Classifiedदुर्गाशक्तीमंथन (विचार)मनोरंजनवैशिष्ट्यपूर्ण / फिचर

★★सिद्धी★★( भाग ७ ) ©®सौ मधुर कुलकर्णी

★★सिद्धी★★( भाग ७ )

इचलकरंजीला इनामदारांकडे मालतीताई,आबासाहेब आणि विनीत,
तिघेही पुढची बोलणी करायला गेले. ही संधी साधून सिद्धीने मीनाशी बोलायचं ठरवलं.
“मीना,काल जे बोललीस ते कुठेतरी माझ्या मनाला लागलं ग! एक सांगू का,आबासाहेब तुझ्या बाबतीत जास्त कडक आहेत कारण तुला सासरी गेल्यावर ऍडजस्ट करायला त्रास होऊ नये म्हणून!मी परक्या घरून आली आहे आणि तू परक्या घरी जाणार आहेस हा फरक आहे. मुलगी वागण्यात कुठे चुकली तर दोष आईवडिलांनाच देतात आणि मी करिअर वूमन आहे हे त्यांना माहिती आहे.”

“एक मिनिट वहिनी! मला जर संधी मिळाली असती तर मी देखील करिअर केलं असतं. पण मुलगी म्हणजे ग्रॅज्युएट करा,लग्न करा आणि संसार करा. त्यांच्या लेखी एवढंच! त्यापुढे जाऊन आबासाहेबांना स्वतःला कधीतरी असं वाटलं का की आपली मुलगी हुशार आहे,तिला शिक्षणात रस आहे. अग,बारावीला नव्वद टक्के होते मला! सायन्स घ्यायची इच्छा होती पण मन मारलं! कधी कधी वाटतं, मी गरीब घरात जन्मले असते तरी चाललं असतं पण हे पाश नको होते.”

“मीना,असं बोलू नये ग! तू आणि विनीत दोघेही आबासाहेबांबद्दल मनात कटूता ठेवून आहात.”

“दुसऱ्यांना हे बोलणं सोपं आहे वहिनी!”

“मीना,लहान गावात मुलींना थोडं कमीच स्वातंत्र्य मिळतं. आणि आता तू लग्नानंतर कोल्हापूरसारख्या शहरात जाणार आहेस. तिथे तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर. पुढे छान शिक! स्वतःच्या पायावर उभी रहा. बघ, ह्याच आबासाहेबांना आपल्या लेकीचं किती कौतुक वाटेल. मुलगी ही आईवडिलांची एक जबाबदारीच असते! आणि ते जुन्या वळणाचे आहेत. माझ्या पपांच्या आणि त्यांच्या विचारात तफावत असणारच. तू आबासाहेबांवर विश्वास ठेव. आपण पुढचं प्लॅनिंग करू. खरेदीला तू पुण्याला यायचं हं! दोघी धमाल करू. नाऊ चिअर अप मीना! मी छान स्ट्रॉंग कॉफी करते,चल बघू किचनमध्ये!” सिद्धीने तिला बळजबरी स्वयंपाकघरात नेलं.

“वहिनी,होईल ना ग सगळं नीट?तो मुलगा त्यादिवशी काहीच बोलला नाही. आई वडिलांच्या हातचं बाहुलं तर नसेल?” मीनाने मनातलं बोलून दाखवलं.

“मीना,तू आता काहीतरी तर्क वितर्क करू नकोस. विनीत कुठे बोलतो आबासाहेबांसमोर? पण एरवी बघ! सतत तोंड सुरू असतं. आणि तो तुझ्याशी एकांतात बोलेल,सगळ्यांसमोर कशाला?” सिद्धीने तिला चिडवलं.मीनालाही नकळत हसू आलं.

विनीत,सिद्धी कामेरीत आहेत तोपर्यंत साखरपुडा करायचा असं ठरल्यामुळे दोन दिवस घाईगडबडीत गेले. साखरपुडा इचलकरंजीला इनामदारांकडेच करायचा ठरलं. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला.

