लॉटरी….(©मंदार जोग) मंदार जोग
लॉटरी….(©मंदार जोग)
एखादा दिवस आयुष्यात अनपेक्षित आनंद घेऊन येतो. जणू काही लॉटरी लागते आपल्याला. आजही ते झालं. आज सकाळी वॉकला गेलो तेव्हा आज फेसबुकवर आज काय पोस्ट टाकायची ह्याचा विचार मनात होता. तो करत चालत असताना एक उत्तम पोस्ट सुचली. सुचल्यावर लगेच टाईप करायला सुरुवात केली. चालायचा ट्रॅक रोजचा असल्याने वाट पायाखालची होती. मी चालत फोनमध्ये टाईप करत होतो. इतक्यात माझा एका बाईला धक्का लागला. फोन हातातून उडून पडणार होता पण मी कॅच केला. बाईंनी “डोळे फुटले का? आया बहिणी नाहीत का?” असा हिंदीत सवाल करत इंग्रजीत एक शिवी हासडत हात उगारला आणि मी मार खायच्या तयारीने डोळे बंद करून घाव चुकवायला हात चेहऱ्यासमोर धरले. अपेक्षित वेळेत आघात न झाल्याने डोळे किलकिले करून पाहिलं तर त्या बाई माझ्या हातांच्या आडून माझा चेहरा बघायचा प्रयत्न करत होत्या. माझ्या चेहऱ्याकडे कित्येक वर्षात कोणी इतक्या कुतूहलाने पाहिलं नसल्याने मी माझ्याकडे कुतूहलाने बघणाऱ्या डोळ्यांकडे बोटांच्या फटीतून कुतूहलाने बघू लागलो. मी चेहरा हातानी घट्ट झाकून घेतला होता. तिने वरच्या सुरात हुकूम सोडला –
बाई – चेहरा झाकू नका नाहीतर…
मी घाबरून चेहऱ्यावरचे हात बाजूला करत अपराधीपणा ने ओतप्रोत ओथंबत असलेल्या माझ्या चेहऱ्याचा गाल पुढे केला आणि आघाताची वाट बघू लागलो. इतक्यात तिने मला इंग्रजीत विचारलं-
ती – तुम्ही काय करता?
त्या अनपेक्षित प्रश्नाने डोळे उघडतं गयावया करत मी उत्तरलो –
मी- तुम्ही सांगाल ते करतो पण प्लीज मारू नका. मी मुद्दाम धक्का नाही हो मारला. मी ना एक पोस्ट लिहीत होतो..फेसबुकवर.
ती- फेसबुकवर?
मी- हो. मी फेसबुकवर लिहिलेलं चार लोक वाचतात म्हणून मी प्रति पुल, वपू, सुशी, तेंडुलकर, दळवी, पेंडसे वगैरे आहे ह्याची मला खात्री वाटून मी स्वतःला फेसबुक सेलिब्रिटी समजतो. त्याचाच परिणाम म्हणून पूर्वी फावल्या वेळात तिथे लिखाण करणारा मी आता तिथेच पडीक असतो, तिथल्या समूहांमध्ये बागडत असतो, त्यांची संमेलने आणि इव्हेंट अटेंड करत असतो, समूहात भेटणारे लोक आता माझे जिवलग, बेष्टी टाइप मित्र मैत्रिणी झालेत. ह्या सगळ्यातून वेळ मिळाला तर त्या फावल्या वेळात चरितार्थासाठी काहीतरी करतो.
ती- ओह. ओके..अरे व्वा. पण असं काय लिहिता आपण?
मी- असं काही ठरवून लिहित नाही. जे सुचेल ते लिहितो.
ती – पण आत्ताच म्हणालात ना की एक पोस्ट लिहित होतात. ती न ठरवता लिहित होतात का?
मी – हा म्हणजे विषय ठरवतो कधीतरी. पण कंटेंट नाही ठरवत. जे जसं सुचेल तसं लिहितो. तीच तर प्रतिपदा आहे माझी.
ती – प्रतिभा…प्रतिभा म्हणतात तिला.
मी – तेच…तेच म्हणायचं होत मला.
ती- आली आहे माझ्या लक्षात तुमची एकूण प्रतिभा. ते सोडा. बाय द वे तुम्ही अभिनय केला आहे का कधी?
मी- बायकोसमोर साळसूदपणाचा अभिनय करतो तेवढाच संबंध अभिनयाशी. व्यावसायिक कधीच नाही.
ती- तुमचा चेहरा परफेक्ट आहे एकदम व्यावसायिक अभिनयासाठी.
मी- तुम्ही डोळ्यांचा नंबर चेक करून घ्या.
ती- त्याची गरज नाही. मी कास्टिंग डायरेक्टर आहे. एका इंडो अमेरिकन वेब सिरीजसाठी कास्टिंग करते आहे. त्यात एक रोल आहे. करणार का?
मी- अहो पण मी फक्त कॉलेजात असताना नाटकात अभिनय केलाय. त्यानंतर नाही.
