वाढदिवस ©® ज्योती रानडे 2025 JyotiRanade. All rights reserved.
(((((((((((( > @nish₹£€$:))))))))))
वाढदिवस
©® ज्योती रानडे
क्षमा आज खूप गडबडीत होती. बाबांचा ७० वा वाढदिवस होता! तिनं पाठवलेल्या कलात्मक आमंत्रण पत्रिका सर्व आप्त, ईष्टांना पोचल्या होत्या. पत्रिकेत लिहलेली वाढदिवसाची थीम बघून बहुतेकांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य उमटले होते..
वाढदिवसाची थीम होती: “किशोरकुमार”
ज्यांना बाबा माहित होते त्यांना ती थीम बघून आश्चर्य वाटले नाही. खाली ठळक अक्षरात लिहले होते..
“आपली उपस्थिती ही भेट सर्वात मोठी आहे. याव्यतिरिक्त इतर कोणत्याही भेटी आणू नयेत. तुमचं आवडतं किशोरकुमारचं गाणं म्हणण्याची मात्र तयारी ठेवा!”
अनंतकाका आणि शुभाकाकूंची दोन्ही मुलं, क्षमा आणि शरद, दोन तासांच्या अंतरावर रहात होती त्यामुळे येणं जाणं नियमित सुरू होतं. अनंतकाका ४० वर्ष अकाऊन्टंटची नोकरी करून निवृत्त झाले होते.
अनंतकाकांचं दैवत होतं किशोरकुमार!
देवघराबाहेरच्या भिंतीवर लावलेला किशोरकुमारचा फोटो व त्याची केलेली पूजा बघून लोकं आश्चर्यचकित होत असतं. काका गाणं शिकले नव्हते पण ते उत्तम गात असतं..
सुखकर्ता दुखहर्ता पाठोपाठ किशोरदांच्या फोटोकडे भक्तीभावाने बघत कधी “जिंदगी के सफर मे गुजर जाते है वो काम..नाहीतर “चिंगारी..” कधी आणिक काही म्हणून ते पूजा संपवत असतं. ते बघून काकू गालातल्या गालात हसतं..
किशोरदा मला बघायला मिळाले असते तर.. काका नेहमी हळहळत. ज्यांचा आवाज लाखो लोकांच्या ह्रुदयाशी पोचतो.. इतकंच काय कठीण काळी लोकांना दिलासा देतो तोच आपला परमेश्वर या तत्वावर काका ठाम होते.. किशोरदांसारखा भावनांचा समुद्र गाण्यातून ओतणारे कलाकार हाताच्या बोटावर मोजावे एवढेच असतात.. किशोरदा, दीदी, रफी हे काकांना संतांहून कमी नव्हते!
लोक काय म्हणतील म्हणून काकांनी कधीच काही बदलले नाही. कुछ तो लोग कहेंगे.. तत्वावर स्वत:ला जे हवं ते करत राहिले. आपल्या अवती भोवती असणारे सारे जग जेव्हा आनंदी असेल तेव्हाच आपण आनंदी असू यावर त्यांचा ठाम विश्वास होता. आपण या समाजातील एक घटक आहोत.. समाज नावाच्या set चा आपण subset! त्यामुळे शेजाऱ्याच्या घरात दु:ख असेल तर त्याचे पडसाद आपल्या घरी उमटणारच. हा विचार ह्रदयात घट्ट धरून ते परमेश्वराकडे सर्वांसाठी, चराचरातील किडामुंगी साठीही सुख मागत. प्रत्येकाची चौकशी करत..
काकांच्या समाजप्रेमाने व त्यातून उदभवणाऱ्या संकटांनी काकू वैतागून जात. अचानक चार सहा लोकांना जेवायला घेऊन येणारे काका फक्त आमटी भात द्यायला काय हरकत आहे म्हणत..
“अहो घरातील आवराआवरी, स्वयंपाक पाणी करणं ही मोठी कामं असतात आणि.. धर्मशाळा नाहीये ही.. असं चैतन्य महाप्रभू होऊन रहायचं होतं तर लग्न कशाला केलंत?”
यावर उत्तर न मिळता किशोरकुमारच्या गाण्याचे शब्द ऐकू येत..
तेरे चेहरे से नजर नही हटती…
काकू काही बोलण्यात अर्थ नाही म्हणून मान हलवून तिथून निघून जात.
अनंतकाकांनी खूप माणसं जोडली होती. आज ७० व्या वाढदिवसानिमित्त ७५-८० लोकं आली होती..
क्षमा व शरद यांनी एक छान हॅाल घेतला होता.. सारे पाहुणे आले होते. हमे तुमसे प्यार कितना.. चे सूर हॅालच्या काना कोपऱ्यात भरून राहिले होते..
काकांना औक्षण करून झालं.. जेवणाचा बेत उत्तम होता..
काका चार शब्द बोलण्यासाठी उठले.
“मित्रांनो व मैत्रीणींनो..तुमचे आभार कसे मानू? खूप प्रेम केलंत माझ्यासारख्या वेड्या माणसावर! खूप काही दिलं मला तुमच्या मैत्रीनं! Sometimes best present is remembering what you have..माझ्याजवळ आयुष्यभर किशोरदा होते.. सर्व सुख दु:खाच्या प्रसंगी..कधी बघायला मिळाले नाहीत पण त्यांनी मला त्यांच्या गाण्यातून कसं जगायचं शिकवलंय..
आपल्याच भावनाना ताल सुरांचं कोंदण करून त्यांनी त्या आपल्यासमोर ठेवल्या म्हणून तर आतपर्यंत पोचल्या..नाही का?
काकांचा स्वर भरून आला होता..
शुभाशी लग्न घरच्यांना मान्य नव्हतं कारण शुभा एक विधवा होती व तिला एक मुलगी होती..समाजाने शुभाला खूप नावं ठेवली..
“कुछ रीत जगत की ऐसी है हर एक सुबह की शाम हुई
तू कौन है तेरा नाम है क्या सीता भी यहा बदनाम हुई.. “
मी घरच्यांचा विरोध असूनही शुभाशी लग्न केलं आणि मी क्षमाचे वडील बनलो.. खरच अशी लेक मला मागूनही मिळाली नसती!
… “तू और मै कही मिले थे पहले” देखा तुझे तो दिलने कहा ..
जाने तू या जाने ना.. माने तू या माने ना..
तेरा मुझसे है पहले का नाता कोई…
काकांचा स्वर सुरेख लागला होता आणि क्षमा गहिवरून गेली होती..
माझ्या मोठ्या आजारात मी केवळ “रूक जाना नही..” ऐकत असे.. म्हणूनच मी त्यातून बाहेर पडलो.. मी किशोरदांमुळे संकटात उभा राहायला शिकलो.. शरद पण उत्तम गातो. तो मला हॅास्पिटलमधे “कभी अल्विदा ना कहना.. म्हणून दाखवत असे..
काका किशोरदांच्या गाण्यातलं तत्वज्ञान उपडं करून सर्वांसमोर ठेवत होते. कवी, म्युझिक कंपोझरचही कौतुक करत होते.. पाहुणेही काकांबरोबर गात होते..
> @nish₹£€$:
तेवढ्यात बाहेर काही गलका ऐकू आला..दारातून किशोरदांची प्रतिकृती असलेले अमितकुमार आत आले.. तोच चेहरा, तोच उत्साह आणि तोच भारदस्त आवाज..
भाईयो और बहनो.. जब, क्षमा दीदीने मुझे बताया के उनके पिताश्री मेरे पापा के भक्त है.. मुझे उनके मिलनाही था। मै पार्टी मे जाने के पैसे लेता हू लेकिन जहा मेरे पापा को भगवानके साथ बिठाया गया है उनसे मै कैसे पैसे ले सकता हॅू? मैने आजतक ऐसा भक्त कही नही देखा। So I came here to see my father’s सच्चा devotee..
काका, आपको बहुत बहुत बधाई। हा मेरे पापा असामान्य थे। अपने चाहनेवालोंपर बहुत प्यार करते थे..अमितकुमार वडिलांच्या आठवणी बोलत राहिले..
जिंदगी ऐ सफर है सुहाना..च्या यॅाडलिंगमधे अमितकुमारांनी साऱ्यांना किशोरदांची आठवण करून दिली.. काका ही त्यांच्याबरोबर गात होते.. लोकांनी सुरात सूर मिळवला होता..फर्माईश येत होती..
काकांची भक्ती आज कारणी लागली होती.. भक्ती कुणाचीही करा..मनापासून केली की ती पावते म्हणणारे काका आज त्या भक्तीचा महिमा अनुभवत होते..
अमितकुमार अर्ध्या तासांत पपा व स्वतःच्या अनेक सुंदर गाण्यांचा पाऊस पाडून परत गेले होते..
शरद क्षमाकडे आश्चर्याने बघत होता. “हे कसं जमवलेस ताई?”
“अरे गेलं वर्षभर प्रयत्न करतेय.. अमितकुमारांना आमंत्रण करण्यासाठी पण ते भेटतच नव्हते.
.. शेवटी बाबा किशोरदांची पूजा करत असलेला विडिओ, फोटो व पत्र पाठवलं. काही आशा नव्हती उत्तराची पण त्यांनी मला लगेच फोन केला व ते येतो म्हणाले..बाबांचा चेहरा बघ ना! सगळ्या श्रमाचं चीज झालं..
बाबांच्या मित्रांबरोबर गात होते.. एक चतुर नार… मित्र हसत डोलत होते. काहीजण नाचत होते.. काकू कौतुकाने बघत होत्या..
भारतीय संस्कृतीनं गाणी, भावगीतं, नाट्यगीतं यांतून जीवनाचं केवढं मोठं तत्वज्ञान शिकवलय हे सर्वांना जाणवत होतं..
आणि क्षमा नावाच्या चतुर नारीकडे शरद आश्चर्याने बघत राहिला.. तिनं बाबांचं ऋण अंशत: तरी फेडलं होतं..
ये जीवन है.. चे सुर गुणगुणत तो हा जगावेगळा वाढदिवस मनापासून एन्जॅाय करत होता..
थोड़े ग़म हैं, थोड़ी ख़ुशियाँ
यही है, यही है, यही है छाँव-धूप
ये जीवन है…
©® ज्योती रानडे
2025 JyotiRanade. All rights reserved.