★★सिद्धी★★ ( भाग ८ ) ©®सौ मधुर कुलकर्णी

★★सिद्धी★★ ( भाग ८ )
मीनाचं लग्न कोल्हापुरात झालं. आबासाहेबांनी लेकीसाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. सगळे मानपान व्यवस्थित केले. पाठवणीची वेळ आली आणि आबासाहेब हुंदके देऊन रडू लागले. मीनाला हे नवीनच होतं. ती आबासाहेबांजवळ गेली आणि त्यांच्या कुशीत शिरून रडायला लागली.
“मीना,तुला खूप शिस्तीत वाढवलं,तुझ्यावर बंधन लादली पण तुझ्या हितासाठीच बाळा! तुझ्या ह्या बापावर रागावू नकोस. आता सासर हेच तुझं घर! सगळ्यांना प्रेम दे.” आबासाहेबांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.
“आबासाहेब!”..मीनाला अश्रू आवरेना.
ते दृश्य बघून मालतीताई आणि
सिद्धीचे डोळे भरून आले.
सिद्धी मनापासून सुखावली.
बापलेकीचं नातं असतंच तसं! अगदी कोमल,हळवं! तिने पपांकडे बघितलं. त्यांचेही डोळे ओलावले होते.
मीनाने मालतीताईंना नमस्कार केला. दुःखावेगामुळे त्यांना बोलता येत नव्हतं.
विनीतने मीनाच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाला, “मीना, कधीही काहीही वाटलं तर आय एम देअर फॉर यू, हे कायम लक्षात ठेव.”
मीना सिध्दीला मिठी मारून रडू लागली, “ए वेडाबाई,आता छान संसार कर. पुढे शीक, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण कर.” सिद्धीने तिच्या कपाळावर ओठ टेकले.
मीनाशिवाय वाडा सुना सुना झाला.मालतीताई फारच हळव्या झाल्या होत्या.
“विनीत,मी अजून दोन दिवस रजा वाढवून घेते,आईंना जरा नॉर्मल होऊ दे” सिद्धी विनीतला म्हणाली.
“ओके, मला उद्या निघायलाच हवं परवा महत्वाची मिटिंग आहे.”
———
मीना हनीमूनसाठी केरळला गेली होती. दोन दिवसांनी तिचा सिद्धीला फोन आला. सिद्धी तिच्या फोनची वाटच बघत होती.
“हॅलो वहिनी,कशी आहेस?”
“अग, तू कशी आहेस ते सांग आधी!मी आतुर आहे ऐकायला.”
“मी मजेत आहे वहिनी! हर्षवर्धन छान बोलतोय. माझा गैरसमज झाला होता ग! तू काळजी करू नकोस.
फक्त त्याची एकच सवय फार वाईट आहे. खूप उशिरा उठतो. दहा वाजेपर्यंत स्वारी झोपूनच असते. मला सवयच नाही ना ग! आबासाहेबांनी सहाच्या वर कधी मला आणि विनीतला झोपूच दिलं नाही.”
“अग, कदाचित लग्नानंतर सुट्टी म्हणून आधी कामाचा लोड असेल त्याला!तो शीण असेल.”
“वहिनी, तू किती दिवस आहेस कामेरीत?”
” मी उद्या निघतेय. दोन दिवस रजा वाढवून घेतली होती.मीना,आईंशी बोल!” सिद्धीने मालतीताईंना मोबाईल दिला.
मीना आनंदात आहे हे ऐकून सिद्धीची काळजी मिटली.
दुसऱ्या दिवशी निघताना ती मालतीताईंना म्हणाली, “आई,आता तुम्ही आणि आबासाहेब पुण्याला या. लग्नाचा शीण घालवायला! मुलीचं लग्न म्हटलं की मानसिक शीणच जास्त असतो.”
“जरा हा लग्नाचा पसारा आवरून मग आम्ही येतो सिद्धी! आता हे पण दोघांचीही लग्न झाल्यामुळे निर्धास्त झाले आहेत.”मालतीताई म्हणाल्या.
मीनाचा संसार सुरू झाला.
सुरवातीला ती दोन दिवसाआड सिद्धीला फोन करायची. मग हळूहळू कमी होत गेलं. संसारात रमली असेल म्हणून सिद्धीने फार मनावर घेतलं नाही.
