हे सगळं तिला असह्य व्हायला लागलं. मोबाईलची रिंग वाजली म्हणून तिने बघितलं, ऑफिसमधल्या नेहाचा फोन होता.
“रागिणी, रजा का वाढवलीस? तू रिझाईन केलंय, अशा वेळी जास्त रजा घेता येतं नाही.”

“नेहा, मी आजारी आहे, नाही येऊ शकत. विभास सरांनी विचारलं का ग माझ्याबद्दल?”

“नाही, काहीही विचारलं नाही. त्यांना हे नवीन नाही, अनेकजण जॉब सोडून जातात.”

म्हणजे विभाससाठी त्या अनेकांपैकी मी एक! रागिणीने सुस्कारा सोडला. आशा माणसाची पाठ सोडत नाही. त्या दिवसानंतर विभास तिच्याकडे एक एमप्लॉयी ह्याचं दृष्टीने बघत होता.
“नेहा, मी अजून काही दिवस तरी येणार नाही.”

“रागिणी, विदआउट पे होईल तुझी रजा.”

“होऊ दे, एकदा इंटरेस्ट संपल्यावर आता काहीच वाटतं नाहीय.”

“ओके, टेक केअर.”

***

औषधं घेऊन रागिणीला थोडी ताकद आली होती. रागिणी तयार झाली आणि फ्लॅटला कुलूप लावून पोस्टात निघाली. बॅगच्या तळाशी ठेवलेलं विभाला लिहिलेलं पत्र घेतलं. पोस्टातच एनव्हलप घेऊन तिथेच टाकायचं होतं.

पत्र पोस्ट करून रागिणी फ्लॅटवर परत आली. मुख्य दरवाजा न लावता, फक्त लोटला. तिची एक ओढणी घेतली आणि स्टूलवर चढून पंख्याला लटकून गळ्याला करकचून बांधली आणि स्टूल ढकलला.

****

मोबाईलची रिंग वाजली म्हणून विभाने बघितलं, ऋचाचा फोन होता. पंधरा मिनिटात तर ती घरी पोहोचणार होती, कशाला केला असेल ऋचाने फोन?

“विभा, ताबडतोब घरी ये.”

“ऋचा, पंधरा मिनिटात मी निघतेच आहे, इतकी काय अर्जंसी आलीय.”

“तू घरी ये.” ऋचाने फोन बंद केला.

**

विभा घरी आली तर प्रसादमामा, मामी, ऋचा, रोहन सगळेच रडत होते.
“मामा, काय झालं?” विभाला धस्स झालं.

“विभा, कसं सांगू ग? रागिणीने आत्महत्या केली. आपल्याला ताबडतोब पुण्याला निघावं लागेल.”

मामाचे ते शब्द ऐकले आणि विभाला घेरी आली. ती धपकन सोफ्यावर बसली. हे असं भयंकर कसं घडलं? इतका टोकाचा निर्णय घेण्याइतकं रागिणीच्या आयुष्यात घडलं तरी काय होतं? विभाच्या संवेदना बधीर झाल्या, अश्रू गोठले. तोंडातून शब्द फुटेना. मामी तिला जवळ घेऊन रडत होती पण तिला रडायलाच येतं नव्हतं.

***

रागिणीने चिठ्ठी लिहून ठेवली होती.
–माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. हा माझा निर्णय होता–

***

पुण्याहून परतल्यावर लेटरबॉक्समध्ये विभाला तिच्या नावाचं पत्र दिसलं. तिने बघितलं, कोणी पाठवलंय कळतं नव्हतं. घरात आल्यावर तिने ते पत्र उघडलं आणि खाली ‘रागा’ वाचून ती अस्वस्थ झाली. तिने खोलीचं दार लावलं आणि पत्र वाचायला घेतलं.

प्रिय विभा…

***

“मामा, मी हॅ जॉब सोडून पुण्याला जातेय. एका चांगल्या कपंनीची जाहिरात आलीय. तिथे प्रयत्न करते.”

“पण त्यासाठी नोकरीं का सोडते आहेस. एकदा जाऊन बघून ये.”

“नाही मामा, ती नाही मिळाली तर दुसरीकडे ट्राय करते. पुण्यात चांगला स्कोप आहे.”

“आणि राहणार कुठे?” प्रसादने विचारलं.

“तात्पुरती सोय केलीय, नंतर बघू.”