साखरपुडा झाल्यावर संध्याकाळी मीना आणि हर्षवर्धन फिरायला गेले. त्या दिवशी देखील तो फार बोललाच नाही. तिचे विषय कुठले,पुढे काय करणार ह्यापलिकडे फारसं नाही. मीनाला कामेरीला सोडताना देखील गाडीत त्याचे दोन मित्र होते. मीनाला ते विचित्रच वाटलं. लग्न ठरलेलं असताना दोघांमधे ह्याचे मित्र कशाला आणि त्यालाही त्याचं काही वावगं वाटलं नाही, ह्याचं तिला आश्चर्य वाटलं.
मीना घरी आल्यावर सिद्धीला म्हणालीच, “वहिनी,हर्षवर्धन जर विचित्रच वाटतो ग मला! नुकताच साखरपुडा होऊन आम्ही दोघे फिरायला जाताना मित्र कशाला हवे? अशा वेळी उलट आसपास कुणी नको असतं आणि हा मित्रांबरोबर मला घरी सोडायला आला. सासूबाई पण जरा शिष्ठच वाटल्या मला. श्रीमंतीचा तोरा!”

“मीना,असतात अग काहीजण मित्रवेडे! त्यांना आनंदात पण मित्र असल्याशिवाय करमत नाही. एकदा लग्न झालं की बघ,ते मित्रच बाजूला होतील.”

———

विनीत आणि सिद्धीचा जायचा दिवस उद्यावर येऊन ठेपला. पंधरा दिवसांची सुट्टी संपणार होती. सकाळपासून सिध्दीला रडू येत होतं. तिचं तिलाच नवल वाटलं,पंधरा दिवसात मी इतकी गुंतले ह्या सगळयांमधे! आता हीच आता माझी माणसं! तिला मालतीताई,मीनाचा चेहरा बघवेना.

दुपारची जेवणं करून विनीत आणि सिद्धी निघणार होते. सिद्धीला आवडते म्हणून मालतीताईंनी पुरणपोळी,मसालेभात असा बेत केला होता.पण सिद्धीच्या घशाखाली घास उतरत नव्हता.जेवताना तिला उमासे यायला लागले. मालतीताईंनी तिला जवळ घेतलं.
“सिद्धी,रडू नकोस बाळा!अग किती जीव लावलास आम्हाला! कसं करमेल आता तुझ्याशिवाय?”

“आई…” सिद्धीला पुढं बोलता येईना. तिचे डोळे वाहायला लागले.

“शांत हो बरं! हे बघ,तुझ्या मनात आलं की तडक कामेरी गाठायची. आणि डब्यात पुरणपोळ्या देते आहे. तुझं लक्षच नव्हतं जेवणात!”

आबासाहेब देखील आज सकाळपासून शांत,अबोल होते.पंधरा दिवसात ह्या मुलीने इतका लळा लावला. विनीतची आता काळजी नाही. सुखाचा संसार होणार दोघांचा!

घरच्याच गाडीने दोघे निघणार होते. सामान गाडीत ठेवलं.मीना आणि सिद्धी एकमेकींकडे बघून अश्रू गाळत होत्या.

आबासाहेबांनी विनीतला हाक मारली,
त्याच्या गळ्यात सोन्याचा गोफ घातला आणि सिध्दीला सोन्याचं कंकण दिलं.
“मीनाचं लग्न दोन महिन्यांनी आहेच,तेव्हा आठ दिवस यावा. आता लगेच परत तुम्हा दोघांनाही जास्त रजा मिळणार नाही.” विनीत आणि सिद्धीने त्यांना वाकून नमस्कार केला, “आयुष्यमान भव!”
आबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलेलं विनितला दिसलं. तो देखील हेलावला.

विनीत,सिद्धीने मालतीताईंना नमस्कार केला. सिद्धीला कुंकू लावत मालतीताई म्हणाल्या,”सिद्धी,लवकर ये,वाट बघतेय तुझी! तुझ्याशिवाय हे लग्नघर वाटणारच नाही.” त्यांना पुढं बोलवेना.

विनीतने मीनाला जवळ घेतलं, “पुण्याला ये,खरं तर आत्ताच आली असतीस आमच्याबरोबर!”

“दादा,थोडं प्रॅक्टिकलचं सबमिशन आहे,ते पूर्ण करून मग येते.” मीना भरल्या डोळ्यांनी म्हणाली.

