डोळे कशासाठी??? सई सुमंत
डोळे कशासाठी???
पाहण्यासाठी….
सुंदर निसर्ग डोळ्यात सामावून घेण्यासाठी…
झोपेत बघितलेली स्वप्ने प्रत्यक्षात आलेली बघण्यासाठी….
पाच ज्ञानेन्द्रयांपैकी एक म्हणजे डोळा. अत्यंत महत्त्वाचा अवयव! दिसतो खूप छोटासा पण अतिशय गुंतागुंतीचे कार्य यामध्ये चालते. प्रत्येक गोष्टीचे सूक्ष्म अवलोकन डोळ्याद्वारेच केले जाते. डोळ्याचे कार्य थोडक्यात सांगायचे झाले तर कुठल्याही गोष्टीची प्रतिमा सर्वप्रथम नेत्रपटल म्हणजे कॉर्नियावर पडते त्याच्या वक्रतेमुळे आणि पारदर्शकपणामुळे त्याच्यात विशिष्ट पॉवर असते त्यातून त्या वस्तू पासून निघणाऱ्या किरणांचे म्हणजे रेज चे अपवर्तन होते पुढे भिंगापाशी पुन्हा एकदा ठराविक पॉवर असल्याने अपवर्तन (म्हणजे रिफ्रॅक्शन होते) आणि ते किरण एकवटत ( converge) पाठीमागे जाऊन रेटीना वरील मॅक्युला या नाजूक भागावर पोहोचतात. तिथूनच पुढे नर्व फायबर मार्फत संदेश वहनाचे कार्य सुरू होते. एखादी वस्तू आपल्यापासून किती अंतरावर आहे त्याचा आकार, रंग, लांबी, रुंदी इत्यादी अनेक गोष्टी आपल्याला विस्तृतपणे बघता येतात.
तसे म्हटले तर “दृष्टी” ही कॉर्निया म्हणजे बुबुळ, डोळ्याचे नैसर्गिक भिंग म्हणजे लेन्स, मागचा पडदा म्हणजेच रेटीना आणि डोळ्याची नस या चार महत्त्वाच्या भागांवर अवलंबून असते. या चारही मध्ये कुठे बिघाड झाला तर दृष्टीला हानी पोहोचते. पैकी फक्त मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर दृष्टी परत येण्याची शक्यता असते बाकी तीन गोष्टींना आजार झाल्यास ही शक्यता कमी प्रमाणात आढळते. अशा महत्त्वपूर्ण अवयवाची /डोळ्यांची माहिती आणि त्याचे आरोग्य नीट कसे राखावे हे सर्वांना माहिती असावे तसेच डोळ्याच्या काही जुजबी आजारांविषयी थोडक्यात माहिती आणि शक्य तिथे उपचार सांगण्यासाठी हा लेख लिहिण्याचा प्रयत्न केला आहे
आता आपण डोळ्याचे वरकरणी दिसणारे आजार पाहूयात
- डोळ्याची पापणी – सूज, जंतू संसर्ग, चष्मा असूनही न वापरणे यामुळे रांजणवाडी चा आजार होतो. जर रांजणवाडी जुनाट झाली तर तेथे गाठ तयार होते आणि त्याला शस्त्रक्रिये व्यतिरिक्त पर्याय नसतो. अस्वच्छतेमुळे सुद्धा डोळ्याच्या पापणीच्या केसांच्या मुळाशी कोंड्या सदृश पदार्थ दिसतो औषधे आणि मलमे याचा वापर करून उपचार शक्य आहे
- डोळ्याचे बुबुळ अतिशय नाजूक असते त्याच्यावर एकदा टिक म्हणजे पांढरट डाग आला की तो कायमस्वरूपी राहतो म्हणून त्याची सर्वात जास्त काळजी घेणे गरजेचे आहे कोणतीही इजा होऊ नये यासाठी डोळ्याला संरक्षक गॉगल, चष्मे, शील्ड्स वापरणे गरजेचे आहे.
