उगवतीचे रंग रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य -© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
उगवतीचे रंग
रवींद्रनाथ टागोर : वारसा आणि कार्य – भाग ३२
( रवींद्रसंगीत – एका नवीन संगीत परंपरेचा सूर्योदय )
रवींद्रनाथांनी अडीच हजारांवर गीते लिहिली आणि या गीतांना चाली ही त्यांनी स्वतःच लावल्या. या गीतांनाच पुढे रवींद्र संगीत म्हणून प्रसिद्धी मिळाली. आपल्या कविता गद्यात म्हणण्यापेक्षा त्या सुरात म्हणणे त्यांना अधिक आवडायचे आणि तशाच त्या ते गात असत. त्यांचा आवाज अतिशय गोड होता ते म्हणायचे, ” मी गीत गाण्यासाठीच या जगात आलो आहे. ”
रवींद्रनाथांच्या घरी गाण्याच्या ज्या मैफिली होत असत त्यांचे लहानपणापासून ते श्रोते होते त्यामुळे त्या मैफली ऐकत ऐकताच त्यांचा संगीताचा कान तयार होत होता. त्या वेळेचे प्रसिद्ध गायक यदुभट्ट, विष्णू चक्रवर्ती, राधिका गोस्वामी, श्यामसुंदर मिश्र आदी रवींद्रनाथ यांच्या घरी गायनासाठी येत. या मंडळींकडूनच रवींद्रनाथांनी शास्त्रीय संगीताचे धडे घेतले.
यासोबतच पाश्चात्य संगीताचाही रवींद्रनाथांनी अभ्यास केला होता ते इंग्लंडमध्ये उच्च शिक्षणासाठी गेले असताना स्कॉट कुटुंबात राहिले त्या ठिकाणी मिस स्कॉट आणि त्यांच्या मुलींनी त्यांना आयरिश संगीताचे धडे दिले. हर्बर्ट स्पेन्सर यांनी लिहिलेला लिहिलेल्या ‘ संगीत मीमांसा ‘ या ग्रंथाचाही त्यांनी अभ्यास केला. थॉमस मूर यांनी लिहिलेल्या ‘ आयरिश मेलडिज ‘या पुस्तकाचाही त्यांनी अभ्यास केला. त्यांच्या या अभ्यासाचे प्रतिबिंब त्यांच्या सुरुवातीला लिहिलेल्या ‘ वाल्मिकी प्रतिभा ‘ या नाटकात उमटलेले आपल्याला दिसते. त्यात त्यांनी युरोपीय संगीताचा वापर करून घेताना चाली दिल्या आहेत.
रवींद्रनाथांवर पाश्चात्य संगीताचा असा प्रभाव असतानाही भारतीय संगीत त्यांना भावना व्यक्त करण्यासाठी अधिक प्रभावी वाटले. त्यामुळे पाश्चात्य संगीतात ते अडकून पडले नाहीत. वेगवेगळ्या भारतीय रागांचा त्यांनी अभ्यास केला होताच. या रागांचा वापर त्यांनी आपल्या रचनांमध्ये करून घेतला. रवींद्रनाथ जेव्हा एखादी गीत रचना करीत असत तेव्हा ते त्यात पूर्णपणे बुडून जात. म्हणूनच त्यांच्या गीतांना चिरकालीन वाङ्मयाचे सौंदर्य प्राप्त झाले. मागणीप्रमाणे कविता लिहिणे आणि दररोज कवितांचा रतीब घालणाऱ्या कवींनी रवींद्रनाथांचे हे वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखे आहे. त्यांच्या नाटकांमधील अनेक प्रसंग गीतांच्या माध्यमातून येतात. बोलता बोलता पात्रे गाऊ लागतात. जेव्हा भावनांची उत्कट अवस्था येते तेव्हा शब्दांना सुरांची साथ आपोआपच मिळते अशी त्यांची भावना होती. त्यामुळे त्यांच्या नाटकातील बऱ्याच रचना या पद्यात झाल्या. त्या नैसर्गिकपणे नाटकात आल्यामुळे उपऱ्या या वाटत नाहीत. संगीताला साध्य न मानता भावनांच्या प्रगटीकरणाचे साधन त्यांनी मानले. त्यात नित्य नवनवीन प्रयोग केले. त्यामुळेच रवींद्र संगीत हे आगळेवेगळे ठरले.