मीनाची फायनल एक्झाम पण झाली. मीनाची आणि सिद्धीची दोघींची एकत्रच मंगळागौर कामेरीला करायचं मालतीताईंनी ठरवलं.
मंगळागौरीला सिद्धीने मीनाला बघितलं आणि तिला काळजीच वाटली. डोळ्याखाली काळी वर्तुळ झाली होती.तिने मालतीताईंना बोलून दाखवलं, “आई, मीना अशी मलूल का दिसतेय?डोळ्याभोवती काळं किती झालंय.”
“मला पण जाणवलं ग ते! मी विचारलं तिला तर म्हणाली परीक्षेच्या जागरणामुळे झालं असेल.” मालतीताईंना पण काळजी वाटली.
“आई, ती आपणहून काही सांगते का ते बघूया! असं सारखं विचारणं मला योग्य वाटत नाही.” सिद्धी म्हणाली.
मंगळागौरीची पूजा झाल्यावर सिद्धीला राहवेना,तिने मीनाला विचारलंच,
“मीना,चेहरा का असा दिसतोय ग? सगळं ठीक आहे ना? का काही लपवते आहेस?”
“नाही ग,काहीच लपवत नाहीय.मी ठीक आहे. वहिनी,जरा माझ्या सासुकडे बघ ग! मानपान खूप लागतात त्यांना. तेव्हढ्यावरून मला टोमणे मारतील.” मीना म्हणाली.
सिद्धीने रजनीताईंकडे बघितलं आणि तिच्या डोक्यातच तिडीक गेली. आल्यापासून बाई नुसती सोफ्यावर बसली होती. आता जेवण झालं की मॅडम हातावर पाणी पडलं की गाडीत बसून घरी परत जाणार. त्यामानाने तिचे सासरे माधवराव स्वभावाने चांगले होते. सिद्धी नाईलाजाने रजनीताईंशी बोलायला गेली.
सिद्धी आणि उमा मंगळागौर झाल्यावर दोन दिवसांनी पुण्याला परतल्या. पुण्यात रुटीन सुरू झालं. विनीत आणि सिद्धी कामात गढून गेले. सिद्धी न चुकता मालतीताईंना आणि मीनाला दोन दिवसाआड फोन करत होती.
आज जेवताना विनीतला मीनाची एकदम आठवण आली.आज मीनाची खूप आठवण येतेय सिद्धी!आठ दिवसात तिचा काही फोन पण नाही.”
‘अरे,पाठची बहीण आहे तुझी ती! जिव्हाळा असणारच. मी केला फोन तिला,पण स्विच ऑफ असंच सारखं येतंय. त्या हर्षवर्धनला करून बघ.”
“उद्या करतो. सिद्धी,तुला सांगायचं राहिलं, मी उद्या तीन दिवसांसाठी बंगलोरला जातोय, सेमिनार आहे. तू आईकडे जा हवं तर.”
“ओके बघते,उद्या ठरवते.”
विनीत बंगलोरला गेला आणि सिद्धीने कंपनीतून परस्पर आईकडे जायचं ठरवलं. सिद्धी राहायला येणार म्हटल्यावर अनिल,उमा खुष झाले.
“आई,उद्या मला बारा वाजता कंपनीत जायचं आहे.सकाळी आरामात उठेन.”
“मनसोक्त झोप! इथे आहे तोवर झोप व्यवस्थित घे.” उमाताई म्हणाल्या.
रात्री दहा वाजता मोबाईल वाजला तेव्हा सिद्धी वाचत बसली होती. नंबर होता. नाव आलं नव्हतं. तिने फोन घेतला आणि मीनाचा आवाज आला.
“वहिनी,तू ताबडतोब इकडे येऊन मला घेऊन जा ग कामेरीला प्लिज!” मीना हमसून रडायला लागली.
ते ऐकून सिद्धीला धडधडायला लागलं, “मीना,काय झालं?का रडतेस इतकी?सगळं ठीक आहे ना? लवकर सांग ग! माझा जीव चाललाय इकडे!”
