★सिद्धी★ ( भाग २ ) ©®सौ मधुर कुलकर्णी,

★सिद्धी★ ( भाग २ )
कंपनीतून बाहेर पडताना विनीतने आज सिध्दीला गाठलंच.
“सिद्धी,तुला घरी जायची घाई नसेल तर खाली कॅन्टीन मधे जायचं?”
“घाई नाही पण फार वेळ नको.आई काळजी करते मग!”
दोघेही कंपनीच्या कॅन्टीनमधे बसले. विनीतने कॉफी मागवली.
“सिद्धी,आपण एकमेकांना आत्तापर्यंत फक्त चेहऱ्याने ओळखत होतो पण काल समोरासमोर आलो. तुझं कॅलीबर,एफिशियंसी ह्याबद्दल खूप ऐकलंय.काल अनुभव पण घेतला.”
“त्यात विशेष काही नाहीय रे,हल्ली कितीतरी मुली हुशार,कामात परफेकशनिस्ट असतात. तू सांग,तुझे आईवडील कुठे असतात?” सिद्धीने कॉफीचा घोट घेत विचारलं.
” माझं मूळ गाव अगदीच छोटं आहे. कोल्हापूर मार्गावर कामेरी नावाचं छोटंसं गाव आहे.आमचा खूप मोठा वाडा आहे. वडिलोपार्जित भरपूर इस्टेट,शेती आहे.आबासाहेबांच्या श्रीमंतीमुळे गावात त्यांचा दरारा आहे. आई अगदी साधी..मालती तिचं नाव!धाकटी बहीण मीना,बी ए च्या दुसऱ्या वर्षाला आहे.”
“आबासाहेब?” सिद्धीने विचारलं.
“आबासाहेब म्हणजे माझे वडील! गावात सगळे त्यांना आबासाहेब म्हणतात. आम्ही पण तेच म्हणायला लागलो. ते फार कडक, जुन्या मताचे,आपलाच हेका चालवणारे आहेत. वडील आहेत माझे,असं बोलू नये हे कळतंय पण ते खरं आहे.मी त्यांच्याशी वाद घालून,भांडूनच म्हण हवं तर, पुण्यात ऍडमिशन घेतली. बारावीनंतर मी कॉमर्स घेऊन घरची शेती बघावी अशी त्यांची इच्छा होती. पण मला खूप चांगले मार्क्स मिळाले आणि माझा सायन्सकडे ओढा होता. मग इथे पुण्यात इंजिनिअरिंग कॉलेजमधे ऍडमिशन घेतली. नंतर एमबीए केलं आणि ह्या कंपनीत नोकरी मिळाली.” विनीतला सिध्दीजवळ मन मोकळं करावंसं वाटलं.
“मी बावधनला राहते.आई,पपा आणि मी! पपा गणित विषयाचे प्रोफेसर आणि आई चित्रकलेचे क्लासेस घेते. मला आई,पपांनी कायम प्रोत्साहनच दिलं, मुलगी म्हणून माझे पाय ओढले नाहीत. तू घरी ये ना,आई पपांना भेट.”
“हो नक्की,थँक्स! तू माझी विनंती मान्य केलीस.”विनीत म्हणाला.
“थँक्स कसले रे? नो फॉर्मलिटीज! चल निघुया?उद्या कंपनीत भेटू. बाय!” सिद्धीने पर्स उचलली.
विनितला आज सिद्धी जास्तच आवडली. मध्यम बांधा, गोरी नितळ त्वचा,छोट्या केसांचा एक पोनी बांधला होता. कंपनीच्या ड्रेस कोड मधे फारच स्मार्ट दिसत होती.
——
सिद्धी गाणं गुणगुणतच घरात शिरली. ” काय ग,काय विशेष?स्वारी खुशीत दिसतेय आज.” उमा म्हणाली.
