मनोरंजन

★★तू जिथे.. तिथे★★ सौ मधुर कुलकर्णी, पुणे

★★तू जिथे.. तिथे★★

     कॉलेज सुरू होऊन आठच दिवस झाले होते.शेवटचं सायकॉलॉजीचं लेक्चर सुरू होतं. गौरी अगदी तल्लीन होऊन सरांचं लेक्चर ऐकत होती.
  “मे आय कम इन सर?” हे ऐकल्यावर सगळ्यांचीच नजर क्लासच्या दाराकडे गेली. इतकं सुंदर लेक्चर मधेच बंद पडलं म्हणून गौरी जरा चिडलीच. तो मुलगा गौरीच्याच बाजूला येऊन बसला. एक मंद सुगंधाची झुळूक आली. गौरीने त्याच्याकडे बघितलं आणि त्यानेही बघितलं. नजरानजर झाली आणि गौरीने मान खाली घातली. सर इतकं सुंदर शिकवत होते की मंत्रमुग्ध होऊन सगळे विद्यार्थी ऐकत होते. लेक्चर कधी संपलं,कळलंच नाही.
   क्लासरूमच्या बाहेर आल्यावर त्या मुलाने गौरीला गाठलं, “माफ करा,मी जरा उशीरा कॉलेज जॉईन केलं आहे. तुमच्या नोट्स मिळतील का?”
  अख्ख्या क्लासमध्ये ह्याला मीच सापडली का नोट्स मागायला? गौरी जरा वैतागलीच.
     “मी तुम्हालाच नोट्स का मागतो आहे,हा प्रश्न तुम्हाला पडणं साहजिक आहे पण तुमच्या बाजूला मघाशी बसलो आणि तुम्ही सिंसीअर वाटला. यु मस्ट हॅव रिटन ऑल द पॉईंट्स.”
   “मी जरा घाईत आहे. उद्या बोलू.”
  “ओके,नो प्रॉब्लेम. मी आदिनाथ जोसेफ!”
   गौरीने चमकून त्याच्याकडे बघितलं. हे कसलं विचित्र नाव! ह्याच्यापासून चार हात लांबच रहायला हवं. गौरी त्याला बाय करून तिथून चालती झाली.
   कॉलेजमधून परतल्यावर गौरीने घरात पाऊल ठेवलं आणि नानांनी तिला विचारलं, “गौरी, नवचंडीच्या यज्ञाची यादी शौनकजवळ दिली होतीस का ? अजून तो आला नाही. उद्या आपट्यांकडे यज्ञ आहे. सामान सगळं तयार हवं.”
    “हो नाना, तुम्ही सकाळी देवळात गेला होता तेव्हा शौनक आला होता. त्याच्याजवळ मी यादी दिली आहे.” गौरीने घाबरतच उत्तर दिले.
   “मला सांगून का गेली नाहीस?”
  “नाना,आईला सांगून गेले होते.मला कॉलेजला उशीर झाला होता आणि तुम्ही घरी नव्हता.”
  “एखादं काम तुला सोपवल्यावर, ते पूर्ण करण्याची जबाबदारी तुझी आहे ना?”
   नानांचे ते शब्द ऐकले आणि गौरी काही न बोलता आत गेली.
  “गौरी,शौनक येऊन गेला हे मी नानांना सांगायला विसरले बघ.” शैला गौरीकडे बघून म्हणाली.
    गौरीने आईकडे फक्त कटाक्ष टाकला आणि तिच्या खोलीत गेली. पर्स टेबलवर फेकली आणि कॉटवर डोळ्यावर हात ठेवून आडवी झाली. हुंदका गळ्यापर्यंत आला,तो तिने आवरला. सगळं मनात साठवलेलं डोळ्यातून पाझरायला लागलं..
                 ———-
 नानांचा कडक स्वभाव तिला समजायला लागल्यापासून ती अनुभवत होती. त्यांच्या ह्या स्वभावाला आजी आणि आई खतपाणी घालत गेल्या. मी म्हणेन ती पूर्व दिशा हा स्वभाव होत गेला. एकदा तर रात्रीच्या जेवणाची वेळ टळून गेली म्हणून आईला वाटेल तसे बोलले. त्यावेळी गौरी दहावीत होती. तिला असह्य झालं. ती चिडून नानांना म्हणाली, “नाना,एक दिवस उशीर झाला तर काय झालं? आज आईचं डोकं दुखत होतं म्हणून ती जरा वेळ झोपली होती.”