“वहिनी, आपण फसल्या गेलोय. हर्षवर्धन ड्रग ऍडिक्ट आहे. त्याच्या ट्रॅव्हल एजन्सीच्या पार्टनरने त्याला ह्या जाळ्यात ओढलं. आता तो पूर्ण आहारी गेलाय. आत्ता देखील त्याचा मित्र आणि तो बाहेर गेलाय.रोज रात्री येऊन त्याला घेऊन जातो. ती नशा त्याची सकाळी बारापर्यंत उतरत नाही. माझं आयुष्य नरक झालंय ग वहिनी. माझी सहनशक्ती आता संपली. तू प्लिज लवकर ये.” असं म्हणून मीना अजूनच ओक्साबोक्शी रडायला लागली.
“मीना,अग काय बोलतेस तू? इतकं सगळं घडेपर्यंत सहन का केलंस? निघून यायचं कामेरीला!आणि हा नंबर कुठलाय?”
“लग्नाला सहा महिने सुद्धा झाले नाहीत वहिनी! कशी जाऊ कामेरीला? एक दिवस मी त्याच्या आईबाबांना हे सांगायला फोन केला. त्यांना देखील हे सगळं माहित होतं वहिनी! लग्नानंतर मुलगा सुधारेल असल्या खुळचट कल्पना असणाऱ्या आईबापांसारखेच ते! हर्षवर्धनने माझा फोन हिसकावून घेतला.आणि धमक्या द्यायला लागला. कामेरीला किंवा इचलकरंजीला परत फोन केलास तर गाठ माझ्याशी आहे. अमानुष झालाय तो! माझ्यावर हात उगारायलाही त्याने कमी केलं नाही. व्यसनाच्या भयंकर आहारी गेला आहे. माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीकडे माझी कामवाली बाई काम करते. तिला चिठ्ठी पाठवून तिच्याकडून मी हा मोबाईल गुपचूप मागवून घेतला. माझ्या पर्समधे मी सगळ्यांचे नंबर ठेवते म्हणून तुला फोन करता आला. ह्या फोनमधे कुठलाच नंबर सेव्ह केलेला नाहीय.वहिनी,मला भयंकर भीती वाटतेय.तू आणि दादा लवकरात लवकर या.” मीनाला नीट बोलता सुद्धा येत नव्हतं,इतकी ती रडत होती.
सिद्धीच्या कपाळावर घामाचे थर आले.
“हो,तू काळजी करू नकोस. मी निघते उद्या सकाळी! मी येईपर्यंत त्याच्याशी काहीच बोलू नकोस.काही तासांचाच प्रश्न आहे. इतकं सहन केलंस,आजची रात्र काढ! मी येतेच उद्या.”
सिद्धीने मोबाईल बंद केला.तिचं डोकं सुन्न झालं. पुढे काय करायचं हे तिला सुचेना. ती डोळे मिटून थोडा वेळ शांत बसली. एका निश्चयाने तिने विनीतला फोन लावला.
“विनीत,सॉरी तुला डिस्टर्ब केलं.झोपला नव्हतास ना?”
“छे ग,काम करतोय. तुला झोप येत नाहीय वाटतं माझ्याशिवाय?”विनीतने तिची चेष्टा केली.
त्याक्षणी सिद्धीला विनीतची ती चेष्टा पण नकोशी वाटली.
“मी उद्या कोल्हापूरला जातेय.माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीचा साखरपुडा आहे. तिचा फोन आला होता,जमत असेल तर नक्की ये म्हणून! सकाळी जाऊन रात्रीपर्यंत परत येईन.आपल्या कंपनीचा कोणी ड्रायव्हर मला मिळेल का? म्हणजे आपलीच गाडी घेऊन जाते.” सिद्धीने नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती.
“ओह ग्रेट! मीनाला भेटशीलच आणि जमलं तर कामेरीला आई,आबासाहेबांना भेटून ये. मी करतो अरेंज ड्रायव्हर!तुला मेसेज करतो.” विनीत म्हणाला.
सिद्धीने मोबाईल बंद केला आणि भीतीने,काळजीमुळे तिची झोप उडाली.डोळयात अश्रूंची दाटी व्हायला लागली….
