*वेड* ©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
*वेड*
मी स्कुटर पार्क केली आणि बिल्डिंगच्या लिफ्टपाशी आले. लिफ्ट वर गेली होती आणि दहाचा आकडा दाखवत होती, म्हणजे अजून दहा मिनिटं जाणार. मला ऑलरेडी उशीर झाला होता. मी पायऱ्या चढायला लागले. सहावा मजला येईपर्यंत माझा दम निघाला. चांगलीच धाप लागली होती. माझा उतावीळपणा.. दुसरं काय!आनंदच्या घरी आज पहिली मिटिंग होती. पु ल देशपांडे ह्यांचं ‘ती फुलराणी’ हे नाटक आम्ही करायचं ठरवलं होतं. आनंदने कॉलेजमध्ये असताना एकांकिकेतलं माझं कामं बघितलं होतं. अभिनय हे माझं देखील पॅशन होतं.
एक दिवस आनंद घरीच आला. जवळपास तीनचार वर्षांनी आम्ही भेटत होतो आनंदने मला मंजुळाचा रोल ऑफर केला. भक्ति बर्वे ह्यांची मी प्रचंड चाहती आणि त्यात त्यांनी साकारलेली मंजुळा मला करायला मिळतेय म्हणजे माझं भाग्यच! आनंदची आणि माझी ओळख एकांकिका स्पर्धेच्या वेळीच झाली होती. तो एक उत्कृष्ट अभिनेता होता. त्यालाही अभिनयाचं वेड होतं. दिग्दर्शन सुमेध करणार होता. व्यावसायिक नाटकांशी तो निगडित होता. सुमेधने त्याच्या व्यस्त वेळेतून आमच्या नाटकाची दिग्दर्शनाची जबाबदारी घेतली होती. हे नाटक स्पर्धेत पहिलं यायलाच हवं होतं.
मी बेल वाजवल्यावर आनंदनेच दार उघडलं. मला लागलेली धाप बघून तो म्हणाला, “चढून आलीस का काय?”
“हो, लिफ्ट खाली यायला वेळ लागला असता आणि मला आधीच उशीर झाला होता.”
“टेक इट इझी राधा. जरावेळ निवांत बस मग आपण चर्चा करू.” सुमेध म्हणाला.
आनंदचे आई-बाबा दिसत नव्हते.
“आनंद, काका-काकू दिसत नाहीय.”
“बाहेर गेले आहेत. बाबांना खरं तर तुला भेटायचं होतं. राधा मंजुळाची भूमिका करतेय हे कळल्यावर ते खुश झाले. योग्य निवड केली म्हणाले.”
माझी आणि आनंदची जशी ओळख झाली तशी अनेकदा मी त्याच्या घरी गेले होते. काका माझ्याशी नाटकांबद्दल खूप चर्चा करायचे. जुनी नाटकं यु ट्यूब वर बघ म्हणून सांगायचे. त्यांनीही त्यांच्या कॉलेजवयीन दिवसात नाटकात कामं केली होती. आनंदने काकांकडूनच अभिनयाचा वारसा घेतला होता.
“राधा, मंजुळाच्या भूमिकेला खूप शेड्स आहेत. गावठी मंजुळा, प्रोफेसरच्या प्रेमात पडलेली मंजुळा आणि त्याच्याकडून दुखावलेली मंजुळा! तुला तुझं टॅलंट दाखवायला पुरेपूर वाव आहे. नाटक निदान पाच वेळा वाच. त्यातले बारकावे कळत जातील. गिव्ह युअर बेस्ट!” सुमेध मला हातात ‘ती फुलराणी’ ची कॉपी देत म्हणाला.
‘ती फुलराणी’ हे नाटक मी नव्या संचातलं बघितलं होतं. पण भक्तीताईंचे काही व्हीडिओ यु ट्यूबवर बघितले होते. मला त्यांचीच मंजुळा फॉलो करायची होती.
