मंथन (विचार)मनोरंजन

माय डिअर ममा ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

माय डिअर ममा

‘जस्ट स्माईल रेस्टॉरंट अँड बार’…
मी पाटीवरचं नाव वाचलं. घराजवळ हे रेस्टॉरंट नवीनच झालं होतं. मनात विचार आला. जावं का आज बारमध्ये? आजपर्यंत साधी बिअर सुद्धा कधी घेतली नव्हती. ममासाठी! माझे सगळे मित्र कधीतरी पार्टीत बिअर घेतात, हे तिला ठाऊक होतं. म्हणजे तिने असं कधीच म्हटलं नाही की तू घेऊ नकोस पण मलाच नको वाटलं. माझं ममावरचं वेडं प्रेम! ती दुखावल्या जाऊ नये हेच सतत माझ्या मनात येतं! तिने माझ्यासाठी खूप केलंय. शी इज अ परफेक्ट सिंगल पेरेन्ट! माझ्यासाठी बऱ्याच गोष्टींचा तिने त्याग केला होता.

मला कळायला लागल्यापासून मी ममा आणि पपाचे फक्त वादच ऐकत आलोय. ते दोघेही एक व्यक्ती म्हणून अतिशय चांगले आहेत. पण एकमेकांसाठी अयोग्य! मतभिन्नता टोकाची! माझ्या नकळत्या वयात ते वेगळे झाले. ममाने पपाला सांगितलं की पोटगी नाही दिलीस तरी चालेल, पण माझा अनिश मला दे. मी जाणता झाल्यावर हे तिने एकदा मला सांगितलं.

त्या वयात फार काही कळत नव्हतं पण दर शनिवार, रविवार पपा भेटायचा, माझे खूप लाड करायचा ते आवडत होतं. माझ्या कुठलाही हट्ट पपा पुरवायचा. पपाला ह्या बाबतीत ममा विरोध करत नव्हती. पण ती स्वतः प्रचंड स्वाभिमानी होती. तिच्या बँकेच्या नोकरीच्या पगारावर आमचं दोघांचं छान चाललं होतं. तिने कर्ज काढून एक बेडरूमचा फ्लॅट देखील विकत घेतला. माझी शाळेची वर्षाची फी पपा भरायचा.

मी दहावीत गेलो आणि पपाला युएसला चांगली जॉब ऑफर आली. जायच्या आधी मला भेटला. हळवा होऊन मला म्हणाला, “निशू, खूप अभ्यास कर, खूप मोठा हो. आईने तुझं खूप छान संगोपन केलं आहे. तिची काळजी घे, तिला जप. ही तीन वर्ष तुझी खूप महत्वाची आहेत. तुझं करिअर त्यावर अवलंबून आहे. आय एम देअर फॉर यू एनी टाइम.” लहानपणी मला कडेवर उचलून घेणाऱ्या पपाने मला मिठीत घेतलं.

बारावीत मी उत्तम मार्क्स मिळवून आय टी इंजिनीअर झालो. पपाने तिकडेच अमेरिकन वूमनशी लग्न केलं. तो तिकडे हॅपी आणि ममा माझ्याबरोबर हॅपी! आमच्या दोघांचं एक छान जग निर्माण झालं होतं.
सगळे मला ममाज बॉय म्हणायचे पण ते खरंही होतं.

पण ह्या ममाज बॉयचं आणि ममाचं आज पहिल्यांदा भांडण झालं. माझं कॅम्पस सिलेक्शन झालं होतं. दोन महिन्यांनी मला जॉईन व्हायचं होतं. पण माझे बरेच मित्र, मैत्रिणी युएसला एम एस करण्यासाठी प्रयत्न करत होते. माझ्याही मनात तेच होतं. मी पपाशी बोललो आणि त्याने मला सांगितलं, “गो अहेड! तुझ्या पुढच्या सगळ्या शिक्षणाचा खर्च मी करेन.”

मी खुश होऊन ममाला हे सांगितलं.
त्यावर ती म्हणाली, “तू तिथे जाऊ नये असं मला वाटतं. माझ्याकडे इतके पैसे नाहीत. घराचं कर्ज मी फेडतेय, अजून लोन काढणं मला जमणार नाही.”

“ममा, पण पपा सगळा खर्च करणार आहे. आमचं बोलणं झालंय.

“तेच नकोय मला.” ममाचा आवाज चढला.

“का? मी जसा तुझा मुलगा आहे, तसा त्याचा पण आहेच ना!”

ममाने चमकून माझ्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात पाणी होतं.
“हो, विसरलेच होते रे. तुला जो योग्य वाटेल तो निर्णय तू घे.” ममा त्यानंतर एकही वाक्य बोलली नाही.