——–
पहाटे पहाटे सिद्धीचा डोळा लागला पण तिने पाचचा अलार्म लावल्यामुळे ती उठली.कोल्हापूरला शक्य तितक्या लवकर पोहोचायचं होतं. तिने स्वतःची कॉफी करून घेतली. फ्रेश झाली. इतक्यात उमा उठलीच.
“सिद्धी,तू तर आज आरामात उठणार होतीस ना? आणि निघालीस कुठे? कंपनीतून कॉल आला का?”
“आई,अग मी विसरलेच होते,मला आज कोल्हापूरला जायचं आहे.माझी कॉलेज मधली मैत्रीण समीरा जोशी आठवतेय का तुला?ती कोल्हापूरचीच आहे,तिचा आज साखरपुडा आहे. काल रात्री मला आठवलं पण तू झोपली असशील म्हणून उठवले नाही. साखरपुडा सकाळीच आहे. मी रात्रीपर्यंत परत येते.आमची गाडी घेऊन जातेय. विनीतने कंपनीच्या ड्रायव्हरला सांगितलं आहे.तो येईलच थोड्या वेळात!”
“सिद्धी,साडी जरा बरी घाल ग! साखरपुड्याला चालली आहेस ना?जरीकाठाची नेसून जा.”
“नको ग,अग आता सिम्पल राहण्याची फॅशन आलीय.कमीत कमी दागिने,नो मेकअप!आणि साडी सिल्कचीच आहे आई! फक्त जरीकाठ नाही.”
“काय तुमची ती फॅशन! दर महिन्याला बदलते.नीट जा ग बाई, ड्रायव्हर ओळखीचा आहे ना?”उमाने काळजीने विचारले.
“हो ग! चांगलाच ओळखीचा आहे. त्याच्याबरोबर मी मुंबईला बरेचदा जाते. मी निघते,तो आमच्या घरापाशी पंधरा मिनिटात पोहोचतोय.मला घरी जाऊन गाडीची किल्ली घ्यावी लागेल आणि काळजी करू नकोस. मी फोन करत राहीन.”
सिद्धी जायला निघाली इतक्यात अनिल आले, “सिद्धी, कुठला दौरा?’
“पपा, कोल्हापुराला जाऊन येते. बाकी आई सांगेल तुम्हाला सगळं! बाय!”
“जपून जा ग आणि फोन करत रहा. तुम्ही मुली शिकल्या सवरल्या तरी आईवडिलांना काळजी वाटतेच.”
“हो पपा,डोन्ट वरी! मी पोहोचले की फोन करते.” सिद्धी पर्स घेत दाराकडे वळली.
सिद्धी गाडीत बसली आणि ड्रायव्हरला सांगितलं, “डायरेक्ट कोल्हापूर.”
गाडीत सीटवर मागे डोकं टेकवून सिद्धी विचार करू लागली,आलेल्या प्रसंगाला कसं तोंड द्यायचं. तिने सगळं प्लॅनिंग केलं. ड्रायव्हरला तिने मीनाच्या घराच्या पोलीस स्टेशन जवळ गाडी थांबवायला सांगितली.
सिद्धी पोलिस स्टेशनच्या आत आली.गर्दी दिसत होती. तिथल्या बाकावर पंधरा मिनिटं बसल्यावर इन्स्पेक्टर जाधवांनी सिध्दीला बोलावलं.
“येस मॅडम,काही तक्रार नोंदवायची आहे का?”
“नाही,मी सौ सिद्धी कामेरीकर.तुम्हाला एक विनंती करायला आले आहे.”
“बोला ना मॅडम!”
सिद्धीने त्यांना ती कोल्हापूरला तिच्या नणंदेला घ्यायला आली आहे हे सांगितलं.नवरा बायकोचं पटत नाही हे कारण सांगितलं. पण हर्षवर्धन ड्रग ऍडिक्ट आहे हे सांगायचं तिने टाळलं. कोर्टात ते वाभाडे निघणारच होते. तिला लवकरात लवकर मीनाला तिथून बाहेर काढायचं होतं. हर्षवर्धन ज्या जाळ्यात फसला होता ते आज ना उद्या उघड होणारच होतं.