  “मला दुरुत्तर करायची तुझी हिम्मत कशी झाली गौरी? आणि आईला बरं नव्हतं तर तू स्वयंपाक करायचा होता.”
   “अहो,तिची परीक्षा महिन्यावर आली आहे. दहावीची परीक्षा आहे. त्याचा अभ्यास किती असतो.”
  “ही कारणं मला सांगू नका. शिक्षण बंद करून टाकेन.” नानांचे हे बोलणे ऐकले आणि गौरी खोलीत जाऊन हुंदके देऊ लागली.”
   “रडू नकोस बाळा! तो असाच तापट आहे.” गौरीच्या पाठीवरून आजी हात फिरवत होती.
  “असाच आहे म्हणजे काय ग आजी? तू कधी रागावली नाहीस का नानांना ह्या बाबतीत? सतत घरात तणाव. मला हल्ली घरी यावसंच वाटत नाही. माझ्या मैत्रिणींकडे किती खेळकर वातावरण असतं.”
   “काय बोलणार ग? तो दोन वर्षांचा असताना तुझे आजोबा गेले. मी फक्त मॅट्रिक झाले होते. शिवणकाम सुरू केलं. नाना अतिशय बुद्धिमान पण पैशाअभावी त्याला डॉक्टर किंवा इंजिनिअर होता आलं नाही. साताऱ्याला जाऊन पौराहित्याचे शिक्षण घेतले आणि हळूहळू जम बसला. आज पुण्यात त्याच्यासाठी लोकं थांबतात. त्याला वेळ असेल तेव्हा पूजा,यज्ञ,सत्यनारायण करतात. त्या क्षेत्रात त्याला फार मान आहे. अगदी लहान वयात परिस्थितीचे चटके खाल्ल्यामुळे, स्वकर्तृत्वामुळे थोडा तापट, आग्रही झाला आहे.”
  “पण त्याची झळ आपल्याला पोहोचते आहे.”
  “निवळेल ग तो काही दिवसांनी.” आजी गौरीच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली.
    पण नानांचा संतापी स्वभाव कमी झालाच नाही. आजी गेली तेव्हा नाना लहान मुलासारखे रडले. नाना इतके हळवे पण आहेत,हे गौरीला त्या दिवशी कळलं. मुलींच्या बाबतीत त्यांची मत जुनीच होती. गौरीला ह्या काळातही खूप बंधनं होती. आधुनिक कपडे घालायची गौरीला परवानगी नव्हती. शाळा, कॉलेजदेखील महिलांचेच होते. मात्र पोस्ट ग्रॅज्युएशनला गौरीला पर्याय नव्हता. एरवी क्वचित कधीतरी कुठल्या मुलाशी बोललेली गौरी ह्या कॉलेजमध्ये जरा बावरली होती. तिचा सायकॉलॉजी हा अतिशय आवडीचा विषय होता. तिला कौन्सिलिंगमध्ये करिअर करायचं होतं. आप्पांना स्वतःला मनासारखं शिकता आलं नाही पण त्यांनी गौरीला तिच्या शिक्षणासाठी कायम प्रोत्साहन दिलं.
                   ——–
 कॉलेजच्या पहिल्या दिवशी मुलांच्या घोळक्यात मुलींना मोकळेपणाने गप्पा मारताना बघून गौरीला कुतूहल वाटलं. आठवडाभरात ती देखील कॉलेजमध्ये छान रुळली.
    दुसऱ्या दिवशी देखील आदिनाथ क्लासमध्ये गौरीच्याच बाजूला बसला. गौरीचं लेक्चरमध्ये अजिबात लक्ष लागत नव्हतं. कसलीतरी भीती वाटत होती. कॉलेज संपल्यावर गौरी घरी जाताना आदिनाथने तिला मेन गेटजवळ गाठलं,”गौरी थांब!”
   मला गौरी म्हणण्याइतकी ह्याची मजल गेलीच कशी? गौरीने रागाने त्याच्याकडे बघितलं.
  “सॉरी, तुला बहुतेक आवडलेलं दिसत नाही. पण मला प्रत्येकाला नावाने हाक मारायला आवडतं. एक छान नातं तयार होतं. मोकळं,संवादयुक्त. परकेपणा सगळा निघून जातो. तुझं नाव गौरी आहे,हे मला कळणं फारसं अवघड नाही. तुला जरा वेळ आहे?”
   “काय काम होतं?”
“काही काम असेल तरच आपण बोलायचं का?” आदिनाथ हसत म्हणाला.
