मंथन (विचार)मनोरंजन

*आजची सतर्क पिढी* श्रद्धा जहागिरदार

*आजची सतर्क पिढी*
“सुनबाई, अगं 9:35 झाले आहेत. अजून मीनल उठली नाहीये. आजकालच्या मुलांना कोणत्या पध्दती नको, संस्कार नको, स्वतंत्र पणे जगायला आवडते.” आज्जीने देवपूजा करुन डायनिंग टेबल वर बसत सुनबाई ला हे बोल सुनावले. “अगं लग्न झाल्यावर कोणती सासू हे लाड पुरवणार आहे. लवकर उठणे नाही, घरात आईला कोणती मदत म्हणून नाही, घरात लक्ष देणे नाही, नेहमी आपला तो मित्र परिवार, कॉलेज त्यातच बिनधास्त जगायचं”. “होऽऽ आई, उठेलच ती थोड्या वेळात. मी जाते उठवायला.”
मीनल ही कॉलेजच्या Last year ला होती. एकुलती एक त्यामुळे लाडाकोडात वाढलेली. कॉलेज झाल्यावर घरी येऊन जेवायचे व आपल्या रुम मध्ये जाऊन फोन वर मैत्रीणींशी गप्पा मारत बसणे. तशी ती हुशार होती. बाराववीला ला मेरीट मध्ये आलेली. आता पण Msc करताना चांगल्या मार्काने पुढे आली होती.
आताची पिढी म्हणजे लाडात वाढलेली. एकुलते एकच मुल असते त्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यांच्या मनासारखी. स्वत: चा निर्णय स्वत: घेण्याची त्यांच्यामध्ये क्षमता असते. Social Media मुळे सर्व गोष्टींची त्यांना माहिती झालेली असते. मीनल चे पण तसेच होते. तिला सर्व गोष्टींची माहिती होती.
मीनल शेवटच्या वर्षालाला होती पण अजुन तिचा अल्लड पणा गेला नव्हता. लाडिकपणे आज्जीच्या गळ्यात पडली की आज्जी म्हणायची “अंग आता लग्नाला आलीस तू मोठ्यांसारखं वागायला शिक जरा.” आज्जी ला मीनलचे हे वागणे पटत नसे. नेहमी त्या मीनल ला संस्काराचे बोल द्यायच्या. पण मीनल “झालं तुझं सुरु आज्जी, मी बघेन गं सगळ” असे म्हणून तेथून काढता पाय घेत असे.
आज सकाळी लवकरच मीनल तयार झाली. “आई येते गं रात्री आठपर्यंत” म्हणत ती बाहेर पडली. आज्जी मात्र तिच्याकडे रागाने पहात होती. तिचे ते मित्रांसोबत फिरणे, तोकडे कपडे घालून ती आत्ता बाहेर पडली होती. आज्जीला बिलकुल तिचे वागणे आवडले नाही.
आजची पिढी एवढी चोखंदळ आणि हजरजबाबी असते की आपण काही सांगायला गेलो तर ती आपल्याच ज्ञानात भर घालते. त्यामुळे आज्जी मीनलच्या ऐवजी सुनबाई ला चांगले बोल सुनवत असत. मीनल वरुन त्यांच्यात व सुनबाई मध्ये वाद झाला.
मीनल चे बाबा व आई 4 दिवसांसाठी परगावी निघाले होते. घरी मीनल व आज्जी दोघीच राहणार होत्या. मीनलला आई सगळ्या सुचना देत होती. “आज्जी कडे लक्ष दे.” आज्जीची औषधं कधी, कोणती घ्यायची ती सविस्तर पणे सांगितले.
“आई – बाबा तुम्ही काळजी करु नका मी बघते सर्व काही.” पण आज्जी मात्र मनात म्हणत होती “आता सगळं हरी हरी!! च आहे. या मीनल ने कसं संभाळावं चार दिवस घर. देवा तुच संभाळ रे बाबा ” म्हणत ती डोक्याला हात लावून सोफ्यावर बसली.
सकाळी 6-30 लाच मीनल चा आवाज आज्जीच्या कानावर आला. “आज्जी चहा तयार आहे. ब्रश करुन ये. तुझे गरम पाणी टेबल वर ठेवले आहे.” आज्जी विस्मयतेने मीनल कडे पहात होती. त्या चार दिवसामध्ये मीनल ची वागणुक पुर्ण बदलली. सगळी कामे ती व्यवस्थितरित्या करत होती. आज्जीची औषधं, तिचा नाष्टा, पथ्य सर्व काही वेळेवर करत होती. मीनलचे हे रुप आज्जी ला नवीन होते. आज्जी आज्जी करत ” तुला खायला काय करुन देऊ? अशी प्रेमाने सगळी कामे करत होती. आज्जीला हे वागणे आश्चर्यकारक वाटत होते.
मध्येच आज्जीचे बिपी खुप लो झाले. तिला दवाखान्यात ॲडमीट करावे लागले. ही परिस्थिती मीनल ने न घाबरता, न गांगरून जाता हाताळली. ताबडतोब ॲंबुलन्स मागवून आज्जी ला ॲडमीट केले. आज्जी जवळ मैत्रिणीला बसवून डॉक्टरने सांगितलेली औषधे, जेवण आणले. आज्जीला प्रेमाने भरवले. भरवताना आज्जी च्या डोळ्यात मायेचे अश्रु भरभरुन वहात होते. मीनलचे हे रुप तिला खरे वाटतच नव्हते. आज्जीची तब्येत बिघडली म्हणून आई – बाबा लवकर आले.
सुनबाई आज्जी जवळ गेल्या आज्जी भरल्या डोळ्याने सुनबाई ला म्हटली “सुनबाई मीनल ने चार दिवसात मला वेगळच रुप दाखवलं गं. माझी एवढी काळजी घेतली की मी भरभरुन पावले. तिचे ते लोभस रुप, मधाळ बोलणे, प्रेमाने आज्जी आज्जी करणे. गुणाची ती माझी नात”
“अहो सासुबाई, मला माहीत होते मीनल सगळं व्यवस्थित करेल. घर संभाळेल. आजची पिढी आहेच ओ तेवढी तत्पर. समयसूचकता त्यांच्या जवळ असते. ”
“हो मग! नात कुणाची आहे..!!”
“सासुबाई तुम्ही पण ना!” असे म्हणत दोघींनी कौतुकाने मीनल कडे पाहिले.
आजची पिढी जरी बिनधास्त, स्वतंत्र मताची असली तरी हुशार आहे. सोशल मीडिया मुळे सर्व गोष्टी ते आत्मसात करतात. तत्पर आणि सतर्क असतात. या पिढीचे पुढील भवितव्य नक्कीच चांगले असणार.
श्रद्धा जहागिरदार🙏

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}