महादू गुलाबाच्या फुलांचा गुच्छ सिद्धीच्या हातात देत म्हणाला, “धाकले मालक,वहिनीसाहेब..आता वाडा थोडे दिवस सुना सुना होणार. तुम्ही होता तर रौनक होती बगा.”

“महादूकाका,परत येतोच आहे दीड महिन्यात! तेव्हा मात्र मला बागकाम शिकवा हं! यावेळी राहूनच गेलं.”

“जी वहिनीसाहेब!”

गाडी कोपऱ्यावर जाईपर्यंत मालतीताई आणि मीना दारात उभ्या होत्या.

सिद्धीने मुद्दामच मागे वळून बघितलं नाही आणि डोळ्यातलं पाणी पुसलं…..

———

पुण्याला आल्यावर सिद्धी,विनीतचे रुटीन सुरू झाले. सिद्धीची तारांबळ व्हायला लागली. कामाची सवय नव्हती.कामेरीला मालतीताई, हाताखाली माणसं होती. त्यामुळे जाणवलं नाही.

“सिद्धी,आज कढी कर ना! करता येते ना तुला?” विनीतने विचारलं.

“हो,येते की! कामेरीला आईंनी केली होती तेव्हा करताना बघितलं होतं.”

“मग आज खिचडी आणि कढी असा बेत कर.”

सिद्धीने सगळं साहित्य ओट्यावर काढलं आणि कढी केली.जेवायला बसल्यावर विनीतने कढी पिताना तिला विचारलं, “तू काही विसरलीस का कढीत टाकायला?”

“नाही रे,सगळं तर टाकलं. तुपाच्या फोडणीत जिरे,मिरची,कढीपत्ता आणि मग त्यात ताक,साखर,मीठ आणि वरून कोथिंबीर.”

विनीतचं लक्ष ओट्याकडे गेलं आणि तो हसायला लागला.

“काय झालं विनीत? का हसतो आहेस?”

“सिद्धी,तू ताकात डाळीचं पीठ मिसळलं नाहीस. ती बघ,ओट्यावर पिठाची वाटी तशीच दिसतेय. त्यात डाळीचं पीठ घालतात,इतकं मला नक्कीच माहिती आहे.”

“ओह गॉड!” सिद्धीने कपाळावर हात मारला. तिलाही खूप हसू आलं.

“इट्स ओके! तुझी स्वयंपाकाची नवीनच सुरवात आहे. चलता है!आपण फोडणीचं ताक पिऊ.” विनीत हसत म्हणाला.

मोबाईलची रिंग वाजली. उमाचा फोन होता.फोन घेतल्याबरोबर सिद्धी म्हणाली,
“आई,तू मला स्वयंपाक करायला का शिकवला नाहीस? माझी फजिती झाली आज! सगळी कढी बिघडली. ”

“सिद्धी,ह्याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा! कितीवेळा तुला सांगितलं की निदान कसं करतात ह्याची माहिती तरी करून घे. पण आधी अभ्यास आणि नंतर नोकरी!वेळ होता का तुला? बरं ते जाऊ दे. मीना कधी येतेय ग? तिला केळवण करायचं म्हणतेय.”

“मीना आणि आई पुढच्या आठवड्यात साड्या खरेदीसाठी येणार आहेत. दोन तीन दिवसच राहणार आहेत.आबासाहेबांना एकटं राहायची कधी वेळच आली नाही ना! त्या दोघी आल्या की तुला कळवते.”

” ठीक आहे,आणि आता दर शनिवारी स्वयंपाक शिकायला इकडे ये! नवऱ्याचे खाण्याचे हाल करू नकोस. अग,पूर्वीच्या बायका म्हणत,नवऱ्याच्या हृदयापर्यंत जायचं असेल तर पोटातून जावं लागतं.” उमाने सिद्धीला प्रेमाने दटावलं.

“ओके आई,डन!” सिद्धीने हसत मोबाईल बंद केला.

आठ दिवसांनी मालतीताई आणि मीना पुण्यात आल्या. विनीत,सिद्धीचा छोटासा संसार बघून मालतीताई खुष झाल्या.
“सिद्धी, तुला किचनमध्ये छोटी,मोठी काही भांडी घ्यायची असली तर मी आहे तोवर आपण तुमच्या पुण्याच्या प्रसिद्ध तुळशीबागेत जाऊन येऊ.”मालतीताई म्हणाल्या.