   “तसं नाही पण मला घरी जायचं आहे.”
  “घरी तर मला देखील जायचं आहे. आपण कॉलेज कँटीनमध्ये बसूया का थोडा वेळ.”
   गौरीने आदिनाथकडे बघितलं. त्याच्या पिंगट डोळ्यातलं आर्जव तिला त्याच्याकडे खेचत होतं. तिने नकळत मान डोलावली. कँटीनमध्ये आदिनाथ बोलत होता आणि गौरी फक्त ऐकत होती. त्याचा सावळा रंग, त्याचे सरळ केस,त्याची देहयष्टी,त्याचे पिंगट डोळे एका तरुण मुलीला भुरळ पाडेल असेच होते.
  “गौरी,मीच बोलतोय. तू बोल न काहीतरी.”
  “आयुष्यात पहिल्यांदा हॉटेलमध्ये एका तरुण मुलाबरोबर आले आहे. सुचत नाहीय,काय बोलावं!”
  आदिनाथला गौरीचं हे साधं रूपच खूप आवडलं होतं. कॉलेजच्या पहिल्या दिवशी क्लासमध्ये इतक्या सुंदर मुली असताना, त्याला गौरीच्याच शेजारी बसावंस वाटलं होतं.
   “ओके, आपण उद्या बोलू. नो प्रॉब्लेम!”
  “आदिनाथ,एकच विचारायचं होतं.”
“मग विचार की.”
  “तुझं नाव आदिनाथ जोसेफ. जरा वेगळं वाटलं.”
 “माझी ममा मराठी आणि डॅड ख्रिश्चन. शेजारी राहायचे. एकमेकांवर जीव जडला,लग्न केलं. दोघांनीही आपल्या धर्माचा आदर केला. माझं आडनाव जोसेफ हे असणार म्हंटल्यावर डॅड ममाला म्हणले,नाव तुझ्या आवडीचं मराठी ठेव. आमच्या घरी आम्ही दिवाळी आणि ख्रिसमस दोन्हीही साजरे करतो.पुण्यातच जन्म,शिक्षण झाल्यामुळे डॅड उत्तम मराठी बोलतात.”
  “दोघांच्या घरून विरोध नाही झाला का?”
  “झाला की! पण ममा आणि डॅड त्यांच्या निर्णयावर ठाम होते. रजिस्टर लग्न केलं आणि संसार यशस्वी करून दाखवला. प्रेमापुढे धर्म येत नाही ग.”
  आदिनाथचं बोलणं गौरी मनात साठवून घेत होती. लहानपणापासून जुन्या वातावरणात वाढलेल्या गौरीला हे सगळं नवल वाटत होतं. आदिनाथबरोबर गप्पांमध्ये ती इतकी रंगली की वेळेचं भानच राहिलं नाही. त्याच्याशी खूप वर्षांची ओळख आहे असं वाटलं.
  रोज कॉलेज सुटल्यावर गौरी थांबून आदिनाथशी बोलायला लागली. तिला तो आवडायला लागला होता. तारुण्यसुलभ भावना अनावर होत होत्या. त्याच्या सहवासात सतत राहावंसं वाटू लागलं. एक दिवस आदिनाथ त्याच्या घरी गौरीला घेऊन गेला. त्याच्या घरचं मोकळं वातावरण बघून तिला नानांचा स्वभाव आठवला. सतत दडपणाखाली असलेलं घरचं वातावरण आठवलं.
गौरीला बघितल्यावर आदिनाथच्या डॅडने विचारलं, “आदि,नक्की मैत्रीणच न? की अजून काही? तसं असेल तर स्पष्ट सांग. मला सून आवडली.”
ते ऐकून गौरी कावरीबावरी झाली.
  “डॅड, तिची चेष्टा करू नका. ती घाबरट ससा आहे. उड्या मारत पळून जाईल.” आदिनाथ हसत म्हणाला.
  “तुम्ही दोघेही तिला त्रास देऊ नका. गौरी,तू आत ये. मी मस्त सँडविच केले आहेत,त्याबरोबर कॉफी घेऊ.” आदिनाथची ममा तिला किचनमध्ये घेऊन गेली. आदिनाथकडे तीन तास गौरी फक्त हसत होती. इतकं हलकं आजपर्यंत कधीच वाटलं नव्हतं.
 आदिनाथने गौरीला घरी सोडलं. तिने गेट उघडलं आणि आदिनाथने गौरीचा हात धरला. “गौरी,डॅडने आज तुझी गम्मत केली,ती तू मनावर घेतली नाहीस ना?”