विभा,विचार करून निर्णय घेते आहेस ना? एका प्रसंगाने आपण किती खचून गेलो होतो, आठवतंय ना? ”

“डोन्ट वरी मामा! तसलं मी काही करणार नाही.”

***

विभाने केबिनचं दार नॉक केलं
“मे आय कम इन सर?”

विभासने वर बघितलं, मूर्तिमंत सौंदर्य त्याच्यापुढे उभं होतं. तो कितीतरी वेळ विभावरीकडे टक लावून बघत होता.

“सर”

“ओह येस! प्लिज कम इन. हॅव अ सीट.”

विभासने विभाची फाईल बघितली.
“माथुर? आमच्या ऑफीसमध्ये रागिणी माथुर होत्या. तुमचा काही संबंध?”

“नो सर.”

“स्टुपिड लेडी.”

“सर, काही म्हणालात?”

“नो नो, विभावरी, तुमचा बायोडाटा इंप्रेसिव्ह आहे. यू आर अपॉइन्टेड!”

“थँक यू सो मच सर.”

विभावरीने करारपत्रावर झोकात सही केली. तिने फाईल घेतली आणि ती केबिनच्या बाहेर पडली. तिच्या मनातल्या आराखड्याचा श्रीगणेशा झाला होता.

***

“रागा, मी मारलं ग त्याला, तुझ्यासाठी, फक्त तुझ्यासाठी!” विभाने कोणाला दिसणार नाही अशा ठिकाणी ठेवलेलं रागिणीचं पत्र बाहेर काढलं. अश्रुंमुळे अक्षरं धुसर झाली.

प्रिय विभा,

व्हाट्स अपवर आणि फोनवर आपला रोज संवाद असताना हे पत्र कशाला असं तुझ्या मनात साहजिकच येईल. मी ह्या जगातून गेल्यावर हे पत्र तुझ्या हातात पडावं आणि फक्त तुलाच हे सत्य कळावं, ह्यासाठी हे पत्रलेखन!

विभू, माझा हा निर्णय तुला अजिबात पटणार नाही हे मला माहितीय. संतापाने तू मला, भेकड, नेभाळट सुद्धा म्हणशील. पण विभू मला समजून घे.

माझा बॉस विभास वैद्य… त्याच्यावर मी प्रेम करायला लागले होते. तो देखील मला प्रतिसाद देतोय असं मला वाटलं. पण मी भ्रमात होते. त्याला फक्त माझा उपभोग घ्यायचा होता. एका रात्रीची मजा! मी बहकले, वाहवत गेले. परिणाम तोच झाला जे एका लग्न न झालेल्या मुलीच्या आयुष्यात होतं. ‘कुमारी माता’. तुला आठवतंय का ग? लहान असताना आई कुंतीच्या कथा सांगायची. तेव्हा ह्या शब्दाचा अर्थ कळतं नव्हता. मोठं झाल्यावर कळायला लागलं. तेव्हा कुंती किती अविचारी होती, असं वाटून गेलं होतं पण….. आज माझ्या वाट्याला तेच आलंय. कुंतीचं दुःख मला कळलं. तिने कर्णाला पाण्यात सोडून दिलं पण ते द्वापार युग होतं. कलियुगात हे असं घडणं अशक्य! मी अबॉर्शन केलं. भ्रूणहत्या… सगळ्यात मोठं पाप! शरीराच्या रितेपणाचं ओझं घेऊन मला जगायचं नव्हतं. आयुष्यभर ही पोकळी तशीच राहणार होती. माझी चूक होती, मला प्रायश्चित्त घ्यायचं होतं.

मी चिठ्ठी लिहून ठेवलीय, माझ्या आत्महत्येला कोणालाही जबाबदार धरू नये. पण तुझ्याजवळ मन मोकळं करायचं होतं. हे पत्र वाचून फाडून टाक. तू हे मामा मामीला अजिबात सांगणार नाहियस. पोलिसांचा ससेमिरा मागे लागेल. त्या दोघांना विनाकारण त्रास होईल. त्यांचे फार उपकार आहेत आपल्यावर! तुझं आणि ऋचाचं लग्न व्हायचं आहे. वचन मागतेय तुझ्याकडून! तू ऐकशील ही खात्री आहे. माझ्या जाण्याचं दुःख करू नकोस. यू आर अ ब्रेव्ह गर्ल. करिअरकडे लक्ष दे.खूप मोठी हो, यशस्वी हो, कीर्ती मिळव!”

तुझीच
रागा

क्रमश:

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}
18:00