“साहेब,माझी एकच विनंती आहे,मला जर गरज पडली तर मी तुम्हाला कॉल करेन. हा माझा नंबर!हे आमचं फॅमिली मॅटर आहे.ते आम्ही नक्कीच सोडवू पण मला कुठलीही तक्रार नोंदवायची नाहीय.फक्त संरक्षणाची वेळ आली तर तुम्ही प्लिज मला मदत करा.”
“मॅडम,अजिबात काळजी करू नका. हवं तर तुमच्याबरोबर हवालदाराला पाठवू का?” जाधवांनी काळजीने विचारले.
“नको,मी करेन हँडल! येऊ मी?हा माझा नंबर! इथल्या पोलीस स्टेशनचा नंबर मी लिहून घेतलाय. धन्यवाद!”
मीनाच्या घरासमोर गाडी थांबली. सिद्धीला आता मात्र खूप टेन्शन आलं. हातपाय थरथरायला लागले. तिने दारावरची बेल वाजवली.दार मीनानेच उघडलं.सिद्धी दिसताच ती तिला मिठी मारून रडायला लागली.
सिध्दीला देखील अश्रू अनावर झाले.
“मीना,अग काय अवस्था करून घेतलीस. लगेच माझ्याबरोबर चल,नेसत्या वस्त्रानिशी. तो नराधम कुठेय?”
“झोपलाय आत! नशा उतरायची आहे अजून त्याची!”
“मीना,ताबडतोब चल!वेळ दवडता कामा नये. ”
सिद्धी आणि मीना दारापर्यंत गेल्या आणि हर्षवर्धन खोलीतून बाहेर आला. स्वतःचा तोल सावरणं सुद्धा त्याला अशक्य झालं होतं.
“कुठे घेऊन चालल्या हो सिद्धी मॅडम माझ्या बायकोला ?” त्याने छद्मीपणे विचारलं.
“तुमची बायको? तो अधिकार आता तुम्ही गमावला आहे. आज कागदोपत्री तिचं नाव इनामदार आहे, ते देखील राहणार नाही. कोर्टाची नोटीस येईलच तुम्हाला. त्याला तयार रहा.”
“ह्याचे परिणाम वाईट होतील, सांगून ठेवतो.” तो धमक्या द्यायला लागला.
“परिणामाची काळजी तुम्ही करा. मी इथे यायच्या आधीच पोलिस स्टेशनमधे तक्रार नोंदवून आले आहे. आणि त्यांना माझा मोबाईल नंबर दिला आहे. खाली पोलीस उभे आहेत. तुमची एक चुकीची खेळी तुम्हालाच संकटात आणू शकते हे लक्षात ठेवा.चल मीना!”
पोलिसांचे नाव काढल्यावर हर्षवर्धन घाबरला.
सिद्धीने मीनाचा हात धरला आणि वेगाने दोघी बाहेर पडल्या.
गाडीत बसल्यावर सिद्धीने ड्रायव्हरला सांगितले, “कामेरीला गाडी घ्या. शक्य तितक्या स्पीडने!”
“मॅडम, मला कामेरीचा रस्ता माहिती नाही. प्लिज गाईड करा.” ड्रायव्हर म्हणाला.
“मी सांगते,चला!”
सिद्धीने इन्स्पेक्टर जाधवांना फोन लावला,”सर,मी सिद्धी कामेरीकर! थोड्या वेळापूर्वी मी तुम्हाला भेटले होते. माझं काम झालं आहे. पुन्हा काही मदत लागली तर मी तुम्हाला संपर्क करेनच. खूप खूप धन्यवाद!”
सिद्धीने मीनाला जवळ घेतलं. कामेरी येईपर्यंत मीनाला सिद्धी धीर देत होती.
वाड्यापुढे गाडी थांबली.वाड्याच्या दाराशी आल्यावर मीनाचे हातपाय गार पडले. तिने सिद्धीचा हात घट्ट धरला.
“वहिनी, मला खूप भीती वाटतेय.”
“मीना तिथून आपण दोघी सहीसलामत बाहेर पडलो हेच नशीब समज!आणि आता ह्यापुढे तुला समर्थपणे सगळ्या गोष्टींना तोंड द्यायचं आहे. रडून चालणार नाही.” सिद्धीने तिला हात धरून आत नेलं.