  “नाही.” गौरी खाली मान घालून बोलली.
  “का नाही घेतली? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे गौरी. आय लव्ह यु.”
 गौरी घाबरली. तिने आजूबाजूला कोणी आहे का ते बघितलं.
  “आदि,मी जाते. माझ्या मनात तसं काहीही नाही.” गौरी धावतच घराकडे गेली. दार ठोठावले आणि आत आली तर नाना समोर उभे! “इतका वेळ कुठे होतीस? कॉलेज तर पाच वाजताच संपतं.”
“मैत्रिणीकडे नोट्स काढत होते.”
 गौरी त्या दिवशी खोटं बोलली पण आदिनाथचं आकर्षण तिला अस्वस्थ करत होतं. त्याच्याशी आपलं लग्न होणं अशक्य आहे,हे तिला ठाऊक होतं. पण ती स्वतःला आवरू शकत नव्हती.
  एक दिवस डोळ्यात पाणी आणून ती आदिनाथला म्हणाली “आदि,आपल्या नात्याला काही अर्थ आहे का रे?”
  “का नाही? तू मला हवी आहेस,माझा सहवास तुला हवा आहे, आपलं नातं घट्ट असल्याशिवाय हे शक्य नाही गौरी.”
 “अरे पण हे अधांतरी वाटतंय. ह्याचा शेवट काय होणार मला माहिती नाही.”
 “शेवट चांगलाच होणार.”
“तू नानांना ओळखत नाहीस.” माझ्यासाठी हे इतकं सोपं नाहीय.”
 “गौरी,आपलं कुणावर तरी जीवापाड प्रेम आहे,त्या व्यक्तिशिवाय आयुष्य व्यर्थ वाटतं, ही भावनाच किती सुखद आहे. आणि खरं प्रेम असेल तर अडथळे पार करण्यात मजा आहे.”
  “माझं तुझ्यावर खरं प्रेम नाही,असं म्हणायचं आहे का तुला?”
  “त्याशिवाय का तू इथे आत्ता माझ्याजवळ आहेस?”
  गौरीने आदिनाथकडे बघितलं. त्याच्या नजरेतलं तिच्याबद्दलचं प्रेम,आकर्षण बघून ती विरघळून गेली. त्याच्या कुशीत शिरत म्हणाली,
  “भीती वाटतेय,तू माझा होशील की नाही?”
 “एका सायकॉलॉजीच्या विद्यार्थिनीने हे बोलावं? गौरी,तूच स्वतः भित्री असलीस तर तू लोकांची भीती कशी घालवशील? कोन्सल्लिंग कसं करशील?”
“मी नानांना फार घाबरते आदि.”
  “ही मनातली भीती दूर कर. ती आपल्या दोघांना एकत्र येऊ देणार नाही. आणि एक लक्षात ठेव,मी तुझाच आहे आणि तुझाच राहणार.” आदिनाथने गौरीच्या कपाळावर ओठ टेकले.
   गौरी आणि आदिनाथबद्दल शैलाच्या कानावर आलं. “गौरी, सावध हो! तुझी पावलं जिकडे वळताहेत तो मार्ग तुझा नाही. मला सगळं कळलं आहे. आदिनाथला भेटणं बंद कर.”
  गौरी धीर गोळा करून म्हणाली,” मी प्रेम करते आदिनाथवर! मला त्याच्याशी लग्न करायचं आहे.”
  “डोकं ठिकाणावर आहे का तुझं?”
ख्रिश्चन मुलाशी लग्न करणार तू?”
  “धर्म बघून कुणी प्रेम करतं का आई?”
 “गौरी, जरा विचार करून बोल. आपल्या घरचं वातावरण तुला माहिती असून तू वाहवत गेलीस.”
  “आई,आम्ही कुठलीही मर्यादा ओलांडली नाही. आदि इतका संयमी,समंजस मुलगा शोधून सापडणार नाही.”
  गौरीचा तो निश्चय बघितला आणि शैलाला नानांची भीती वाटायला लागली. शैलाने नानांजवळ तिच्या लग्नाचा विषय काढला.
   “गौरीसाठी मुलं बघायला सुरवात करा.”
 “शैला, अजून तिचं एम ए पूर्ण व्हायचं आहे. ते तरी पूर्ण होऊ दे.”
  “लग्न ठरेपर्यंत तीच वेळ येते. फार उशीर नको.”
