#भय इथले संपत नाही © सतीश बर्वे १७.१०.२४ #कथाविश्व
#भय इथले संपत नाही © सतीश बर्वे
१७.१०.२४
#कथाविश्व
नानींची टॅक्सी गेट बाहेर गेली आणि त्यांना निरोप देणारे लहानमोठे आम्ही सर्वजण ओक्सबोक्शी रडू लागलो . इतके दिवस डोळ्यांत जबरदस्तीने कोंडून ठेवलेले अश्रू फुटलेल्या धरणासारखे हाहाकार माजवत डोळ्यांतून ओसंडून वाहायला लागले .
आजच्या ह्या शेवटाची सुरवात झाली ते आमच्या चाळीच्या पुनर्बांधणीचा निर्णय झाला तेव्हा . चाळ जुनी झाली होती . जागा अपुरी पडत होती . पाण्याचा प्रश्न होता कायमचा . ह्या साऱ्यातून सुटका होईल म्हणून एका बिल्डरने आमच्या समोर एक सुंदर प्रस्ताव ठेवला होता . सध्या आहे त्याच्या दुप्पट जागा चारचार मजली इमारतीत तो देणार होता . स्वतंत्र फ्लॅट . २४ तास पाणी . शिवाय मासिक देखभालीच्या खर्चापोटी सर्व सभासदांना घसघशीत रक्कम मिळणार होती .एकटे नाना सोडले तर ह्या प्रस्तावाला सर्वांची संमती होती . पण नानांच्या विरोधाची कारणे ऐकून आम्हा सर्वांचे मन गलबलून गेले होते. नाना वय वर्षे ८८ आणि नानी ८३. नानांना दोन मुलगे . एक परदेशात तर एक इथेच मुंबईत . पण दोघेही घरापासून कैक वर्षे दुरावलेले . हा दुरावाच नानांच्या विरोधाचा मूळ होता . चाळीतील खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांना आधार देत नाना नानी जगत होते . नाना पोष्टातून निवृत्त झाले होते तर नानी सचिवालयातून. दोघांना मिळणाऱ्या पेन्शन मधून ते आनंदाने राहत होते. इतके दिवस फक्त दुरावलेली मने होती त्यांच्या मुलांची . पण पुनर्बांधणीनंतर चाळीचे स्वरूप बदलून कदाचित फ्लॅट मध्ये राहणाऱ्यांची मनही दुरावलेली आणि दुभंगलेली होतील ह्याची नानांना सतत भीती होती. मी नानाच्या शेजारच्या खोलीतच राहायचो . मी शेखर अन संदीप बरोबर एकत्र खेळून लहानाचा मोठा झालो होतो . नाना नानी मला त्यांचा तिसरा मुलगाच मानायचे . अगदी हक्काने.आमच्या चाळीतील सर्वात वयाने आणि अनुभवाने मोठे म्हणून नानानांनींना मान आणि आदर होता . सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरीरीने भाग घ्यायचे . अभ्यासात चांगले मार्क्स मिळवून उत्तीर्ण झालेल्या सगळ्यांना ते कौतुकाने बक्षिसे द्यायचे.
आमची चाळ म्हणजे एकत्र कुटुंबच होते . एकाला लागून एक अश्या वीस खोल्या खाली आणि वीस खोल्या वर अशी एकूण चाळीस बिऱ्हाडे होती आमच्या एक मजली चाळीत . अश्या तीन चाळी तीन बाजूनी होत्या आणि मधोमध मोकळे मैदान. सगळे सणवार एकत्रितपणे साजरे व्हायचे इथे . एका खोलीत खुट्ट झालेले शेवटच्या खोलीत क्षणार्धात समजायचे . वाढदिवस , बारसे , डोहाळजेवण , लग्न म्हणजे चाळीत आनंदोत्सव असायचा . सगळे मदतीला असायचे. त्यामुळे यजमान घराला खूप मदत असायची . कुणी आजारी पडले तर आख्खी चाळ मदतीला धावून यायची . नानांची दोन्ही मुले शेखर आणि संदीप ह्याच चाळीत लहानाची मोठी झाली . दोघेही जात्या मोठे हुशार आणि बुद्धिमान . मोठा शेखर . आय आय टी मधून पदवीधर झाला आणि परदेशी शिकायची स्वप्ने बघू लागला . नानांनी कर्ज काढून त्याला परदेशी पाठवला . पण तो तिथेच रमला आणि तिथल्या श्रीमंती वातावरणाचा एक भाग बनला. एका परदेशी मुलीशी संसार थाटून कायमचा तिथे राहण्याचा निर्णय त्याने नानांना कळवला आणि नानानांनींना पहिला मोठा धक्का बसला .. सुरवाती सुरवातीला त्याची पत्रे यायची . पण नंतर दोन पत्रातील अंतर वाढले आणि कालांतराने सर्वच संपले. नोकरीत असताना इतरांना वेळेवर पत्रे मिळावीत म्हणून इमानेइतबारे चोख काम करणाऱ्या नानांना गेली 3० वर्षे शेखरच्या पत्रांनी हुलकावणीच दिली होती. आजच्या घडीला फोन , इमेल , वेब कॅम इत्यादी संदेश वहनाची आधुनिक व्यवस्था असून देखील नाना नानींना शेखरच्या चेहरा पण दिसत नव्हता . धाकटा संदीप मुसलमान मुलीच्या प्रेमात पडून घराबाहेर पडून ठाण्याला वेगळे बिऱ्हाड करून राहत होता. दोन कमावती मुले असून देखील नाना नानी खऱ्या अर्थाने एकटेच होते आणि मुलानातवंडांच्या प्रेमाला मुकले होते .