- बुबुळाच्या बाजूला कंजंक्टायव्हा नावाचे पारदर्शक पातळ पटल असते. आपण डोळे आले असे जेव्हा म्हणतो तेव्हा तो या आवरणाला झालेला जंतू संसर्ग होय आणि डोळ्यातून अति प्रमाणात चिकट, पांढरट, पिवळट घाण येणे, डोळ्यात टोचणे, डोळा खूप लाल होणे, खूप पाणी येणे, क्वचित उजेड सहन न होणे अशा प्रकारचे प्रकारची लक्षणे दिसतात. हा आजार औषधांनी बरा होतो. अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल, हा संसर्गजन्य आजार असल्याने खबरदारी घेणे गरजेचे आहे जसे आपल्या वस्तू इतरांना हाताळू न देणे. साध्या प्रमाणातला जंतुसंसर्ग हा आपल्या प्रतिकार शक्तीनुसार आपल्या आपण बरा होतो अन्यथा त्याला प्रतिजैविक म्हणजे अँटिबायोटिक डोळ्याचे थेंब गरजेचे असतात
- पुढचा डोळ्याचा अतिसामान्य असणारा आजार म्हणजे मोतीबिंदू. खरंतर मोतीबिंदू हा आजार नसून वयोमानानुसार डोळ्यात होणारा बदल आहे. जसे केस पांढरे होतात तसेच डोळ्यातील नैसर्गिक भिंग पांढरे होते. आणि दृष्टी धुसर होते. यावर शस्त्रक्रियेव्यतिरिक्त दुसरा पर्याय उपलब्ध नाही. शस्त्रक्रियेनंतर 90 ते 95 टक्के गेलेली नजर परत येण्याची खात्री असते. सध्या सुईतून फोल्डेबल लेन्स टाकून बिन टाक्याच्या शस्त्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीने आणि उच्च तंत्रज्ञान वापरून केल्या जातात. ही जखम लवकर बरी होऊन रुग्ण पुढच्या दहा ते बारा दिवसातच आपली दैनंदिन कामे करू शकतो आणि आनंदी जीवन जगू शकतो .याबाबतीत उच्चतंत्रज्ञान हे वरदानच म्हणायला हवे
- डोळ्यासमोर काळपट ठिपके हालताना दिसणे ह्याला शास्त्रीय परिभाषेत व्हिट्रीयस फ्लोटर असे म्हणतात. डोळ्याच्या आत मध्ये असणारा जेली सारखा पदार्थ वयोमानानुसार पातळ होत जातो. आणि त्याची नैसर्गिक संरचना बदलत असल्यामुळे डोळे हलले की हा पदार्थही डोळ्याबरोबर हलतो त्यामुळे डोळ्यासमोर कोळ्याचे जाळे, केसाची बट, भरपूर काळपट/चंदेरी रंगाचे ठिपके हालत आहेत असा भास होतो बहुतांश वेळा यामध्ये गंभीर आजार नसतो पण दृष्टी फारच गढूळ झाल्यास व्हिट्रीयो रेटायनल सर्जनला भेटणे गरजेचे असते. डोळ्याच्या बाहुल्या डोळ्यात थेम्ब घालून मोठ्या करून डोळे आतून व्यवस्थित तपासून घ्यावेत
- काचबिंदू- हा डोळ्यासाठी अतिशय घातक असणारा आजार आहे. बहुतांश वेळा हा आजार अनुवंशिकतेमुळेच असतो. स्टिरॉइड सारख्या औषधांचा अति प्रमाणात वापर, डोळ्याला मार लागणे, डोळ्याच्या इतर शस्त्रक्रियांनंतरचा दुष्परिणाम अशा प्रकारची कारणे यामागे असतात. यामध्ये डोळ्याची आजूबाजूची दृष्टी हळूहळू कमी होत पूर्णपणे नाहीशी होण्याचाही धोका असतो. याचे मुख्य कारण म्हणजे डोळ्याचा दाब ठराविक मर्यादे पलीकडे जाऊन डोळ्याच्या