Classifiedमनोरंजन

★विभा कॉलिंग विभास ★ (4) लेखिका मधुर कुलकर्णी

*विभा कॉलिंग विभास * (4)

“विभावरी, कधी येतेय ऑफिसला?” सानिका फोनवर विचारत होती.

शक्य तितका नॉर्मल आवाज ठेवत विभा म्हणाली, “निघतेच पाच मिनिटात!”

“तुला बातमी कळली नाही का? विभास सर गेले.”

“गेले म्हणजे?”

“ही इज नो मोअर विभा!”

“काय सांगतेस?” आपला स्वर किती खोटा आहे हे विभाला जाणवलं. काल रात्री तिला झोपेची गोळी घेऊन सुद्धा झोप आली नव्हती. रात्रभर ती जागी होती. विभासला तिने सूड घ्यायचा म्हणूं मारून तर टाकलं होतं. ते कृत्य केल्याचा तिला पश्चाताप नव्हता पण ती आता घाबरली होती. तिच्या प्रिय, साध्या बहिणीला त्याने फसवलं होतं. रागिणीने त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवला होता आणि ह्याची शिक्षा तिने विभासला दिली होती.

***

विभावरी ऑफिसमध्ये पोहोचली तर पोलीस आणि हातांचे ठसे घेणारे आले होते. अचानक मृत्यू की खून ह्याचा शोध लावण्याचं काम सुरु झालं होतं. एक क्षण ती घाबरली पण एकच क्षण! जे काही तिने केलं होतं ते शिक्षा भोगण्याच्या तयारीने केलं होतं. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांच्या हाताचे ठसे घेणार होते. विभावरीच्या हाताचे ठसे घेणारा तिच्याकडे संशयाने बघतोय असं तिला वाटलं.ती गुन्हेगार होती, हे तिला देखील माहिती होतच!

***

एक मोठा श्वास घेऊन विभावरीने नंबर डायल केला.
“मामा, माझं इथलं काम पूर्ण झालंय, पण मी इतक्यात येऊ शकत नाही. आमच्या बॉसचे अचानक निधन झाले. पोलिसांना संशय आहे, पूर्ण इन्व्हेस्टिगेशन होईपर्यंत मला थांबावे लागेल.”

“विभा, हे काय आता? तू रागिणीच्या कपंनीत अप्लाय केलं होतंस तेव्हाच मी विरोध केला होता पण तू हट्टाला पेटली होतीस. पॅकेज चांगलंय, कपंनी चांगलीय म्हणून तुला मी जाऊ दिलं. पोळलो होतो ग रागिणीच्या प्रसंगामुळे! तिच्या ह्या गूढ मरणाचं दुःख मला पचवता येत नाहीय. ताईला दिलेलं वचन मी पूर्ण करू शकलो नाही.”

“असं का बोलतोस मामा? तू कुठेही कमी पडला नाही. रागा मनाने अतिशय कमकुवत होती. पण तिच्या ह्या कृतीने आपण उध्वस्त होऊ, हा विचारच तिने केला नाही. तू काळजी करू नकोस मामा! काही वाटलं तर मी तुला फोन करेन.”

विभावरीला मनात प्रचंड कालवाकालव झाली. गुन्हा साबित झाला आणि मी दोषी ठरले तर मामाचं काय होईल. तिला रडूच फुटलं. त्याच्या उपकाराची परतफेड करण्याऐवजी आम्ही दोघीही बहिणींनी त्याला मनस्तापच दिला.तिने डोळ्यातले पाणी पुसले.

***

विभावरीची चूक तिला भोवली. मासे कापताना तिने ग्लोव्हज घातले नव्हते. सुरीवर तिचे ठसे सापडले होते.कोर्टात केस गेली. एक दिवस कस्टडीत काढून विभाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहावं लागलं. स्वतःच केस लढायची तिने ठरवलं.

विभासकडून त्याची मावस बहीण शलाका ही केस लढणार होती.
शलाकाने प्रश्न विचारायला सुरवात केल्यावर, चेहऱ्यावर कुठेही भांबवलेपण दिसायला नको ह्याची खबरदारी विभाने घेतली.

“मिस विभावरी, विभास सरांकडे तुम्ही गेला होता हे तुम्ही पोलिसांपासून लपवून का ठेवलं?”