……..
फुलराणीची तालीम सुरु झाली आणि दर वेळी मंजुळाचा एक एक पैलू उलगडत गेला. काही प्रसंगात मी स्वतःला मंजुळात बघायला लागले. खूप सहन करून संयमाचा कडेलोट झालेली! अशीच काहीशी मी देखील होते. सहन करून एका सीमेपलीकडे स्वतःचं अस्तित्व दाखवणारी! आनंद प्रोफेसरची भूमिका लाजवाब करत होता. खरोखर अभिनय त्याच्या रक्तातच होता. रोज भेटून,सहवासाने नकळत त्याच्याबद्दल मला आकर्षण वाटायला लागलं. त्यालाही माझ्याबद्दल काहीतरी वाटतंय, हे त्याच्या डोळ्यातून मला अनेकदा जाणवायचं.
प्रयोग अतिशय सुंदर झाला. स्पर्धेत मला अभिनयाचे प्रथम पारितोषिक, आनंदला द्वितीय आणि सुमेधला दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. अतिशय आनंदाचा क्षण होता. आई-बाबांना तर माझा अभिनय बघून डोळ्यात पाणी आलं.
माझ्या अपेक्षेप्रमाणे आनंदने मला लग्नाचं विचारलं. मी लगेच होकार दिला. आनंद एमबीए झाला होता. नोकरीं चांगली होती. आईबाबांनी पण विरोध केला नाही. आनंदची आई मात्र खूप खुश दिसत नव्हती. त्यांना नोकरीं करणारी सून हवी होती. आनंदची धाकटी बहीण स्वप्ना देखील इतक्यातच जॉब करू लागली होती. मी बीएड झालेच होते. नोकरीसाठी माझेही प्रयत्न सुरूच होते.
“आनंद, आईंची मनापासून इच्छा दिसतं नाहीय.”
“लग्न माझ्याशी करणार आहेस ना?”
“असं कसं बोलतोस तू? एखाद्या व्यक्तीविषयी मनात अढी असेल तर एकत्र राहणं अवघड होतं.”
“तिने कधी नकार दिलाय? तिला नोकरीं करणारी सून हवी आहे आणि तू प्रयत्न तर करतेच आहेस. राधा, ते जाऊ दे. तुला एक सांगायचं होतं, मला एका प्रसिद्ध नाटक कपंनीची ‘संकेत मिलनाचा’ ह्या नाटकासाठी ऑफर आलीय आणि मी ती स्वीकारली आहे.”
“पण तुला रजा मिळेल का इतकी? आता आपला संसार पण सुरु होणार.”
“राधा, तुला ठाऊक आहे, अभिनय हे माझं वेड आहे. ते मी कधीही दूर करू शकत नाही. असा नकार देतं गेलो तर माझी प्रगती खुंटेल आणि तालमी रात्रीच असणार आहेत.”
मी काहीच बोलले नाही. त्याला निराश नव्हतं करायचं.
आमचं लग्न दोन महिन्यांवर आलं होतं आणि पंधरा दिवस आधी आनंदचं नाटक होतं. आमची भेट क्वचितच व्हायची. मी त्याला साथ देतं होते कारण त्याचं हे वेड मला जपायचं होतं.
आनंदने ‘संकेत मिलनाचा’ मध्ये अतिशय उत्कृष्ट भूमिका निभावली. मलाही कुठेतरी आशा वाटली की आनंद मलाही नाटकात काम करायला प्रोत्साहन देईल. दोघेही हे वेड एकमेकांच्या साथीने जोपासू!पण ते मागेच पडलं.
………..
लग्न होऊन सून म्हणून आले पण आनंदचे बाबा जितके मोकळेपणाने माझ्याशी बोलायचे, तेवढ्या आई बोलत नव्हत्या. आम्हा दोघींमधली तेढ काही संपत नव्हती. आनंदची बहीण स्वप्ना देखील जरा अहंकारी होती. तिचा करिअरग्राफ अतिशय छान होता, त्यामुळे की काय ती जरा गर्विष्ठ होती.