“नाही ग,काही विशेष नाही.” सिद्धी बोलली खरी पण तिलाही आज विनीतशी बोलून खूप छान वाटलं. सहा फूट उंच,सरळ दाट केस,चेहऱ्यावर निरागस गोडवा होता. पण वडिलांविषयी तो असं का बोलला?पहिल्याच भेटीत सहसा इतकं मोकळं कुणी बोलत नाही.तिला जरा आश्चर्यच वाटलं.विनीत खूप साधा वाटला तिला पण कुठेतरी,काहीतरी कमी भासल्यासारखं वाटलं. कदाचित घरच्या वातावरणामुळे सतत धाकात रहायची सवय, त्यामुळे आत्मविश्वास कमी असल्यासारखा वाटला.मी खरंच नशीबवान,आई-पपांसारखे आई-वडील मला लाभले.
सिद्धीच्या मनात विचारचक्र सुरू झालं. हे काय होतंय मला आज? मी आल्यापासून विनितचाच विचार करतेय. त्याच्या व्यक्तिमत्वात काहीतरी ओढ लावणार आहे असं जाणवलं.त्याच्याशी बोलताना हा खूप जवळचा मित्र आहे असं वाटलं.
रात्री झोपायच्या आधी सिद्धीने मोबाईल बघितला.विनीतचे खूप सारे मेसेज तिला दिसले.
तिच्या सौंदर्याची,हुशारीची तारीफ!…
सिद्धी गालात गोड हसली….
कंपनीत आता रोजच सिद्धी आणि विनीत.. ब्रेकफास्ट आणि लंच एकमेकांसोबतच घेऊ लागले.कधी निघताना सिध्दीला उशीर होणार असेल तर विनीत तिच्यासाठी थांबायचा. तिला घरापर्यंत सोडून पुढे औंधला त्याच्या फ्लॅटवर जायचा. विनीत सिद्धीवर प्रेम करायला लागला होता पण तिच्याजवळ कबुली देण्याची त्याची हिम्मत होत नव्हती. तिला जर आवडलं नाही तर तिची मैत्रीही आपण गमावून बसू असं त्याला वाटत होतं.
आज विनीतला कंपनीत यायला जरा उशीरच झाला.बाईक मधेच रस्त्यात पंक्चर झाली. लेटमार्क लागलाच! त्याने पंचिंग केलं आणि त्याच्या जागेवर आला.सिद्धी त्याला कुठे दिसली नाही. तो बेचैन झाला.
तासाभराने त्याला सिद्धी आत येताना दिसली.तिने विनितला विश केलं आणि तिच्या जागेवर जाऊन बसली.आज सिद्धी काहीतरी वेगळीच दिसत होती.,कपाळावर कुंकू,कानात मोठे इअरिंग्स,हलकासा मेकअप पण केला होता.त्याच्या मनात नको ते विचार यायला लागले. सिध्दीला कुठलं स्थळ वगैरे तर आलं नसेल ना?तिच्या लग्नाची बोलणी तर सुरू नसतील?त्याचं कामात लक्ष लागेना.
ब्रेकमधे चहा घेताना त्याने सिध्दीला विचारलंच, “सिद्धी,आज कुंकू,इअरिंग्स कंपनीत?एरवी तुला कधी असं बघितलं नव्हतं म्हणून विचारलं.”
“ओह!ते काढायचं राहूनच गेलं.आज घरी छोटी पूजा होती म्हणून जरा नटले, आईसाठी! तिचं म्हणणं असतं एरवी मी कधी तुला कुठल्याच गोष्टीत आडकाठी करत नाही पण पूजेच्या वेळेस जरा कुंकू,बांगडया,कानातले घालत जा.” तिने टिकली काढण्यासाठी कपाळाकडे हात नेला.
“राहू दे टिकली! सुंदर दिसते आहेस आज!” विनीत तिच्याकडे बघत म्हणाला.आपल्या मनात जे काही आलं तसलं काहीही नाहीय हे ऐकून त्याला हायसं वाटलं.