“बाकी काही नाही आई,पण कामेरीला आहे तसा छोटा दगडी खलबत्ता मिळतो का ते बघूया! त्यातला मिरचीचा ठेचा..अहाहा! मिक्सरच्या ठेच्याला ती मजा नाही.”

“मला तर पुण्याला आल्यापासून कामेरीला जाऊच नये असं वाटतं.” मीनाचं हे बोलणं ऐकून सिद्धी अवाक् झाली.

मीना आंघोळीला गेल्यावर सिद्धीने मालतीताईंना विचारलंच,” आई,मीना खुष नाही का? लग्न ठरलेल्या मुलींसारखी ती उत्साही,आनंदी वाटत नाही.”

“तसं काही नाही ग! तिलाही आता नवीन घरात जायचं म्हणजे दडपण आलं असेल. आणि ते रजनीताई प्रकरण जरा वेगळंच दिसतंय. सासूचा तोरा आहेच जरा! बोलणी करताना म्हणाल्या होत्या, मंगळसूत्राची एक वाटी माहेरची असते.आम्हाला काय प्रथा माहिती नाही का? पण लगेच बोलून दाखवलं. आता मीना कशी सांभाळून घेते ते बघायचं. तुझ्यासारखा समजूतदारपणा दाखवला तर ठीक आहे.”

“त्या बाबतीत आय एम द लकीएस्ट पर्सन! माझ्यासारखी भाग्यवान मीच आई! तुमच्यासारखी सासू मला मिळाली.”

“आणि माझ्यासारखी भाग्यवान मीच! तुझ्यासारखी समजूतदार सून मला मिळाली.” दोघीही हसल्या.

“भाग्यवान सासूबाई आणि भाग्यवान सुनबाई,माझ्या नाश्त्याची काय सोय? सिद्धी,तू आज कंपनीत येते आहेस की रजा टाकलीय?” विनीतने विचारलं.

“मी आज रजा टाकली आहे. आईकडे जातोय केळवणाला! तू घराची किल्ली घेऊन जा. उद्या साडी खरेदी! परवा दोघीही कामेरीला परत जाणार आहेत.”

“आई,रहा ना ग थोडे दिवस! मी एकटा असताना तू,आबासाहेब आणि मीना हा फ्लॅट घेतला तेव्हा वास्तूशांतीसाठी दोनच दिवस आला होता. त्यांनतर नाहीच.”

“नको रे!आता ह्या वयात ह्यांना जास्त दिवस एकटं राहणं नको वाटतं.” अचानक मालतीताईंचं भिंतीवरच्या सिद्धीच्या फोटोकडे लक्ष गेलं. “सिद्धी,हा कंपनीचा ड्रेस का ग?”

“हो आई! विनीतनेच माझ्या नकळत तो फोटो कंपनीतच काढला होता.” सिद्धीने तो फोटो मालतीताईंच्या हातात दिला.
“किती स्मार्ट दिसतेस ग! आणखी काय म्हणतात तुमच्या इंग्लिशमधे?”

“एलिगंट, गॉर्जस.” मीना फोटो बघत म्हणाली.

“तेच ते! मला खरंच नवल वाटतं सिद्धी तुझं! इतक्या वेगळ्या वातावरणात वाढलेली तू! आमच्यात किती सहज सामावलीस. अगदी दुधात साखर मिसळावी तशी! मालतीताई तिच्याकडे कौतुकाने बघत म्हणाल्या.

“जपून हं आई! नाहीतर ह्या साखरेच्या दाण्यांचे मिऱ्याचे दाणे व्हायचे,डोक्यावर वाटायला!” विनीत सिद्धीची चेष्टा करत म्हणाला.
“तुम्ही तिघी एन्जॉय करून या. भरपूर खरेदी करा.”

——

सिद्धीच्या माहेरी मीनाला खूप छान मोकळं मोकळं वाटत होतं.
“काका,तुमच्याकडे किती छान मोकळं वातावरण आहे. कसलंही टेन्शन नाही.” मीना अनिलना म्हणाली.

“असं नाही बेटा! शहरातले ताणतणाव वेगळे असतात. उलट छोट्या गावातली माणसं जास्त सुखी असतात.”

“पण तुमच्या घरचं वातावरण किती मोकळं आहे. खूप छान वाटतंय मला इथे!”

“मीना,आता तू माहेरपणाला आमच्याकडे हक्काने येत जा. आम्हाला जशी सिद्धी तशीच तू!” उमा मीनाचा हात हातात घेत म्हणाली.

“हो काकू,नक्की!”

“उमावहिनी, लग्नाचं आमंत्रण आत्ताच देते आहे. तुम्ही दोघेही आठ दिवस आधी या. तुमची मदत हवीय हं मला!”

“नक्की येऊ मालतीवहिनी!अहो,तुमच्या वाड्यात राहण्याची मजा काही वेगळीच!” अनिल म्हणाले.

रात्री झोपताना सिद्धी विनीतला म्हणालीच, ” विनीत,समथिंग इज राँग! मला असं आतून वाटतंय आपण सगळे चुकतोय. मीनाच्या लग्नाची घाई तर होत नाहीय ना आपल्याकडून?”

“सिद्धी,मला तर सगळं नॉर्मल वाटतंय. आणि तू देखील नको तो विचार करू नकोस.”
सिद्धी कितीतरी वेळ जागी होती. नको नको ते विचार सारखे डोक्यात येत होते…..
——-

पुण्याहून कामेरीला परतल्यावर मालतीताईंना मीना अंतर्मुख झाल्यासारखी वाटली.सिद्धीच्या घरचं वातावरण आणि इथलं वातावरण ह्याची ती सतत तुलना करू लागली. त्यांनी सिध्दीला फोन लावला.
“सिद्धी,झोपली नव्हतीस ना ग?”

“नाही हो आई,बोला ना! इतक्या रात्री फोन केला? सगळं ठीक आहे ना?” सिद्धीने घाबरून विचारलं.

“काळजी करू नकोस. सगळं ठीक आहे. मीना फार अबोल झालीय ग!काय करावं काही कळत नाहीय.तू जरा उद्या बोलशील का तिच्याशी?”

“हो आई, मी नक्की बोलेन तिच्याशी! तुम्ही नका काळजी करू!आता शांत झोपा.”

दुसऱ्या दिवशी सिद्धीने मीनाला फोन लावला, “मीना,काय झालंय तुला? तू आनंदी,खुष का वाटत नाहीस? अग लग्न ठरलेल्या मुलीच्या आनंदाला उधाण येतं. तू कशातच रस दाखवत नाहीय.” सिद्धीने काळजीने विचारलं.

“नाही ग वहिनी,असं काहीही नाही. माझी फायनल एक्झाम लग्नानंतर लगेच आहे ना!अभ्यास होईल का,परीक्षा देता येईल का हाच विचार असतो मनात सतत!”

“इतकंच ना?अग त्यात काय,नको देऊ परिक्षा, पुढच्या सेशनला दे. हर्षवर्धन भाऊजींशी सतत फोनवर बोलत जा. म्हणजे परीक्षा वगैरे काही डोक्यात येणारच नाही.” सिद्धीने मीनाचा ताण कमी करायचा प्रयत्न केला.

“तो कुठला करतोय फोन? मीच सतत फोन करते आणि दहा मिनिटं बोललो की ह्याचं लगेच काहीतरी काम निघतं.” मीना नाराजीनेच बोलली.

“अग तो अबोल असेल! तू त्याला बोलतं कर. मी आणि विनीत पुढच्या आठवडयात येतो आहे. सध्या तरी आठ दिवसच रजा मिळाली आहे. नंतर वाढवता आली तर बघू.”

“ओह ग्रेट वहिनी! लवकर ये ग!तू घरात असली की वेगळंच चैतन्य असतं. खूप रिलॅक्स वाटतं मला!” मीना आनंदून म्हणाली.

“मला सुद्धा कधी कामेरीला येतेय असं झालंय.” सिध्दीला पण एकदम वाडा, आई,आबासाहेब,महादूकाका डोळ्यापुढे आले.