नसेला कायमस्वरूपी इजा होते आणि दृष्टी दोष उद्भवतो. बऱ्याचदा हा आजार छुप्या पावलाने येतो. त्याची खूप मोठी विशिष्ट लक्षणे रुग्णाला जाणवतही नाहीत म्हणूनच प्रत्येक माणसाने वर्षातून एकदा तरी आपले डोळे व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे. काचबिंदूवर औषधे आणि शस्त्रक्रिया दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत तथापि औषधांचा परिणाम व्यवस्थित होत आहे ना हे पाहण्यासाठी वर्षातून एकदा डोळ्याची नस आणि दृष्टी क्षेत्र तपासणी करून घ्यावी
- चष्म्याचा नंबर ही एक सामान्य समस्या आहे. दुर्दैवाने कोविड-19 च्या काळानंतर अनेक लहान मुलांना सतत मोबाईल कम्प्युटरच्या अतिवापराने तसेच खोलीतल्या खोलीतच सतत बैठे खेळ खेळल्याने चष्म्याचे नंबर लागण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे असे आढळते. डोळ्याला नीट दिसत नसेल तर लांबचा म्हणजेच मायनस नंबर किंवा चाळीशी नंतर लागणारा जवळचा प्लस नंबर असण्याची शक्यता असते. या व्यतिरिक्त बुबुळाच्या विचित्र वक्रपणामुळे सिलेंड्रिकल प्रकारचा नंबर लागू शकतो. चष्मा लावणे, कॉन्टॅक्ट लेन्स चा वापर, लेसिक शस्त्रक्रिया हे यावर पर्याय असू शकतात, व्हिजन थेरपीद्वारे डोळ्याच्या स्नायूंचये कार्य वाढवून सुद्धा डोळ्याचा लहानसा नंबर घालवता येतो का यावर संशोधन कार्य चालू आहे
- तिरळेपणा – जन्मजात असणारा, डोळ्यांच्या स्नायूंचे कार्य थांबल्यामुळे, अपघातानंतर येणारा, मेंदूच्या आजारांमुळे येणारा तिरळेपणा, डोळ्याच्या नंबरमुळे येणारा तिरळेपणा, डोळ्याचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यामुळे येणारा तिरळेपणा आणि कवटीच्या विशिष्ट आकारामुळे, डोळ्याच्या ठेवणीमुळे जाणवणारा खोटा तिरळेपणा असे अनेक प्रकार आहेत. याच्यावर शस्त्रक्रिया हा उपाय आहे तसेच मूळ कारण शोधून काढले तर इतर उपाय करता येतात
- रेटीना चे आजार– अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, शरीराशी संबंधित इतर आजार या सर्वांमुळे रेटीनाला सूज येऊन दृष्टी जाण्याची शक्यता असते. औषधे, गोळ्या डोळ्याला दिले जाणारे इंजेक्शन, रेटीनाची शस्त्रक्रिया, रेटिनासाठीची विशिष्ट लेझर थेरपी असे उपाय यावर असतात. मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी वर्षातून एकदा डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या करून डोळे आतून तपासून घेणे गरजेचे आहे
10 रातांधळेपणा म्हणजे रात्रीचे न दिसणे आणि रंग आंधळेपणा म्हणजे रंगांमध्ये फरक न ओळखता येणे. हा आजार बहुतांश वेळा अनुवंशिकच असतो. यावर सध्या तरी ठोस असा उपाय उपलब्ध नाही तथापि जीवनशैलीत आणि काही बदल अमलात आणल्यास आयुष्य जगणे सोपे जाते. पण रातांधळेपणा असणाऱ्यांची दृष्टी आयुष्याच्या मध्यावर पूर्णपणे मालवण्याची शक्यता अधिक आहे त्यामुळे हा घातक आजार आहे
