मनोरंजन

टायगर मॅाम ©® ज्योती रानडे

टायगर मॅाम

©® ज्योती रानडे

“रॉबर्ट, पियानोची प्रॅक्टिस केली नाहीस तर जेवायला देणार नाही.” आठ वर्षाचा रॉबर्ट रडत रडत पियानोची प्रॅक्टिस करू लागला. मंजू हे दृश्य तिच्या घरून रोज बघत असे.

मंजू, नवरा सागर व दोन मुलं अमेरिकेत बरीच वर्षं रहात होती. त्यांच्या शेजारी ली नावाची चायनीज फॅमिली रहात होती. आई जेन, वडील टोनी आणि मुलगा रॉबर्ट असे छोटे कुटुंब होते. मंजूने पाहिलेल्या अनेक चायनीज कुटुंबाप्रमाणेच ली कुटुंबाचीही मुलं कसं वाढवायचं याची काही मूल्ये होती..

मुलांनी अभ्यासात “A किंवा A+ च” मिळवली पाहिजे, टीव्ही नाही, खेळ खेळला तर स्टेट/नॅशनल लेवल ला गेलंच पाहिजे, पियानो किंवा व्हायोलिन उत्तम वाजवता आलच पाहिजे, जगातील उत्तम कॅालेजमधे ॲडमिशन मिळालीच पाहिजे. हे सारे मिळवण्यातच जीवनाचे सार्थक आहे. आयुष्यात यशस्वी होण्याचा हा एकमेव मार्ग आहे.

एका संध्याकाळी प्रॅक्टिस शिवाय जेवण नाही हे ऐकताच मंजूच्या पोटात तुटले. ती ताडकन उठली आणि जेन कडे गेली. मंजू अचानक आपल्याकडे का आली आहे हा विचार जेनच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.

“जेन, रॉबर्टनं पियानोची प्रॅक्टिस जेवणानंतर केली तर? तो बिचारा रोज रडत असतो” मंजूने त्यातल्या त्यात सौम्य प्रश्न विचारला.

“WHAT??? नाही..नाही..प्रॅक्टिस आधी..मग जेवण. मी फक्त तीस मिनिटे प्रॅक्टिस दिवसातून तीन वेळा कर म्हटलंय. न्यूयॉर्क मधल्या जगप्रसिद्ध ब्रॉडवे या स्टेज वर पियानो वाजवायचा आहे ना? मग याच्या दसपट कष्ट करावे लागतील.” जेन ठणकावून सांगत होती. लाल नाक झालेला रॅाबर्ट दमलेल्या डोळ्यांनी आपल्याला वाचवण्यास कोण आलय बघण्यासाठी बाहेर आला.

“रॉबर्ट,जा पियानो वाजव!” जेन कडाडली. तो मुकाट्याने पियानो जवळ जाऊन बसला.

“मांजू,..त्याला प्रॅक्टिस करू दे.” जेन ने दार बंद केले आणि पाठोपाठ पियानो शेजारची खिडकीही बंद केली. मंजू नाईलाजाने घरी परतली. बंद खिडक्या व बंद दाराआडून रॉबर्टचे दबलेले रडणे आणि पियानोचे करूण सूर पुसट ऐकू येतच होते. कुणाला मिळवायची होती ब्रॅाडवे वर जागा? जेनला का रॅाबर्टला?

मंजू तिच्या दुसऱ्या एका चायनीज मैत्रीणीशी बोलत असताना त्या मैत्रीणीने तिला अगम्य ज्ञान दिले!
“मांजू..मांजू..I think चायनीज आया फार सुपिरिअर असतात! आपल्या मुलाला यशस्वी कसं करायचं त्यांना माहित असतं.. तू कर तक्रार जेन बद्दल पण भारतीय, कोरिअन, जमेकन वगैरे आयाही फार वेगळ्या नाहीत बरका!”