    नानांजवळ गौरीबद्दल शैलजा काही बोलू शकत नव्हती. त्याचे विपरित परिणाम होऊन काहीतरी भलतंच घडलं असतं. शैलाने वधू-वर सूचक मंडळात गौरीचे नाव नोंदवले.
  “गौरी,जरा बाहेर ये.”
 नानांची हाक आली तशी गौरी खोलीच्या बाहेर आली.
 “उद्या आपट्यांकडल्या नवचंडीच्या यज्ञाला तू आणि आई दोघीही माझ्याबरोबर चला. तुला आग्रहाचे आमंत्रण आहे. त्यांचा मुलगा सौमित्र यु एसला असतो. तो महिनाभर रजेवर आला आहे.”
   गौरीने काही न बोलता मान हलवली. उद्या यज्ञाला जायचं म्हणजे कॉलेजला जाता येणार नाही. आदि भेटणार नाही. तिने व्हाट्स अपवर त्याला मेसेज टाकला. गौरीला खरं तर अजिबात जायची इच्छा नव्हती. श्रीमंत लोकांकडे गेलं की तिला दडपण यायचं. तिच्या राहणीचं, तिच्या दिसण्याचं! आणि आपटे म्हणजे बडं प्रस्थ होतं. त्यांच्या मालकीच्या दोन फॅक्टरी होत्या. प्रसिद्ध उद्योगपती म्हणून त्यांचं नाव होतं. त्यांच्याकडे सतत पूजा,यज्ञ सुरू असायचे आणि त्यासाठी त्यांना गुरुजी म्हणून नानाच हवे असत.
    गौरीने तिच्या मैत्रिणीला फोन केला. “प्रीती,उद्या मला कॉलेजला यायला जमणार नाही. नोट्स मला नंतर देशील. आणि आदिला माझा निरोप दे.”
आपट्यांकडे जाताना शैलाने गौरीला बजावलं, “गौरी साडी नेसून चल.”
  “काय ग आई! आधीच मला फक्त सलवार कमीज घालायचं बंधन आहे. माझ्या मैत्रिणी किती नवीन ड्रेसेस घालून कॉलेजमध्ये येतात. माझ्या ह्या राहणीची मला लाज वाटते.”
  “नानांना आवडत नाही तुला माहितीय ना? परत तेच का बोलते? आपल्या घरचं वातावरण आहे तसं! तुला काही कमी तर नाही पडू देत ना!”
गौरी मुकाट्याने साडी नेसली. आपट्यांकडलं ऐश्वर्य बघून गौरीचे डोळे दिपले. सगळं फर्निचर,सामान अद्ययावत, उंची होतं. तिचं दडपण जास्तच वाढलं.
  पूजा होत आली होती,इतक्यात गौरीला आपटे काकूंनी किचनमध्ये बोलावलं.
 “गौरी,तू पण आत ये की! आईजवळ बस.” गौरी उठली आणि आपटे काकूंच्या मागोमाग गेली. शैला सगळ्या गुरुजींच्या जेवणाची तयारी करत होती. “आई मी घरी जाऊ का?” गौरीने विचारलं.
  “गौरी,इथे तुझी मदत व्हावी म्हणून तुला आणलं आहे. जेवणाची तयारी कर जरा. ताट,वाट्या पुसायला घे.”
  गौरीला हे अजिबात आवडलं नाही. घरात इतके नोकर असताना आईने हे काम आपल्याला सांगावं हे गौरीला अजिबात पटलं नाही. तिने नाराजीनेच सगळं केलं. आपट्यांकडला यज्ञ पार पडला आणि गौरीला कधी घरी जाते असं झालं. गौरी पुसलेली ताटं बाहेर नेताना तिची दारात एका तरुणाशी टक्कर झाली. सिगरेटचा उग्र दर्प गौरीला जाणवला आणि तिने मान वळवली. “आर यु गौरी?”
  गौरीने फक्त मान हलवली आणि तिथून बाजूला झाली. तिला आदिनाथची तीव्रतेने आठवण झाली. इतक्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. आदिनाथचा फोन होता. ती कोपऱ्यात गेली आणि तिने फोन घेतला. “गौरी,निरोप मिळाला. कुठे जाणार होतीस? मला काही बोलली नाहीस. उद्या येते आहेस ना कॉलेजमध्ये?”
  “हो,उद्या येते आहे. आदि,लव्ह यु!” गौरीच्या अंगावर रोमांचं आलं.
