#भाडोत्री- लेखक- पराग गोगटे.
#भाडोत्री-
लेखक- पराग गोगटे.
बाळाच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवून जिवतीने त्याला तिच्या स्वाधीन केलं. सातच दिवसांचं बाळ ते, झोपेतच हलकंसं हसलं. “ही आपली शेवटची भेट! मोठा हो, खूप शिक आणि तुझ्या आईचं नाव काढ”, त्याच्या कानाजवळ जात ती पुटपुटली.
“आईचं नाव काढ” या शब्दांवर गळ्यात आलेला हुंदका तिने महत्प्रयासाने परतवला. पर्समधून दोन हजाराची नोट काढून तिने बाळाच्या दुपट्याच्या घडीत ठेवली. ताडकन् वळून ती परत फिरली, कधीही मागे वळून न बघण्यासाठी…
जगनने काही न बोलता तिच्या हातातली पिशवी घेतली आणि रिक्षा थांबवली. जगन तिचा गाववालाच होता. शहरात किडुकमिडुक कामं करून पोट भरायचा.
जगन जेव्हा जेव्हा गावी येई, तेव्हा तेव्हा शहरातल्या गोष्टी सांगायचा. शहरी जीवन, तिथे असणारी साधन-सुविधांची मुबलकता, खाण्या-पिण्याची चंगळ… या आणि अशा अनेक सुरसरम्य कथा ऐकून गाववाले शहरात जायचं स्वप्न पाहायचे.
जिवती पण अशाच स्वप्नांत रंगून जायची. शहरात बक्कळ पैसा मिळतो, हे तिच्या मनावर ठसले होते. घरात अठरा विश्व दारिद्र्य. जमिनीचा इवलासा तुकडा पण सावकाराकडे गहाण पडलेला. बाप शेतापेक्षा दारूच्या गुत्त्यावरच अधिक वेळा सापडायचा.
जिवती सगळ्यात मोठी, आणि मुलगा होत नाही त्यामुळे तिच्या पाठी अजून चार बहिणी. रंगाने सावळी आणि बांध्याने दणकट असलेली, उफाड्याची जिवती चारचौघींच्यात हमखास लक्ष वेधून घ्यायची.
दारूचं व्यसन लागण्यापूर्वी जिवतीचा बाप बरं कमवत होता. पण, मुलगा होण्याचा अट्टहास आणि तो होत नाही म्हणून नैराश्यात सुरू केलेली दारू, व्यसनाच्या दारी कधी घेऊन गेली कळलंच नाही. जिवती अभ्यासात हुशार आणि चुणचुणीत होती. घरच्या परिस्थितीमुळे तिची शाळा सुटली. दहावीची परिक्षा देता आली नाही तरी गावातल्या सार्वजनिक ग्रंथालयात जे जे मिळेल ते आधाशासारखं ती वाचत रहायची.
जगन जेव्हा जेव्हा गावी यायचा तेव्हा ग्रंथालयासमोरच्या पारावरच त्याचा गप्पांचा फड जमलेला असायचा. जिवती पण कधी कधी त्या गप्पा ऐकायची.
चकाचक शहरी दुनियेची नाही म्हंटलं तरी तिला भुरळ पडलीच होती. शहराच्या नट-नट्यांबद्दलचे किस्से जगन अगदी रंगवून रंगवून सांगायचा. जिवतीचे स्वप्नाळू डोळे शहराची दिवास्वप्ने रंगवू लागत.
जगन खरं तर तिच्यापेक्षा दोन-तीन वर्षाने लहानच होता. पण त्याचे कपडे, मनगटावरील घड्याळ, मनमोहक अत्तरांचे सुगंध, यांमुळे एकदम रूबाबदार वाटायचा. याचा हात धरून शहरात पळून जावं असं फार वाटे जिवतीला. जगनलाही कल्पना होती की जिवती त्याच्यावर लट्टू आहे…
रिक्षात बसल्या बसल्या जिवतीचा भूतकाळ तिच्या डोळ्यांसमोरून झरझर जाऊ लागला. वाऱ्याने उडणारी केसांची बट मागे करत तिने रिक्षा स्टेशनजवळच्या मार्केटमध्ये घ्यायला सांगितली. दरवेळी गावी जाताना घरच्यांसाठी खरेदी करण्याची तिची सवय जगनला माहित होती.
शहरात येऊन तिला आता आठ वर्षं झाली होती. दर वर्षी दोन-तीन महिन्यांची सुट्टी घेऊन ती आणि जगन गावी यायचे. तसा तो आता शिरस्ताच झाला होता त्यांच्यासाठी.
जगनचं आता जवळचं असं कुणी उरलं नव्हतं गावात. घरी जाणं खरं तर निव्वळ उपचार राहिला होता जिवतीसाठी, पण ती तो न चुकता करत होती.
