मनोरंजन

वाढदिवस -दीपक तांबोळी

वाढदिवस

-दीपक तांबोळी

लोढा शेठच्या गाडीचा हाॅर्न वाजला तसा एकनाथच्या ऐवजी दिनू सिक्युरिटीच्या रुममधून बाहेर आला.त्याने लगबगीनं फाटक उघडलं.गाडी जशी गेटच्या बाहेर पडू लागली तसा त्याने आपला बाप जसा ठोकतो तसा सॅल्यूट लोढाशेठला पाहून ठोकला.लोढाशेठच्या चेहऱ्यावर त्याला बघून एक प्रसन्न हास्य झळकलं.”पोरगा खरंच स्मार्ट आहे”ते मनातल्या मनात म्हणाले.गाडी पुढे रस्त्याला लागली तसा कालचा प्रसंग त्यांना आठवला.काल त्यांच्या मुलाचा पंधरावा वाढदिवस त्यांनी सोसायटीच्या क्लबहाऊसमध्ये जोरदार साजरा केला.त्यांचा मुलगा सनी दहावीच्या परीक्षेत ९९%घेऊन पास झाला होता हे खरं वाढदिवस साजरा करण्यामागचं मुख्य कारण होतं.सोसायटीचा सिक्युरिटी गार्ड कम केयरटेकर एकनाथचा मुलगा दिनू वाढदिवसाला आपल्या आईबहिणीसोबत हजर होता.लोढाशेठ सगळ्या पाहुण्यांची चौकशी करतकरत दिनूजवळ पोहचले.दिनू त्यांचाच नाही तर पुर्ण सोसायटीचा आवडता मुलगा.त्याला पाहून लोढाशेठ थांबले.त्याच्या उत्साहाने भरलेल्या चेहऱ्याकडे पहात त्यांनी विचारलं
“काय दिनू कशी वाटली पार्टी?”
“लई झकास ” दिनूनं त्याच्या नेहमीच्या स्टाईलने उत्तर दिलं “पुढच्या महिन्यात माझा पण वाढदिवस आहे आणि माझे पप्पा पण अशीच सगळ्यांना पार्टी देणार आहेत ”
ते ऐकून लोढाशेठ जोरात हसले.या पार्टीकरता त्यांना दिड लाख खर्च आला होता.एक सिक्युरिटी गार्ड एवढा खर्च करणं शक्यच नव्हतं.एकनाथने त्याला नको ते स्वप्न दाखवलं होतं.दिनूच्या भाबडेपणाची त्यांना गंमत वाटली पण त्यांना त्याचं मन मोडायचं नव्हतं म्हणून ते म्हणाले
“अरे वा!आम्हांला बोलावणार आहे ना?”
“हो मग!सोसायटीतल्या सगळ्यांना बोलावणार आहे” दिनू उत्साहाने म्हणाला.
शेठजी हसतहसतच पुढे गेले होते.
ते आठवून आताही शेठजींच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.एकदम त्यांना जाणवलं की एकनाथची एवढा खर्च करण्याची ऐपत नक्कीच नाही. महिन्याला दहा हजार कमावणारा माणूस एकदिड लाख फक्त वाढदिवसाला खर्च करणार नाही. मात्र सोसायटीत रहाणारे सगळे मिळून तर करु शकतात.या विचाराने त्यांना एकदम उत्साह वाटायला लागला.काय हरकत आहे? प्रत्येकाने दोन हजार जरी जमा केले तरी दिनूचा वाढदिवस जोरदार साजरा करता येणार होता आणि सोसायटीतला कुणी नाही म्हणेल असंही त्यांना वाटत नव्हतं कारण सगळेच पैसेवाले होते आणि महत्वाचं म्हणजे दिनू होताच तसा.सदोदित उत्साहाने फसफसलेला.हाक मारली की कुणाच्याही मदतीला धावून जाणारा.कोणतंही काम सांगा दिनूने ते केलं नाही असं झालंच नव्हतं. बरं या कामाचा कुणी मोबदला देईल अशीही अपेक्षा नाही. तो शाळेतून आला की सारखा सोसायटीतल्या रहिवाशांच्या कामासाठी वरखाली करायचा.कधी कंटाळा नाही की नाही म्हणणं नाही.”दिनू मला भाजी आणून दे” “दिनू जरा रुम साफ करायचीय.येतोस का मदतीला?” “दिनू आजीला जरा फिरवून आणतोस का बागेत?” “दिनू कोपऱ्यावरच्या मेडिकल मधून औषधं आणून दे बरं” “दिनू बाळ रडतोय.त्याला फिरवून आण जरा” अशी शेकडो कामं रोजच दिनूला सांगितली जायची आणि दिनू ती उत्साहाने करायचा.कधी कुणी त्याच्यावर चिडलं,रागावलं तरी दिनूने कधीही उलटून उत्तर दिलंय असं होत नव्हतं.

सोसायटीला तीन सिक्युरिटी गार्ड होते.त्यातले दोन गावातच रहायचे.एकनाथ मराठवाड्यातल्या परभणी जिल्ह्यातून आलेला.एक्स सर्व्हिसमॅन.सोसायटीच्या अगोदरच्या अध्यक्षांनी त्याला आणलं होतं.सोसायटीच्या बेसमेंटमध्ये बांधलेल्या दोन छोट्या रुममध्ये कुटुंबासह रहायचा.सिक्युरिटी गार्ड कम केअर टेकर अशा दोन्ही भुमिका तो निभवायचा.दिनू हा त्याचा छोटा मुलगा.तेरा वर्षाचा.गोरागोमटा आणि चुणचुणीत. एकनाथची बायको आणि मोठी मुलगीही सोसायटीतल्या रहिवाशांची गरज पडली तर बऱ्याचदा धुण्याभांड्याची कामं करायची.एकंदरीत या पुर्णच कुटुंबाची सोसायटीला बरीच मदत व्हायची पण खरा हिरो होता तो दिनू.सर्वांच्या मदतीला ताबडतोब धावून जाणारा.

