★सिद्धी★ ©®सौ मधुर कुलकर्णी,

★सिद्धी★ ( भाग १ )
पहाटे पाचला सिद्धीला दचकून जाग आली. ती लगेच उठली,फ्रेश झाली आणि डायनिंग टेबलवर लॅपटॉप घेऊन बसली.आज कंपनीच्या सीईओ समोर तिचं पहिलंच प्रेझेंटेशन होतं. सिद्धी दोन महिन्यापूर्वीच एका मल्टीनॅशनल कंपनीत जॉईन झाली होती.लहानपणापासूनच सिद्धी अतिशय बुद्धिमान, ध्येयवादी आणि स्वतंत्र विचारांची होती.कुठलीही गोष्ट तिला परफेक्ट हवी असायची.आजचं प्रेझेंटेशन चांगलं होण्यासाठी तिने खूप परिश्रम घेतले होते.
रोजच्याप्रमाणे अनिलना सहा वाजता जाग आली.स्वयंपाकघरात ते पाणी पिण्यासाठी आले आणि त्यांना सिद्धी दिसली.
“सिद्धी,आज सूर्य कुठे उगवलाय?तू इतक्या लवकर उठलीस?”ते हसून म्हणाले.
“पपा, आज माझं प्रेझेंटेशन आहे,आणि मला खूप टेन्शन आलंय, नीट होईल ना?”
“नक्कीच चांगलं होणार.माझा विश्वास आहे तुझ्या कर्तृत्वावर! तू कर तुझं काम,आज चहा मी करतो.”
“काही नको,करते मी!एकतर साखर जास्त घालता,नाहीतर चहा जास्त घालता.” उमा स्वयंपाकघरात येत म्हणाली.
सिद्धी आणि अनिल एकमेकांकडे बघून हसले.
चहा घेताना कामात तल्लीन झालेल्या सिद्धीकडे उमा कौतुकाने बघत होती. सिद्धीचा तिला अभिमान वाटला.ती होतीच तशी! देवीच्या नवरात्रांत नवव्या दिवशी तिचा जन्म झाला म्हणून उमाने तिचं नाव ‘सिद्धी’ ठेवलं होतं. तिला आठवलं,मुलगी झाली म्हणून सासूबाई जरा नाराजच झाल्या होत्या.कधीतरी त्यांच्या बोलण्यातून उमाला ते जाणवायचं.पण अनिल तिला समजावून सांगायचे ,”उमा,फार मनाला लावून घेऊ नकोस. ती जरा जुन्या विचारांची आहे.आपली सिध्दीच एक दिवस असं कर्तृत्व गाजवेल की तिचे आईवडील असल्याचा आपल्याला अभिमान वाटेल.”
आणि झालंही तसंच! सिद्धी बुद्धीने अतिशय तल्लख होती. शाळेत नववीपर्यंत पहिला नंबर सोडला नाही. दहावीत देखील बोर्डात दुसरी आली. ती दुसरीत असताना तिचा दुसरा नंबर आला पण तिला पहिल्या नंबरची इतकी खात्री होती की तिने शिक्षकांना पेपर परत तपासायला लावले.आणि ती पहिली आली होती. मार्कांची बेरीज चुकली होती.
उमाच्या डोळ्यांपुढे एकदम छोटीशी सिद्धी आली आणि तिला हसू आलं. तिने मनातच देवाला प्रार्थना केली,”देवा,पोरीला यश मिळू दे. तिच्या मेहनतीचं फळ तिला मिळू दे.”
तयार होऊन आठ वाजता सिद्धी कंपनीत जायला निघाली.तिने देवाला नमस्कार केला.उमाने तिच्या हातावर साखर ठेवली.”छान कर प्रेझेंटेशन! आत्मविश्वास कमी पडू देऊ नकोस.”
“हो आई,”सिद्धीने साखर तोंडात टाकली. “पपा,विश मी गुड लक!”
“गुडलक बेटा, डू युअर बेस्ट!” तिच्या डोक्यावर थोपटत अनिल म्हणाले.
आज सिद्धीने स्कुटर जरा नेहमीपेक्षा जास्तच जोरात चालवली.कंपनीच्या पार्किंगमधे सिद्धीने स्कुटर पार्क केली आणि धावतच लिफ्टकडे वळली. लिफ्टमधे तिचा कलीग विनीत कामेरीकर होता. आज त्याचंही प्रेझेंटेशन होतं. दोघेही एकमेकांकडे बघून हसले. विनीत आणि सिद्धी एकाच वेळेस कंपनीत जॉईन झाले होते पण फारसं बोलणं कधी होत नव्हतं.
कंपनीत आत जाताना विनीतने अचानक सिध्दीला हाक मारली, “सिद्धी,आय नो,यु हॅव ट्रेमेन्ड्स पोटेन्शियल. ऑल द बेस्ट!”
“विश यु द सेम!” सिद्धी हसून म्हणाली.
दोघेही प्रेझेन्टेशनसाठी काँफरन्स हॉलकडे गेले..!
कॉन्फरन्स हॉलमधे प्रेझेन्टेशनसाठी सिद्धी आणि विनीत आले.आज सेल्फ अफ्रेझलचे प्रेझेन्टेशन होते. दोघांचेही पहिलेच प्रेझेंटेशन असल्यामुळे दोघेही घाबरलेच होते.
सिद्धीने प्रेझेंटेशन सुरू केलं. स्ट्रेनथ्स,विकनेस,अपोरचुनिटीज,
SWOT analysis.. ह्यावर कुठेही न अडखळता सिद्धी आत्मविश्वासाने बोलली. कंपनीचे सीइओ सिद्धीवर फारच खुष झाले. त्यांनी तिच्याजवळ येऊन तिचे विशेष कौतुक केले. “यु आर अ प्रॉमिसिंग गर्ल! वूई नीड सिंसीअर एम्प्लॉइज लाईक यु! कीप इट अप!”
“थँक यु सो मच सर!” सिद्धीने त्यांना शेकहॅन्ड केलं.
हॉलच्या बाहेर पडताना विनीत सिध्दीला म्हणाला, “सिद्धी आऊटस्टँडिंग झालं प्रेझेन्टेशन, अभिनंदन!”
“हो थँक्स,तुझं पण छानच झालं.”
“गॉड नोज,मला तुझ्यासारखी शाबासकीची थाप नाही मिळाली.”
“बेटर लक नेक्स्ट टाईम!बाय.” सिद्धी हसत म्हणली.
सिध्दीला विनीत रोज बघत होता पण तिच्यातला स्पार्क त्याने आज जवळून बघितला.नकळत तिच्याबद्दल त्याला आकर्षण निर्माण झालं.
सिद्धी खुषीतच घरी आली.
“आई, पपा; प्रेझेन्टेशन खूपच छान झालं. सीईओ प्रत्यक्ष माझ्याशी बोलले आणि कौतुक केलं.आय एम सो हॅपी टुडे.”
“वेल डन सिद्धी! प्राउड ऑफ यु!” अनिल म्हणाले.
“आई,आज वडा पाव कर,मस्त झणझणीत चटणीसह! मी पाव घेऊन येते.”
सिद्धी तिच्या खोलीत गेल्यावर उमा अनिलना म्हणाली, “अनिल,आता सिद्धीचं लग्नाचं बघायला हवं.पंचवीस पूर्ण झालेत तिला!लग्न जुळेपर्यंत वर्ष जातच की!योग्य वेळी लग्न झाली की पुढचं सगळं सोपं जातं.”
” बरोबर आहे उमा,आजच तिचं नाव वधुवर सूचक मंडळात नोंदवतो. पण सिध्दीला तिच्या योग्य स्थळ मिळेपर्यंत घाई करायची नाही. तिच्या हुशारीची कदर करणारे हवे. शिवाय ती जरा स्वतंत्र विचारांची,बंडखोर आहे.ते देखील समजून घ्यायला हवं. नाहीतर घरात कलह नको.”
“त्या सगळ्या पुढच्या गोष्टी आहेत.आधी नाव तर नोंदवा.आणि सिद्धी कितीही स्वतंत्र विचारांची असली तरी अविचारी नक्कीच नाही. परिस्थिती सांभाळून घेण्याइतकी समज तिच्याकडे नक्कीच आहे.”
“बरोबर,तुझीच मुलगी!”अनिल हसत चेष्टेने म्हणाले.
“हो तर,आहेच की!” उमा हसत म्हणाली आणि बटाटेवड्याची तयारी करायला गेली.
डायनिंग टेबलवर वडापाव खाताना तिघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या.
अनिलने हळूच विषय काढला.
“सिद्धी,आता तुझे दोनाचे चार हात करायची तुझ्या आईला घाई झालीय.”
“आलीस का आई तू मूळ पदावर!ठीक आहे,मी तयार आहे पण मुलगा सेन्सिबल हवा हं! मला त्याच्या रंगरूपाचं अजिबात अप्रूप नाही.आमच्या पिढीत विचार जुळणं फार महत्वाचं आहे ग! तुमच्या काळात तुम्ही बायका पटत नसलं तरी बोलत नव्हता.पण मला हे जमणं अवघडच आहे आई! आणि तुला तर माहितीय,खोटेपणा,अन्याय ह्या गोष्टींची मला चीड आहे.” सिद्धी सात्विक संतापाने म्हणाली.
“अग हो रिलॅक्स! आजचा दिवस तुझा इतका छान गेला आहे. मूड खराब करू नकोस.आपण नंतर बोलू ह्या विषयावर! जा जाऊन झोप!”अनिल म्हणाले.
“ओके, गुड नाईट!” सिद्धी तिच्या रुमकडे गेली.
“बापलेकीचं हे नेहमीचंच आहे. गांभीर्य म्हणून नाही कसलं!” उमा चिडली.
“अग, आज तिचा दिवस इतका छान गेलाय,तो आनंद टिकू तरी दे जरा काळ! उद्या बोलू तिच्याशी ह्या विषयावर!”अनिल म्हणाले.
सिद्धी कॉटवर आडवी झाली. झोपायच्या आधी तिने व्हाट्सएप ओपन केलं.तिला विनीतचा मेसेज दिसला.
..हाय सिद्धी,आज तुला भेटल्यावर मी खूप इम्प्रेस झालो.इतके दिवस तुला लांबून बघत होतो.तुला हुशारीचा गर्व आहे असं वाटायचं बट यु आर सो सिम्पल…
…थँक्स विनीत,आय एम फ्लॅटर्ड. गुड नाईट..
सिद्धीने मोबाईल बंद केला आणि लाईट स्विच ऑफ केला.
क्रमशः
©®सौ मधुर कुलकर्णी,