आपल्या वडिलांच्या आज्ञेप्रमाणे जेव्हा ते जमीनदारीचे काम पाहत असत त्यावेळी त्यांचा संबंध सामान्य लोकांशी येत असे त्याप्रसंगी त्यांच्या कानावर वैष्णवांची भजने, तांत्रिकांची गीते, कीर्तनकारांच्या रचना त्याचप्रमाणे होडीवरील नावाड्याने म्हटलेली गीते पडत असत. या गीतांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांच्या असे लक्षात आले की या लोकगीते जाणाऱ्या गायकांना रागदारीची फारशी माहिती नव्हती. तरीही ते तालाचे भान ठेवून गात असत. त्यांच्या रचना हृदयाला भिडणाऱ्या असत. त्यामुळे सूर आणि ताल यांचा अभ्यास केलेल्या रवींद्रनाथांना असे नैसर्गिक गाणे जवळचे वाटू लागले आणि आपल्या प्रेरणेनुसार रागांच्या नियमात ना अडकता ते त्या रागांना नवनवीन रूप देऊ लागले. अशाप्रकारे लोकसंगीतचा समावेश असलेली कीर्तने, भजने, बौद्ध धर्मातील पदे आणि बाऊलांचे गाणे आदींचा प्रभाव पडून त्यांचे अनेक गीते जन्माला आली.
रवींद्रनाथांची संगीत विषयक जाण जसजशी विकसित होत गेली तसतसा त्यांच्या संगीतातही बदल होत गेला जाणकारांच्या मतानुसार त्यांची संगीत तीन टप्प्यात विकसित झाले असे म्हटले जाते त्यातील पहिल्या टप्प्यात त्यांच्यावर पडलेला देशी संगीत, पाश्चात्य संगीत आणि लोकगीतांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो पण त्यातही यातील कोणत्याही प्रकाराची नक्कल न करता त्यातील जे जे चांगले ते त्यांनी घेतले.
रवींद्रनाथांच्या वैयक्तिक जीवनात अनेक आघात त्यांना सोसावे लागले. अनेक दुःखे पचवावी लागली. प्रियजनांचे मृत्यू डोळ्यासमोर पहावे लागले. त्यातूनच त्यांचे मन अध्यात्म आणि मुक्तीकडे ओढ घेऊ लागले. त्यांच्या या भावनांचे प्रतिबिंब त्यांच्या गीत रचनांमध्येही उमटले. अनेक संतांनी आपल्या भक्तीरचना सादर करताना भारतीय संगीत परंपरेतील ध्रुपद रचनेचा अतिशय प्रभावी वापर केला. रवींद्रनाथांना सुद्धा ही ध्रुपद पद्धती आपल्या गीत रचनांसाठी सोयीची वाटल्याने त्यांनी तिचा अवलंब केला.
आपल्या पद्यरचनांमध्ये नवनवीन रागांचा वापर आणि मिश्रण करून त्यांनी आपल्या कवितांना चाली लावल्या. भावनेला सुरांची जोड दिली त्यामुळे त्यांची गीते अजरामर ठरली. हेच रवींद्र संगीताचे वेगळेपण आहे. त्यांच्या कवितांमध्ये निसर्ग सौंदर्याचे गुणगान देखील आहे. निसर्गाचे वेगवेगळ्या ऋतूत असलेले सौंदर्य त्यांचे मन मोहून टाकत असे. शांतिनिकेतन मध्ये त्यांनी शारदोत्सव आणि वसंतोत्सव साजरे करायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांच्या अनेक गीत रचना जन्माला आल्या. या गीतांना संगीतही त्यांनीच दिले. त्यांच्या जीवनातील संगीत विकासातील दुसऱ्या टप्प्यात त्यांनी आपल्या गीत आणि संगीताचे प्रयोग आपल्या नाटकांमध्ये करायला सुरुवात केली. छोटी छोटी पण आशय प्रधान असलेली कवितांची कडवी, प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या पद्य रचना आणि त्याचे जोडीला तालवाद्यांचे सूर या माध्यमातून रवींद्रसंगीत सहजपणे जनमानसात पोहोचले आणि लोकप्रियही झाले.