डोळ्याच्या डॉक्टर कडे जाऊन या दोन्हीचे तपासणी आणि निदान करता येते
11 कम्प्युटर विजन सिंड्रोम –
कम्प्युटर च्या अतिवापराने काय होते? डोळे कोरडे पडणे, डोळ्यात सतत टोचल्याची जाणीव होणे डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यावर सतत ताण राहणे, झापड आल्यासारखे होणे, कमी मध्यम स्वरूपाची डोकेदुखी राहणे आणि सतत डोळे थकल्यासारखे वाटणे, लाल होणे इत्यादी अनेक तक्रारी असे रुग्ण करतात. यावर उपाय म्हणजे कम्प्युटरवर काम करत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेणे, वीस–वीस–वीस असा नियम वापरणे म्हणजे दर 20 मिनिटांनंतर 20 फुटांवर दृष्टी केंद्रित करणे, 20 सेकंद डोळे बंद ठेवणे . असा व्यायाम करावा, डोळ्याची भरपूर उघडझाप करावी, भरपूर पाणी प्यावे, डोळ्यांना पुरेशी विश्रांती /झोप आवश्यक आहे. खूप प्रमाणात कोरडेपणा असल्यास डोळा ओलसर ठेवणारे ड्रॉप डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरावेत
12 डोळ्याच्या काही तपासण्या ओ सी टी– ऑक्युलर कोहेरन्स टोमोग्राफी(रेटिना तपासणी) , ऑप्टीकल बायोमेट्री(डोळ्याचे मापन पेरिमेट्री , टॉपोग्राफी( बुबुळाचे वक्रता वगैरे मापन ) डायलटेड फंड चेक अप (डोळ्याच्या बाहुल्या मोठ्या करून आतून तपासणी) , नॉन कॉन्टॅक्ट टोनोमेट्री( डोळ्याचा दाब तपासणे ) , स्लिट लॅम्प तपासणी( डोळ्याच्या पापण्या बुबुळ, कंजंक्टायव्हा तपासणे) ऑटो रिफ्रॅक्टोमीटर(कम्प्युटर द्वारे डोळ्याचा नंबर तपासणे) , मेबोग्राफी( डोळ्याच्या पापणीची तपासणी) इत्यादी
डोळ्यांविषयी काही गमतीदार समज :-
- डोळे आलेल्या रुग्णाकडे केवळ बघितल्याने आपल्यालाही डोळे येतात.
- एकदा चष्मा लावला की हळूहळू लावून तो नंबर निघून जातो.
- औषधाने मोतीबिंदू निघून जातो
डोळ्याचे आरोग्य आणि दैनंदिन सवयी–
१ डोळे चोळू नये.
२. इतर कोणाचे हि औषध अथवा चष्मा वैद्यकीय सल्ल्याशिवाय वापरू नये
३. डोळे लाल झाल्यास केवळ ऐकीव ज्ञानावर घरगुती उपाय करत काहीही डोळ्यात टाकू नये
४ योग्य नंबरचा, योग्य आकाराचा चष्मा वापरावा
५ वाचताना पुरेसा उजेड हवा
६ योग्य झोप आणि विश्रांती घ्यावी
७. सकस आणि चौरस आहार घ्यावा .
८ अ , इ, क जीवनसत्व भरपूर मिळेल असा आहार घ्यावा.
९ डोळ्याचे नियमित व्यायाम करावे जसे डोळे सर्व दिशांना फिरवावे, दृष्टी जवळ लांब हलती ठेवावी.. इत्यादी
डोळ्याचे इतरही गंभीर असणारे आणि नसणारे आजार आहेत . नियमित डोळे तपासणी केल्यास योग्य निदान आणि उपचार मिळाल्यास डोळे सुरक्षित राहू शकतात.
सई सुमंत
97674 39208