लोढाशेठ सोसायटीचे सेक्रेटरी होते.त्यांनी ठरवलं सोसायटीच्या मेंबर्सची मिटिंग बोलवायची आणि हा मुद्दा मांडायचा.बारा मजली सोसायटीत ४८ फ्लॅट होते आणि त्यात रहाणारे जवळजवळ सगळेच सधन होते.दोनतीन हजार काढून द्यायला कुणी नाही म्हणणार नव्हतं.

रात्री ते घरी परतले तेव्हा एकनाथ ड्युटीवर होता.त्याला त्यांनी विचारलं
“एकनाथ आपल्या दिनूचा वाढदिवस कधी असतो?”
“सोळा ऑक्टोबर.का बरं साहेब?”
“अरे काल तो म्हणत होता माझे पप्पा पण माझा वाढदिवस सनीसारखाच साजरा करणार आहेत.खरंय का?”
एकनाथ जोरात हसला
“अहो साहेब आपली काय ऐपत असा वाढदिवस साजरा करण्याची.पण काल सनीबाबाचा वाढदिवस पाहून तो माझ्या मागे लागला की माझाही वाढदिवस असाच करायचा.मी त्याला खुप समजावून सांगायचा प्रयत्न केला पण ऐकेचना म्हणून म्हंटलं ठिक आहे करु.तर तो सगळ्यांना तेच सांगत सुटलाय.अर्थात त्याच्यावर कोण विश्वास ठेवायलाय?”
“आम्ही करु त्याचा वाढदिवस “असं सांगायचं शेठजींच्या अगदी ओठावर आलं होतं पण दिनूला सरप्राईज द्यायला पाहिजे या विचाराने ते काही बोलले नाहीत.
जेवण वगैरे झाल्यावर त्यांनी सोसायटीच्या अध्यक्षांना फोन लावला.
“पाटिल साहेब, एक विचार मनात आलाय.आपला सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनूचा पुढच्या महिन्यात वाढदिवस आहे.तुम्हांला तर माहितच आहे की दिनू किती कामाचा मुलगा आहे ते.तेव्हा मला असं वाटतं की आपण सगळ्या सोसायटीने मिळून त्याचा वाढदिवस साजरा करावा”
“कल्पना चांगली आहे.पण साजरा करायचा म्हणजे कसा?”
“सोसायटीतल्या प्रत्येक परीवाराने दोन हजार रुपये जमा करायचे.साधारण शहाण्णव हजार जमतील.त्यात केक कापणं ,सगळ्यांचं जेवण आणि मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करु.त्या निमित्ताने एक गेटटुगेदर होऊन जाईल”
“गेटटुगेदर ठिक आहे पण एका सिक्युरिटी गार्डच्या मुलाचा वाढदिवस साजरा करणं आपल्यासारख्या उच्चभ्रू लोकांना शोभेल का?सोसायटित असे अनेक जण आहेत ज्यांना आपल्या मुलांचे वाढदिवससुद्धा घरातच साजरे केलेले आवडतात. मग दिनूच्या वाढदिवसाला ते तयार होतील का?अजून एक प्राॅब्लेम आहे.हा वाढदिवस आपण आपल्या खर्चाने साजरा केला तर बाकीचे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्या मुलांनी काय घोडं मारलंय?दिनूचा केला तर आमच्याही मुलांचे करा.मग तेव्हा काय उत्तर द्यायचं?”
“अहो साहेब त्यांची फॅमिली इथं रहात नाही. सिक्युरिटी शिवाय इतर कोणतंही काम ते किंवा त्यांची फॅमिली करत नाही.शिवाय तुम्ही पहाता तो पोरगा शाळेतून आला की सोसायटीतल्या लोकांची वैयक्तीक कामं करत असतो तीही फुकट.कधी त्याने कामाचे पैसे मागितले नाहीत की कामाला नाही म्हंटलं नाही. सोसायटीतले लोक त्याला आपल्या स्वार्थाकरीता वापरुन घेतात .मग एक दिवस त्याच्यासाठी खर्च केला तर बिघडलं कुठं?”
“ठिक आहे.माझी काही हरकत नाही.ठेवा मिटिंग.बोलावून घ्या सगळ्यांना.पण मला नाही वाटत लोक तयार होतील.एकेक नमुने आहेत सगळे”
“पण मला खात्री आहे,दिनूसाठी ते नक्कीच पैसे देतील.आणि त्यांनी नाही दिले तरी मी एकटा करेन त्याचा वाढदिवस ” लोढाशेठ जिद्दीने बोलून गेले
“मग तर प्राॅब्लेमच नाही.व्हा पुढे”