माझ्या सुदैवाने मला घराजवळच एका प्रायमरी शाळेत नोकरीं मिळाली. त्यानंतर आईंचं माझ्याशी वागणं जरा बदललं. बाबा मात्र अगदी वडिलांप्रमाणे माझ्यावर प्रेम करत होते. आनंद आणि मी सहजीवनाचा आनंद घेत होतो. माझी जरा धावपळ होतं होती पण आनंदकडे बघितलं की सगळं विसरत होते.
कौटुंबिक वातावरण गढूळ व्हायला एक कारण झालं. स्वप्नाने परजातीय मुलाशी लग्न ठरवलं पण आईंना ते मान्य नव्हतं. मी मध्ये पडले आणि त्यांना सांगितलं, “आई, तिच्या मनाविरुद्ध दुसऱ्या कुठल्या मुलाशी लग्न लावून दिलं तर ती समाधानी राहिल का? हा तिचा निर्णय आहे, ती नक्कीच उत्तम संसार करेल.”
मी आणि आनंदनेच पुढाकार घेऊन स्वप्नाचं लग्न अगदी थाटात केलं.
………
समन्वय नाटक संस्थेकडून आनंदला
‘पुरुष’ ह्या नाटकासाठी एकवीस प्रयोगासाठी विचारणा झाली. त्यातले आठ प्रयोग यु एसला निरनिराळ्या ठिकाणी होणार होते. हा निर्णय घेणं कठीण होतं.
“राधा, हा खूप मोठा प्रोजेक्ट आहे, मला पूर्ण वेळ द्यावा लागेल. नोकरीं सोडली तरच शक्य आहे.”
आनंदचा हताश चेहरा बघितला आणि मी एका निर्धाराने बोलले,
“आनंद, दे राजीनामा! तुझं हेच तर स्वप्न होतं ना! खूप मोठा, प्रसिद्ध अभिनेता व्हायचं! ती वेळ आलीय. माझ्या पगारात निभावू! मी ट्युशन्स सुरु करते. आणि तू नाव कमावलं की तुझा पैसा येईलच.”
“राधा, तुझी साथ आहे म्हणूनच…”
मी त्याच्याकडे बघत, हसत त्याला बिलगले.
‘पुरुष’ ह्या नाटकाला तुफान प्रसिद्धी मिळाली. आनंदला नवीन नाटकांच्या खूप ऑफर्स येऊ लागल्या. ह्या आनंदात भर म्हणजे गौरी सोनपावलांनी आमच्या घरात आली. तिचं संगोपन करण्यात माझा वाटा जास्त असला तरी आनंदचे प्रयोग नसतील तेव्हा तो पूर्णवेळ गौरीचा बाबा असायचा. पैसा येत होता, मोठ्या घरात शिफ्ट झालो. पण मिठाचा खडा पडावा तसा स्वप्ना नवऱ्याला सोडून माहेरी निघून आली. घटस्फोटापर्यंत प्रकरण गेलं.
स्वप्नाचं वाईट होऊ नये ह्या हेतूनेच मी एक दिवस घरात कोणी नसताना तिला म्हणाले,
“स्वप्ना, नवराबायकोत वाद होतातच पण ते नातं तुटू नये असं मला वाटतं आणि तू तुझ्या आवडीचाच लाईफ पार्टनर शोधला होतास.”
“तू मला शिकवायची गरज नाही. मी इथे येऊन राहतेय हे जर तुला खूपत असेल तर सांगते, हे घर माझ्या भावाने घेतलंय. तुझा काय अधिकार? तू काय केलं ह्या घरासाठी? हे सगळं ऐश्वर्य माझ्या भावाचं आहे. तो जर काही म्हणत नाही तर तू का नाक खुपसतेस?”