कधी नव्हे ते ममावर चिडलो. माझ्या आयुष्याचा महत्वाचा निर्णय सुद्धा ह्या दोघांमुळे मी घेऊ शकत नव्हतो. पपाचं असं दूर जाणं आणि ममाचा इगो! रागाच्या भरात बाहेर पडलो. आणि ह्या रेस्टॉरंटसमोर उभा होतो. मागून पाठीवर थाप पडली म्हणून वळून बघितलं तर चंदन उभा होता. “तू इधर क्या कर रहा है? जा, बच्चा घर जा! ये जगह तेरे लिये नही है.” चंदन मला चिडवत म्हणाला.

“चंदन, तू बारमध्ये चाललाय?”

“नाहीतर काय तुला भेटायला आलोय? आज दिमाग आउट है. घरसे झगडा करके आया हूँ. चल अंदर! मी बिअर घेतो, तू कोल्डड्रिंक घे.”

“चंदन, आज मला पण बिअर घ्यायची आहे.”

“ममाज बॉय, परमिशन घेतली का?” चंदन जोरात हसत म्हणाला.

“आत चल! आज मी पण ममाशी भांडलोय.”

चंदनने बिअर ऑर्डर केली. पहिला सिप घेतल्यावर त्याची चव इतकी कडवट लागली की लोकं कसे घेतात हा प्रश्न पडला.
“आज बापसे लडके आया हूँ!” चंदन सिप घेत म्हणाला.

“काय झालं चंदन?”

“मी युएसला एम एस करायला जावं म्हणून माझ्या मागे लागले. मुझे नही जाना.”

त्याक्षणी चंदन मला पृथ्वीतलावरचा सर्वात मूर्ख प्राणी वाटला. आमचं दोघांचं घरी बिनसायचं कारण युएस होतं पण विरुद्ध अर्थाने!
“चंदन, आर यू मॅड? वडील तुझ्या मागे लागले आणि तू नाही म्हणतोय?”

“हो, कारण मी खूप आधीच ठरवलं होतं की मी इंजिनिअर झाल्यावर भारतातच नोकरी करेन आणि माझ्या माँला सुखी करेन. माझ्या वडिलांनी फक्त पैशाला महत्व दिलं. दिवसरात्र काम आणि गडगंज पैसा हेच त्यांचं आयुष्य! माझी माँ एक साधी गृहिणी आहे रे! तिने विनातक्रार ते सगळं स्वीकारलं. कधी कुठे बाहेर जाणं, फिरायला जाणं नाही. सतत नातेवाईकांच्या घोळक्यात राबत राहिली. मी आठवीत असताना, एक दिवस मला जवळ घेऊन खूप रडली. तिचं ते केविलवाणं रडणं बघून मी देखील रडलो पण नंतर तिचं दुःख कळायला लागलं. ती आतून एकटी होती, आणि आधार शोधत होती. तेव्हा मी लहान होतो पण आता मी तिचा आधार होणार. तिला सोडून मी यूएसला जाणार नाही. जिथे जॉब मिळेल तिथे तिला घेऊन जाईन.पर बच्चा, तू क्यूँ डिप्रेस हुआ है?”

मी माझ्या मनातलं लपवत म्हणालो,
“काही नाही रे, ममाशी किरकोळ भांडण झालं. चंदन, मी पहिल्यांदा घेतलीय, डोकं जड झालंय. मी निघतो. आणि तू पण जास्त घेऊ नकोस. घरी नीट जा.”

“डोन्ट वरी, तू तुझी काळजी घे, बाय.”

चंदनला बाय केलं आणि बाहेर आलो. आमच्या दोघांच्या विचारात किती तफावत होती. ममाला उलटून बोलल्याचा मला पश्चाताप झाला. हा प्रश्न मी शांतपणे पण सोडवू शकलो असतो, तिला दुखवून नाही.

घराचं लॅच उघडलं आणि आत आलो . अंदाज घेतला, ममा झोपली होती. तिच्या खोलीत गेलो. खूप रडली असावी बहुतेक! गालावर सुकलेले अश्रू दिसले. तिच्या टेबलवरचा कागद, पेन मी घेतला आणि त्यावर लिहिलं…

माय डिअर ममा…
सॉरी!

पांघरूण घेतलं आणि बाहेर झोपायला आलो. बिअरची गुंगी का काय, लगेच झोप लागली. सकाळी खूप उशीरा जाग आली. किचनमध्ये आलो. ममा तिचा टिफिन भरत होती.

“ममा सॉरी, काल मी बिअर घेतली.”

“आई आहे तुझी! कळलं मला!”

“ममा, मी नाही जाणार यूएसला.”

“अनि, आय एम सॉरी बेटा! मी स्वार्थी झाले होते. तुझ्या भविष्याचा विचारच केला नाही. तू यूसला जायच्या तयारीला लाग. पण एका अटीवर! तू कायमचा तिकडे राहणार नाहीस.”

“डन ममा!” मी अत्यानंदाने ममाचा हात धरला आणि तिला कुशीत घेतलं. लहानपणी तिच्या कुशीत झोपताना मी निर्धास्त असायचो. आता माझ्या आधाराने तिला निर्धास्त करायचं माझं कर्तव्य होतं….

—————-

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

One Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}