सोसायटीतल्या सगळ्या परीवारांचा एक व्हाॅटस्अप ग्रुप होता.त्यावर शेठजींनी येत्या रवीवारी पाच वाजता मिटिंग आयोजित केल्याचा मेसेज टाकला.मिटिंगचा विषय त्यांनी मुद्दामच टाकला नाही. विषय पाहूनच बरेच जण मिटिंगला यायचेच नाहीत असं त्यांना व्हायला नको होतं.
रविवार उजाडला.लोढाशेठ पाच वाजताच मिटिंग हाॅलमध्ये जाऊन बसले.कुणीही आलं नव्हतं.हे नेहमीचंच होतं.कोणत्याही विषयावर मिटिंग असो येणारे फार कमी.जे यायचे तेही आपल्या फुरसतीने सेक्रेटरीवर उपकार केल्यासारखे डुलतडालत यायचे.
सहा वाजले तेव्हा अध्यक्ष पाटील उगवले.
“अरे!अजून कुणीच आलं नाही?तुम्ही मेसेज पाठवला होता ना सगळ्यांना?”त्यांनी विचारलं
” हो तर.एकूणएक जणाला मेसेज पाठवलाय”
“मग असं कसं झालं?मेसेज ऐवजी तुम्ही फोनच करायला हवे होते.मेसेज वाचलाच नसेल तर त्यांना कळणार कसं?”
“अहो साहेब सगळ्यांनी मेसेज वाचलाय.मी चेक केलंय”
तेवढ्यात तीन चार जण आले.मग परत तीनचार जण आले.शेवटी सव्वासहा वाजता बारा जणांची उपस्थिती झाली.विषय जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणून लोढाशेठनी दहापंधरा मिनिटं थांबायचं ठरवलं.
” लोढा शेठ मिटिंगचा विषय नाही कळवला तुम्ही” लोखंडे जरा रागातच म्हणाले
“साहेब ही ऑफिशियल मिटिंग नाहिये.पण एक पाच मिनिट थांबा सगळा विषय क्लियर होईल ”
” शेठजी लवकर आटोपा.आम्हांला शाॅपिंगला जायचंय ” गव्हाणे मावशी घाई करत म्हंटल्या.
शेवटी आहे ती मंडळीही निघून जाऊ नये म्हणून शेठजींनी सुरुवात केली.
“माननीय सदस्यांचं मी स्वागत करतो.आज सोसायटीच्या प्रश्नांव्यतिरिक्त एका वेगळ्याच विषयावर चर्चा करण्याकरीता आपण जमलो आहोत.विषय असा आहे की आपण सर्वच जण आपल्या सिक्युरिटी गार्ड एकनाथचा मुलगा दिनेश उर्फ दिनूला जाणता.एक सगळ्यांच्या मदतीला धावून जाणारा,कसलीही अपेक्षा न करता सगळ्यांची काम चोख करणारा,सदोदित हसतमुख असणारा असा हा मुलगा आपल्या सर्वांचाच लाडका आहे.या दिनूचा वाढदिवस सोळा ऑक्टोबरला आहे.माझा असा विचार आहे की दिनूच्या या कामाबद्दल,त्याच्या आपल्या सर्वांना असलेल्या सहकार्याबद्दल यावेळेचा त्याचा वाढदिवस आपण सर्वांनी मिळून साजरा करावा ”
शेठ थांबले.त्यांनी कुणी काही प्रतिक्रिया देतंय का याचा अंदाज घेतला.दोन मिनिट शांतता पसरली मग कुलकर्णी म्हणाले
“खरंच दिनू आपली खुपच काम करतो.आपण त्याचा वाढदिवस साजरा केला तर त्याला,त्याच्या आईवडिलांना खुप आनंद होईल.पण वाढदिवस साजरा कसा करणार?”
” सोपं आहे.आपण सर्वांनी दोन हजार रुपये जमा करायचे.४८ घरांचे ९६ हजार जमा होतील.त्यात केक,दिनूला गिफ्ट, सगळ्या परीवारांचं एकत्र जेवण आणि मनोरंजनाचा हल्काफुल्का कार्यक्रम करता येईल”
“बापरे दोन हजार?खुप जास्त होतात “सुलक्षणेबाई म्हणाल्या.
” अहो मँडम आपण परिवारासह हाॅटेलमध्ये जातो तेव्हा आपल्या चारपाच जणांचंच बिल तीनचार हजार होतं.ते आपण भरतोच ना?”शेठजी कळवळून म्हणाले
” पण काहो शेठजी,दिनू आपल्यासाठी जे काही करतो त्याचा काही ना काही मोबदला आपण देतोच ना!परवा त्याने माझ्या बाईकचं पंक्चर जोडून आणलं तेव्हा मी त्याला दहा रुपये खुशीने दिलेच होते.मग वेगळा वाढदिवस साजरा करायची गरज काय?”महाजन मध्येच उठून म्हणाले.
” हो बरोबर आहे ” पवारांनी त्यांची री ओढली “आम्हीसुद्धा त्याने गहू वगैरे दळून आणले की खुशीने पाचदहा रुपये देतोच.आणि शेठजी या लोकांचे असे वाढदिवस साजरे करुन त्यांना मातवू नका.आज तुम्ही दिनूचा वाढदिवस साजरा करताय उद्या त्याच्या बहिणीचा करावा लागेल.मग दुसरे सिक्युरिटी गार्ड म्हणतील आमच्याही मुलांचे करा.मग प्रत्येक वेळी आम्ही असेच दोन दोन हजार द्यायचे का?”
शेठजींना शंका आली की पवार दारु पिऊनच आले असावेत कारण आताही त्यांचे डोळेही तारवटलेले होते.पवार सरकारी अधिकारी होते.दाबून वरकमाई करत होते आणि खर्चही तसाच करायचे.प्यायला बसले की पाचपाच हजाराची दारु ते पिऊन जातात असं शेठजींच्या कानावर आलं होतं.आणि आता एका चांगल्या कामासाठी दोन हजार द्यायला खळखळ करत होते
” मी पवार साहेबांशी सहमत आहे” पारेख उठून म्हणाले ” गरीबांना अशा गोष्टींची सवय लावायचीच कशाला?अशाने ते शेफारतात. एकदा सेलेब्रेट केल्यावर पुढच्या वर्षीही त्याची तीच अपेक्षा राहिल”
” तसं काही होणार नाही पारेख साहेब. पुढच्या वर्षी तो मोठा होईल त्याला आपोआपच जाणीव होईल” शेठजी ठामपणे म्हणाले
” मला वाटतं आपण करावा वाढदिवस” वानखेडे उठून म्हणाले ” आपण सगळेच सधन आहोत.काय हरकत आहे दोनदोन हजार द्यायला.अहो तेवढ्या रकमेचं तर आपण जेवणच करणार आहोत.शेठजी बरोबर म्हणताहेत ”
आता चर्चा रंगू लागली.प्रस्तावाच्या बाजूने आणि प्रस्तावाच्या विरोधात बोलणारे तावातावाने आपली बाजू मांडू लागले.आपल्या प्रस्तावाला थोडाही विरोध होणार नाही अशी अपेक्षा घेऊन आलेले लोढाशेठ समोरचे वादविवाद पाहून क्षुब्ध झाले. माणूस इतका स्वार्थी कसा होऊ शकतो याचंच त्यांना आश्चर्य वाटत होतं.
” शेठजी मी निघू का? मला शाँपिंगला जायला उशीर होतोय ” गव्हाणेबाई अस्वस्थ होऊन म्हणाल्या तसे अध्यक्ष पाटील उठले
” दोन मिनिट थांबा गव्हाणे मॅडम.एकमत न झाल्यामुळे आपण मतदान घेऊ.दिनूचा वाढदिवस साजरा करावा असं किती जणांचं मत आहे त्यांनी हात वर करावा”
समोरच्या बारा जणातून फक्त कुलकर्णी,वानखेडे,चव्हाण, गव्हाणेबाई यांनी हात वर केले.पवार,महाजन,जोशी,पारेख,लोखंडे,सुलक्षणेबाई यांनी हात वर केला नाही.फक्त चार हात वर आलेले पाहून लोढाशेठ चिंतातूर झाले
“चार जण. अध्यक्ष आणि मी आमचं मत धरुन सहा जण होताहेत.म्हणजे सहा विरुद्ध सहा असा बिकट मामला झालाय”
” आता यावर उपाय काय?”सुलक्षणे बाईंनी विचारलं
” सोपं आहे.आज जे आले नाहीत त्यांना मी मेसेज पाठवून निर्णय विचारतो.जर नाही म्हणणाऱ्यांची संख्या जास्त झाली तर मी स्वतः सगळा खर्च करुन त्या मुलाचा वाढदिवस करेन “शेठजी थोडेसे चिडूनच दृढनिश्चयाने म्हणाले तसे पवार उठून म्हणाले
“जर तुम्हांला वाढदिवस करायचाच होता तर आम्हांला बोलावलं कशासाठी?.फालतू आमचा वेळ घालवला”आणि ते उठून बाहेर चालायला लागणार तेवढ्यात शेठजी म्हणाले
“एक मिनिट.माझी सर्वांना विनंती आहे की निर्णय काहिही होवो,या विषयाचा उल्लेख दिनू किंवा एकनाथजवळ करु नका.आपल्याला त्या कुटुंबाला सरप्राईज द्यायचंय ”
“ठिक आहे “सर्व म्हणाले आणि पवारांच्या मागे सर्वजण निघून गेले.
“बघा मी तुम्हांला म्हंटलं नव्हतं की सगळे नमुने आहेत.पैसे देणार नाहीत.ठिक आहे .मेसेज पाठवून बघा सगळ्यांचा काय निर्णय होतो ते आणि मला कळवा ” पाटीलसाहेब उद्वेगाने म्हणाले.
शेठजींना काय बोलावं ते कळेना.त्यांनी फक्त मान डोलावली.
घरी येऊन हा विषय त्यांनी बायकोला सांगितला.बायको रागाने मारवाडी भाषेत म्हणाली
” तुम्हांलाही नको त्या उचापत्या सुचतात.खरंच काय गरज आहे त्या पोराचा वाढदिवस करायची.असा कोणता तो मंत्रीसंत्री लागून गेलाय?मान्य आहे तो मेहनती आहे,प्रामाणिक आहे,विशेष म्हणजे तो कुणाच्याही मदतीला धावून जातो पण या लोकांना असं डोक्यावर चढवायचं नसतं हे माझ्यापेक्षाही तुम्हाला चांगलं समजतं कारण एवढं मोठं सुपरशाॅप तुम्ही चालवता ते उगाच नाही. आणि तुम्हांला एवढं त्याच्याबद्दल वाटतंच आहे तर त्याला घरी बोलवा.एखादा ड्रेस आणि मिठाईचा बाॅक्स त्याच्या हातात द्या बस झालं.पुर्ण सोसायटीच्या लोकांना बोलावून आपल्या सनीसारखा वाढदिवस साजरा करायची काहीच गरज नाही.दुसरं तुम्ही प्रत्येकाकडून दोन हजार घ्यायचं म्हणताय.अहो गणेशोत्सवासाठी आणि नवरात्राच्यावेळी वर्गणीचे साधे पाचशे रुपये द्यायलासुध्दा हे लोक त्रास देतात ते तुम्हांला काय दोन हजार काढून देणारेत?”
“वर्गणीची गोष्ट वेगळी आहे.तिथे भावना नसतात.पण इथे हा मुलगा सगळ्या कुटुंबांशी जोडला गेलाय.तू म्हणते तसा त्याचा वाढदिवस तर आपण कधीही करु शकतो.पण त्या पोराने जे स्वप्न बघितलंय ते पुर्ण करावं असं मला मनापासून वाटतंय”
” तुम्ही पण ना!एकदा काही ठरवलं की त्याच्यावरच अडून बसता”असं म्हणत ती तणतणत किचनमध्ये निघून गेली.

दुसऱ्या दिवशी शेठजींनी बाकीच्या छत्तीस परीवारांना मेसेज पाठवला.दिनूचा वाढदिवस साजरा करण्यामागची आपली भुमिका सविस्तर मांडून प्रस्तावाच्या बाजूने मत द्यायचं आवाहन केलं.तीनचार दिवस तर कुणाचीही प्रतिक्रिया आली नाही. त्यानंतर लोकांनी “कशासाठी हा उपद्व्याप करताय?,अशा अनिष्ट प्रथा पाडू नका,इतका खर्च का येतोय त्याचा हिशोब द्या,दोन हजार फार होतात,शंभरदोनशेत जे करायचं ते करा” अशा संतापजनक प्रतिक्रिया नोंदवल्या.प्रस्तावाच्या बाजूने फक्त आठ तर विरोधात सोळा मतं पडली.बाकीच्या बारा जणांनी सर्वसहमतीने जे ठरेल त्याला आम्ही राजी आहोत असं तटस्थ मत नोंदवलं.या तटस्थ लोकांचा शेठजींना भयंकर राग आला.हे तटस्थ लोकच चांगल्या कृत्यांच्या बाजूला उभं न रहाता वाईट कृत्यांना एक प्रकारे समर्थनच देतात हे त्यांच्या लक्षात आलं.त्यांनी परत एकदा या लोकांना मेसेज पाठवून “फक्त हो किंवा नाही एवढंच कळवावे “अशी विनंती केली.पण तिचा काही उपयोग झाला नाही. अशा लोकांना कुणाच्याच नजरेत वाईट व्हायचं नसतं किंवा उघडपणे कोणतीही भुमिका घ्यायचं धैर्य त्यांच्यात नसतं.शेवटी सात दिवस वाट बघून शेठजींनी मतांची गणना केली.चौदा विरुद्ध चोविस मतांनी ते हरले होते.त्यांना खुप वाईट वाटलं.दिनू फुकट सर्वांची कामं करत होता त्याची लोकांनी शुन्य किंमत केली होती.याच कामाकरीता जर नोकर ठेवला असता तर महिन्याला तीनचार हजार त्याने सहज घेतले असते आणि या लोकांनी न कुरकुरता ते दिले असते.एकदम त्यांच्या डोक्यात सणक आली आणि त्यांना वाटलं ,जावं आणि दिनूला सांगावं की “तुझ्या उपकाराची या लोकांना जाण नाही.यापुढे कुणाचंही काम करणं बंद कर”.पण त्यांनी मन आवरलं.शेवटी ते सोसायटीचे सेक्रेटरी आणि प्रतिष्ठित व्यापारी होते.त्यांना असं करणं शोभणारं नव्हतं.