स्वप्नाचं ते बोलणं ऐकलं आणि डोक्यातून वीज सळसळत जावी तसं झालं. मी काहीच नव्हतं केलं ह्या घरासाठी? सुरवातीच्या काळात आनंदने नोकरीं सोडल्यावर दोन वर्ष केवळ माझा पगार आणि ट्युशन्सवर घर चालत होतं. आनंदचं वेड जोपासण्यासाठी मी हे सगळं आनंदाने केलं. गौरीला पाळणाघरात ठेवून नोकरीं केली. आनंदच्या अनुपस्थितीत आईबाबांची आजारपणं काढली. माझं अभिनयाचं वेड बाजूला ठेवलं आणि मी काहीच केलं नव्हतं?
जागी झाले, त्या क्षणी खाडकन जागी झाले. माझं अस्तित्व मला असं खाक होऊ द्यायचं नव्हतं.
………
आनंदच्या अभिनय प्रवासाचा गौरव राज्य सरकार करणार होते. आनंदच्या चेहऱ्यावरचं समाधान मला सुखावून गेलं पण आता माझं सुख मला शोधायचं होतं. माझी चाळीशी आली होती. आता माझ्यासाठी मला जगायचं होतं. माझं अभिनयाचं वेड मला जोपासायचं होतं. मी समन्वय नाटक संस्थेच्या देसाईंना फोन लावला, “सर, मला नाटकात कामं करायची इच्छा आहे. मी खूप पूर्वी करत होते, पण फार गॅप पडलीय.”
“मॅडम, तुमची मंजुळा मी बघितली आहे. तुम्हाला प्रथम पारितोषिक मिळालं होतं, हे देखील मला आठवतंय. ‘अखेरचा सवाल’ नाटक करतोय, तुमची इच्छा असेल तर डॉ मुक्ताच्या भूमिकेसाठी प्रयत्न करू शकता.” देसाई म्हणाले.
“मी तयार आहे. कोणाला आणि कधी भेटायचं ते सांगा.” माझ्यातली अभिनेत्री मला जागवायची होती.
………..
आनंदचा सत्कार समारंभ उत्तम झाला. आनंदने त्याच्या भाषणात माझं भरभरून कौतुक केलं. त्याची सहचारिणी म्हणून मला स्टेजवर दोन शब्द बोलण्यासाठी विनंती केली.
“नमस्कार रसिक मायबाप! हा आनंदाचा सोहळा केवळ तुम्ही आनंदवर केलेलं प्रेम आणि त्याला दिलेल्या प्रतिसादामुळे आज आम्ही उभयता बघतोय. आनंदने अभिनय क्षेत्रात जी भरारी घेतली ही गोष्ट आम्हा कुटुंबियांसाठी खूप अभिमानास्पद आहे. त्याची मेहनत, कष्ट, रंगदेवतेवरचं प्रेम ह्याला कारणीभूत आहे. आनंदचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आज त्यांना आणि तुम्हा रसिकांना, माझ्याकडून एक सरप्राईज! अनेक वर्ष माझंही अभिनयाचं वेड मागे पडलं होतं. आनंदला दिलेली साथ, काही सांसारिक जबाबदाऱ्या, ह्यात ते वेड लपून गेलं होतं पण आता ते पुन्हा बाहेर येतंय, माझ्यातली कला, माझ्यातली अभिनेत्री तृप्त करायला! ‘अखेरचा सवाल’ ह्या नाटकात मी डॉ मुक्ताची भूमिका साकारतेय. तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आणि प्रोत्साहन हवे आहे. धन्यवाद!”
मी आनंदकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात आश्चर्य आणि कौतुक दोन्हीही होतं.
‘ती फुलराणी’ गाजवणारी मंजुळा रंगमंचावर यायला अधीर झाली होती.
×समाप्त ×
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
कथा खूप छान लिहिली आहे