मंजूला धक्का बसला! आपण भारतीय आयाही अशाच आहोत? चायनीज आयांप्रमाणेच यशाचा महामार्ग मेडिकल इंजिनिअरिंग कॅालेजमधूनच जातो हे सर्वमान्य आहेच पण भारतीय आया या थराला गेलेल्या तिला तरी आठवत नव्हत्या. मुलं आनंदी दिसत नाही हो कोणत्या आईला कळणार नाही? रॅाबर्ट खूप हुशार होता. उत्तम मार्क मिळवून आणि जेनने सांगितलेले सारे काही मिळवूनही तो कधी आनंदी दिसत नसे.

काही वर्षांनी मंजूने एक पुस्तक वाचलं. “Battle Hymn of the Tiger Mother” हे पुस्तक एमी चुआ नावाच्या अशाच सुपिरिअर चायनीज आईने लिहलेले होते. ते पुस्तक वाचून मंजू कासावीस झाली. सतत मुलांना यशाच्या मागे धावायला लावणाऱ्या आयांना “टायगर मॅाम”म्हणतात हे तिला कळलं. सर्कशीतील प्राण्यांसमोर पट्टा आपटून काम करण्यास लावणाऱ्या रिंगमास्टरमधे व टायगर मॅाम मधे तिला काहीच फरक दिसत नव्हता.

मंजूला तिचं लहानपण आठवलं. सुट्टीतले साधे खेळ, टिपऱ्या, काठीपाणी, डबा ऐसपैस,पत्ते, कॅरम, आंबे, कैऱ्या, रुसवे फुगवे..परत गळ्यात गळा..यानं जे बंध निर्माण झाले ते आजही किती घट्ट आहेत हे तिला जाणवलं. यशस्वी होण्याचा महामार्ग नातेसंबंध उत्तम जपण्यातून जात असतो हे परत एकदा कळलं!

“अगदी IIT ला गेलेलो नसू पण आपणही यशस्वी आहोत. ब्रॅाडवे च्या स्टेजवर वाद्य वाजवत नसू पण कित्येकांशी सूर उत्तम जुळलेत! यशाच्या महामार्गावर चालत नसू पण ज्या काट्याकुट्यांच्या रस्त्यावर चाललो ते रस्ते काटे बोचले तर काय करायचं शिकवून गेलेत..जगात कुठेही आपला निभाव लागेल एवढी ज्ञानाची पुंजी जवळ नक्की आहे.. आई बाबांनी पंख तर दिलेच पण त्या पंखात त्यांच्या आपल्यावरील विश्वासाची ताकद भरून दिली.. मंजू पोटतिडीकीनं सागरला सांगत होती..

यशस्वी होण्यासाठी सतत धावताना आपली मुलं दमून जात आहेत हे लक्षात आले नाही तर ती आई सुपिरिअर कशी म्हणायची? मुलं आनंदी दिसत नसेल तर त्याला यशस्वी कसं म्हणायचं? कुठल्याही गोष्टीचा अतिरेक बरोबर कधीच नसतो.

काही वर्षांनी मंजूला यु ट्युब वर रॉबर्ट ली ची मुलाखत दिसली. रॅाबर्ट ब्रॅाडवेवर पियानो लीलया वाजवत होता. “एवढं यश मिळवूनही मी आनंदी नाही. मला परत लहान व्हावसं वाटतंय आणि मित्रांबरोबर धुडगूस घालावासा वाटतोय. चुका करत शिकावंस वाटतंय! माझं सगळं लहानपण पियानोच्या सुरात हरवून गेलं. माझी बायको मला सोडून गेली तेव्हा वाटलं.. मी चार चौघांसारखा वाढलो असतो तर कदाचित उत्तम वादक झालो नसतो पण उत्तम माणूस नक्कीच झालो असतो!”

जेन, टायगर मॅाम, त्या मुलाखतीत त्याच्या शेजारी बसून त्याच्याकडे रागाने पहात होती! आनंद म्हणजे ब्रॅाडवे न कळणाऱ्या आपल्या हुशार इंजिनीअर लेकाला शहाणा म्हणावं का वेडा याचा विचार करत होती!

©® ज्योती रानडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}