——-शेठजींचे दुकान——– लेखक -प्रदीप केळुस्कर
——–शेठजींचे दुकान——–
लेखक -प्रदीप केळुस्कर 9307521152/9422381299
मोहनकाका दुकानात आपल्या जागेवरून लक्ष ठेऊन होते, मालक अमित अजून दुकानात यायचा होता, अकरा नोकर मंडळी दुकानात आतबाहेर करत होती, गोडाऊनमध्ये धावत होती. गिर्हाईकांचे पैसे मोहनकाका ड्रॉवरमध्ये टाकत होते, क्रेडिटवाल्याना चलन करून देत होते.
एवढ्यात मालक अमित आला, तसे मोहनकाका उठले आणि दुसऱ्याजागेवर जाऊन बसले.अमित टेबलाच्या मागे येऊन बसला आणि त्याने दुकानात नजर टाकली, नेहेमी प्रमाणे दुकानात गर्दी होती, माल खपत होता.. पैसे येत होते. गोडाऊनमध्ये माल उतरला जात होता.
मोहनकाका अमितला म्हणाले
“मी कॉम्टनची ऑर्डर काढली आहे, त्यावर नजर टाक आणि पिव्हीसी पाईप्स कमी आहेत, त्याला सध्या मागणी आहे, त्याचा मोठा लॉट घयायला हवा कारण त्त्यांची सध्या स्कीम सुरु आहे.’
“तुम्ही काय ती ऑर्डर देऊन टाका. बँकेत कुणाला तरी पाठवा, कॅश भरायची आहे आणि चेक्स दयायचे आहेत.
अमितने पैसे मोजले आणि काकाकडे दिले. काकांनी स्लिप भरली तसेच चेक्सच्या स्लिप्स भरल्या आणि ते बँकेत जायला निघाले.
दुकानाची जेवणाची सुट्टी दुपारी एक ते तीन होती, पण दोन वाजले तरी गिर्हाईक कमी होतं नव्हते.शेवटी मोहनकाकांनी पुढील शटर ओढून घेतले.
दुपारी तीन वाजता दुकान पुन्हा उघडले. चार वाजता मालक अमित आला आणि हळूहळू त्याची मित्रमंडळी जमू लागली आणि काकांच्या चेहेऱ्यावर आठ्या पडल्या. त्यान्च्या मनात येत होते, हे दुकान मोठया शेठच्या पुण्याईवर अजून जोरात सुरु आहे पण मोठे शेठ आजारी पडले, हॉस्पिटलमध्ये असताना त्यानी आपल्याकडून वचन घेतले, या दुकानाला आणि तरुण अमितला कधीही न सोडण्याचे. त्या वचनाला जागून आपण अजून दुकानात येत असतो पण अमितची मित्रमंडळी त्याला आणि या दुकानाला रसातळाळा पोचवणार यात शंका नाही.
मोहनकाकांच्या कानात अमितच्या मित्रांचे शब्द पडत होते
“हा प्लॉट सत्तरला मिळतोय, पनवेलच्या पुढे, त्याठिकाणी नवीन स्टेशन होतेय, शिवाय काही दिवसात मेट्रो पण येईल, डोळे झाकून पैसे टाक ‘.
तर सात वाजता आलेला अजून एक मित्र सांगत होता “हैद्राबादकी ये स्कीम है, पहले पचास डालनेका औरं हर मैना दस लाख घर बैठे कमानेका.
मोहनकाकांचा तीळपापड होतं होता. दुकानात गर्दी होती, पैसे येत होते पण या गप्पात पैसे घयायचे पण भान अमितला नव्हते. काका लक्ष ठेऊन पैसे घेत होते म्हणून पैसे ड्रॉव्हर मध्ये पडत होते. रात्री नऊ वाजले दुकान बंद करण्याची वेळ झाली तशी मंडळी बाहेर पडली. आता ही मित्रमंडळी अमितला बिअरबार मध्ये नेतील आणि मनोसक्त दारू पिऊन बिल अमितला दयायला लावणार. हे रोजचेच झाले होते. अमितला यातून बाहेर काढायला हवे होते, पण..
