कशासाठी तो अट्टाहास पदवीचा पुढचा जन्म हवा फक्त नाविकाचा

कशासाठी तो अट्टाहास पदवीचा
पुढचा जन्म हवा फक्त नाविकाचा
महाकुंभातले ते 45 दिवस आणि रात्रीसुद्धा एखाद्याचे नशीब एवढे बदलू शकतात. काय असतं नशीब म्हणजे?
‘खेळणं बास आता अभ्यासाला बस’ हे वाक्य कानावर पडायची सवय होऊन बालपण आले तसे निघूनही गेले. कधी क्रिकेटपटू व्हायची स्वप्ने धुळीला मिळायची तर कधी उत्तम धावपटू व्हायची. गल्लीमध्ये हाफ पीच क्रिकेटला ऊत यायचा. टेनिस बॉलवर खेळताना सिक्सर बसली की मन भरून यायचं. कुठल्यातरी घराच्या लाकडी खिडकीवर चेंडू आदळायचा. फलंदाजच अघोषित अंपायर असायचा आणि तोच सिक्सर घोषित करायचा. केव्हातरी आठवी नववीत असताना ‘जिमखाना डे’ला धावण्याच्या स्पर्धेत पहिला आलो आणि मिळालेले सर्टिफिकेट घेऊन नाचत घरी गेलो आणि छाती फुगवून घरी दाखवलं तर ‘बस झालं आता उंडारणं, अभ्यासाचं बघ तेवढं. दोन वर्षात दहावी येईल. मग दहावीला 75% मार्क मिळवण्याचं स्वप्न…
पण तू नाविक हो, रग्गड पैसा मिळवशील नि करियर भरभराटीला येईल, असं पालकांनी कधी म्हटल्याचे आठवत नाही.
महाकुंभ मेळा, ते 45 दिवस, 130 नावा आणि 30 कोटी रूपये, वाचून डोळे पांढरे झाले. कशाला अभ्यासाच्या नि पदवी मिळवण्याच्या मागे लागलो? पोहता पोहता कधीकाळी नाव वल्हवायला शिकलो असतो तर दीड महिन्यात कोट्यवधी मिळवले असते. हाय काय न् नाय काय… जन्म प्रयागराजचा, नावा चालवण्याचा वडिलोपार्जित धंदा, मोठं नाविक कुटुंब, सरकारने ठरवून दिलेला दर 483 रूपये. पण पाप धुवून काढायच्या नादात जनता कमीतकमी 1000 रुपये द्यायला तयार. एकाने तर 30000 द्यायचे मान्य केले कारण त्याला पापं धुवून लागलीच कामावर रुजू व्हायचं होतं.
दुसरं म्हणजे नावेत 10 जणच बसवायचा नियम पण लोक ऐकतायत होय.. तिथंही जीवघेणी स्पर्धा पाप धुवून काढायची… 25 जण आरामात बसवायचे. सहा हजारच्या जागी एका फेरीत साठहजार. अशा अगणित फेऱ्या… रोजचे काही लाख मिळायला लागले आणि 45 दिवसांत 30 करोड… विद्यापीठांमध्ये नाविक पदविकेचा अभ्यासक्रम सुरू केला तर तिथेच लाखोंची उलाढाल होईल.
आता वाटतं, प्रयागराजमध्ये जन्माला आलो असतो तर? त्या ‘पिंटू महारा’ नाविकाच्या कुळात जन्माला आलो असतो तर? पोहता पोहता नाविक झालो असतो तर… पदवी मिळवली, नोकरी केली पण त्या 30 कोटीतला एकतरी कोटी खिशात आला का आतापर्यंत?
ठरलं तर मग, पुढच्या जन्मी नक्की नाविक व्हायचं.. तोपर्यंत 144 वर्षे होऊन गेली असतीलच…. मग प्रयागराजला कोट्यवधी कमवायचे… बाकी हे इंजिनियरिंग, मेडिकल सब झुठ हैं….
अगला जनम ‘नाविक’ही सही
डॉक्टर होकर पेशन्टसें अच्छा ‘भाविक’ ही सही
😃
©सदानंद