सिद्धीने विनीतकडे बघितलं. प्रेमात पडलेल्या मुलासारखीच त्याची नजर होती. तिलाही विनीत आवडायला लागला होता पण दोघांच्या घरचे वातावरण,विचार ह्यात खूपच तफावत होती. विनीतकडून आजपर्यंत तिने जे ऐकलं त्यावरून त्याचे वडील फारच जुन्या विचारांचे वाटत होते. आईला घरात फारशी किंमत नाही असंच वाटत होतं.आणि विनीतने तरी तिच्याजवळ अजून प्रेमाची कबुली कुठे दिली होती? ती मनाशीच हसली.
“सिद्धी चल जाऊया! ब्रेक संपलाय.”विनीतच्या बोलण्याने सिद्धी भानावर आली.
“विनीत,आजपासून आठवडाभर मला घरी निघायला उशीर होणार आहे.कामाचं जरा लोड आहे.तू माझ्यासाठी थांबू नकोस. तुझी वेळ झाली की तू जा.”
तिचं असं बोलणं ऐकून विनीत खजील झाला.त्याला वाटलं सिद्धी मला टाळतेय.तिच्या मनात असं काहीच नसेल.मी स्वतःवर संयम ठेवायला हवा.
संध्याकाळी निघताना त्याने सिध्दीला बाय केलं आणि निघाला.सिद्धी मनात एकदम नाराज झाली.उशीर झाल्यावर तिच्यासाठी थांबणारा विनीत,मी आज थांबू नको म्हटल्यावर इतकं कोरडं बाय करून लगेच निघून गेला.तिला आतून काहीतरी दुखावल्यासरखं झालं.तिने पुढ्यातली फाईल उघडली आणि काम सुरू केलं.
त्यादिवसापासून विनीत सिद्धीशी मोजकंच बोलू लागला. तिचं आकर्षण कमी होत नव्हतं पण त्याने स्वतःच्या मनाला समजावलं. सिद्धी आणि विनीत ब्रेकफास्ट, लंच बरोबरच घेत होते पण तो पहिला मोकळेपणा अचानक लुप्त झाला होता.
विनीतचं असं अंतर ठेवून वागणं सिध्दीला अखेर असह्य झालं.ती त्याच्यावर प्रेम करायला लागली होती. त्याचं तुटक वागणं,दुर्लक्ष तिला सहन होईना.
कंपनी सुटल्यावर दोघेही बाहेर पडले. गाडी काढताना सिद्धीने विनीतचा हात धरला आणि म्हणाली, ” विनीत,जरा बोलायचं होतं.”
“अग मग बोल की!” विनीत खिशातून गाडीची किल्ली काढत म्हणाला.
“का टाळतो आहेस मला?”
“सिद्धी, काहीतरी काय बोलतेस! रोज आपण भेटतो,बोलतो,एकत्र लंच घेतो.”
“नाही विनीत,हल्ली तू अंतर राखून असतोस. का?”
“सिद्धी,स्वतःवर ताबा ठेवायचा प्रयत्न करतोय. माझ्याकडून असं काही घडायला नको जे तुला आवडणार नाही. ” विनीत म्हणाला.
“अरे,आवडेल मला! तुझ्या तोंडून ऐकण्यासाठी मी कधीची आसुसले आहे.” असं म्हणून सिद्धी रडायलाच लागली.आपण पार्किंग मधे आहोत याचंही तिला भान राहिलं नाही.
“सिद्धी,अग काय हे?”
“विनीत,मला तू हवा आहेस.मी खूप प्रयत्न केला पण नाही स्वतःला आवरू शकले.”
विनीतने तिचे हात हातात घेतले.तिचे डोळे पुसले आणि म्हणाला, “सिद्धी इकडे बघ!आज जग जिंकल्यासारखं वाटतंय ग! मी तुझाच आहे आणि कायम राहीन.”
सिद्धीच्या डोळ्यात पाणी आणि ओठावर हसू होतं….
क्रमशः
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे