कथा – फसवा पाऊस ले-अरुण वि.देशपांडे- पुणे 9850177342 email: arunvdeshpande@gmail.com

कथा – फसवा पाऊस
ले-अरुण वि.देशपांडे- पुणे
————————-
कोसळणाऱ्या पावसातच ती सकाळी ऑफिसला निघाली ,पावसात भिजतच ती आली . आता संध्याकाळ कधीच होऊन गेली,पाऊस थांबण्याची चिन्ह नव्हती.
बरसणाऱ्या श्रावण- पावसाकडे पहात ती निःशब्द बसून रहाते. तिच्यासाठी ” पाऊस ,नि श्रावण फसवा असतो.
तिच्या बाबांचा फोन आला-
किती वेळ आहे ग तुला ?
एकटीने येऊ नको ,
मी येतोय रिक्षाने,
तिचे बाबा आले, तिचा मूड नाहीये,
हे ओळखून बाबा म्हणाले,
थकलेली दिसतेस, बस मागच्या सीटवर शांतपणे.
मी चालवतो गाडी.
काही न बोलता ती डोळे मिटून घेत शांत बसली .
तिला आठवू लागले…
“त्याची -तिची पहिली भेट अशाच ” श्रावणातल्या पहिल्या पावसात झाली होती. तिच्या ऑफिस बिल्डिंगमध्येच त्याचे ऑफिस .
लिफ्टमधल्या रोजच्या भेटीत झालेली ओळख त्याने वाढवली.
बोलायला एकदम स्मार्ट, रूपाने हिरोसारखा देखणा”, त्या बिल्डिंगमध्ये अनेक ऑफिस होत्या.त्यातल्या सुंदर, देखण्या स्त्रिया ,नवीन पोरी ” या हिरोभवती पिंगा घालतात ” हे ती रोजच पहात असे.
असा हिरो” तिच्या मैत्रीसाठी धडपडतोय, याचे तिला फार अप्रूप वाटत होते.
ती मात्र त्याला अजिबातच न शोभणारी होती. ,तरीही त्याला “आपण आवडलोत”
या कल्पनेने,भावनेने तिच्यावर त्याच्या प्रेमाचे जणू गारुड झाले होते.
” कॉफी घेत तिच्यासोबत वेळ घालवणे त्याला फार आवडते” ,
हे त्याने सांगितल्यापासून ती त्याच्यासाठी खास वेळ देऊ लागली.
बोलण्यातून तिला कळाले,
त्याच्यापेक्षा तिचाच पगार खूप जास्त आहे ,
तो जॉबमध्ये तिला सिनियर , पण त्याची कंपनी छोटी , त्याचे पॅकेजही सोसोच होते.
त्या हँडसम हिरोच्या मनमौजी ,मस्त स्वभावाच्या प्रेमात ती आकंठ बुडाली “, भेटीचा, फिरण्याचा सिलसिला सुरू झाला.
एक दिवस तो म्हणाला-
मला पैशाची थोडी अडचण आहे,
मला पैसे देऊ नकोस, पण इथून पुढे ,
महिन्याच्या लास्ट-वीक मध्ये माझा सगळा खर्च ,
यापुढे “तू करशील का प्लीज !
त्याच्यासाठी असा थोडा खर्च तिच्यासाठी किरकोळ होते. त्याची विनंती तिने आनंदाने मान्य केली.
त्याच दिवशी प्रेमालाही तिने प्रतिसाद दिला”,
ओळखीची परिणीती आता जवळीकीत झाली .
तरी त्याने अंतर राखले आहे, हे तिच्या लक्षात येत असे.
हम कभी भी जुदा नही होंगे”,
त्याची प्रेमाची शपथ तिने हसत स्वीकारली.
मैत्रीच्या त्या पहिल्या श्रावण -पावसात दोघे मनोमन चिंबचिंब झाले . पुढे किती तरी दिवस “तो पहिला पाऊस तिच्या मनात झिरपत होता.”
ती विचार करायची ..
आपली जोडी अनुरूप दिसणारी नाही”,
तो किती सुंदर देखणा, ती साधारण, काळी-सावळी” ,तरी
“तू खुप आवडतेस ” या त्याच्या पालुपदाने तिचा विश्वास दृढ होत गेला.
तो नवथर पाऊस थांबला , भानावर आलेल्या तिच्या मनाला गोष्टी नव्याने दिसू लागल्या,उणिवा जाणवू लागल्या .
” दिसते तसे नसते ” जाणीव झाली.
आताशा तिला वाटे –
“आपली जोडी सर्वार्थाने विजोड आहे,”
त्याच्या मनाशी जुळवून घेणे कठीण आहे .
कठपुतली “होऊन तालावर नाचले की स्वारी खुश असते.
