दुर्गाशक्तीमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

★★सिद्धी★★( भाग ५ ) ©®सौ मधुर कुलकर्णी

★★सिद्धी★★( भाग ५ )

कामेरीकरांचा पाहुणचार घेऊन, अनिल, उमा आणि सिद्धी पुण्याला परत जायला निघाले. लग्न कामेरीलाच करायचं असं ठरलं. आबासाहेबांचा गोतावळा खूप होता त्यामुळे त्यांनीच हे सुचवलं. वाड्याबाहेरच मांडव घालायचं ठरलं.

उमा आणि सिद्धीला मालतीताईंनी कुंकू लावलं तेव्हा सिद्धीला त्यांच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास झाला.
“आता लवकरच तुझी लक्ष्मीची पावलं ह्या वाड्यात येऊ दे सिद्धी!” मालतीताई सिद्धीच्या गालावर थोपटत म्हणाल्या.

सिद्धीने आबासाहेब,मालतीताईंना नमस्कार केला.मीनाला म्हणाली, “येते ग!आता हक्काने तुझी वहिनी होतेय,खुष ना?”

मीनाने हसतच मान डोलावली. विनीतला सिद्धीने नजरेनेच निरोप दिला.

पुण्याला परतल्यावर दुसऱ्या दिवशी अनिलने सिध्दीला सरळच विचारलं,
“सिद्धी,तुला जमेल ना त्या घरात स्वतःला सामावून घेणं?”

“म्हणजे काय पपा?”

“लग्नानंतर मुलीच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळते. माहेरी ती वेगळ्या वातावरणात वाढलेली असते. सासरी स्वभावाला मुरड घालावी लागते.आणि आम्ही तुला सगळ्याच गोष्टींचं स्वातंत्र्य दिलं पण आता तुला काही गोष्टींचा विचार करावा लागेल.”

“पपा,विनीतच्या बोलण्यातून त्यांच्या घरची मला पूर्ण कल्पना होती.मी करेन स्वतःला ऍडजस्ट! आता ती माझी माणसं आहेत.आणि आईने सुद्धा तुमच्या प्रेमाखातरकेलंच की ऍडजस्ट! ती इतक्या सुशिक्षित, मॉडर्न घरातली,मुंबईत राहणारी. पण वर्ध्यासारख्या लहान गावात लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहिलीच ना?”

“सिद्धी,माझी गोष्ट वेगळी आहे.सत्तावीस वर्षांपूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ ह्यात खूप फरक आहे. तुमच्या पिढीत सहनशक्ती कमी असते.”उमा म्हणाली.

“मान्य आहे आई मला! मी माझ्याकडून सर्वतोपरी प्रयत्न करेन. त्यांची सुखदुःख आता माझी झालीत.”

उमाने सिद्धीच्या डोक्यावर हात ठेवला.डोळे थोडे ओलावले.
“आई,अजून सासरी जायची आहे मी!”सिद्धी हसत म्हणली.

“हे पाणी तुझ्यातल्या समजूतदार मुलीसाठी आहे.आता जे बोललीस ते करून दाखव.आज माझ्या डोळ्यात पाणी आलंय. उद्या मालतीताईंच्या डोळ्यात तुझ्यासाठी पाणी यायला हवं, इतकी सगळ्यांवर माया कर.” उमा डोळे पुसत म्हणाली.

“तसंच होईल आई! सुनेचं कर्तव्य पार पाडेन आणि मुलीची माया देईन.” सिद्धी त्यांचा हात धरत म्हणाली.

“तो इस बात पे गरम कॉफी हो जाय!”अनिल हसून म्हणाले

“पपा,मी करते.”

“तुम्ही बसा हो वहिनीसाहेब!आम्ही सेवेला हजर आहोत.”

अनिलचा अविर्भाव बघून सिद्धी आणि उमा खळखळून हसल्या.

———

कामेरीला वाड्यासमोर भव्य मांडव घातला होता.नोकरचाकर, हाक मारली की हाताशी माणसं कशाचीच ददात नव्हती.

पुण्याहून मोजकेच पाहुणे घेऊन अनिल,उमा, सिद्धी आले.इतका भव्य वाडा बघून सगळ्यांचेच डोळे विस्फारले. आबासाहेबांनी सोय उत्तम केली होती.

लग्नाचे विधी सगळे साग्रसंगीत झाले.आबासाहेबांनी सिध्दीला दागिन्यांनी मढवली. कामेरीकरांच्या इभ्रतीला शोभेल अशी!

लक्ष्मीपूजन करून पुण्याची मंडळी परत निघणार होती.
सिद्धीने माप ओलांडल्यावर मीनाने अडवलं,
“वहिनी, उखाणा घेतल्याशिवाय आत यायला परमिशन नाही.”
सिद्धी लाजली आणि उखाणा घेतला.