 “पहिल्यांदा तुझ्याकडून हे ऐकलं. से इट अगेन!” आदिनाथ तिला चिडवत म्हणाला.
  “आदि…” गौरीने सुखाने डोळे मिटले.
     रात्री व्हाट्स अपवर तासभर बोलत होती. तिचं आदिनाथवर प्रेम आहे,हे हिम्मत करून ती नानांना सांगणार होती. त्या रात्री स्वप्नात सारखा आदिनाथ येत होता.
    सकाळी गौरी उत्साहाने उठली. गाणं गुणगुणत किचनमध्ये जाणार इतक्यात तिच्या कानावर शब्द पडले.
  “आपटे वहिनींनी गौरीला मागणी घातली आहे. मी होकार दिला आहे. इतकं बडं स्थळ,इतकी धार्मिक,चांगली माणसं शोधूनही सापडणार नाहीत. आणि सौमित्रमध्ये नकार देण्यासारखे काहीच नाही. शिकलेला,देखणा,अमेरिकेत उच्च पदावर आहे. त्याला देखील गौरी खूप आवडली आहे. लग्न करूनच तो यु एसला जाईल. गौरीचे व्हिसाचे काम झाले की ती नंतर जाईल. साखरपुडा नकोच म्हणाले. मलाच मुहूर्त काढायला सांगितला आहे. पुढच्या आठवड्यातच उत्तम मुहूर्त आहे. ठरवून टाकू.”
   “बरं झालं,काळजीच मिटली.” शैला खुशीत म्हणाली.
गौरीने दारावरची पकड घट्ट केली. डोळ्यात आसवं,मनात राग,भीती सगळं उफाळून आलं. ती नकळत ओरडली. “नाना,मला हे लग्न करायचं नाही.”
  “अग पण का? इतकं चांगलं स्थळ चालत आलं आहे.”
  “नाना, प्लिज माझं ऐका.” गौरी रडत म्हणाली.
  “आईवडिलांना सोडून जायचं म्हणून तिला रडू येतंय. तुम्ही काळजी करू नका. गौरीचा होकार आहे.”
  “आई, मला बोलू दे.”
“गौरी,तुला नानांची शपथ आहे,ह्या मुलाला नकार देऊ नकोस.”
  उभ्या जागी गौरी थिजली. आईच मुलीला वडिलांची शपथ घालत होती. बाळबोध वातावरणात वाढलेली गौरी मूग गिळून गप्प बसली. मनात आदिची मनोमन क्षमा मागितली. तिची वाट आता तिला एकटीलाच चालायची होती. आदिचा हात सुटला होता….
                   ——–
    शेवटच्या पेशंटचे कोन्सल्लिंग झाले आणि पूर्वाने हातात मोबाईल घेतला.
  “हॅलो,आदिनाथ! पूर्वा बोलतेय. उद्या संध्याकाळी आठ वाजता तू माझ्या क्लिनिकमध्ये येऊ शकशील? एक सिव्हीअर डिप्रेशनची केस आहे. आय एम ट्राइंग माय बेस्ट पण तुझी मदत हवी आहे.”
  “शुअर! सव्वा आठ पर्यंत येतो.” आदिनाथने होकार दिल्यावर पुर्वाला बरं वाटलं. एम ए सायकॉलॉजी करून आदिनाथने पीएचडी केलं होतं. कितीतरी डिप्रेशनच्या पेशंट्सना त्याने त्यातून बाहेर काढलं होतं. तो एक नामांकित सायकॉलॉजीस्ट म्हणून पुण्यात प्रसिद्धीस येत होता.
    आदिनाथ पूर्वाच्या केबिनमध्ये आला.”हाय पूर्वा!”
  “हाय आदि! आज पेशंटचे तिसरे सिटिंग आहे. नो रिस्पॉन्स!”
  “फाईल बघू.” आदिनाथने फाईल उघडली. पेशंटचं नाव होतं..गौरी बापट. त्याने फोटो बघितला आणि त्याला धक्का बसला. गौरी आणि मनोरुग्ण? त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बघून पूर्वाने विचारलं,”आदि,तू ओळ्खतोस का हिला?”
   “हो,माझ्या कॉलेजमध्ये माझ्याच क्लासमध्ये होती. शिक्षण अर्धवट सोडून लग्न करून यु एसला गेली होती. स्ट्रेंज! एक सायकॉलॉजीची विद्यार्थिनी मनोरुग्ण व्हावी?