दोनतीन दिवसांनी अध्यक्ष पाटिलसाहेबांचा फोन आला
“मग ठरलं का दिनूचा वाढदिवस साजरा करायचं?”
त्यांना काय उत्तर द्यावं ते शेठजींना कळेना.शेवटी त्यांनी खरं सांगायचं ठरवलं
” प्रस्तावाच्या बाजूने फक्त चौदा मतं पडली साहेब.त्यामुळे वाढदिवस कॅन्सल करावा लागणार”
पाटिलसाहेब जोरजोरात हसले
“मी म्हंटलं होतं ना तुम्हांला आपल्या सोसायटीत एकूण एक नमूने आहेत म्हणून.तुम्ही त्यादिवशी म्हंटला होतात की कुणी नाही केला तरी मी करणारच,मग कन्सल का करताय?जे तयार आहेत त्यांच्याकडून पैसे घ्या,उरलेले तुम्ही टाका आणि करुन टाका वाढदिवस”
“तसं करता येईल पण ते योग्य दिसणार नाही. ठिक आहे बघतो मी काय करायचं ते”असं म्हणून त्यांनी पाटिलसाहेब काही म्हणायच्या आत फोन कट केला.

एकेक दिवस निघायला लागला तशी शेठजींच्या मनाची घालमेल वाढली.”कुणी नाही दिले पैसे तर मी माझ्या पैशाने वाढदिवस करीन”असे ते जोशात म्हणून तर गेले होते पण आता त्यांना तेवढे पैसे खर्च करणं जीवावर येत होतं.चौदा जणांनी पैसे दिले तरी उरलेले सत्तर बहात्तर हजार पदरचे
खर्च करायला त्यांच्या मनाची तयारी होत नव्हती.काय दुर्बुद्धी सुचली आणि आपण ते बोलून चुकलो याचा त्यांना पश्चात्ताप होऊ लागला.

एक दिवस एक गडबड झाली.संध्याकाळच्या वेळेस जोशींचा मुलगा आपली महागडी बाईक सोसायटीच्या बाहेर लावून घरात गेला.पाचच मिनिटात परत येऊन त्याला बाहेर जायचं होतं.दुर्दैवाने तो गाडीची चावी गाडीलाच विसरुन गेला.घरात गेल्याबरोबर त्याच्या मैत्रीणीचा फोन आला.तिच्याशी गप्पा मारतामारता आपण गाडी बाहेरच लावलीये हे तो विसरला.त्याच सुमारास एक बाईक चोर तिथं आला.बाईकला लागलेली चावी पाहून त्याला आनंदाचं भरतंच आलं.सिक्युरिटीच्या केबिनमध्ये तेव्हा राम नावाच्या सिक्युरिटी गार्डसोबत दिनूही बसला होता.त्याने बाईक स्टार्ट झाल्याचा आवाज ऐकला आणि तो ताठ झाला.जोशींच्या मुलाला त्याने मगाशीच वर जातांना पाहिलं होतं.एका सेकंदात तो गेटच्या बाहेर आला.बाईकवर दुसरा माणूस पाहून सगळा मामला त्याच्या लक्षात येऊन तो त्या बाईकस्वारावर जोरात ओरडला.बाईकचोराने बाईक वळवून मेन रोड वर जशी घातली दिनू जीवाच्या आकांताने त्याच्या मागे पळाला.बाईक आपल्या हातात लागणार नाही हे पाहून त्याने एक झेप घेऊन तीची मागची बाजू पकडली आणि तिला तो खेचू लागला.बाईकचोराने बाईकचा वेग वाढवला.दिनूने ते पाहून पायात घातलेल्या चपला रोडवर ताकदीने दाबून धरल्या.बाईकचा स्पीड कमी झाला पण दिनू आता फरपटत पुढे जाऊ लागला.सुदैवानं समोरुन येणाऱ्या दोन बाईकस्वारांचं लक्ष या प्रकाराकडे गेलं.त्यांना यात काहीतरी गडबड आहे हे लक्षात आलं.एकाने आपली बाईक सरळ बाईकचोराच्या समोर उभी केली.दुसऱ्याने चपळाईने खाली उतरुन बाईकचोराच्या बाईकची चावीच हस्तगत केली.
” हा चोर आहे.गाडी चोरुन घेऊन चाललाय”दिनू ओरडला तसा एका बाईकस्वाराने बाईकचोराच्या मुस्काटात दोन थपडा मारल्या.आता बरेच लोक जमा झाले.सिक्युरिटी गार्डही धावत आला.कुणीतरी पोलिसांना फोन लावला.बाईकचोराला लोकांनी पकडून ठेवलं.
“कुणाची गाडी आहे रे ही?”सिक्युरिटी गार्ड रामने दिनूला विचारलं
“त्या जोशीसाहेबांची आहे”दिनू म्हणाला.तेवढ्यात जोशींचा मुलगा धावत आला.बाईक पाहून त्याला हायसं वाटलं.
घरी जाऊन जोशींच्या मुलाने झालेला सगळा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला.
“बाबा त्या दिनूची कमाल म्हंटली पाहिजे. त्याची चप्पल तुटली,पँट फाटली तरी त्याने गाडी सोडली नाही. बाबा दिनूला काहितरी बक्षीस दिलंच पाहिजे”
“पाचशे रुपये देऊन टाक”
“बाबा आपली सव्वा लाखाची गाडी त्याने चोरी जाण्यापासून वाचवली आणि फक्त पाचशे रुपये द्यायचे?”
“अरे गाडी नेली असती तरी आपण चोवीस तासात
शोधून आणली असती.पोलीस खात्यात आपल्या ओळखीच आहेत तशा”जोशी अभिमानाने म्हणाले
“हो.ते ठिक आहे पण पोलिसांनाही तुम्हांला एकदिड हजार बक्षीस म्हणून द्यावेच लागले असते ना?”
पोरगा ऐकत नाही हे पाहून जोशींचं डोकं तापलं
“हे बघ चूक तुझी आहे.तुला गाडीची चावी काढता येत नव्हती?आता मला उगीच मनस्ताप देऊ नकोस नाहीतर तुझी गाडीच मी विकून टाकेन”बापाने दम भरल्यावर पोरगा चुप बसला पण कुठेतरी त्याच्या मनाला ते पटलं नव्हतं.