तिच्या पाठच्या बहिणीचं लग्न तिनंच लावून दिलं होतं. उरलेल्या तिघींची शिक्षणं, घरासाठी लागणाऱ्या चीजवस्तू यांसाठी जिवतीच पैसे पुरवत होती.
बापाचं दारूचं व्यसन सोडविण्यापलिकडे गेलं होतं. आईदेखील वयोमानपरत्वे थकली होती. सगळ्यांसाठी सगळं करूनदेखील कुणाची शाबासकीची थाप पाठीवर नाही की कौतुकाचा चकार शब्द नाही. जिवती तरीही खपत होती त्यांचं आयुष्य सुरळीत होण्यासाठी.
संध्याकाळच्या सुमारास पोचलेल्या जिवती व जगनचं दरवर्षीसारखंच अत्यंत थंड स्वागत झालं घरात. बाप घरी नव्हताच. म्हातारी कोपऱ्यात बसून वाती वळत होती. मधली बहिण नर्सिंग काॅलेजला शिकत होती. धाकल्या दोघींची काहीबाही कामं, अभ्यास चालू होता.
जिवतीनं तान-मान पाहून स्वतःच चहा टाकला सगळ्यांसाठी. उकळणाऱ्या पाण्यातल्या बुडबुड्यांबरोबर तिच्या आठवणींचे बुडबुडेही वर येऊ लागले.
जिवतीचं जगनबरोबर शहरात पळून जाणं घरात कुणालाच रूचलं नव्हतं. त्यात शहरात ते बिन लग्नाचे राहतात हे कळल्यानंतर घरच्यांची आणि गावातल्या इतरांची जिवतीकडे बघायची दृष्टीच बदलली होती…
सर्वांना चहा देऊन आपल्या चहाचा कप तोंडाला लावणार इतक्यात नर्सिंग काॅलेजमध्ये शिकणारी जानकी घरात शिरली.
जिवती काही बोलणार इतक्यात जानकी खेकसली, “या जगन बरोबर झोपून मन भरलं नाही वाटतं? की आता पैशासाठी इतरांबरोबर पण झोपायला लागलीस?”. तिच्या काळीज चिरणाऱ्या प्रश्नाने जानकीच्या तोंडून अस्फुट हुंदका निघाला.
“रडण्याचं नाटक कुणासमोर करतेस? तुला काय वाटलं, कुणाला कळणार नाहीत तुझे शहरातले धंदे? आधी या जगनबरोबर पळून गेलीस, तेव्हाच आमच्या तोंडात शेण घातलंस. पण बिनलग्नाचे का होईना, एकत्र राहताय यातच सुख मानत होतो आम्ही. पण आता कळतंय सगळं खरं! शहरात तू धंदा करतेस. पैसे घेऊन लोकांकडे जातेस. हा…हा…हलकट जगन तुझ्यासाठी दलाली करतो ना? तुला गि-हाईक मिळवून देतो. वर्षभर मजा करून दोन महिने येता इथे आराम करायला…तू धंदेवाली आणि हा तुझा दलाल…”, जानकी शब्दांचे आसूड ओढत होती.
जिवतीच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वाहत होतं. वाती वळणारी म्हातारी भकास चेहऱ्याने जिवतीकडे पाहत होती. धाकल्या दोघी गांगरून गेल्या होत्या. जगनही तिच्या बोलण्याने अस्वस्थ झाला होता.
“माझ्या काॅलेजच्या सिनिअरचं शहरात पोस्टींग झालंय. तिनं तुला अनेक वेळा पाहिलंय हाॅस्पिटलात. धंदा करतेस तर करतेस, वर त्यातून जन्माला येणारी पोरं पण विकतेस…”,
गालावर बसलेल्या सणसणीत थपडेनं जानकीचं वाक्य अर्धवटच राहिलं. इतकी वर्षं शांत पाहिलेल्या जगनच्या या पवित्र्याने ती ही गांगरली.
“बस्स्…एकदम बस्स्… एक शब्द बोलशील पुढे तर जीव घेईन तुझा…”, जगन बरसला.
“जानकी, वाट्टेल ते आरोप करण्याआधी एकदा तरी विचार करायला हवा होतास तू की तुझ्या नर्सिंगची फी, या दोघींची शिक्षणं, घरातलं सामान, औषधं, लग्नं, सण-वार या सगळ्याचा खर्च तू जिला धंदेवाली म्हणतेस ना तिच्या कमावलेल्या पैशावरच चालतोय इतकी वर्षं…
आणि तुला काय माहिती काय गं आमच्याबद्दल? कुणीतरी येऊन तुझे कान भरते, गावातली चार टाळकी काहीतरी बरळतात आणि तू जिवतीवर आरोप करतेस?”, जगनला आता असह्य झालं होतं. जिवतीने डोळ्यांनीच “गप्प बस” सांगूनसुद्धा त्याने दुर्लक्ष केलं होतं.