———

विनीत आणि सिद्धी कामेरीला पोहोचले. वाडा बघून सिध्दीला उचंबळून आलं. तिने सामान टाकलं आणि बागेत एक फेरफटका मारून आली. जणू काही झाडं पण तिची वाट बघत होते.

“सिद्धी,आता तू आलीस तर जरा लग्नाची कामं सुचतील बाई मला! बावचळल्यासारखं झालं होतं ग मला एकटीला!” मालतीताई म्हणाल्या.

“आई,तुमची बहीण..सुमा मावशी येणार होत्या ना?”

“अग, तिच्या घरी अचानक तिचे दिर आणि जाऊ आलेत त्यामुळे ती वेळेवरच येईल.”

“वहिनी,चल ना माझ्या खोलीत! मला जरा सांग ना,कुठल्या प्रसंगाला कुठली साडी, दागिने घालायचे ते! मला काही कळत नाहीय.” मीना सिद्धीला तिच्या खोलीत घेऊन गेली.

“वहिनी,बोलायचं होतं तुझ्याशी, म्हणून मुद्दाम तुला इकडे आणलं.”

“बोल ना मीना,काय झालं?” सिद्धीने काळजीने विचारले.

“वहिनी,काल फोनवर हर्षवर्धनचा आवाज काहीतरी विचित्रच वाटला ग मला! जड झाल्यासारखा! मला भीतीच वाटतेय,त्याला दारूचं वगैरे व्यसन तर नसेल ना?” मीना घाबरली होती.

“मीना, तुझ्या लग्नाचा विषय काढला त्या दिवसापासून मी तुला बघतेय. यू आर नॉट हॅपी.अजूनही वेळ गेलेली नाहीय. फक्त साखरपुडा झालाय,लग्न नाही. आबासाहेबांना स्पष्ट सांग.” सिद्धी जरा मोठ्यानेच बोलली.

ते ऐकून मीना रडायलाच लागली.
“आता कसं सांगणार वहिनी? आबासाहेबांची या गावात काय अब्रू आहे तुला माहितीय ना? माझं कुणी ऐकून घेणार नाही.आणि मी प्रत्यक्ष कुठे बघितलंय? हा माझा अंदाज आहे. माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? घराणं सुद्धा महितीतलं आहे ग!”

“मीना,तुझी ही द्विधा मनस्थिती आधी थांबव. तुझी हिम्मत होत नसेल तर मी बोलते आबासाहेबांशी! मला वाईटपणा आला तरी चालेल. तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ग!”

मीना काहीच बोलत नव्हती. नुसतीच रडत होती. सिद्धीचा संयम सुटत चालला.

“मीना,मी आत्ताच्या आत्ता हे सगळं आईंच्या कानावर घालतेय.”

“नको वहिनी,तुला शपथ आहे.नको सांगू कुणाला !”

“मीना,अग ह्या नात्याला काही अर्थ आहे का? जिथे तुझं मन जडलंच नाहीय,तुला त्याची ओढच वाटत नाही, तिथे तुम्ही दोघे एकरूप कसे व्हाल?”

“नको नको जाऊ दे. मी चुकली असेन कदाचित!तसं नसेलही!” मीना डोळे पुसत म्हणाली.

“हा तुझा फायनल निर्णय आहे ना मीना?”

“हो वहिनी!”

“मग यापुढे तू उदास दिसता कामा नये. तू आनंद घे आणि आई,आबासाहेबांनाही आनंद दे. आता एक छानसं स्माईल दे बरं!” सिद्धीने तिचे डोळे पुसले.

मीना डोळे पुसत हसली.

“मी पार्लरमध्ये फोन करते. तिची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.मेकअप तर मी करून देईन तुला पण हेअरस्टाईल मला येत नाही ग बाई! आता तू फ्रेश होऊन बाहेर ये आणि चेहरा हसरा ठेव.”

“ओके वहिनी,आलेच फ्रेश होऊन!”

सिद्धी खोलीच्या बाहेर आली पण मीनाचं बोलणं ऐकून तिला एकदम हुरहूर वाटायला लागली.

” देवा,सगळं चांगलं असू दे आणि सगळं चांगलं होऊ दे.” तिने मनोमन प्रार्थना केली….

क्रमशः

©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
.site-below-footer-wrap[data-section="section-below-footer-builder"] { margin-bottom: 40px;}