  इतक्यात रिसेप्शनिस्टने पेशंटला आत पाठवलं. समोर गौरीला बघून आदिनाथ चरकला. डोक्याखाली गडद काळी वर्तुळं, निर्जीव डोळे,कुठल्याही भावना नसलेला भकास चेहरा! छे, ही माझी गौरी असूच शकत नाही. तो निरागस गोडवा,ते लांब केस,चेहऱ्यावर असलेले सात्विक भाव सगळं सगळं हरवलं होतं. गौरीबरोबर तिची मावशी आली होती.
गौरी खुर्चीवर बसणार इतक्यात तिचं लक्ष आदिनाथकडे गेलं. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव सरसर बदलले. ती थरथर कापायला लागली आणि मावशीचा हात धरून जोरात ओरडली. “मावशी घरी चल,मला कोणाशीही बोलायचं नाही. मला नकोय कुठलं औषध!” आणि हातात चेहरा लपवून रडू लागली.
   “गौरीताई,रिलॅक्स! तुम्हाला त्रास होत असेल तर आजचं सिटिंग कॅन्सल करू. तुम्ही मावशीबरोबर घरी जा. ओके?” पूर्वाने गौरीला समजावलं.
   गौरी केबिनच्या बाहेर पडली आणि पूर्वा आदिनाथला म्हणाली,”त्या काहीच बोलत नाही. फसलेलं लग्न आहे,इतकंच फक्त त्यांच्या आईवडिलांकडून कळलं.”
  “त्यांच्या पुढच्या सिटिंगला मला कळव,मी येईन.”
   आदिनाथ घरी परतला पण गौरी डोळ्यासमोरून हलत नव्हती. इतका श्रीमंत,उच्चशिक्षित, देखणा नवरा मिळालेल्या गौरीची ही अवस्था? तो खुर्चीवर डोळे मिटून बसला. गौरीची शेवटली भेट आठवली…..
                ———
     गौरी आदिनाथला घट्ट मिठी मारून रडत होती.”आदि,मी आज लग्नाच्या खरेदीसाठी बाहेर पडले आणि तुला फोन केला. सगळं संपलं रे! मी तुझी नाही होऊ शकत.”
  “वेडी आहेस का? काहीही संपलेलं नाही. तू माझी आहेस आणि माझीच राहणार.”
  “आदि,ते शक्य नाही. मला आईने नानांची शपथ घातली आहे. नानांना काही झालं तर?”
  “कमॉन गौरी! तुझी तयारी असेल तर सगळं सोडून माझ्या घरी ये. ममा आणि डॅड तुझं स्वागतच करतील.”
   “आदि,माझी हिम्मत नाही. नाना आपलं प्रेम स्वीकारणं शक्यच नाही. मला एकदाच तुला डोळे भरून बघायचं होतं म्हणून आज भेटले. मला विसरून जा आणि माफ कर. मी प्रीत निभावू शकले नाही.” गौरीने त्याचे दोन्ही तळवे हातात घेतले, त्यावर ओठ टेकले आणि ती वळून परत जायला निघाली….
                  ———
   “गौरी,थांब.” आदिनाथ जोरात ओरडला.
  “आदि, आर यु ओके?” आदिने वळून बघितलं. डॅड त्याच्या खांद्यावर थोपटत होते. गौरीच्या आठवणींमधून आदिनाथ जागा झाला.
 “डॅड, आज गौरी पेशंट म्हणून पूर्वाच्या क्लिनिकमध्ये आली होती.”
  “गौरी आणि पेशंट?”
“हो, आय एम गोइंग टु हॅन्डल धिस केस.”
  “गुड बेटा, बेस्ट लक! तिला त्यातून बाहेर काढ आणि घरी घेऊन ये एकदा!” त्याला थोपटत डॅड म्हणाले.
    पुढच्या सिटिंगला गौरीशी पूर्वा बोलायला लागल्यावर पंधरा मिनिटांनी आदिनाथ आला. “पूर्वा, तुझी हरकत नसेल तर मला फक्त गौरीशी बोलायचं आहे.”
  “ओह शुअर आदि!” पूर्वा केबिनच्या बाहेर जायला लागली तशी गौरी थरथर कापायला लागली. पूर्वा बाहेर गेल्यावर आदिनाथ खुर्चीतून उठला आणि गौरीजवळ आला. गौरी अंग आकसून खाली मान घालून खुर्चीत बसली होती. आदिनाथने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि हाक मारली,”गौरी!”