गोडबोल्यांची लेक झाली कामेरीकरांची सून..
विनीतचं नाव घेते नव्या आयुष्याला सुरवात करून…..

———

पुण्याला परतायची वेळ आली आणि उमाच्या डोळ्याला धारा लागल्या. सिध्दीला मिठीत घेतलं आणि अश्रू अनावर झाले. दोघीही हमसून रडत होत्या.

“उमावहिनी,डोळे पुसा बघू! सिद्धीची अजिबात काळजी करू नका. ती आमची दुसरी लेकच आहे. आणि पंधरा दिवसांनी पुण्याला परत येणार आहेतच की दोघेही!आता सतत तुमच्या डोळ्यासमोर सिद्धी नसली तरी हाकेच्या अंतरावर आहे. मनात आलं की तिला भेटून या ,नाहीतर तिलाच तुमच्या घरी बोलवा.” मालतीताईंनी उमाला सावरलं.

“मालतीवहिनी, माझी सिद्धी एकुलती एक असली तरी लाडवलेली नाहीय.कामाची फार सवय नाही तिला,पण तुमच्या हाताखाली शिकेल हळूहळू! काही चुकलं तर तिला मोठ्या मनाने माफ करा.”

“काळजी करू नका अनिलराव,उमाताई! ती आता आमची सून आहे,ह्या घराची शान आहे.”
आबासाहेब अनिलना थोपटत म्हणाले.

“सिध्दी,येतो ग! “अनिलरावांना गदगदून आलं.

“आई,पपा तुम्ही आता एकमेकांची काळजी घ्या.” सिद्धीला रडू अनावर झालं.

अनिलने आबासाहेबांना हात जोडले,”आबासाहेब,ऋणानुबंधाच्या गाठी बरोबर घेऊन जातोय.”

बस दिसेनाशी होईपर्यंत सिद्धी पाहत होती. मालतीताईंनी हळुवारपणे तिला आत नेलं.

दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाच्या प्रसादाला अख्ख्या गावाला आमंत्रण होतं. सिद्धी नऊवारी,नथ,दागिने घालून सगळ्या प्रथा पाळत होती. विनीत-सिद्धी अगदी लक्ष्मी नारायणाची जोडी दिसत होती.

सगळी मंडळी येऊन गेल्यावर आबासाहेब खोलीत जायला वळले आणि थांबून म्हणाले,” सूनबाईंची दृष्ट काढा. कुणाची नजर लागायला नको.”

विनीतने सिद्धीकडे बघितलं.खानदानी दिसत होती अगदी! सिद्धी त्याची सहचारिणी झाली ह्याचा त्याला अभिमान वाटला.

———–

सकाळी सिद्धीला जाग आली आणि ती घाबरलीच! आई आणि आबासाहेब केव्हाच उठले असतील आणि आपण अजून झोपलोय. ती भीतभीतच स्वयंपाकघरात आली.

“आई,अहो मला उठवलं का नाही? मला अशी जाग येणारच नाही.सवयच नाही ना इतक्या लवकर उठायची. पण आता उद्यापासून अलार्म लावते.”

“अग, नवी नवरी तू! तुला कसं उठवणार?” मालतीताईंनी तिची चेष्टा केली.” आणि काहीही दडपण घेऊ नकोस,मी आहे ना!”

” वहिनी,काल किती सुंदर दिसत होतीस.” मीना म्हणाली.

“बायको कोणाची आहे मग?”
विनीत आत येत म्हणाला.

“आता मी तिची वहिनी पण आहे हं!” सिद्धीने लगेच मीनाची बाजू घेतली.

“वहिनी,तुझे फोटो दाखवणार आहे,कॉलेजमधल्या माझ्या मैत्रिणींना!” मीना तिला मोबाईल मधले फोटो दाखवायला लागली.

“मी पण येईन एक दिवस तुझ्या कॉलेजमधे,इथे आहे तोवर!” सिद्धी म्हणाली.
मालतीताई आणि मीना तिच्याकडे बघतच राहिल्या.

” माझं काही चुकलं का?” सिद्धीने विचारलं.

“नाही ग,चुकलं काहीच नाही. किती सहज मोकळेपणा आहे तुझ्या वागण्यात! मला असं कधी वागताच येत नाही. सतत दडपण.” मीना हताश होऊन बोलली.

विषय भलतीकडेच चाललाय हे बघून सिद्धी म्हणाली,”आई,आज आमटी मी करू का?”

“जरूर कर!तुला आता इथली पद्धत शिकायलाच हवी.पण आधी चहा घे,आंघोळ कर. आपल्या घरी पारोश्याने स्वयंपाक चालत नाही.

“आलेच मी आई फ्रेश होऊन.” सिद्धी चहाचा कप ठेवत म्हणाली.

——–

डायनिंग टेबल असून आबसाहेबांचं ताट आणि पाट बघून सिद्धीने मालतीताईंना विचारलं, “आई,आबासाहेब खाली का बसतात जेवायला?डायनिंग टेबल असताना!”

“अग, त्यांना टेबलवर जेवायला आवडत नाही.”

“आई,तुम्हाला किती तडजोड करावी लागली असेल ना! आबासाहेब इतके कडक शिस्तीचे!”

“तू देखील करतेच आहेस की आता विनीतसाठी! मालतीताई हसून म्हणाल्या. “खरं सांगू का सिद्धी,ते कडक आहेत पण दुष्ट नाहीत.”

“अहो आई,मला तसं नव्हतं म्हणायचं. बरं जाऊ दे. आपण ताटं घेऊ या. ”

आबासाहेब पाटावर बसले.चित्राहुती घालून मग त्यांनी जेवण सुरू केलं.

“आज आमटीत तिखट टाकायला विसरलात की काय? “त्यांनी आमटीचा घास घेत विचारलं.

“अहो,आज आमटी सिद्धीने केलीय.आपल्या घरची पद्धत शिकेल हळूहळू!” मालतीताईंनी सांगितलं.

“असू दे,असू दे! शिकताहेत ना,तेच कौतुकास्पद आहे.”आबासाहेब म्हणाले.

रात्री जेवण झाल्यावर सिद्धी खोलीत आली.विनीत तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाला, “काय जादू केलीस ग आबासाहेबांवर? तुझ्या बाबतीत त्यांचा कडकपणा कुठे गायब होतो माहिती नाही.”

“आहेच मी त्यांची लाडकी सून! आणि जादूचं म्हणशील तर तुझ्यावर पण केलीच की! ” सिद्धी विनीतच्या मिठीत शिरत म्हणाली.

विनीतने तिला जवळ घेतलं आणि तिच्या हातावर ओठ ठेवत म्हणाला, “आय एम लकी.”…..!

———-

लग्नाला आठवडा उलटला. सिद्धी सासरच्या सगळ्या पद्धती माहिती करून घेत होती. या आठ दिवसात तिला कळलं की आबासाहेबांना कामेरीत किती मान आहे. कामेरी तालुका असला तरी काही कुटुंब विश्वासाने आबासाहेबांकडे सल्ले मागायला येत असत! त्यांच्या एकूण बोलण्यावरून तिला जाणवलं की त्यांनी तरुण वयात खूप मेहनत करून शेती,त्यांचे इतर व्यवसाय किती उत्तम तऱ्हेने वाढवले होते. कर्तृत्ववान माणसात थोडा अहंकार,शिस्त ही येतेच. पण त्याची झळ विनीत,मीनाला बसली होती. त्यामुळे ते दोघेही आबासाहेबांसमोर कधीही मोकळेपणाने बोलत नसत.

सिद्धी पूजेसाठी बागेत फुलं आणायला गेली. महादू झाडाचं कटिंग करत होता.

“वहिनीसाहेब,अहो मी आणून दिली असती की फुलं!”

“महादूकाका,ही सगळी झाडं कुणी लावली?” सिद्धीने विचारलं.

“अहो,इथल्या प्रत्येक झाडामागे कथाच हाय बगा. तो पिवळा गुलाब दिसतोय बगा,तो धाकल्या मालकांचा जन्म झाला तवा आबासाहेबांनी लावला होता. गोरापान,देखणा मुलगा झाला तर म्हणले,हा टवटवीत गुलाब माझ्या विनीतसाठी! तो चमेलीचा वेल मीनाताईंच्या जन्माच्या वेळी आबासाहेबांनीच लावला. माझी लेक सुगंध घेऊन आली म्हणाले होते तवा!
वहिनीसाहेब,आबासाहेब जरा रागीट, शिस्तीचे हाय पण दिलदार माणूस!अहो, गावात सर्वांचा आधार आहेत ते! तुमच्यावर बी कधीमधी रागावले तर राग मनात धरू नका बगा.”महादू फुलं परडीत टाकत म्हणाला.

“नाही हो काका,मला पूर्ण कल्पना आहे, त्यांनी ह्या घरासाठी,गावासाठी किती केलं आहे ते आणि रागावले तर काय झालं? तो त्यांचा अधिकारच आहे. वडिलांसारखेच आहेत ते मला!” सिद्धीने परडी घेतली आणि ती जायला निघाली. इतक्यात महादू म्हणाला, “वहिनीसाहेब,जरा थांबा.पपई पिकली आहे,ती घेऊन जावा आत.धाकल्या मालकांना लई आवडते.”

सिध्दीला महादूकडे बघून एकदम भरूनच आलं. किती जीवापाड प्रेम करतात हे सगळ्यांवर.

दुपारची जेवणं झाल्यावर आबासाहेब मालतीताईंना म्हणाले, “आज जरा शेतावर जाऊन येतो.बरेच दिवस झालेत गेलो नाही. पेरणीचं बघायला हवं. विनीतला बरोबर घेऊन जातो.”

सिद्धीने ते ऐकलं आणि धीर एकवटून म्हणाली, “आबासाहेब,मी येऊ तुमच्याबरोबर?”

मालतीताईंनी चमकून तिच्याकडे बघितलं.

“आबासाहेब,मला खूप कुतूहल,आकर्षण आहे ह्या सगळ्या गोष्टींचं! लहानपणी फक्त एकदा मैत्रिणीच्या शेतावर गेले होते.”

आबासाहेबांना सिद्धीच्या प्रश्नाचं कौतुक वाटलं. शहरातली मुलगी असून ह्या गोष्टींचा ओढा आहे ह्या मुलीला,हे बघून बरं वाटलं.

“सुनबाई,आमची हरकत नाही.पण त्या मातीच्या ढेकळावरून चालू शकाल का तुम्ही?”

“आबासाहेब,प्रयत्न केल्याशिवाय कुठलीच गोष्ट साध्य होत नाही. येते मी तुमच्याबरोबर!”

“ठीक आहे,मी ड्रायव्हरला जीप काढायला सांगतो. तुम्ही आणि विनीत तयार रहा.”आबासाहेब म्हणाले.

“सिद्धी,काय ग बाई तुझा उत्साह!”मालतीताईंनी कौतुकाने सिद्धीकडे बघितलं.

“मीना,चल ना तू पण! जरा मजा करू.” सिद्धी मीनाला म्हणाली.

“छे ग,आबासाहेब असताना कुठली मजा? तू आणि दादा जाऊन या.”

“मीना,इतकी सतत धाकात राहू नकोस. कदाचित असंही असेल तू आणि विनीत त्यांच्याशी कधी मोकळेपणाने बोललाच नसाल.”

“वहिनी,जाऊ दे तो विषय!तू आणि दादा जाऊन या. यु एन्जॉय!”मीना म्हणाली.

सिद्धी खोलीत आली आणि विनीतला म्हणाली, “विनीत,मी पण येतेय शेतावर!”

“सिद्धी,तू तिथे येऊन काय करणार आहेस?” विनीतने विचारलं.

“काय करणार म्हणजे?आपलं शेत मला बघावसं वाटलं म्हणून येते आहे.”

“ओके चल! पण ती शेतावरची माणसं वहिनीसाहेब करून तुझ्या मागं मागं फिरतील. ती लहान पोरं कुतूहलाने बघतील. मग इरिटेट होऊ नकोस.” विनीतने तिला बजावलं.

“इरिटेट?काय बोलतोस विनीत!अरे, इतका जीव लावणारी ती माणसं असतात. त्यांची श्रीमंती हीच असते.” सिद्धीने रागाने विनीतकडे बघितले.

“ओहो मॅडम,रुसू नका.चल पटकन तयार हो.”

विनीत आणि सिद्धी तयार होऊन बाहेर आले. तिघेही शेतावर जायला निघणार इतक्यात लँडलाईन वाजला.

आबासाहेबांनी फोन घेतला.
“हॅलो,आबासाहेब कामेरीकर बोलतोय.”
पलीकडून इचलकरंजीच्या इनामदारांचा फोन होता.लग्नाला येऊ शकले नाही म्हणून त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.

“इनामदारसाहेब,या की एकदा सहकुटुंब आमच्या घरी! आमची मीना लग्नाची आहे. काही स्थळ असतील तर सांगा.काय सांगताय?तुमचा मुलगाच आहे होय लग्नाचा?अहो मग दुधात साखर! याच तुम्ही सगळे!मुलगी बघण्याचा कार्यक्रम म्हणूनच आमच्या घरी या.तसा फोन करतो मी परत!” इतकं बोलून आबासाहेबांनी फोन ठेवला.

“चला,चिरंजीव, सुनबाई! लगेच परतायचं आहे,फार उशीर नको.”आबासाहेब चालायला लागले.

“विनीत,अरे हे असं आहे ह्यांचं!ना त्या मीनाला विचारलं,ना मला! परस्पर ठरवून मोकळे!”मालतीताई म्हणाल्या.

“आई,आम्ही आल्यावर आपण बोलू.आबासाहेब बाहेर वाट बघताहेत.”विनीत म्हणाला.

सिद्धी मालतीताईंजवळ आली,त्यांच्या हातावर थोपटलं आणि म्हणाली, “आई, आम्ही परत आल्यावर बोलू.तुम्ही काळजी करू नका.”

विनीत आणि सिद्धी दोघेही बाहेर पडले…….

क्रमशः

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}