सिझनची पहिली कैरी आणि जुन्या आठवणींचा भन्नाट तडका! — मानसी जोशी
सिझनची पहिली कैरी आणि जुन्या आठवणींचा भन्नाट तडका!
— मानसी जोशी
सीजनची पहिली कैरी खाताना जी मजा असते ना, ती काही औरच! ✨ लेकाने झाडावरच्या वाऱ्यांवर मात करत, झडप मारून कैरी हातात आणून दिली. मोठ्या प्रेमाने विचारलं – “रागावणार नाही ना?”
मी मात्र क्षणात मागच्या काळात हरवली गेले! लगेचच त्याला विचारलं – “शेजारचे कोणी तुला रागावणार नाहीत ना?” आणि हे विचारताच जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
लहानपणी आम्हीही झाडावर चढून कैऱ्या तोडायचो, आणि मग मनात यायचं – “शेजारची आजी, बागेचा मालक किंवा झाडाची मालकीण रागावणार तर नाही ना?” पण विचारायलाच नको,झाडावर लटकणाऱ्या कैऱ्या दिसल्या की हे सगळे विचार पळून जायचे!
आईला झाडांची जबरदस्त आवड! त्यामुळे जेव्हा आम्ही नवीन घरी राहायला आलो, तेव्हा जुन्या घरातील मोठं, प्रेमाने वाढवलेलं आंब्याचं झाड मागे सोडणं शक्यच नव्हतं. आई-बाबांनी नगरपालिकेची परवानगी काढली आणि झाड मुळासकट हलवून नवीन घरी न्यायचा निर्णय घेतला.
ही काही सोपी गोष्ट नव्हती! इतकं मोठं झाड हलवण्यासाठी विशेष नियोजन केलं. मोठ्या ट्रकमध्ये ते सावधगिरीने ठेवण्यात आलं. रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी झाडाचं स्थलांतर करण्यात आलं.
नवीन घरी पोहोचल्यावर त्याला योग्य ठिकाणी प्रेमाने रुजवलं आणि काळजी घेतली. जणू काही झाड नव्या जागी रुजण्याची वाटच पाहत होतं!हाच तो नारळीखोबरी आंबा! त्या कैऱ्या तर स्वर्गीय चव द्यायच्या – गडद हिरव्या, टोकाला किंचित पिवळसर झाक असलेल्या, आणि हातात घेतल्या की घट्ट आणि जड लागणाऱ्या!
झोपाळ्यावरून उड्या मारून, कधी कंपाउंडच्या भिंतीवर चढून, आम्ही त्या कैऱ्या ओरबाडायचो. हे सगळे करताना मदतीला बंडुकाका असायचा, प्रेमाने आणि मला “पाये” हे घे असे म्हणायचा आणि मग खरी मजा सुरू व्हायची – त्या कैऱ्या धुवून, एका मोठ्या स्टीलच्या डब्यात तिखट, मीठ आणि थोडासा मसाला टाकून हलवायचो. पहिला घास घेतल्यावर जो आंबट तडका जीभेला बसायचा, त्याने अक्षरशः डोळे गच्च मिटायचे आणि चेहरा वेडावाकडा व्हायचा! पण तरीही पुन्हा एक फोड उचलायला हात थांबतच नसे.
अरुंधती मावशीचे घर शेजारीच होते, तिने तोतापुरी चे झाड लावले होते त्या तर आम्ही सालीसकट तुकडे करून खायचो! त्यांच्या सालीला थोडासा आंबटगोड टच असायचा! त्या चावताना जी मजा यायची ना, ती काय सांगू! पण आम्ही कैऱ्या तोडल्या की अरुंधती मावशीचं प्रेमळ रागावणं न चुकता यायचं –
“तुम्हाला कितीदा सांगितलंय, त्या कैऱ्या आत्ता नको तोडू! थोड्या मोठ्या होऊ देत की!”
आणि आम्ही? तोंडावर मिश्कील हसू ठेवून, त्या आंबट कैऱ्यांच्या फोडी तोंडात टाकत राहायचो!
कैरीच्या भन्नाट आंबटसर चवीने तोंडात थरथर हलायची! मग ओठ चाटत, गाल फुगवत आम्ही त्यावर पाणी प्यायचो, आणि तेव्हा जिभेवर उमटणारा अजून वेगळाच भन्नाट स्वाद काय जबरदस्त असायचा!
आज लेकाचं खोडकरपण पाहून हसायला येतंय! त्याच्या डोळ्यातही तोच चमक आहे, जी कधी आमच्या डोळ्यात असायची!
आता पिढ्या बदलल्या, पण कैरीच्या आंबट चवीतली मजा आणि ती खाण्याच्या आठवणी तश्याच ताज्या आहेत!
मग तुमची पहिली कैरी खाण्याचा प्लॅन झाला का?😋