दोनतीन दिवसांनी अजुन एक घटना सोसायटीत घडली.सुलक्षणेबाईंची गांवातच रहाणारी मुलगी माहेरी आईवडिलांना भेटायला आली होती.संध्याकाळी ती आपल्या घरी निघून गेली.रात्री दहा वाजता तिचा सुलक्षणे बाईंना फोन आला.
“आई एक गडबड झालीये.माझं एक कानातलं सापडतच नाहीये. मी तुझ्याकडे आले तेव्हा दोन्ही कानात होते.आता मात्र डाव्या कानातच आहे”ती रडकुंडीला येऊन बोलत होती
“अरे बापरे!ते डायमंडचे कानातले ना?हो बरोबर.तू इथे आलीस तेव्हा तुझ्या कानात होते.पण घरातच शोध ना.तिथंच कुठतरी पडलं असेल”
“आई दोन तासापासून शोधतेय.घराचा सगळा कानाकोपरा शोधून झालाय”ती आता रडायला लागली होती
“विश्वासरावांना कळवलं का?त्यांनीच तुझ्या वाढदिवसाला घेऊन दिले होते ना?”
” हो.पण ते आता चेन्नईत आहेत. त्यांना कळवायचा धीर होत नाहिये.कळलं तर चिडतीलच ते माझ्यावर.अडिच लाखाचे होते आई ते कानातले.एक गेलं म्हणजे सव्वा लाखाचं नुकसान….”तिला पुढे बोलवेना
“जाऊ दे रडू नकोस.मी शोधते इथे.सापडलं तर तुला कळवते”
सुलक्षणेबाईंनी दोन तास घरात शोधाशोध केली पण काही तपास लागेना.
सकाळी उठल्या उठल्या त्यांनी सिक्युरिटीला फोन केला.झालेल्या घटनेची माहिती देऊन सोसायटीच्या आवारात शोध घ्यायला सांगितलं.घरातही त्यांनी परत शोधायचा प्रयत्न केला.या दरम्यान मुलीचे चारपाच फोन येऊन गेले.कानातलं सापडत नाही म्हणून ती कासावीस झाली होती.पोलिसात तक्रार देऊ या का असं सुलक्षणेबाईंना विचारत होती.सुलक्षणेबाई आणि त्यांच्या मिस्टरांनी तिला धीर धरायला सांगितलं कारण तक्रार केली की सोसायटीत पोलिस चौकशीला येणार .त्याचा सगळ्यांनाच मनस्ताप होणार होता.
दुपारी चार वाजता त्यांच्या दाराची बेल वाजली.त्यांनी दार उघडलं.बाहेर दिनू उभा होता.
“काय रे दिनू?”
दिनूने त्यांच्यासमोर हात उघडला.त्या हातावर ते डायमंडचं कानातलं होतं.
” हेच आहे का ते हरवलेलं?”
सुलक्षणेबाईंचे डोळे विस्फारले.हो!तेच तर होतं ते.त्यांच्या लाडक्या लेकीने कौतुकाने त्यांना दाखवलेलं.
” हो.हेच आहे ते”त्या आनंदाने ओरडल्या”कुठं सापडलं हे?”हातात घेऊन त्यांनी विचारलं
“गेटच्या बाहेर.रस्त्यावर. सगळे सोसायटीच्या आत शोधत होते.पण ताईंनी गाडीत बसतांना स्कार्फ काढतांना मी पाहिलं होतं.म्हणून मला शंका आली की ते बाहेरच पडलं असेल.आणि खरंच ते तिथंच सापडलं” दिनू हसऱ्या चेहऱ्याने सांगत होता.सुलक्षणेबाईंनी ते घेऊन आपल्या पर्समध्ये टाकलं.पर्समधूनच त्यांनी शंभरची नोट काढली आणि त्याच्यासमोर धरली
“हे घे तुझं बक्षीस आणि थँक्यू व्हेरी मच.खरंच खुप गुणी मुलगा आहेस तू”
“नाही. नको”असं म्हणून दिनू वळला आणि निघून गेला.तो गेल्यावर सुलक्षणेबाईंनी मोबाईल उचलून लेकीला फोन लावला.
“अगं ज्योती सापडलं बरं का तुझ्या कानातलं”
ज्योती आनंदाने ओरडली
“कुणाला आणि कुठे सापडलं आई?”
सुलक्षणेबाईंनी दिनूचं नांव आणि कुठे सापडल्याचं सांगितलं.
“हा दिनू खरंच स्मार्ट पोरगा आहे.बरं तू त्याला काही बक्षीस दिलं की नाही?”
“मी त्याला शंभर रुपये देत होते त्याने घेतले नाही”
“काय आई!अगं सव्वा लाखाचं इयरिंग आहे ते आणि तू फक्त शंभर रुपये देत होतीस?अगं कमीतकमी हजार रुपये तर द्यायचेस.मी परत केले असते तुला”
“जाऊ दे गं! या लोकांना फार डोक्यावर चढवू नये”
“कमाल करतेस तू आई.सापडलं नसतं तर सव्वा लाख पाण्यातच गेले असते ना?”
सुलक्षणेबाई काही बोलल्या नाहीत.
दोन दिवसांनी पवार आपल्या कुटुंबासहित जयपूरला लग्नाला गेले.जातांना एकनाथला घरी राहिलेल्या आपल्या आईकडे लक्ष द्यायला सांगून गेले.पासष्ट वर्षांची त्यांची आई प्रवासाची दगदग सहन होणार नाही म्हणून घरीच राहिली.पवार सकाळी गेले आणि रात्री त्यांच्या आईच्या छातीत वेदना होऊ लागल्या.जीव घाबराघुबरा होऊ लागला.
त्रास जास्त वाढला तशी त्यांना दिनूची आठवण आली.त्यांनी एकनाथच्या रुममध्ये फोन करुन दिनूला पाठवायला सांगितलं.दिनू त्यांच्या फ्लॅटमध्ये गेला.आजींनी त्याला कपाटातली औषधं द्यायला सांगितली. ॲसिडिटीने अस्वस्थ वाटत असेल म्हणून पाण्यात इनो टाकून द्यायला सांगितलं. दिनूने त्यांनी जे जे सांगितलं ते केलं पण बऱ्याचदा ऐकून आणि वर्तमानपत्रात वाचून ही लक्षणं हार्ट अटॅकचीसुध्दा असू शकतात हे त्याला माहीत होतं.त्याला इमरजंसी नंबर्स तोंडपाठ होते.आजी नाही नाही म्हणत असतांना त्याने आजीच्या मोबाईलवरुन सोसायटीच्या डाॅक्टरला फोन लावला.तो फोन उचलेना म्हणून त्याने सरळ अँब्युलंस ड्रायव्हरला फोन लावला.सुदैवानं त्यानं तो उचलला.दिनूने त्याला लगेच सोसायटीत यायला सांगितलं.पाचच मिनिटांनी सोसायटीच्या डाॅक्टरचा फोन आला.दिनूने त्यालाही लगेच यायला सांगितलं. जवळच रहात असल्याने तोही लगेच आला.आजीचा बी.पी.चांगलाच वाढला होता.थोड्याच वेळात अँब्युलंस आली.दिनू आजीसोबत एखादी बाई असावी याकरीता आईला उठवून सोबत घेऊन गेला.आजीला हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट केल्या गेलं.उपचार सुरु झाले.
बातमी कळताच सकाळी लोढाशेठ हाॅस्पिटलमध्ये आले.तिथे दिनूला पाहून त्यांचा जीव कळवळला.पोरगा रात्रभर जागा होता.मग त्यांनी पवारांना फोन लावून सगळी कल्पना दिली.पवारांचं संध्याकाळच्या गाडीचं रिझर्वेशन होतं.दिवसभरात इतर गाड्यात जागा मिळाली नाही तर ते संध्याकाळीच निघणार होते.त्यांनी लोढाशेठला दुसऱ्या दिवशीच्या सकाळपर्यंत आईची काळजी घ्यायला सांगितलं. लोढाशेठनी ते मान्य केलं.