   गौरी आदिनाथच्या कमरेला मिठी मारून जोरात रडायला लागली. आदिनाथ फक्त तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. “गौरी,आज आपण काहीच बोलणार नाही. तू शांतपणे घरी जा,औषध घे. पुढच्या सिटिंगला आपण बोलू. आदिनाथने पूर्वाला आत केबिनमध्ये बोलावलं. “पूर्वा, पुढच्या सिटिंगमध्ये गौरी मला सगळं तिच्या मनातलं सांगणार आहे. हो ना गौरी?”
  गौरीने आदिनाथकडे बघितलं. तिच्या काळवंडलेल्या चेहऱ्यावर आदिनाथला पुसटसं हसू दिसलं.
   पुढच्या सिटिंगला आदिनाथने गौरीला त्याच्या क्लिनिकमध्ये बोलावलं. आज गौरी थोडी वेगळी वाटली. तिच्या हातापायांची थरथर कमी झाली होती. “गौरी, तू मनातलं सगळं सांगितल्याशिवाय मी ट्रीटमेंट कशी देणार?”
   “मला काहीही सांगायचं नाही.” गौरी परत रडायला लागली.
  “गौरी!” आदिनाथने उठून तिचा चेहरा त्याच्या हातात धरला. “गौरी, तुला तुझ्या आदिला सगळं सांगावं लागेल.”
  गौरीने त्या पिंगट डोळ्यात बघितलं आणि हुंदके देत सगळं सांगायला लागली,”मी लग्न करून दोन महिन्यांनी व्हिसाचे काम झाल्यावर यु एसला गेले. तिथे गेल्यावर कळलं,मी फसल्या गेले होते. सौमित्र सतत ड्रिंक्स,चरस, गांजा, वेगवेगळ्या मुलींना चटक लावणे, जुगार ह्या सगळ्या वाईट सवयीत अडकला होता. मला सिगरेटचे चटके देऊन त्याच्या आईवडिलांना हे कळता कामा नये ही धमकी द्यायचा. माझ्याही शरीरावर अत्याचार केले. विकृत होता तो आदि! आपटे काकाकाकूंना देखील हे इतकं गंभीर आहे, ह्याची कल्पना नव्हती. मला परतायला कुठलाच मार्ग नव्हता पण आपटे काका माझ्या पाठीशी राहिले. ते यु एसला आले आणि गौरीला चेंज हवा म्हणून भारतात घेऊन जातो,असं सौमित्रला सांगितलं. इथे आल्यावर घटस्फोटाची सगळी जबाबदारी त्यांनी घेतली. मी दोन महिन्यांची गरोदर होते. अबॉर्शन केलं. आयुष्य उध्वस्त झालं होतं. जगणं नकोसं झालं होतं. आई, नाना पुरते खचून गेले होते. एकदा आत्महत्येचा प्रयत्न देखील केला पण वाचले. आदि,मला जगायचं नाहीय रे!” गौरीने टेबलवर डोकं ठेवलं.
    “सायकॉलॉजीची विद्यार्थिनी इतकी कमकुवत गौरी? तुला कोन्सल्लिंगची आवड होती म्हणून तू हा विषय घेतला आणि स्वतःची ही अवस्था करून घेतलीस?”
   आदिनाथने गौरीला प्यायला पाणी दिलं. “औषधं घे,यु विल बी फाईन.”
  “आदि,ममा आणि डॅड कसे आहेत?” गौरी इतकी नॉर्मल बोलतेय हे बघून आदिला प्रचंड आनंद झाला.
  “दोघेही मजेत.”
  “आणि तू..?” गौरीचे डोळे गच्च भरले होते.
  “मी पण मजेत. आपल्या दोघांच्या भेटीतल्या सुंदर आठवणींमध्ये रमतो.”
  “म्हणजे तू?”
 “नाही केलं लग्न! बघितल्या खूप मुली पण प्रत्येकीत गौरी शोधत होतो,ती नाही सापडली.”
  “आदि..”
  “रिलॅक्स गौरी, ह्यावर आपण नंतर बोलू, ओके? आजचं सिटिंग थांबवू. पुढची अपॉइंटमेंट मावशीला घ्यायला सांग.”
    गौरीने आदिनाथकडे बघितलं. त्याच्या डोळ्यात तिला तेच प्रेम दिसलं,जे त्याने इतकी वर्ष जपून ठेवलं होतं. गौरीला तिचं वळण सापडलं होतं. आता आदिनाथचा हात धरून ती ह्याच वळणावर मार्गस्थ होणार होती… ..
               ××समाप्त××
सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}