नवरात्री — विजयादशमी संकलन – अनघा वैद्य

विजयादशमी = सिमोलांघन
दुर्गेची नऊ शक्तिरूपे आहेत, ती अशी :-
शैलपुत्री – हिमालयपुत्री हिचे लग्न शंकराशी झाले. नवरात्राच्या पहिल्या दिवशी हिचे पूजन करतात.
ब्रम्हचारिणी – म्हणजे तपचारिणी. उजव्या हातात जपमाळ व डाव्या हातात कमंडलू असे तेजोमय स्वरूप. पूजनाने सिद्धी व विजय प्राप्त होतात असा समज आहे. नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी हिचे पूजन करतात.
चंद्रघंटा – कल्याण करणारे व शांतिदायक दशभुजा स्वरूप. शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे.सर्व हातात अस्त्रे आहेत. पूजनाने सर्व कष्टांतून मुक्ती मिळते असा समज आहे. नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी हिचे पूजन करतात.
कुष्मांडा – अष्टभुजा प्रकारचे स्वरूप. पूजनाने रोग नष्ट होतात असा समज आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. हिला कोहळ्याचा नैवेद्य लागतो. वाहन सिंह आहे. नवरात्राच्या चवथ्या दिवशी हिचे पूजन करतात.
स्कंदमाता – स्कंदाची माता म्हणून असलेले चार भुजांचे स्वरूप. देवी कमळासनावर विराजमान आहे. देवीचा वर्ण पूर्ण शुभ्र आहे. नवरात्राच्या पाचव्या दिवशी हिचे पूजन करतात.
कात्यायनी – ‘कत’ नावाच्या ऋषीच्या कुलात, ‘कात्यक’ गोत्रात उत्पन्न झालेली अशी ती कात्यायनी. नवरात्राच्या सहाव्या दिवशी हिचे पूजन करतात.
कालरात्री – काळे शरीर व तीन डोळे असलेली, केशसंभार विखुरलेला, वाहन गर्दभ. खड्ग धारण केलेली, भयानक असे स्वरूप. नवरात्राच्या सातव्या दिवशी हिचे पूजन करतात.
महागौरी – गोरा वर्ण, आभूषणे व वस्त्र पांढऱ्या रंगाचे. चार हात असलेली व वृषभ हे वाहन असलेली. नवरात्राच्या आठव्या दिवशी हिचे पूजन करतात.
सिद्धिदात्री – सर्व सिद्धी देणारी. हिच्या उपासनेने आठ सिद्धी प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात. नवरात्राच्या नवव्या दिवशी हिचे पूजन करतात.
वर्षातून ४ वेळा नवरात्री येते : वर्षात चार नवरात्र असतात. या चार नवरात्रा पैकी दोन गुप्त आणि दोन सामान्य नवरात्र असतात. पहिले नवरात्र चैत्र महिन्यात येतं आणि दुसरे नवरात्र अश्विन महिन्यात येतात. चैत्र महिन्याचे नवरात्र मोठे नवरात्र म्हटले जातो आणि अश्विन महिन्याचे नवरात्र लहान किंवा शारदीय नवरात्र म्हणतात आषाढ आणि माघ मासात गुप्त नवरात्र येतात. हे गुप्त नवरात्र तांत्रिक साधनांसाठी असतात आणि साधारण किंवा सामान्य नवरात्र शक्तीच्या साधनेसाठी असतात.
आपल्या शरीरात ९ छिद्रे असतात. दोन डोळे, दोन कान, नाकाचे दोन छिद्र, दोन गुप्तांग आणि तोंड. या ९ अंगांना पावित्र्य आणि शुद्ध केल्यानं मन निर्मळ होऊन सहाव्या इंद्रियांना जागृत करतं. झोपेत या सर्व इंद्रिय सुप्त अवस्थेत असतात आणि फक्त मन जागृत राहत. वर्षभरातील ३६ नवरात्राचे उपवास केल्यानं शरीराच्या अंतर्गत अंगांची पूर्णपणे स्वच्छता होते.
रात्रीचं महत्त्व : नवरात्र या शब्दाचा अर्थ म्हणजे ‘नव अहोरात्राची प्राप्ती(विशेष रात्री)’, रात्र हा शब्द सिद्धीचे प्रतीक आहे. भारतातील प्राचीन ऋषी-मुनींनी रात्रीला दिवसापेक्षा अधिक महत्त्व दिले आहे. हेच कारण आहे की दिवाळी, होळी, शिवरात्र आणि नवरात्रीचे सण रात्रीच साजरे करतात. जर रात्रीचे कोणतेही गूढ नसते तर या सणांना रात्र नसून दिवस म्हटले गेले असते. जसे नवदिन, शिवदिन पण आपण असे म्हणत नाही. शैव आणि शक्तीशी निगडित असलेल्या धर्मात रात्रीचे महत्त्व आहे तर वैष्णव धर्मात दिवसाला महत्त्व आहे. म्हणून या रात्री मध्ये सिद्धी आणि साधना किंवा ध्यान केले जाते (या रात्री केलेले शुभ संकल्प सिद्ध असतात).
नऊ देवींचे नऊ नैवेद्य : शैलपुत्री कुट्टू आणि हरड, ब्रह्मचारिणी -दूध -दही आणि ब्राह्मी, चंद्रघण्टा चवळी आणि चंदूसुर, कुष्मांडा पेठा, स्कंदमाता वरईचे तांदूळ किंवा भगर आणि अळशी, कात्यायनी हिरवी भाजी आणि मोइया, काळरात्री काळीमिरी, तुळस आणि नागदौन, महागौरी साबुदाणा तुळस, सिद्धीदात्री आवळा आणि शतावरी.
षोडश मातृकामध्ये सहाव्या क्रमात जी देवी येते तिचे नाव विजया आहे. जगतजननी माता भवानीच्या दोन सखींचे (मैत्रिणी) नाव जया-विजया आहे. यामधील एकीच्या नावावर विजयादशमीचा सण साजरा केला जातो. हा सण शस्त्राने देशाच्या सीमेची रक्षा करणारे तसेच कायद्याचे रक्षण करणारे किंवा शस्त्राचा इतर चांगल्या कामासाठी वापर करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
अश्विन शुक्ल दशमीला साजरा होणारा दसरा हा हिंदूंचा प्रमुख सण आहे. दसरा हा सण असत्यावर सत्याचा विजय म्हणून साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असे देखील म्हणतात. हा सण शौर्याचा उपासक आहे. हा सण म्हणजे भारतीय संस्कृतीची शौर्याची पूजा आहे. व्यक्ती आणि समाजाच्या रक्तात शौर्य प्रकट व्हावे म्हणून दसऱ्याचा सण साजरा केला जातो.
विजयोत्सव- मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांनी या दिवशी दशानन रावणाचा वध केला असे मानले जाते. त्या असत्यावर सत्याचा विजय म्हणून हा सण साजरा केला जातो. देशात दसरा किंवा विजयादशमी हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
दसरा ही तिथी वर्षातील सर्वांत शुभ साडेतीन मुहूर्तांपैकी असल्याचे मानले जाते. या दिवशी लोक मुहूर्त न बघता नवीन कामाला सुरुवात करतात. या दिवशी शस्त्र पूजन, वाहन पूजन केले जाते. प्राचीन काळी राजे या दिवशी विजयासाठी प्रार्थना करायचे आणि रण यात्रेला जात असे.