सात दिवसांनी पवारांची आई एंजिओप्लास्टी करुन घरी परतली.भेटायला येणाऱ्या सर्वांना ती दिनूने तिची किती काळजी घेतली याबद्दल भरभरुन सांगत होती.तोंड फाटेस्तोवर त्याचं कौतुक करत होती.
” अरे सुभाष त्या दिनूला काहितरी बक्षीस दे रे.फार गुणाचं पोरगं आहे.सख्ख्या आजीसारखी माझी काळजी घेत होता तो ”
आईने असं म्हंटल्यावर पवारांच्या कपाळावर आठ्या उमटल्या.
“आई मी त्याला पाचशे रुपये दिले होते.त्याने घेतले नाहीत. फार मातला आहे तो.आता काय त्याला लाख रुपये द्यायचे?नाही घेत तर गेला उडत ”
” अरे लाख रुपये नाही म्हणत मी.कमीतकमी पाच हजार तर द्यायचे.दोन दिवस त्याने आणि त्याच्या आईने तुझी आणि सुनबाईची कमतरता भासू दिली नाही”
पवार काही बोलले नाहीत. फक्त नाराजीने त्यांनी होकारार्थी मान हलवली.अर्थात ते एवढे पैसे दिनूला देणार नव्हतेच.

एक दिवस एकनाथ ने लोढाशेठना फोन केला
” शेठजी मला एका कंपनीत नोकरी मिळतेय.वीस हजार पगार देणार आहेत.मी त्यांना पुढच्या महिन्यात येण्याचं कबुल केलंय.सिक्युरिटी एजन्सीला सांगून तुम्ही एखादा सिक्युरिटी गार्ड मागून घ्या ”
लोढाशेठ काळजीत पडले.नवीन सिक्युरिटी गार्ड तर त्यांना केव्हाही मिळाला असता पण एकनाथ सारखा केयरटेकर मिळणं मुश्कील होतं.त्यातून दिनूसारखा सर्वांना मदत करणारा पोरगा मिळणं तर त्याहून कठीण होतं.त्यांनी हा विषय सोसायटीच्या मिटिंगमध्ये मांडायचं ठरवलं.दिनूच्या वाढदिवसाला आता सात दिवस उरले होते आणि त्याचा वाढदिवस साजरा करायचा विषय आता बंदच झाला होता.”कुणी नाही केला तरी मी दिनूचा वाढदिवस साजरा करेन”हे मिटिंगमध्ये तावातावाने म्हंटलेलं वाक्य आता लोढाशेठला सलत होतं.सोसायटीचे सदस्य मिटिंगमध्ये हा विषय काढून त्यांची टिंगलटवाळी करणार होतेच.त्यांना काय उत्तर द्यायचं याचाही विचार करणं भाग होतं.पण आता एकट्याने साजरा करायची शेठजींची इच्छा मरुन गेली होती.शेवटी एका सिक्युरिटी गार्डच्या मुलासाठी एवढे पैसे खर्च करणं त्यांच्या व्यवहारात बसत नव्हतं.पण त्यांनी ठरवलं.दिनूला घरी बोलावून त्याला शर्टपँटचं कापड देऊन टाकायचं.त्यासोबत एखादं कॅडबरीचं चाॅकलेट नाहितर मिठाईचा बाॅक्स. बस झालं.चांगुलपणाचा ठेका त्यांनी एकट्याने थोडाच घेतला होता.

