मनोरंजन

“आभास – एक हृदयस्पर्शी नातं” कविता संगम

“आभास – एक हृदयस्पर्शी नातं”

संध्याकाळचे चार वाजले होते. सावित्रीबाई वारंवार दाराकडे पाहत होत्या. डोळ्यांत आशा, चेहऱ्यावर उत्सुकता. खिडकीतून बाहेर पाहताना, समोरच्या रस्त्यावरून जाणाऱ्या प्रत्येक सावलीत त्यांना ओळखीचा चेहरा शोधल्यासारखं वाटत होतं. “आज आठवा दिवस… अजूनही आली नाही!” त्यांनी मनातल्या मनात पुटपुटत साडीच्या पदराने डोळे पुसले. “माझ्याकडे फोनही नाही, नाहीतर एव्हाना कधीच तिला विचारलं असतं,” त्या स्वतःलाच समजावत होत्या. तेवढ्यात, गेटकडे एक हलकासा आवाज आला. सावित्रीबाईंनी ताबडतोब बाहेर पाहिलं, आणि त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. “आई! उशीर झाला ना? माफ करा!” स्वाती धावत आत आली. तिच्या हातात एक डबा होता. “स्वाती!” सावित्रीबाईंच्या आवाजात आनंद, काळजी आणि हलकासा तक्रारीचा सूर होता. “काय गं, इतक्या उशिरा?” “आई, ऑफिसच्या कामामुळे उशीर झाला. पण बघा, तुमच्या आवडीची गूळपोळी आणली आहे!” स्वातीने सावित्रीबाईंना डबा दिला. त्यांनी डबा उघडला, आणि गोडसर वासाने संपूर्ण खोली भरून गेली. पहिला घास घेताच त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. “अगं, तुझ्या हाताला आईच्या हाताचा गोडवा आहे.” स्वाती हसली, पण तिच्या डोळ्यांत ओलावा होता. “आई, तुम्ही खूप आठवण काढत होत्या ना?” सावित्रीबाई थोड्या वेळ शांत राहिल्या. नंतर मंद हसत म्हणाल्या, “अगं, माझ्या मनात नेहमीच राहुल असतो.” स्वातीने हळूच त्यांचा हात हातात घेतला. “आई, म्हणूनच मी येते ना! किमान काही वेळ तरी तुम्हाला आनंद द्यायला.” सावित्रीबाईंनी तिला हळूच मिठी मारली. “खरंच गं, कधी कधी आभासही खऱ्यासारखा वाटतो. आणि तुझ्या या भेटीमुळे माझा राहुल जिवंत असल्यासारखा वाटतो.”

स्वाती गप्प बसली. काही वेळाने तिने मोबाईल काढला आणि म्हणाली, “आई, एक मिनिट… राहुलशी बोलणार?” सावित्रीबाई गोंधळल्या. “राहुलशी?…” स्वातीने फोन कानाला लावला आणि म्हणाली, “हॅलो, हो राहुल, आईशी बोल.” सावित्रीबाईंनी थरथरत्या हाताने फोन कानाला लावला. “आई…” त्या आवाजाने त्यांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. “राहुल…? बाळा, कसा आहेस?” “मी ठीक आहे आई, तुम्ही काळजी करू नका. मी नेहमी तुमच्या सोबत आहे.” त्या एका वाक्यात सावित्रीबाईंना त्यांच्या मुलाची ऊब जाणवली. स्वातीने फोन ठेवला. “आई, राहुल आता नाही, पण त्याच्या आठवणी कायम तुमच्यासोबत आहेत.” सावित्रीबाई काही क्षण शांत राहिल्या. हळूहळू जुन्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यासमोर थैमान घातले .

राहुल… त्यांचा एकुलता एक मुलगा. लहानपणी खूप गोंडस होता. त्यांच्या कुशीत डोकं ठेवून झोपायचा. मोठा होत गेला तसं त्याच्या जबाबदाऱ्या वाढत गेल्या. इंजिनिअर झाला, मोठ्या कंपनीत नोकरीला लागला. घरात आनंद पसरला होता. सगळं छान चालू होतं… तो दिवस सोडून. त्या दिवशी सकाळी राहुलने नेहमीप्रमाणे आईच्या पाया पडून आशीर्वाद घेतला आणि ऑफिसला निघाला. “आई, संध्याकाळी लवकर येतोय, तुझ्यासोबत बसून गप्पा मारायच्या आहेत!” त्याच्या या वाक्यावर त्या हसल्या होत्या. पण तो संध्याकाळी कधीच आला नाही. एक अपघात… एका ट्रकने त्याच्या गाडीला धडक दिली. जागच्या जागी मृत्यू. सावित्रीबाईंना पहिल्यांदा कळलंच नाही की हे काय घडलं. त्या रस्त्यावर पोहोचल्या, पण तोपर्यंत सगळं संपलं होतं. त्यांच्या राहुलला ते उचलून घेऊन गेले होते. फक्त रक्ताच्या डागांनी तो तिथे होता.

तो दिवस, तो क्षण… त्यानंतर आयुष्य कधीच पूर्वीसारखं राहिलं नाही. राहुल नसला तरी त्याच्या आठवणी जिवंत होत्या. घरभर त्याच्या गोष्टी पसरलेल्या होत्या. त्याची पुस्तकं, त्याचे कपडे, त्याच्या वहीवर लिहिलेलं त्याचं नाव… सगळं तसंच होतं, फक्त तो नव्हता.

स्वातीने सावित्रीबाईंच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि त्यांचा हात हातात घेतला.

“आई, राहुल तुम्हाला एकटं नाही सोडणार. तो तुमच्या मनात कायम आहे. आणि मी आहे ना?” सावित्रीबाई हसल्या. “हो गं! तू नसतीस तर माझं मन कधीच हरवलं असतं. तुझ्या या भेटी, तुझ्या या गप्पा… यामुळे मला राहुल जिवंत आहे अस वाटतं. त्याची उणीव तू भरून काढलीस.” स्वातीही भावूक झाली. “आई, काही नाती रक्ताची नसतात, पण तरी ती आपलीशी वाटतात.” त्या दोघी काही वेळ शांत बसून राहिल्या. आभास असला तरी तो खरा वाटत होता… आणि कधी कधी अशा आभासावरच आपलं आयुष्य उभं राहतं.

✍️ कविता संगम

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}
10:42