उद्या अमितची बोलायचेच हे मोहनकाकांनी ठरविले. त्यासाठी उद्या त्याच्या घरी जायचे हे पण त्यानी ठरविले.सकाळी लवकर मोहनकाका शेठजीच्या घरी पोहोचले.अमितची आईने दरवाजा उघडला. काका आल्याने तिला आनंद झाला. तिने चहा आणुन दिला. थोडयावेळाने अमित आणि त्याची पत्नी अर्चना बाहेर आली.अमितच्या आई आणि पत्नी समोर काका बोलू लागले.
“अमित, दुकानात नोकरमाणसे असतांत, गिऱ्हाईक असत म्हणून मी बोलत नाही, पण तुझे हल्ली दुकानात लक्ष नाही. तुझी मित्रमंडळी तुला वेगवेगळे पैसे गुंतवण्याचे मार्ग सांगतात, ते मी ऐकत असतो पण हे योग्य नव्हे, आपला व्यवसाय हा मोठया शेठनी सुरु केला आणि त्यान्च्या कृपेनें उत्तम चालू आहे. असे असताना धंदयातील पैसे बाहेर काढणे हे धोकादायक आहे, तू तूझ्या असल्या मित्रापासून लांब रहावे असे मला वाटते ‘.
“काका, आपला धंदा किती छोटा.. असल्या धंद्यात पैसे मिळून मिळून किती मिळणार? धाडस करायला हवे आणि तरुणपणात धाडस करायचे नाही तर कधीं करायचे? दिवसेंदिवस आपल्या सध्याच्या दुकानात प्रॉफिटमार्जिन कमी कमी होतं जाणारं, स्पर्धा वाढणार म्हणून आता पासून वेगळ्या वाटा शोधायला हव्यात. मी आता जमिनीत पैसे गुंतवणार आहे आणि कॉन्स्ट्रुशन मध्ये घुसणार आहे. तुम्ही दुकान सांभाळा.. हळूहळू मला दुकानात यायला पण जमणार नाही.’
काका गप्प झाले. त्याना वाटले अमितची आई किंवा बायको काही बोलतील किंवा त्याचे मन परिवर्तन करतील पण ती दोघ गप्पच होती कदाचित अमितने आधीच या दोघीना नवीन धंदा्याबद्दल मोठया गोष्टी सांगितल्या असतील.
काका गप्प बसले आणि चहा पिऊन घराबाहेर पडले.
हळूहळू अमित दुकानात यायचा कमी झाला, सतत बाहेरगावी जाऊ लागला, काकांना फोन करून पैसे पाठवायला सांगू लागला. बँकेतील पैसे दुसरीकडे ट्रान्सफर होऊ लागले.
कसे तरी पाच सहा महिने गेले आणि हळूहळू व्यापाऱ्यची पेमेंट थकू लागली, चेक परत येऊ लागले.
दुकानात कोणी माल पाठवायला तयार होईनात.नोकरांचे पगार थकले. मोहनकाकांनी आपल्या घरून थोडी रक्कम आणुन थोडा माल आणला, पण शेवटी.. हे आहे तर ते नाही.. एक एक नोकर काम सोडून गेले. या संधीचा फायदा घेऊन एका मारवाडयाने त्याच गल्लीत दुसरे हार्डवेअर सुरु केले.त्याने या दुकानातील नोकरांना आपल्या दुकानात घेतले. सहा महिन्यात दुकानात शुकशकाट पसरला. एकटे मोहनकाका रोज येऊन दुकान उघडत होते आणि बंद करत होते. मोठया शेटजीना दिलेल्या शब्दाची त्याना सतत आठवण येत होती.
मोहनकाका दर सोमवारी फोन करून अमितला दुकानाची परिस्थिती सांगत होते, त्यावर त्याचे ठरलेले उत्तर “बांधकाम सुरु होते आहे, थोडे दिवस लागतील, एकदा बुकिंग सुरु झाले की पैसेच पैसे. मग परत दुकानात माल भरू.. थोडे दिवस थांबा.
अमितकडून पैसे आले नाहीत आणि दुकानात माल भरला नाही. या दुकानाची मोठया शेटजीपासूनची गिऱ्हाईके होती, ती अजून या दुकानात येत होती पण दुकानाची ही परिस्थिती पाहून हळहळत होती.मोहनकाका अमितच्या घरी जाऊन त्याच्या आईला आणि पत्नीला पण भेटत होते पण त्त्यांचे पण हेच सांगणे “घराची बुकिंग सुरु होऊ देत, मग परत दुकान पूर्वीसारखे चालू करू ‘.
दोन वर्षे अशीच गेली, त्या शहरात अजून दोन हार्डवेअर दुकानें सुरु झाली. आता नेहेमीची गिऱ्हाईके सुद्धा शेटजीचे दुकान विसरले.
दुकानात काही मालच नव्हता तरी मोहनकाका दुकान उघडत आणि मोठया शेटजीच्या फोटोला हार घालत आणि थोडया वेळाने दुकान बंद करत.
एक दिवस मोहनकाका आपल्या घरी रामरक्षा वाचत बसले असताना त्यान्च्या घरासमोर स्कुटर थांबली. कोण आले या वेळी? असे म्हणत मोहनकाकाची पत्नी बाहेर आली तर दाढी वाढलेला अमित होता.
“काका आहेत काय?
“आहेत, ये, कुठे होतास एवढे दिवस?
“बाहेरगावी होतो, म्हणत अमित आत आला आणि त्याने रामरक्षा वाचणाऱ्या काकांचे पाय पकडले.
काका एकदम गडबडले, त्यानी रडणाऱ्या अमितला वर उचलले.
“अरे अरे, काय करतोस हे? आणि माझे पाय का धरलास बाबा?
“काका, मी फसलो.. पूर्ण बुडालो.. मला फसवलं हो.. माझे तीन कोटी बुडाले.. नको त्या माणसांच्या नादाला लागलो.. तुम्ही मला सावध करत होता तरीही..
“कळली ना तुला चूक.. अरे तू साधा मुलगा.. आमच्या शेटजींचा मुलगा.. तुला या जगाची ओळख नाही.. माझे केस उगाच नाही पिकले..तुझ्याकडची शिते बघून ही भुते जमत होती.
“पण काका, आपले दुकानसुद्धा बंद पडले माझ्या दुर्लक्षामुळे.. माझ्या बाबांचे दुकान.
“होय, ती मला खन्त आहे, मोठया शेटजींचे दुकान.. ते बंद पडता नये.. तू व्यवस्थित दुकानात येणार असशील तर अजून ते दुकान पूर्वीसारखे जोरात चालेल
“पण काका, दुकानाचे क्रेडिट गेले हो, आता कोण माल देईल?
“अजून मोठया शेटजींचे क्रेडिट शिल्लक आहे. तुला बघायचे आहे? तू तुझे सर्व धंदे बंद करून दुकानात येणार असशील तर मी तुझ्यामागे उभा आहे.
“होय काका, उद्यापासून मी नियमित दुकान उघडणार..
“मग बघच हा मोहनकाका कसा चमत्कार करतो ते? मोठया शेठजीच्या हाताखाली काम केलंय मी. तू जा आता.. मी उद्या दुकानात आहे.
अमित घरी गेला.
दुसऱ्यादिवशी सकाळी आठ वाजता अमित दुकानात आला तर त्याआधी येऊन काकांनी दुकान उघडून फरशी पुसणे सुरु केले होते. अमितने फडका घेतला आणि तो खिडक्या, टेबल पुसू लागला.