“आई, आबासाहेब…!” सिद्धीने हाक मारली.
मालतीताई आणि आबासाहेब सिद्धीचा आवाज ऐकून धावत बाहेर आले. मीनाची अवस्था बघून मालतीताईंच्या छातीत धस्स झालं.त्या धावत मीनाजवळ आल्या.
“मीना,काय ही तुझी दुर्दशा!”
“सुनबाई,काय हे? असं काय विपरीत घडलं?”आबासाहेबांनी मीनाकडे बघून घाबरत विचारलं.
“आई,आबासाहेब,तिला जरा वेळ शांत बसू दे. मी सांगते सगळं!” सिद्धीने मीनाला बैठकीच्या खोलीत नेलं. मालतीताई पाणी घेऊन आल्या. मीनाच्या हातात ग्लास दिला आणि त्यांना हुंदका आला.
“आई,आबासाहेब!..आता मी जे काही सांगणार आहे ते शांत चित्ताने तुम्ही दोघेही ऐका. आपण अनावधानाने फसल्या गेलोय. हर्षवर्धन ड्रग्स घेतो हे आपल्याला माहिती नव्हतं. इनामदारांनी आपल्याला फसवलं आहे. मीनाने तुमच्या भीतीपायी इतके दिवस सहन केलं पण तिची सहनशक्ती संपली आणि तिने काल रात्री मला फोन केला. तिला तिथे राहणं अशक्य होतं. मी सकाळी पुण्याहून निघाले आणि तिला घेऊन आले.”
आबासाहेब हे ऐकून हादरले.त्याचा तोल गेला आणि ते पडणार इतक्यात मीनाने आणि सिद्धीने त्यांना सावरले. त्यांना खुर्चीवर बसवून सिद्धीने त्यांना पाणी दिले आणि ते हमसून रडायला लागले.
“मीना,पोरी मला माफ कर. मी तुझ्या आयुष्याचा खेळखंडोबा केला. कुठलीही चौकशी न करता तुला त्या घरात दिलं.” मान खाली घालून ओंजळीत तोंड लपवून आबासाहेब रडू लागले.
आबासाहेबांना असं रडताना बघून मालतीताई हेलावल्या.”अहो, रडणं थांबवा बघू! आता ह्यातून काहीतरी मार्ग काढायला हवा.”
सिद्धी आबासाहेबांजवळ आली. तिने त्यांच्या पाठीवरून हात फिरवला.
“आबा..”
आबासाहेबांनी भरल्या डोळ्यांनी सिद्धीकडे बघितलं.
“हो आबाच म्हंटल मी तुम्हाला!आज मला तुमची मोठी लेक समजा. आबा, तुमची मान अशी खाली गेलेली मला चालणार नाही. ती ताठच रहायला हवी. कामेरीचा आधारस्तंभ असा तुटून चालणार नाही.” सिद्धीने त्यांचे हात हातात घेतले.
“सिद्धी..!”आबासाहेब सिद्धीच्या हातात तोंड खुपसवून आणखीनच हुंदके द्यायला लागले.
“आबा,माफ करा. लहान तोंडी मोठा घास घेतेय.पण तुम्ही मीनाला सतत धाकात ठेवलं त्यामुळे ती कमकुवत,भित्री झाली. आता जग खूप पुढे गेलंय. आता मुलींना आत्मविश्वास आणि आत्मबळ देण्याची गरज आहे नाहीतर तर त्यांचा टिकाव लागणं अशक्य आहे. बाहेरच्या जगात स्त्रीला स्वसंरक्षणासाठी मनाने खंबीर व्हायला हवं. मीनाला तुम्ही दुबळी केलं.”
“सिद्धी,आता पुढे काय ग?काहीच सुचत नाहीय.” मालतीताईंना दडपण आलं.