ती- तुम्हाला अभिनय करायचा नाहीये. आत्ता मला चुकून धक्का लागल्यावर जे मिडल क्लास घाबरलात ना? सेम तेच करायचं आहे सिरीज मध्ये. तरीही त्यात तुम्हाला दोन तीन फाईट सिन आहेत, एक दोन रोमँटिक सिन आहेत, बाकी नॉर्मल मिडल क्लास व्यक्तिरेखा आहे. उदयपूर, बाली, इस्तंबूल आणि मोस्टली लास वेगस मध्ये शूट असेल ऑगस्ट २०२५ पासून तीन महिने. पण तुम्हाला फॉर्मलीटी म्हणून ऑडिशन द्यावी लागेल. बाकी मी बघते.
मी तोंडातून बाहेर गळायला आलेली लाळ उलट घशात गिळून टाकत घोगऱ्या आवाजात विचारलं-
मी- र…रोमँटिक सिन म्हणजे…
ती- तुम्ही वेब सिरीज बघता ना? त्यात असतात तसेच…कम ऑन…
मी क्षणार्धात ओटीटी वरील समस्त मदानिकांची उजळणी करत आधाशीपणे विचारलं.
मी- क..कोणाबरोबर आहे रोमँटिक सिन ते कळेल का प्लीज?
ती- (लाडिक हसून) यु नॉटि बॉय…ते आता नाही सांगणार..सिलेक्शन झालं की कळेल..(डोळा मारून) पण यु वोन्ट रिग्रेट.
मी भिड चेपत टिपिकल मिडीयम स्पायसी प्रश्न अडखळत्या इंग्रजीत विचारला-
मी- व्ह..व्हॉट अबाउट..प..पगार…?
ती- पगार?
मी- न..नाही..पगार काय म्हणतोय मी..सवय हो…दुसरं काय…मला म्हणायचं होत..ते आपलं..प..पेमेंट..ते किती असेल साधारण?
ती- ओह दॅट..ते कळेल. आधी सिलेक्ट तर व्हा तुम्ही. पण यु वोन्ट रिग्रेट. किमान सात आकडी रक्कम असेल.
मी हळूच मागे बोटांनी एकं, दहं, शतं, सहस्त्र करत सात आकडी म्हणजे किती ह्याचा अंदाज घेत अंदाज आल्यावर प्रतिक्षिप्त क्रिया म्हणून ती सगळी बोटं (स्वतःच्या) तोंडात घातली आणि ती बघते आहे लक्षात आल्यावर काढून चड्डीला पुसली! मला काय बोलावं सुचत नव्हतं.
ती- हे माझं कार्ड. आज अकरा वाजता ऑडिशन साठी या. बाय..
मी- बाय…
ती धावत निघून गेली. मी अविश्वासाने तिथेच असलेल्या बाकावर धपकन बसलो. पाण्याची बाटली त्या कार्डवर ठेवली आणि डोळे बंद करून जे झालं ते खरं आहे का हे पडताळायला स्वतःला चिमटा काढला. चिमट्याने कळवळून जोरात उठलो आणि उठताना पाण्याच्या बाटलीला धक्का लागून ती खाली पडली. ती पडल्यावर तिच्याखाली ठेवलेलं कार्ड उडालं. मी त्याच्या मागे पळालो. पण कार्ड उडून शेजारी असलेल्या नाल्यात पडून माझ्या नजरेसमोर वाहून गेलं. मी उदास होऊन म्हणालो “आपलं नशीब बेकार. असो. आपण आपली फेसबुक पोस्ट लिहू.” अस म्हणत फोनकडे वळलो तर मगाशी अर्धवट लिहिलेली पोस्ट पण सेव्ह न केल्याने गायब झालेली! मी डोक्याला हात लावून तसाच बसलो. इतक्यात हाक ऐकू आली-
आवाज- एक्स्क्यूज मी. अहो मी तुमचा नंबर घ्यायचा विसरले आणि परत आले.
मी वर पाहिलं. तीच बाई परत आली होती माझा नंबर घ्यायला. मी अत्यंत खुश होत माझा नंबर तिला देऊन तिला मला मिस्ड कॉल द्यायला सांगून तिचा नंबर सेव्ह केला. ती बाय म्हणून निघून गेली. मी खुश होत विचार करू लागलो की आजचा हा जबराट लॉटरी लागल्यासारखा प्रसंग पोस्ट म्हणजे लिहावा का? मग विचार केला की तो जरी कितीही खरा असला तरी लोकांना तो नक्कीच खोटा वाटू शकत असल्याने तो लिहून काहीच उपयोग नाही. त्यामुळे मग मी हा प्रसंग पोस्ट म्हणून न लिहायचा निर्धार करून पोस्टसाठी विषय शोधत चालू लागलो. संध्याकाळ पर्यंत काही सुचलं तर लिहितो. नाहीतर हाच खरा प्रसंग एप्रिल फूलची पोस्ट म्हणून गोड मानून घ्या.© मंदार जोग