दुसऱ्यादिवशी मोहनकाका कोल्हापूरला गेले आणि मोठया शेटजींपासूनचे व्यापारी “पोरवाल ब्रदर्स ‘च्या ऑफिसात पोहोचले. मोहनकाकाना पहाताच स्वतः पोरवालशेठ बाहेर आले आणि त्यानी काकांना आत घेतले.
“शेटजी, तुमचे पैसे थकले आमच्याकडून.. पण अमितशेठची चूक झाली आता त्याला आपली चूक समजली. परत दुकान सुरु करतोय आम्ही.. आम्हाला क्रेडिटवर माल पाहिजे..
“पण काका, मागील येणे..
“या काकावर विश्वास ठेवा शेठ, मोठया शेठनी व्यवहार केला तसा दोन वर्षात व्यवहार करून तुमची पै ना पै फेडायला लावतो की नाही बगा.. आणि तरीपण तुमचा विश्वास नसेल तर माझी गावातील एक एकर जमीन तारण ठेऊन घ्या..
मोहनकाकांनी आपल्या जमिनीचा सातबारा बाहेर काढला.
पोरवाल शेठ म्हणाले “काका, तुमच्यकडून काही तारण नको.. तुमचा शब्द हेच तारण.. काय हवी ती ऑर्डर द्या, तुमच्या दुकानात माल पोच होईल..
“आभारी शेठ.. काकांनी हात जोडले.
“काका, तुमचे मोठे शेठ मोठे भाग्यवान.. तुमच्यासारखा हिरा त्याना मिळाला..
मोहनकाका बाहेर पडले. तेथून ते “अजितकुमार अँड सन्स मध्ये गेले. तेथून ते अजून अनेक व्यापाऱ्याकडे जाऊन भेटले. काकांच्या शब्दावर विश्वास ठेऊन सर्वांनी क्रेडिट दयायचे कबूल केले.
दुसऱ्यादिवसा पासून दुकानात माल यायला सुरवात झाली. प्रत्येक व्यापाऱ्याने शब्द दिल्याप्रमाणे माल पाठवला.
आता अमित दुकानात वेळेत येऊन बसू लागला, मग काका आपली जुनी स्कुटर घेऊन बाहेर पडले. त्यान्च्या तालुक्यातील पस्तीस गावामध्ये त्त्यांची जुनी गिर्हाईके होती.. बहुतेक बगायतदार… शेतकरी.. छोटे दुकानदार. त्या प्रत्येकाकडे काका गेले. मोहनकाका या वयात स्वतः आपल्यकडे आल्याने ती मोठी गिर्हाईके परत दुकानात येऊ लागली.त्याना बघून छोटी गिऱ्हाईक येऊ लागलं. मग काकांनी दोन नोकर ठेवले. गर्दी वाढू लागली.
सर्व व्यापाऱ्यांचे पैसे नियमित पोच होऊ लागले. दोन वर्षात मागील सर्व उधारी पोच झाली.
आता दुकान कर्जमुक्त झाले, अमित व्यवस्थित दुकान सांभाळू लागला.काका आता थकले होते. त्त्यांची ऐशी पुरी झाली होती. एवढ्यात अमितची बायको अर्चना प्रसूत झाली आणि तिला मुलगा झाल्याची बातमी आली.
काकांना वाटले, अर्चनाच्या पोटी मोठया शेठनी जन्म घेतला. आता आपल्याला विश्रांती घयायला हरकत नाही.
काका समाधानी होते. मनात रामनाम म्हणत दुकानात बसत होते.
रामनवमी दिवशी असेच काका आपल्या खुर्चीवर बसुन दुकानातील व्यवहार पहात होते.. काही वेळात अगदी शांतपणे त्यानी डोळे कायमचे मिटले.
प्रदीप केळुस्कर 9307521152/9422381299