“आई,आबा तुम्ही काळजी करू नका. मी आणि विनीत आहोत.आता मीनाची जबाबदारी माझी! तिचं शिक्षण पूर्ण करून तिला स्वतःच्या पायावर उभं करेन आणि तिचं लग्नही करून देईन. मी तर तुम्हालाही असाच सल्ला देईन की थोडे दिवस तरी तुम्ही दोघेही पुण्याला आमच्याजवळ रहा. पुण्याचं घर लहान आहे,थोडी गैरसोय होईल.पण घर जितकं लहान,तितकी कुटुंबातली माणसं जवळ असतात. मला आता पुण्याला परतायला हवं. विनीत बंगलोरला गेला आहे. त्याला आणि आई,पपांना ह्यातली काहीच कल्पना नाही. विनीत उद्या येणार आहे. मी त्याला सगळं सविस्तरपणे सांगेन. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि इनामदारांचा फोन आला तर न डगमगता,न घाबरता माझ्या मुलाशी किंवा सुनेशी संपर्क साधा असं खडसावून सांगा. पुण्याला माझे ओळखीचे चांगले वकील आहे. मीनाच्या घटस्फोटाची केस त्यांनाच देऊ. त्यांचा सल्ला घेऊ. फक्त कायदेशीर बाबतीत तुमची मदत मला लागेल.”
“सिद्धी,मागच्या जन्माचं पुण्य आमचं! तुझ्यासारखी सून मिळाली.” मालतीताई हळव्या होत म्हणाल्या.
“आई,परत असं बोलू नका. आपल्या कुटुंबाची सुखदुःख आपण नेहमीच वाटून घेऊ.आणि तुम्हाला कुठलाही धमकीचा फोन आला तर मला कळवा. आपण पोलीस प्रोटेक्शन घेऊ. मीनाला मात्र मी आता इथे ठेवणार नाही.” सिद्धीने मालतीताईंचे डोळे पुसले.
“मीना, आता पुण्याला निघायला हवं. मलाही उद्या कंपनी आहे ”
मीनाने तिथे असलेले थोडेफार कपडे घेतले. सिद्धी आणि मीना..दोघीही मालतीताई आणि आबासाहेबांच्या पाया पडल्या.
“यशस्वी व्हा! आणि जमलं तर तुझ्या ह्या बापाला माफ कर मीना!” आबासाहेबांनी डोळे पुसले.
“आबासाहेब,तुम्ही माझ्याशी पाठीशी खंबीरपणे उभे रहा,बाकी मला काही नको.” मीना आबासाहेबांना बिलगली.
मालतीताईंनी दोघींनाही जवळ घेतलं.
“एकमेकींना धरून रहा.”
” हो आई,तुम्ही काळजी करू नका. आणि तुम्ही दोघे काळजी घ्या.” सिद्धी म्हणाली.
गाडी निघाल्यावर मालतीताईंना अश्रू अनावर झाले. इतकी वर्ष त्या ‘दुर्गाकवच’ न चुकता वाचत होत्या. आज सिद्धीच्या रूपाने दुर्गाच घरात अवतरली होती. कुटुंबासाठी एक अभेद्य कवच घेऊन!
नवमं सिध्दीदात्री च!………
★★समाप्त★★
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
ही कथा व यातील पात्र पूर्णतः काल्पनिक आहेत.
———————————————–
नमस्कार रसिक वाचकहो 🙏🏻😊
आज ‘सिद्धी’ ही दीर्घकथा पूर्ण झाली तुम्ही सगळे रोजच्या भागाला जो भरभरून प्रतिसाद देत होता त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांची शतशः ऋणी आहे.
काही वाचकांना कथा अचानक संपली असंही वाटू शकतं पण दिर्घकथेला मर्यादा असतात. मुळात ही कथा सिद्धीवरच होती. तिच्या स्वभावाचे सगळे पैलू मला दाखवायचे होते. बुद्धीमान, समजूतदार मुलगी!.. नोकरीत स्वतःच्या हुशारीने यश मिळवणारी!..एक उत्कट प्रेयसी!..सासरी वेगळ्या वातावरणात स्वतःला सामावून घेणारी आणि सासरच्या माणसांना जीवापाड जपणारी एक आदर्श सून!..आणि वेळ पडल्यास दुर्गेचा अवतार धारण करणारी एक धाडसी मुलगी!…ही तिची सगळी रुपं मला दाखवायची होती. असेच पुढच्या लिखाणासाठी मला प्रोत्साहन द्या आणि पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏🏻😊
©®सौ मधुर कुलकर्णी, पुणे
*सिध्दी* उत्तम!!