तेजस्वी तपस्विनी ………….. सौ योगिनी कुलकर्णी.

तेजस्वी तपस्विनी
२००८ च्या मे महिन्यात मी पहिल्यांदा लता ताईंना भेटले. पराग ताईंचा सोलापुरातला विद्यार्थी असल्याने आमच्या लग्नाचे पौरोहित्य करण्यासाठी लताताई आणि अपर्णाताई कल्याणी आल्या होत्या. त्या आधी ताईंचे वर्षभर मौन होते म्हणून आम्ही लग्नाची तारीख ताईंना येता येईल अशी ठरवली होती. लग्नाआधी छात्र प्रबोधनची ओळख होती पण प्रबोधिनीशी एवढी ओळख नव्हती.
ताईंना पाहिल्यावर लगेच लक्षात आले की किती तेजस्वी, साध्या वेशातल्या मोठ्या साधक आहेत ह्या! आपल्याला तासभर गप्प बसता येत नाही पण वर्षभर साधना करत मौनात राहणाऱ्या लता ताईंबद्दल माझ्या मनात कुतूहल निर्माण झाले. मला त्यांचे काम तेव्हा एवढे माहित नव्हते. साधना करणाऱ्या प्रबोधिनीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या एवढाच काय तो परिचय! (एवढ्या मोठ्या आहेत आणि त्यांना फक्त ‘ताई ‘ कस म्हणायचं? असा प्रश्न होताच मला, कारण पुण्यात आल्यावर प्रबोधिनी समजू लागली!)
त्यानंतर जसे जसे ताईंना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भेटत गेले तसे त्यांचे व्यक्तिचित्र उलगडू लागले. लता ताईंचे मृदु शब्द, पाठीवरून प्रेमाने फिरवलेला हात, मनमोकळ्या गप्पा हे सर्व मला लाभले त्यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजते.
माझे सासरे हराळीच्या सौर प्रकल्पासाठी दोन वर्ष आ. अण्णा आणि आ. ताईंच्या मार्गदर्शनाखाली काम करत होते त्यावेळी आम्ही भेटायला हराळीला जायचो. हराळीला गेल्यावर आमचे खूप प्रेमाने स्वागत आणि आदरातिथ्य व्हायचे.. त्यावेळी ताईंचे काम समजून घेण्याचा प्रयत्न केला होता.. तिथली सकाळी ६ वाजता केलेली उपासना मी कधीही विसरू शकणार नाही. स्वतः आ. अण्णा पेटी वाजवत होते आणि हळू हळू उजाडताना शांत संथ लयीत केलेले परब्रह्म शक्तीचे स्मरण, गायत्री मंत्राची उपासना भारावून टाकणारी होती.
आ.स्वर्णलता ताईंच्या विविध रूपांची ओळख व्हायला लागली.
आधी उजाड असणाऱ्या, हादरवून टाकणाऱ्या जमिनीवर हिरवळ फुलवण्याचे, लोकांच्या जखमी मनांवर फुंकर घालण्याचे काम किती मौलिक असेल याची कल्पना येऊ लागली. गुरुकुलात काम सुरू केल्यावर ताईंचे कार्य अधिकच कळत गेले आणि एवढ्या मोठ्या व्यक्तीची आपली ओळख आहे याबद्दल अभिमान वाटू लागला. त्यांची विविध रूपे उलगडू लागली.
फक्त व्यक्ती नाही तर प्राण्यांवर सुद्धा तितकीच माया करणाऱ्या लता ताई.. Excel नावाच्या छोट्या कासवाच्या पिल्लाला तितक्याच मायेने सांभाळणाऱ्या लता ताई!
उजळती वाट मधून विद्याव्रताच्या सहा व्रतांची सोप्या उदाहरणातून ओळख करून देणाऱ्या लता ताई!
आ. अप्पा पेंडसे यांचे उत्कट चैतन्यदायी चरित्र शब्दबद्ध करणाऱ्या लता ताई!
प्रतिभावान कवयित्री, प्रबोधिनीच्या अनेक पद्य रचना ज्यांनी केल्या (ज्या म्हणताना माहितच नव्हते की या ओळी लता ताईंच्या आहेत) ज्या प्रेरणादायी ओळी सतत वापरत असतो त्याच्या रचनाकार लताताई!
जोनाथन सीगल ह्या कार्यकर्त्यांमध्ये प्रेरणा जागवणाऱ्या पुस्तकातून भेटलेल्या ताई !
गुरुकुल पालक मेळाव्यामध्ये चिंतनिकेच्या सत्रात ‘माणूस म्हणून आपण कसे घडायला हवे’ हे अतिशय सोप्या भाषेत सांगणाऱ्या लता ताई!
स्वतःच्या पद्यातील ओळी शब्दशः जगणाऱ्या लता ताई!
आर्तांना हृदयासि धरावे
श्रांतासाठी छाया व्हावे
असे सर्वांशी लाघवी बोलणाऱ्या अनेक कुटुंबांना, कार्यकर्त्यांना आधार देणाऱ्या लता ताई!
भविष्यवेधी स्वप्न दर्शनी प्रतिभा आम्हा दे
रूप तुझे पलटण्यासाठी दृढतम बाहु दे
असे प्रभावी शब्दसामर्थ असणाऱ्या लता ताई!
यश सुखाची मीठ मोहर मातृमुखी ओवाळूनी..
स्वतः चे सर्वस्व प्रबोधिनीसाठी राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या लता ताई!
पंजाबमधील सद्भावना दौरा असो किंवा दारूबंदी ची हराळीतली चळवळ असो जेवढ्या मृदु तेवढ्याच प्रसंगी कठोर, तेजाने लखखत समोरच्याला गारद करणाऱ्या लता ताई!
माझ्या कुटुंबाने संघर्षाच्या काळात उभारी घेतली ती लता ताईंच्या मार्गदर्शनामुळेच!
ध्येयाचा सुगंध लाभलेल्या या व्यक्तिमत्वाचा मला अल्पकाळ सहवास लाभला हे माझे भाग्य. ताई जरी आता प्रत्यक्ष नसल्या तरी त्यांचे विचार आणि कार्य पुढे न्यायची जबाबदारी आपल्यावर आहे अशी भावना सतत मनामध्ये आहे.
तपस्वी मनस्वी जरी आकृती ती
नसे आज साक्षात समोरी उभी
स्मृतींच्या कृतींच्या हजारो शलाका
तरी चेतलेल्या मनाच्या नभी
कर्मयोगी असणाऱ्या आ. स्वर्णलताताई भिशीकर यांना मन:पूर्वक नमस्कार आणि भावपूर्ण श्रद्धांजली.
धन्यवाद.
सौ योगिनी कुलकर्णी.