आपल्या संगीतकारकिर्दीच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये त्यांनी आपल्या गीत आणि संगीतात आणखी वेगवेगळे प्रयोग केले. शास्त्रीय संगीत आणि लोकगीतांमध्ये त्यांनी आपल्याला हवे त्याप्रमाणे बदल करण्याचा प्रयत्न केला. भारतीय संगीतात माहिती नसलेला कंपोझिशन हा नवीन प्रकार त्यांनी रूढ केला आपल्या संगीत प्रवासात दोन ते अडीच हजारांपेक्षा जास्त गीते लिहून स्वतः त्यांना चाली लावल्या त्याचप्रमाणे त्यांनी नाटक, संगीत आणि नृत्य या तीन कलांचा अद्भुत असा त्रिवेणी संगम घडवून आणला. रवींद्रनाथांचे संगीत हे अस्सल भारतीय असून आज बंगालमधील घराघरांमध्ये तसेच देशाच्या विविध भागांमध्ये निनादत आहे. त्याचे कारण म्हणजे त्याची लोकाभिमुखता आणि हृदयाला भिडण्याची क्षमता.
रवींद्रनाथ स्वतः उत्कृष्ट गायक होते राष्ट्रीय काँग्रेसचे कलकत्त्यात जेव्हा अधिवेशन झाले तेव्हा त्यांनी ‘ वंदे मातरम ‘ हे गीत अत्यंत तन्मय होऊन म्हटले. त्यांनी गायलेल्या गीतांचा श्रोत्यांवर दीर्घकाळ प्रभाव असायचा. त्यांचे ‘ आमार शोनार बांगला ‘ हे बांगलादेशचे राष्ट्रगीत असो की आपल्या देशाचे राष्ट्रगीत ‘ जन-गण-मन ‘ या त्यांच्या रचना अत्यंत अप्रतिम आहेत. आपल्या देशावर तर त्यांचे सर्वच क्षेत्रातील कायमचे न फिटणारे ऋण आहे.
रवींद्र संगीताचा प्रभाव बंगालमधील घराघरात आहे. ‘ रोबिन्द्रो शोंगीत ‘ म्हणून ते प्रसिद्ध आहे. बंगालमध्ये त्याला लोकसंगीताचे मोल प्राप्त झाले आहे. अनेक संगीतकार आणि कवींनी रवींद्र संगीतापासून प्रेरणा घेतली. बॉलिवूडमधील अनेक गीते रवींद्र संगीतावर आधारित आहेत. रवींद्रनाथांनी या क्षेत्रातही एवढे प्रचंड काम करून ठेवले आहे की त्याचा मागोवा घेतल्याशिवाय संगीतकार आणि गायकांना पुढे जाता येत नाही. “जोदी तारे नाइ चीनी गो शेकी” हे रवींद्र संगीतातील गाणे वेगवेगळ्या गायकांनी गायले आहे. लिजंडरी सिंगर किशोरकुमार यांनी तर हे गाणे इतके अप्रतिम म्हटले आहे की ऐकताना जणू आपली समाधी लागते. जिज्ञासूंनी हे गीत यु ट्यूबवर अवश्य ऐकावे. याच गीताचा वापर ‘ अभिमान ‘ चित्रपटातील ‘ तेरे मेरे मिलन की ये रैना ‘ या गीतात फार सुंदर केला आहे. तसेच ‘ चंदा देखे चंदा ‘ हे झूठी चित्रपटातील गाणे ‘ आमी तोमाय जातो ‘ या मुखड्यावरून आणि ‘ जोदी तारो ‘ या गीतावर आधारित आहे. जलते है किसके लिये, जाये तो जाये कहा, मेघा छाये आधी रात, छुकर मेरे मन को यासारखी अनेक गाणी रवींद्र संगीतावरून प्रेरणा घेऊन जन्माला आली आहेत. संगीतकार अनिल विश्वास, आर डी बर्मन, हेमंतकुमार, सलील चौधरी आदी अनेक संगीतकारांनी रवींद्र संगीताचा वापर आपल्या गीतांमध्ये करून घेतलेला दिसतो. रवींद्रनाथांनी लिहिलेले एकला चलो रे या गाण्याचा वापर तर अनेक संगीतकारांनी आणि गायकांनी वेगवेगळ्या प्रकारे आपल्या कार्यक्रमात केला आहे. संगीत म्हणजे दोन आत्म्यानमधील दुवा असे रवींद्रनाथ म्हणत असत. त्यांच्या संगीताच्या धाग्याने खरे तर संपूर्ण भारतवर्ष जोडले गेले आहे.
© विश्वास देशपांडे, चाळीसगाव
७/१२/२०२४
प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२
( कृपया लेख नावासहित अग्रेषित करावा )