Classifiedजाहिरातदुर्गाशक्तीदेश विदेशमंथन (विचार)युनिटी बिझनेसवैशिष्ट्यपूर्ण / फिचरव्यवसाय
स्टार्ट अप ” उद्योगांचे संभाव्य धोके:……… वासुदेव स. पटवर्धन, पुणे. मोबाईल नंबर: 8459583871

स्टार्ट अप ” उद्योगांचे संभाव्य धोके:
सरकारच्या धोरणात्मक प्रोत्साहनाने संपूर्ण देशात “स्टार्ट अप” संकल्पने अंतर्गत खूप मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रात व्यवसाय- उद्योग सुरू आहेत, नवीन सुरू होत आहेत. बौद्धिक क्षमता असणाऱ्या, विविध प्रकारचे कौशल्य असणाऱ्या किंवा नाविन्यपूर्ण कल्पना साकारू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी ही सुवर्ण संधी आहे आणि त्याचा लाभ देखील बऱेच होतकरू तरूण करून घेताना दिसत आहेत. आत्मनिर्भर भारताच्या वाटचालीसाठी ही नक्कीच अत्यंत सुखावह बाब आहे.
पण आज मला ह्या सर्व विषयातील एक-दोन भयावह, संभाव्य शक्यतांची जाणीव करून द्यावीशी वाटते. विशेषतः ह्या गोष्टींची झळ जशी ग्राहकांना थेट पोचू शकते तशीच इतरांसाठी आरोग्य विषयक समस्या निर्माण करू शकते. इथे मला दोन प्रकारच्या स्टार्ट अप चा विचार करायचा आहे. पहिला म्हणजे, अन्नपदार्थ प्रक्रिया, पॅकिंग करणारे उद्योग-व्यवसाय आणि अन्नपदार्थ ग्राहकांपर्यंत पोचवणारे व्यवसाय. सरकारी नियमानुसार असे उद्योग-व्यवसाय, नेमलेल्या यंत्रणेकडून (जसे fssai) नोंदणी न चुकता करून घेताना दिसतात. परंतु त्यानंतर तयार केलेले, ग्राहकांना पुरवण्यात येणारे अन्नपदार्थ योग्य दर्जाचे आहेत ना, याची निश्चिती करण्याची जबाबदारी व्यवसायिका बरोबर सरकारी यंत्रणेची देखील आहे. व्यावसायिक, फायद्यावर जास्त लक्ष देत असल्याने, ग्राहका पर्यंत पोचणाऱ्या पदार्थाचा दर्जा चांगलाच असावा याचा फारसा विचार करत नाहीत.
ही जबाबदारी सरकारी यंत्रणा पूर्णपणे पार पाडतानाही दिसत नाही. केवळ त्यांची उदासीनता हे त्याचे एकमेव कारण नाही. पुरेसे तज्ञ मनुष्य बळ उपलब्ध नसणे हे देखील महत्त्वाचे कारण आहे. अन्नपदार्थांची वेळोवेळी प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक असते. पण ह्या सुविधांची कमतरता जाणवते. २-३ वर्षांपूर्वी देखील सरकारी यंत्रणा पुरेशी नव्हती आणि आता तर व्यवसायांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्या प्रमाणात यंत्रणेच्या पायाभूत सुविधा नक्कीच वाढलेल्या नाहीत. त्यामुळे ग्राहकांच्या, जनतेच्या आरोग्यावर साहजिकच परिणाम होणे स्वाभाविक आहे.
वस्तू उत्पादन क्षेत्र हे दुसरे विचारात घेतले जाणे आवश्यक आहे. सर्वच उत्पादन प्रक्रियेत थोड्याफार प्रमाणात प्रदूषण निर्मिती होतच असते. अल्प प्रमाणात होणाऱ्या प्रदूषणाचे नियंत्रण नैसर्गिक पध्दतीने होण्याची शक्यता असते किंवा त्याचा परिणाम तितकासा जाणवत नाही. परंतु काही प्रकारचे उद्योग मोठ्या प्रमाणावर घातक प्रदूषणकारी असतात. सर्वसाधारणपणे रसायन व औषध निर्मिती, रंग निर्मिती यासारखे उद्योग जास्त प्रमाणात प्रदूषण करतात हे सर्वांना समजते. परंतु वाहन निर्माण उद्योगाचा प्रमुख घटक, प्लेटिंग, ह्यातून देखील मोठ्या प्रमाणात घातक जलप्रदूषण होते. दुर्दैवाने, आपल्याकडे जे उत्पादक आहेत त्यांना उत्पादनाशी संलग्न विषयांची पुरेशी माहिती नसते. उत्पादन निर्मितीचा खर्च व बाजारपेठेची परिस्थिती यांचा अभ्यास, फायद्यावर लक्ष ठेऊन त्यांना करावाच लागतो. पण उद्योगाच्या दृष्टीने एक महत्त्वाचा भाग, प्रदूषण नियंत्रण व पर्यावरण संरक्षण दुर्लक्षित केला जातो. त्यामुळे सरकारी यंत्रणेवरच ह्या पैलूकडे काटेकोरपणे लक्ष द्यायची जबाबदारी आहे. परंतु तेथे देखील, वर उल्लेख केल्याप्रमाणे, पायाभूत सुविधांची व तज्ञ मनुष्यबळाची कमतरता जाणवते. ज्या प्रमाणात आणि ज्या वेगात उद्योगांची वाढ झाली आहे, होत आहे, त्याच्या तुलनेत सरकारी यंत्रणा खूपच कमी पडतात. ह्याचा परिणाम नैसर्गिक स्त्रोतांच्या प्रदूषणावर आणि पर्यायाने उपलब्धतेवर होतो.
तेव्हा, स्टार्ट अप उद्योग-व्यवसायांना प्रोत्साहन देताना वरील दोन्ही विषयांचा अभ्यासपूर्वक विचार होणे अगत्याचे, आवश्यक आहे.
— वासुदेव स. पटवर्धन, पुणे.
मोबाईल नंबर: 8459583871