मनोरंजन

गृहिणीपणाचा उत्सव , चैत्रगौर.. श्री. विनय मधुकर जोशी !

गृहिणीपणाचा उत्सव , चैत्रगौर..

आज चैत्र शुद्ध तृतीया म्हणजे गौरी तृतीया. आज पासून वैशाख शुक्ल तृतीयेपर्यंत गौरीची पूजा करून महिनाभर हा उत्सव साजरा होतो. देवघरातली अन्नपूर्णा लख्ख करून तिची षोडशोपचारे पूजा केली जाते आणि तिला महिनाभर झोपाळ्यावर ठेऊन हा उत्सव साजरा होतो. अनेक शुभ चिन्हांची रांगोळी “चैत्रांगण” काढली जाते.

गौरी अन्नपूर्णा कशी झाली याची सुंदर कथा पुराणात येते.गौरी हि भौतिक समृद्धीची देवता. अन्नधान्य , वात्सल्य , धन संपती , सौंदर्य , मांगल्य , कौटुंबिक सौख्य हे सारं काही तिचीच कृपा. आणि शिव म्हणजे विशुद्ध ज्ञान !.

योग , वैराग्य , ब्रह्मज्ञान यांचे ते अधिष्ठान. शिव पार्वती एकदा कैलाशी निवांत गप्पा मारत होते. बोलण्याच्या ओघात शिव म्हणाले ब्रह्म सत्यम जगत मिथ्या. फक्त ब्रह्म सत्य आहे बाकी सब झूट.

पार्वती म्हणाली अहो हे सुंदर विश्व ? शिव म्हणले साफ खोट आभासी आहे हे , विश्वातील सौंदर्य , मांगल्य , नातीगोती ? ते हि असत्य बर मग आपण खातो ते अन्न तरी ? तेही खोट , असत्य , आभासीच , फक्त ब्रह्म तत्वच सत्य !! झालं गौरीला आला थोडा राग.. ती म्हणाली बरं तुमचं ज्ञान वैराग्यच खर बाकी सगळ आभासी ना. या क्षणी मी अंतर्धान होते.

गौरी गुप्त होताच जगातले मांगल्य लोपले , नात्यांचा गोडवा उडाला , घराचे घरपण हरपले , सात्विक सौंदर्य विरले , आणि मुख्य म्हणजे जगातले सगळे अन्न धान्य सुद्धा अकस्मात संपले. शिवाना वाटले हरकत नाही.. या वाचून जगाचे काही बिघडत नाही. पण थोड्याच वेळात अख्या जगातले देव , मानव , ऋषी , पशु पक्षी सारे प्राणीमात्र भुकेले होऊन शिवांपाशी आले. महादेव म्हणाले थांबा तुम्हाला जरा ज्ञान देतो. पण भुकेल्या पोटी कसलं ब्रह्म कसलं ज्ञान. आधी अन्न द्या मग पुढ्च बोला.पण अन्न आणायचे कुठून ? कोणीतरी सांगितल अख्या विश्वात फक्त काशी नगरीत एक घर आहे तिथेच अन्न उपलब्ध आहे. सगळ्या प्राणिमात्रांच्या वतीने शिव याचक म्हणून तिथे भिक्षा मागायला गेले. ओम भवती भिक्षां देहि.

आतून एका गृहिणीचा नाजूक आवाज आला महादेवा भिक्षेत काय देऊ ज्ञान कि वैराग्य ? महादेवानी पाहिलं , आत सुवर्ण सिंहासनी साक्षात पार्वती बसली आहे , मांगल्य लेवून , पावित्र्य पांघरून , समृद्धीचे अलंकार घालून आणि तिच्या हातात आहे अन्नाचे अक्षयपात्र , वात्सल्याच्या पळीने ती प्रतेक जीवाला अन्न देऊन तृप्त करते आहे. प्रपंचाशिवाय परमार्थ , प्रवृत्तीवाचून निवृत्ती , शक्तीविना शिव अपूर्णच आहेत हा साक्षात्कार शिवांना झाला. शिव म्हणाले ज्ञान – वैराग्य प्राप्त होण्यासाठी आधी शरीरात शक्ती आणि मनात शांती हवी , त्यासाठी सकस अन्न हवे , अन्न हे पूर्णब्रह्म. त्याचीच भिक्षा दे !

ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ||

पार्वती हसली , तिने आनंदने शिवांना भोजन दिले , शिव तृप्त होताच जगातले सगळे जीव देखील तृप्त झाले. त्या तृप्त अंतकरणाने महादेव म्हणाले तू सदाशिवाला सुद्धा पूर्ण करणारी सदापूर्णा आहेस , जगाची आई बनून अन्न पुरवणारी तू अन्नपूर्णा आहेस. साध्या गृहिणीच्या रूपातली ती शंकराची प्राणवल्लभा अन्नपूर्णा म्हणून विख्यात झाली.

हि अन्नपूर्णा जगातल्या सगळ्या गृहिणींच प्रतिक आहे. सोनेरी महालात राहणाऱ्या रुख्मिणीवर देखील द्वारकेतील सगळ्यांना अन्न देण्याची जबाबदारी होती आणि झोपडीत राहणारी सुदामाची बायको सुद्धा मिळेल ते रांधून घराला जेऊ घालत होती. परिस्थितीचा फरक असेल पण कुटुंबाला तृप्त करण्याची वृत्ती सारखीच आहे. कदाचित ही आठवण राहावी म्हणून नववधूला लग्नात माहेरून अन्नपूर्णा देतात.तिची रोज पूजा करत गृहिणीने सकस अन्न शिजवावं , नाती जपावीत , घराला घरपण द्याव. हे सगळं करत असताना “गृहिणी कुठे काय करते ?” असा प्रश्न कोणी विचारला तर गृहिणीच्या रुपात अवतीर्ण होऊन जगाचे पोषण करणाऱ्या अन्नपूर्णेची कथा आठवावी.

या गृहिणीपणाचा उत्सव ही चैत्रगौर. रोजची देवघरातली अन्नपूर्णा मखरात हिंदोळ्यात बसवली जाते. किंवा काही ठिकाणी पंचगौरचे छोटे झोपाळे पुजले जातात. त्यात मध्यभागी ही गौरी आणि सभोवताली तिचा परिवार – शिव , गणेश , नंदी वैगरे.गृहिणी हीच घराचा केंद्रबिंदू आहे हे यातून बिंबवलं जातं.

स्वयं पञ्चाननः पुत्रौ गजाननषडाननौ |
दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे ||

पाच मुखे असणारे शंकर ; गजमुख गणेश आणि सहा मुख असणारा कार्तिकेय अशी खाणारी बारा तोंडे घरी असताना भिक्षाटन करणाऱ्या दिगंबर शिवाचा संसार सुरळीत चालला आहे ; कारण त्याच्या घरी अन्नपूर्णा गृहिणी म्हणून आहे.

शिवांपासून तर जगभरातल्या सगळ्यांचे संसार ज्यांच्यामुळे सुरळीत चालले आहेत अशा गृहिणींच्या रुपात असणाऱ्या अन्नपूर्णेला नमन

अन्नपूर्णे सदापूर्णे शंकरः प्राणवल्लभे |
ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वती ||

~~ श्री. विनय मधुकर जोशी !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}