अस्तित्व* सौ. श्रध्दा

अस्तित्व*
नारायण, नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध आमच्या गुरुजींनी आम्हाला करायला सांगितले. आम्ही विचार करत होतो करावे का नाही? केल्याने खरच काही फरक पडतो? म्हटलं ह्या श्रध्देच्या, विश्वासाच्या गोष्टी पण आहेत. शेवटी विश्वास ठेवावा न ठेवावा हे आपल्या हातात.
हो – नाही करत करायचे ठरवले.
दुपारी गाडी काढून नरसोबाची वाडी येथे निघालो (तेथेच सांगीतले होते) मी श्रीपादवल्लभ ची खूप भक्त आहे. मनात खूप दिवसांपासून वाटत होते कुठेतरी दत्ताच्या ठिकाणी दर्शन व्हावे. योगायोग नरसोबाची वाडी येथे नरसिंह सरस्वती, गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ चा अवतार. त्यांचे बोलावणे आले. सकाळी आपला युनिटीचा मेडिकल कॅम्प करुन दुपारी निघालो.
माहिती नाही एक वेगळाच उत्साह होता मनात. म्हटलं श्रीपादवल्लभा तुला भेटण्याची इच्छा होती ऐकलीस तू. मनातून नमस्कार केला.
सकाळीच दर्शनाला गेलो. काहीही गर्दी नाही. मला गर्दी ची भिती वाटते म्हणून शक्यतो मी त्याच्या नादी लागत नाही. आणि आज काल आपण पाहतो प्रत्येक तिर्थक्षेत्राला गर्दी असते. मला आधीच टेंशन आले गर्दी असेल तर दर्शन कसं करु. देवाचा धावा केला म्हटलं येथपर्यंत बोलावलेस दर्शन देणं न देणं तुझ्या हातात. मी तुझ्या गर्दीमुळेच दर्शन झाले नाही असे म्हणणार.
पण मंदिरात गेले काहीही गर्दी नाही ते पाहून मला तर नाचू की काय असे झाले एवढा आनंद झाला. शांतपणे दर्शन घेताना डोळ्यात पाणी आले म्हटलं श्रीपादा किती रे तुला काळजी माझी. तुला भेटण्याची इच्छा ती पुर्ण केलीस, माझ्यासाठी जास्त लोक पण दर्शनाला ठेवले नाहीस. कळवळून मुर्ती कडे पाहिले. असे वाटले स्मितहास्य करुन माझ्याकडे पहात आहे. निवांत समोर बसले त्याला म्हटले का तुझं अस्तित्व नाकारायचे? आज माझ्या बाबतीत जे घडले ते तुझ्या अस्तित्वामुळे च. कोण म्हणतं देव नाही? अरे प्रत्यक्ष माझ्या हाकेला धावून आलास तू.
डोळे भरुन दर्शन घेतले. नंतर विधी करण्यासाठी नदी घाटावर गेलो. विधी होताना मी पहात होते, मनात येत होते बरे झाले आपण हे सांगीतलेले विधी करत आहोत. म्हणजे मनात एक आशा पल्लवीत झाली होती, आपली समस्या आता दुर होणार. आता आपल्याला काळजी नाही. म्हणजे मी नकळत पणे त्या विधी कडे सकारात्मकतेने पहात होते. आम्हा दोघांना प्रसन्न वाटत होते. गुरुजी पण व्यवस्थित पणे समजावून सर्व सांगत होते.
दुपारी परत मंदिरात गेले. समोर बसले. मुर्ती फुलांनी एवढी सुंदर सजवली होती त्यातून सात्विकता, प्रसन्नता शांतता, भक्ती मनाला मोहून टाकत होती. किती दर्शन घेतले तरी तेथून निघावेसे वाटत नव्हते.
दुसरे दिवशी चे विधी झाले. एकंदरीत दोन दिवस विधी झाले. आम्ही दोघे जण अशा पवित्र्यात निघालो चला आता आपली समस्या दुर होणार.
मंडळी, कोण म्हणते देवाचे अस्तित्व नाही. माझा हा एकंदरीत अनुभव मन हेलावून टाकणारा आहे.
शेवटी ईश्वरा वरील श्रध्दा, विश्वास, भक्ती हेच कारण देवाचे अस्तित्व मान्य करायला पुरेसे आहे.
तो विश्वासच आपल्या मनामध्ये आशा निर्माण करतो. ती श्रध्दाच संकटाशी सामना करायला आपल्याला बळ देते.
प्रत्यक्ष देव येवून म्हणजे हातात त्रिशूळ घेतलेला, मुकुट घातलेला, गदा घेतलेला आपल्या समोर येऊन आपली संकटं दुर नाही करणार. तर आपल्यातील ईश्वरा विषयी वाटणारी श्रध्दाच आपल्याला देवाचे अस्तित्व दाखवणार आहे.निघताना प्रसन्न चित्ताने परत एकदा दर्शन घेतले श्रीपाद वल्लभ चा जप करत परतीच्या मार्गाला लागलो.
हेच ते देवाचे अस्तित्व.
सौ. श्रध्दा