जगन सांगत होता, “जिवतीनं मला शपथ दिली होती न बोलण्याची. पण आता खूप झालं. आता मी गप्प नाही बसणार.
सगळ्यांना वाटतं मी तिला फूस लावून घेऊन गेलो शहरात… पण… पण खरं तर माझ्या बरोबर शहरात जाऊन काम करायची, पैसे कमवायची कल्पना जिवतीचीच.
माझ्या गप्पा ती ऐकायची. मी आणलेली सिनेमांची मासिकं ती वाचायची… ती वाचतानाच तिला एक दिवस कुठच्या तरी हिरोच्या पोरीच्या जन्माची माहिती वाचायला मिळाली. काहीतरी सरोगेट… सरोगसी… गर्भाशय भाड्याने देण्याबद्दल त्यात लिहिलं होतं. आपणही हेच करायचं असं मनात पक्कं ठरवून टाकलं होतं तिनं.
इथे घरी खायचे वांदे, कर्ज झालेलं, बेवडा बाप, पाठीवर चार बहिणी… त्यात धड शिक्षण नाही. काम तरी काय मिळणार इथे गावात.
तेव्हा तिनंच मला ही कल्पना सांगितली. शहरात जायचं… नवरा-बायको आहोत म्हणून सांगायचं, गर्भाशय भाड्याने द्यायचं… मूल झालं की पैसे घ्यायचे, बाळाला त्याच्या खऱ्या आई-वडिलांकडे द्यायचं आणि गावी यायचं विश्रांतीसाठी दोन-तीन महिने… अंगावरून येणारं दूध औषधं घेऊन घेऊन थांबवायचं… गेली काही वर्षं हेच चालू आहे जिवतीचं”, सांगताना जगनच्या डोळ्याला अश्रुंच्या धारा लागल्या होत्या.
“हे सगळं कुणासाठी? तुमच्यासाठी, घरासाठी. गर्भारपणातली औषधं, जेवणखाणाचा सगळा खर्च, ज्यांचं मूल ते करतात. वर परत भरपूर पैसे मिळतात.
जिवती पळून गेल्यापासनं हातात पैसा खुळखुळायला लागला तुमच्या. आज तुम्हाला सत्य कळलं, पण इतकी वर्षं खर्च करताना कधी लाज नाही वाटली, तेव्हा नाही कुणाची जीभ रेटली विचारायची की हा पैसा कुठून येतो ते.
लोकांना फक्त आम्ही बिनलग्नाचे दिसतो. आमच्याबद्दल लोक अभद्र बोलतात, जिवतीला धंदेवाली म्हणतात, पण कुणालाच माहित नाही की इतक्या वर्षांत बाकी कुणी तर सोडाच, पण मी देखील तिच्या अंगाला स्पर्श केला नाहीये. फक्त तिचा एक चांगला मित्र बनून तिची काळजी घ्यायचं काम मात्र मी केलंय”.
जगन थांबला होता बोलायचा. आज खूप वर्षांनी मनावरचा भार हलका झाल्यासारखं वाटत होतं जगन आणि जिवतीला.
सगळे चिडीचूप होते. दिवे लागणीची वेळ झाली होती. घरात काळोख भरून राहिला होता. म्हातारी ऊठली. काही न बोलताच जिवतीच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवून तिने बोटं मोडली. दोघींच्याही डोळ्यांत अश्रू दाटले होते.
हातातल्या वळलेल्या वातींचा म्हातारीने देवांसमोर दिवा लावला… देवघरातला जिवतीचा कागद त्या मंद प्रकाशात उजळला होता…
© पराग गोगटे, ठाणे.
Disclaimer:
“सरोगसी” हा वैद्यक, सामाजिक आणि न्यायिक दृष्टीने अत्यंत संवेदनशील व क्लिष्ट विषय आहे. एकाच स्त्रीला एकापेक्षा जास्त वेळेला सरोगसी कायद्याने व वैद्यकीय दृष्ट्या प्रतिबंधित आहे. त्यामुळे, वरील कथा संपूर्णपणे काल्पनिक असून, केवळ लिखाण व विस्ताराच्या दृष्टिकोनातून त्यातील नाट्यमय प्रसंग योजिले आहेत. म्हणूनच, सरोगसी व त्या अनुषंगाने उल्लेखिलेल्या घटनांच्या शास्त्रीय, वैद्यक, न्यायिक व सामाजिक पातळीवरील सत्यासत्यतेची व परिणामांची तज्ञांकडून संपूर्णतः पडताळणी केलेली नाही याची वाचकांनी कृपया नोंद घ्यावी. परिस्थितीने हतबल झालेली व्यक्ती कायदा व वैद्यकीय बंधनाच्या पलिकडे जाऊन असे पाऊल उचलू शकते अशी केवळ एक शक्यता म्हणून त्याकडे पाहिले जावे.