“लपवण्यासारखं त्यात काहीच नव्हतं. आणि मी मुद्दाम सांगावं असंही काही विशेष नव्हतं. मला विभास सरांनी कामासाठी बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेले. आणि ऑफिसमधले अजून एक दोघे येणार आहेत हे देखील त्यांनी मला सांगितलं होतं. पण तिथे गेल्यावर अर्धा तास झाला तरी कुणीच आलं नव्हतं. विभास सरांनी माझ्याशी शारीरिक जवळीक साधायचा प्रयत्न केला.मला भीती वाटायला लागली. विभास सरांनीच मला कोकण जॉईंट मधून फिश ऑर्डर करायला सांगितली होती. त्यांना फिश अतिशय आवडतं, हे देखील त्यांनी सांगितलं. ते प्रचंड ड्रिंक्स घेत होते. मी फिश कापून त्यांना प्लेटमध्ये दिलं तेव्हा त्यांनी माझा हात जोरात धरला आणि मी घाबरले. ते फिश तोंडात टाकत असतानाच मी माझा हात सोडवला आणि तिथून ताबडतोब पळून जायचा प्रयत्न केला. ते माझ्या मागे येतील ह्या भीतीने मी बाहेर पडल्यावर लॅच ओढून घेतलं.”

“तुमची मोठी बहीण पण ह्याचं ऑफिसमध्ये होती, ज्यांनी काही महिन्यांपूर्वी आत्महत्या केली. मला खात्री आहे की त्यांच्या आत्महत्येचा ह्या केसशी नक्कीच संबंध आहे.” विभासची बहीण विभावरीला शब्दात पकडत होती.

“मिलॉर्ड, माझ्या बहिणीने आत्महत्येच्या आधी चिठ्ठी लिहून ठेवली होती, तिच्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार धरू नये. उलट तिच्याकडून विभास सरांबद्दल मी चांगलेच ऐकले होते. मी जाहिरात बघून अर्ज केला, सिलेक्ट झाले. ह्यात माझ्या बहिणीचा काहीही संबंध नाही.”

विभावरीसमोर रिपोर्ट ठेवत शलाका म्हणाली, “विभास सरांच्या मृत्युंनंतर दहा मिनिटे तुम्ही त्याचं ठिकाणी होता, हे मोबाईल वरून कळलंय.”

“हो मिलॉर्ड, मी लॅच ओढून बाहेर आले तर माझी गाडी सुरु होतं नव्हती, त्यात माझा काही वेळ गेला. पण आता विभास सरांचा मृत्यू झालाय, हे मला तरी कुठे माहिती होतं? त्यांच्या हातून मी माझा हात सोडवून त्याचं क्षणी बाहेर पडले होते.

***

माशाचा काटा अडकून गुदमरून विभासचा मृत्यू झाला, असा पोस्टमार्टमचा रिपोर्ट आला. केवळ सुरीवर हातांचे ठसे, ह्यापलीकडे विभावरीविरुद्ध कुठलाच पुरावा नव्हता. केस हायकोर्टाने क्लोज केली तरी शलाका सुप्रीम कोर्टात जाणार होती.

“सोडणार नाही तुला! दुर्दैवाने cctv बंद पडले होते, नाहीतर आज तू गजाआड असतीस. आज सुटलीस तरी कायमची नाही हे लक्षात ठेव! तुझा गुन्हा साबित करेनच.” शलाका विभावरीकडे खुनशी नजरेने बघत म्हणाली.

“शिक्षा भोगायला मी तयार आहे, जे काही केलं ते पूर्ण विचार करूनच! मी मरणाला भीत नाही…..माझं माझ्या बहिणीवर जीवापाड प्रेम होतं, इतकंच मला माहितीय. न्यायदेवता जो न्याय देईल तो मला मान्य!” विभावरीचे डोळे शलाकाशी तिच्या मनातलं बोलत होते…..

–समाप्त–

©® सौ मधुर कुलकर्णी, पुणे

अशी कथा लिहिण्याचं धाडस पहिल्यांदा केलं. खूप सर्वांगीण विचार करूनच अशा कथा लिहाव्या लागतात कारण वाचक हुशार असतो. आणि आता गुन्हेगार सापडण्यासाठी cctv, मोबाईल हे खुप मोठे सपोर्ट आहेत. अनेक गुन्हे तर केवळ मोबाईलमुळे उघडकीस येतात.
पहिलाच प्रयत्न होता, सांभाळून घ्या! 🙏😊

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}