आमची पुनर्बांधणीची शेवटची बैठक झाली ज्यात सर्व ठरले . साधारण ४-५ महिन्यानंतर आम्हाला आमच्या खोल्या खाली करून देण्याचे नक्की झाले . हा निर्णय होऊन २-३ महिने लोटले नाहीतर अचानक नाना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वारले . खोली खाली करून दुसऱ्या जागेत कुणाच्या आधाराविना राहावे लागणार ह्या काळजीने बहुदा त्यांचा बळी घेतला. नानांचे दिवसकार्य आम्हीच केले आणि एक दिवस नानींनी आमच्या चाळीतील सर्वांना बोलावून माझ्या हातात नानांचे एक पत्र वाचायला दिले . मी थरथरत्या हाताने ते वाचायला लागलो.
आपल्या चाळीच्या जागी नवीन इमारत उभी राहणार ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे . पण मला मात्र ती दुःखाची वाटते . आज आमची मुले आमच्या पासून वेगळी राहत असली तरी तुम्हा सर्वांच्या आधाराने मी आणि नानी आनंदाने राहत होतो . पण हे सुख पुढच्या काही महिन्यात कायमचे हिरावले जाणार म्हणून मी आणि नानी हादरून गेलो आहोत . जवळ जवळ २ वर्षे भाड्याच्या घरात एकटे राहणे आम्हाला कितपत शक्य होईल ह्या बद्दल आम्ही साशंक आहोत . म्हणून आम्ही दोघांनी एक निर्णय नाईलाजाने घेतला आहे . आमच्या कडे साठवलेली पुंजी आणि नानींचे सोन्याचे दागिने विकून आलेले पैसे आम्ही एका वृद्धाश्रमात भरत आहोत . तिथे आमची मरेपर्यंत राहण्याखाण्याची आणि औषधपाण्याची सोय होणार आहे . आमची खोली आम्ही स्वखुशीने श्रीधरच्या नावाने करावयाचे ठरवले आहे आणि त्या दृष्टीने वकिलामार्फत कागदपत्र करून ते आमच्या कपाटात हिरव्या लखोट्यात ठेवले आहेत , जर का आमच्यापैकी एकाने चाळ खाली करायच्या आधीच ह्या जगाचा निरोप घेतला तर श्रीधरने वृद्धाश्रमात फोन करून तिथली मोटार बोलावून उरलेल्याला त्या वृद्धाश्रमात पोहोचवायचे काम करावे . पण कोणीही सोबत म्हणून जाऊ नये कारण जो सोडायला येईल त्याचा निरोप घेणे आमच्यापैकी जो जिवंत असेल त्याला जमणार नाही . इथले पाश इथेच सोडून जाण्याचे आम्ही ठरवले आहे . जरी ही खोली श्रीधरच्या नावावर आम्ही करत असलो तरी ही खोली सर्व चाळीसाठी असून गरजूंनी त्याचा योग्य वापर करावा अशी आमची इच्छा आहे . त्या दृष्टीने सर्व तजवीज माझ्या मृत्युपत्रात करून ठेवली आहे .ज्या खोलीत बसून आम्ही दोघांनी आमच्या दुरावलेल्या मुलांची डोळ्यांच्या खाचा करत वाट बघितली त्या कटू आठवणी घेऊन नवीन घरात आणि बंद दारात जगणे आम्हाला अशक्य आहे . म्हणून नाईलाजाने आम्ही लांब आणि शांत जागी असलेल्या वृद्धाश्रमाची निवड केली आहे .जेणेकरून अखेरच्या क्षणी श्वास सोडताना तरी पुत्र वियोगाचे वारे आमच्या अवतीभवती वाहणार नाहीत .
नानांनी अजून बरेच काही लिहिले होते त्यांची खोली कशी आणि कोणी कोणी कश्या रीतीने वापरावी वगैरे . पण इथवरच वाचून माझ्या हातातून नानांचे पत्र गळून पडले. नानींनी मला जवळ घेऊन माझे सांत्वन केले आणि अजून २-३ दिवसांनी चाळ सोडून जाण्याचे जाहीर केले .
नानींची टॅक्सी नजरेआड झाली आणि जड अंतःकरणाने आम्ही आपापल्या घरात गेलो . त्या रात्री मला जेवण देखील गेले नाही .
आज नानानांनींवर आलेली वेळ उद्या आणखी कोणावर देखील येऊ शकते ह्या विचारांनीच मन सुन्न होऊन जाते .
भय इथले संपत नाही हेच खरे. मग तो खोलीत राहणार असो का बंगल्यात .
शेवटी ज्याच्या त्याच्या प्राक्तनात जे वाढून ठेवले आहे त्याला सामोरे जाण्यावाचून आपल्या हाती काहीच नसते आणि ते मनाला पटवून देण्याचे कठीण काम प्रत्येकाला दुर्दैवाने करावेच लागते .
© सतीश बर्वे
१७.१०.२४
कथालेखन खूप उत्तम झाले आहे आवडली कथा धन्यवाद