ऋतुगंध लेखनमाला क्रमांक ५४ वांग्याची भाजी सौ ऋतुजा राजेश केळकर मुंबई चौफेर करिता
ऋतुगंध
लेखनमाला क्रमांक ५४
वांग्याची भाजी
आज काय लिहू याचा विचार करता करता जवळ जवळ बरोबर एका वर्षांने तंद्रीत म्हणा किंवा मन कुणाच्या तरी आठवणींनी हळवं झाल म्हणून म्हणा नकळतच वांग्याच्या भाजीच्या फोडणीत लोणच्याचा मसाल पडला आणि घरभर भाजीचा खमंग सुवास दरवळता क्षणी अहोंनी , “अरे व्वा ,आज किती दिवसांनी लोणच्याच्या मसाल्यातील वांग्याची भाजी करतेयस ऋतू.”अशी भाजी पानात पडण्याआधीच पावती दिली . पण माझे मात्र डोळे डबडबले .त्या दोघींच्या आठवणींनी , त्या दोघींनाही माझ्या हातची अशी वांग्याची भाजी फार फार आवडायची. होत्या माझ्या दोन सख्ख्या मैत्रिणी पण, ऋतुचक्राच्या कराल दाढेत अडकून आमचे मैत्रीचे धागे तुटले आणि आज परत एकदा आठवणींचे ढग गोळा झाले आणि भावनाच्या झ-यांना डोळ्यातून मोकळी वाट मिळाली झालं.
खरच सच्चा आणि खरा मित्र मिळणं याला देखील नशीबच लागत बर.नशिबाच्या रेषा सटवाईने लिहिताना ज्यांना रक्ताच्या नात्यात नाहीना बांधता येत त्यांना ती आपल्या आयुष्यात मित्र अगर मैत्रीण म्हणून पाठवते अस म्हणतात.
श्रावणाच्या मनभावन मेघांच्या बरसत्या लहरींत एकाच छत्रीत आम्ही तिघीच भिजताना तेव्हा उन्मत आनंदाच्या डोहात डुंबत, मोहरत प्यालेल्या त्या गरमागरम चहाची चव या तुटलेल्या धाग्यांना नाही पुन्हा नव्याने बांधू शकत . आपण शुभेच्छा करिता केलेला फोन जेव्हा वा-याची दिशा पाहून अस्वीकारला जातो तेव्हा झालेल्या जखमा ह्या कुठल्याही औषधाने नाही भरून निघत. खर तर मैत्री या शब्दाची व्याख्याच नाही करता येत कारण जे आई वडिलांना भावंडाना माहिती नसता ते सारं सारं आपल्या मित्र मैत्रीणीना माहिती असत.
मैत्री म्हणजे कान्ह्याची बासरी , हृदयातील कवितेच्या प्रदेशातील सुंदर पाऊलखुण ,परमात्म्याच्या कृपा वर्षावातील लहरींचा आवेग म्हणजे मैत्री,चित्तिच्या चकोराला मैत्रीच्या चांदण्यात मिळालेल्या एका तिरीपेने देखील आयुष्यातील मोठमोठ्या संकटाना तोंड देण्याचे सामर्थ्य मनात निर्माण होते.
पण जेव्हा काळाच्या ओघात नकळत हात सुटतात किंबहुना सोडवून घेतले जातात तेव्हा मैत्रीच्या फिक्स डिपोझीटला दुर्जनांच्या वांछयांची नजर लागते तेव्हा आनंदाचे आणि प्रेमाचे व्याज द्विगुणीत होऊन मैत्रीचे हे डिपोझीट वाढण्याऐवजी त्यात घट होऊन हळू हळू ते नष्ट पावते आणि दयाघनाच्या कृपेने मिळालेली ही सुंदर भेट हे धन एखाद्या हिटलरच्या किंवा लंगड्या कॉर्पोरेट पारव्याच्या थव्यांच्या बेगुमान टोचींमुळे रक्तबंबाळ होऊन तुटतं ना तेव्हा त्या जळत्या दीपशिखेचे दुःख हे फक्त त्या दिशेने झेपावणाऱ्या आणि मग भस्मसात होणा-या त्या भ्रमरालाच माहिती असतं .
कसं आहे ना की,’ स्वार्थपुर्णा: संबंधात: क्षणिका: भवंती ‘ अर्थात स्वार्थाने बांधलेली नाती क्षणभंगुर असतात तसेच ,’ अद्यकाले सत्या मैत्री दुर्लभा अस्ती ‘ अर्थात वर्तमान काळात खरी मैत्री मिळणे हे दुर्मिळ आहे.म्हणूनच मित्र नेहमीच जपा.
म्हणूनच मैत्रीच्या या धाग्यांना कधी अवतीभवतीच्या परिसराची वाळवी लागू देऊ नका ,कारण मैत्रीचा कोंभ हा आपल्या पिंडात जेव्हा रुजतो फोफावतो तेव्हा त्याची पाळेमुळे खूप खोलवर जातात,मग जर तो उपटला गेला तर त्याच्या स्मरणशाळांच्या पडक्या वास्तुच्या भिंतीखाली आपलं अस्तित्वच असं गाडले जातं की आपल्याच अवशेषांची थडगी आपल्यालाच ओळखू येत नाहीत आणि मग जगातील मृगजळात मैत्रीचे कृत्रिम देवचाफ्यांचे वाफे उरी कवटाळून त्यांनाच आपण नंदनवन समजतो. अखेरीस मनाचे कवडसे उमटण्यासाठी एक ही अंगण उरणार नाही. मग आयुष्याचा उन्हाच्या झळा शांत करणारी एखादी मैत्रीचा गोडवा भरून पुढे येणारी आमरसाची वाटी अगर माहेरपणाच्या चंद्रामृताचा साऊल अभिषेक सारंच आटून जात आणि मग जेव्हा जेव्हा पाऊस रिमझिमतो आणि समोर वाफाळलेला चहाचा कप समोर येतो तेव्हा तेव्हा आसमंतात कुठेही वाजत नसलेलं गीत ऐकू येते…..
“ ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनिया …
न फिर तू जी सकेगा और न तुझको मौत आयेगी …
कभी तन्हाई में यु हमारी याद आयेगी ….”
सौ ऋतुजा राजेश केळकर
मुंबई चौफेर करिता