१६ ऑक्टोबर.आज दिनूचा वाढदिवस. संध्याकाळची वेळ.क्लबहाऊसला लावलेली लायटिंग चमचम करत होती.हाॅलमध्ये खुप गर्दी जमली होती नव्हे झाडून सगळी सोसायटी हजर होती.सजवलेल्या स्टेजच्या मागच्या भिंतीवर “हॅपी बर्थडे दिनू”चा बॅनर झळकत होता.ठेवणीतली शानदार शेरवानी घातलेला दिनू प्रसन्न चेहऱ्याने स्टेजवर उभा होता.त्याच्या बाजूला त्याचे आईवडील,सोसायटीचे अध्यक्ष पाटीलसाहेब आणि लोढाशेठ उभे होते.समोरच्या गर्दीकडे आणि टेबलवर ठेवलेल्या भल्या मोठ्या केककडे पाहून दिनूचा वाढदिवस खरंच साजरा होतोय यावर लोढाशेठचा विश्वास बसत नव्हता.पाचसहा दिवसांपूर्वी झालेल्या मिटिंगमध्ये त्यांनी एकनाथला दुसरी नोकरी मिळाल्याचं आणि एकनाथ आणि त्याचं कुटुंब सोसायटी सोडून जात असल्याचं सांगितलं आणि चमत्कार घडला.एकनाथचा पगार वीस हजार करण्यापासून ते दिनूचा वाढदिवस साजरा करण्यापर्यंतचे सगळे मुद्दे धडाधड मंजूर होत गेले.लोकांना दिनू आणि त्याच्या कुटूंबाची किंमत अखेर कळली होती आणि आज तो दिवस उजाडला होता ज्याची ते मनापासून वाट बघत होते.
दिनूने केक कापायला सुरुवात केली आणि “हॅपी बर्थडे टू यू दिनू”चा जोरदार जल्लोष झाला. लोढाशेठनी दिनूला उचलून घेतलं तसे सगळे स्टेजवर धावत आले.दिनूच्या तोंडात केक भरवण्याची जणू स्पर्धा लागली.केक भरवून झाल्यावर जो तो दिनूशी हात मिळवून,त्याला जवळ घेऊन शुभेच्छा देऊ लागला.मग त्याला गिफ्ट देण्यासाठी भली मोठी रांग लागली.कुणी एक हजार, कुणी दोन हजाराची पाकीटं तर कुणी कपडे देत होतं.जोशी आले.त्यांनी आठ हजाराचा मोबाईल त्याला गिफ्ट दिला.सुलक्षणेबाई आल्या.त्यांनी पाच हजाराची सोन्याची चेन त्याला दिली.मग पवार त्यांच्या आईसोबत आले तेव्हा त्यांच्या हातात होती एक चमचमती नवी कोरी सायकल.जिची किंमत होती बारा हजार.
सगळ्यांचे गिफ्ट्स देणं झाल्यावर लोढाशेठ बोलायला उभे राहिले.
“मित्रांनो खुप खुप धन्यवाद.आपण सगळ्यांनी मिळून आपल्या लाडक्या दिनूचा वाढदिवस साजरा केला.सगळ्यांनी त्याला स्वखुशीने गिफ्ट्स दिलेत.आता माझं गिफ्ट मी जाहीर करतो.दिनूच्या डिग्रीपर्यंतच्या शिक्षणाची जबाबदारी मी अध्यक्ष असलेल्या “हेल्प” या फाऊंडेशनने स्विकारली आहे”
टाळ्यांचा कडकडाट झाला.मग अध्यक्ष बोलायला उभे राहिले.
” सगळ्यांनी इतके गिफ्ट दिनूला दिले आहेत की मी त्याला काय द्यावं हेच मला समजेनासं झालंय.जितकं दिनूचं कौतुक होतंय त्यापेक्षा जास्त कौतुक त्याच्या आईवडिलांचं व्हायला पाहिजे.कारण त्यांनी केलेल्या चांगल्या संस्कारामुळेच दिनू आपल्या सगळ्यांच्या मदतीला धावून जातो.तोही कसलीही अपेक्षा न ठेवता.अशा निरपेक्ष भावनेने कुणालाही मदत करण्याचे संस्कार आपणही आपल्या मुलांवर केले पाहिजेत. आजकालची तरुण पिढी मोबाईल,लॅपटाॅपमध्ये गुरफटून स्वकेंद्रित झाली आहे.त्यांनी दिनूचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला पाहिजे.अशा सुसंस्कारी मुलाला घडवल्याबद्दल माझं गिफ्ट मी दिनूच्या ऐवजी त्याच्या आईवडिलांना देणार आहे.त्यांची मोठी मुलगी आता लग्नाची झालीये.तिच्या लग्नाच्या खर्चाची सर्व जबाबदारी मी उचलणार आहे”
टाळ्यांचा परत एकदा कडकडाट झाला.
लोढाशेठनी माईक हातात घेतला.
“कुणाला दिनूबद्दल दोन शब्द बोलायचे असतील तर त्यांनी स्टेजवर यावं ”
दिनूच्या वाढदिवसाला विरोध करणारे पवार स्टेजवर आले.दिनूच्या वाढदिवसाला आपण विरोध केला होता त्याबद्दल सर्वांची माफी मागून त्यांनी दिनूचे एकेक स्वभावगुण सांगून त्याची प्रशंसा सुरुवात केली.मग एकेक जण येऊ लागला.दिनूने केलेल्या मदतीचे प्रसंग सांगू लागला.अनुभव सांगतांना बऱ्याच जणांना गहिवरून येत होतं.सगळ्यांच्या तोंडून आपलं कौतुक ऐकून दिनू अवघडून बसला.त्याच्याच बाजूला बसलेल्या एकनाथच्या आणि त्याच्या बायकोच्या डोळ्यातून मात्र आनंदाश्रूंच्या धारा वहात होत्या.

©️ दीपक तांबोळी
9503011250
(ही कथा माझ्या “अशी माणसं अशा गोष्टी ” या पुस्तकातील आहे.कोणताही बदल न करता शेअर करण्यास हरकत नाही.माझ्या पुस्तकांच्या अधिक माहितीसाठी कृपया वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}