स्वतःचेच खरे करण्याचा त्याचा स्वभाव ,म्हणजे तिच्यावर हुकूमत गाजवणे होते”.
हे जाणवल्यावर, आधी हे काहीच कसे कळले नाही ?
स्वतःच्या मूर्खपणाचा राग येऊ लागला.
अशा विचित्र माणसाची का भुरळ पडली असेल ?
अवखळ वयाचा दोष म्हणायचा का ?
ती हताश होऊन बसे.
तो समोर आला की त्याच्या विषयी आकर्षण आणि प्रेमापुढे मनात वाटणाऱ्या शंकांचा,गोष्टींचा तिला साफ विसर पडे.
तिचा स्वतःवर ताबा रहात नसे, भारवलेली ती ,
तो म्हणेल तशी जात होती, भरकटत, फरफटत …
तिच्या जवळ बसून ,प्रेमाचे शब्द बोलतांना
“पैसा, चैन, मौजमजा ” त्याच्या आयुष्याचे ध्येय आहे”.
हे ठळकपणे लक्षात येऊ लागले.
त्याला ती हवीच आहे , पण फक्त तिच्या मोठ्या पगाराच्या पैशासाठी” ,
त्याच्या मायावी प्रेमात, मोहक जाळ्यात आपण फसलोत ?
म्हणून ती स्वतःवर चिडत होती.
तिचे मित्र-मैत्रिणी समजावत-
त्याचे प्रेम फक्त तिच्या पैशावर आहे.
मौज मजा ” आणि तिची निमूटपणे साथ ” ,
हेच त्याचे प्रेम आहे”.
मैत्रिणी म्हणायच्या तिला-
-तू अशी वेडी ,खुळी कशी ग ?
अजून वेळ गेली नाही,आवर घाल स्वतःच्या मनाला.
तू सुंदर नाहीस, दिसायलाही यथातथाच ,साधी सरळ आहेस तू.
त्याच्यासारखा हिरो तुझ्यावर प्रेम करतो “, तुझ्या न्यूनगंडाचा हा मजनू गैरफायदा घेतोय.
तुझ्या शरीराचे त्याला आकर्षण वाटावे “असे तुझ्यात काहीच नाहीये, म्हणून तू “सेफ राहिलीस”असे समज.
तू त्याला पैसे देऊ नकोस,
तो गयावया करेल, हात जोडेल, पाया पडेल,
रुसेल, फुगेल, रागावेल,
कदाचित तुझ्यावर हात ही उचलेल..
तू खंबीर रहा, धीटपणे मुकाबला कर,
त्रास होईल थोडा, पण जमेल नक्की !
तिने हॉस्टेल सोडले,गावाकडे जाऊन आई-वडिलांना घेऊन आली. तिचे रुटीन बदलून गेले.
आजारी आईला उपचारासाठी दाखल करतांना ,ती त्याला
म्हणाली”
मला तुझ्या प्रेमाची, सोबतीची गरज आहे, बराच पैसा खर्च होईल,त्याची काळजी नाही.
तू सोबत रहा, तुझाच आधार आहे मला.
घडले वेगळेच…
कसला आधार, नि कसली सोबत, तो तिच्या बिनकमी प्रेमात गुंतणारा नव्हता.
त्याने तिची साथ सोडून दिली.
रोज भेटणारा तो, तिच्याकडे पहात नव्हता ,ओळख
देत नव्हता.
त्याचे बदलेले रुप, वागणे तिला मानसिक धक्का देऊन गेले.
त्याचे तिच्यावर कधीच प्रेम नव्हते, तिचे मात्र त्याच्यावर प्रेम जडले होते.
प्रेमभंग तिचा झाला होता, त्याला काही फरक पडणार नव्हता, उलट
तू नही तो और सही ..!
किती अजब प्रेम, फसवे प्रेम..
बाहेरचा “फसवा पाऊस”थांबला होता.
——————————
लघुकथा- फसवा पाऊस
लेखक- अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342
email:
arunvdeshpande@gmail.com
=========================================
संक्षिप्त परिचय- अरुण वि.देशपांडे , लेखक-कवी-बालसाहित्यिक- समीक्षक
पाटील नगर – बावधन-(बु)- पुणे.
—————
लेखन आरंभ- 1983-84
1.इंटरनेटवर लेखन-आरंभ- 2011 , 2. एकूण प्रकाशित पुस्तके- 80
——————————————–
मोठ्यांसाठी –46,बालसाहित्य – 34, , 1. प्रिंट बुक्स – 47, 2. ई बुक्स – 33
————————————————
माझे युट्युब चॅनेल: #गप्पा-गोष्ट-गाणी #अरुणविदेशपांडे @arunvdeshpande
-अरुण वि.देशपांडे-पुणे
9850177342